तब्बल दोन वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर छोट्या पडद्यावर पुन्हा आलेली अभिनेत्री मौली गांगुली लवकरच एण्ड टीव्ही वाहिनीवरील ‘बाल शिव’ या पौराणिक मालिकेत अनुसूयाची प्रमुख भूमिका साकारताना पाहायला मिळणार आहे. भगवान शिव व त्यांच्या विविध अवतारांबाबत विविध कथा सादर करण्यात आलेल्या आहेत, पण त्यांच्या बालपणाची कथा आतापर्यंत सांगण्यात आलेली नाही. महादेव शंकराचे बालपण, त्यांचे आईवरील प्रेम याबाबतही मालिकांमध्ये कधी दाखवण्यात आलेले नाही. शिवाचे हेच रूप झी स्टुडिओज निर्मित या मालिकेत पाहायला मिळेल. यात शंकराच्या आईच्या म्हणजे महासती अनुसूयेच्या भूमिकेत मौली गांगुली दिसेल.
याबाबत ती म्हणते, लक्षवेधक पटकथा व सुप्रसिद्ध कलाकार असलेल्या या मालिकेचा भाग असणे माझ्यासाठी महत्त्वपूर्ण क्षण आहे. अशा लक्षणीय भूमिकेसाठी निवडणे जाणे हे माझे भाग्य आहे. मी माझ्या करिअरमध्ये विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत, पण ही भूमिका निश्चितच वेगळी आहे. अनुसूयामध्ये दयाळूपणा व निश्चयीपणाचे परिपूर्ण संतुलन आहे. ती गुरूकुल व त्यामधील मुलांची उत्तमरित्या काळजी घेते, त्यांना सर्वोत्तम ज्ञान देते आणि त्यांच्यामध्ये शिस्तबद्धता बिंबवते, असेही तिने स्पष्ट केले. ही मालिका ३१ ऑगस्टपासून सुरू होणार आहे.