जगातील सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटू अशी ख्याती असलेला लिओनेल मेसीचा भारत दौरा आयोजकांनी उत्तमपणे विकला. यातून मेसीनं आणि आयोजकांनी मोठी कमाई केली. कोलकातात फसलेल्या उपक्रमातून धडा घेत अन्य शहरांत मेसीदर्शन यथोचित होईल, याची काळजी घेण्यात आली. परंतु तरीही महानायक मेसीचं भारताने काय करायचं? हा प्रश्न पडतोच. याचीच उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न.
तो आला, त्यानं पाहिलं, त्यानं जिंकलं, असं १०० टक्के म्हणता येणार नाही. कोलकातात अस्सल चाहत्यांनी जे केलं, ते जगानं पाहिलं. मग हैदराबाद, मुंबई आणि दिल्लीत सावधपणे सावरलं. म्हणजे कोलकाता तोडफोडीची पुनरावृत्ती होऊ नये, म्हणून पैसे मोजून आणलेल्या फुटबॉलरसिकांचं ‘मेसीरंजन’ होईल, याची काळजी घेण्यात आली. कोलकाताच्या घटनेमुळे काही मंडळींना ‘चुकलं आमचं काही तर क्षमा असावी’ असा उमाळा येईल. पण, मेसी आला आणि कमावून गेला, हे नक्की.
अर्जेंटिनाचा विश्वविजेता फुटबॉलपटू लिओनेल मेसी यानं भारतात येण्यासाठी १५० कोटी रुपयांची सुपारी घेतली. ‘गोट (सर्वकालिन सर्वोत्तम) इंडिया टूर’ हा घाट घालणार्या मंडळींनी या सुपीक कल्पनेचं आर्थिक चीज करीत आपला गल्ला भरला. हजारो, लाखो रुपयांची तिकीटं लावून मेसी दर्शनाचं कुंभाड रचलं. कोलकातामध्ये ते फसलं. परिणामी चाहत्यांच्या भावनांचा उद्रेक झाला. मग संतप्त फुटबॉलचाहत्यांनी हा घोटाळा आहे, असा आरोप करीत स्टेडियमची नासधूस केली. पण तीन दिवसांच्या एकंदर मेसी दौर्याचा आढावा घेतल्यास आयोजकांची योजना यशस्वी झाली, असं म्हणता येऊ शकतं. खिशात पैसे असलेले फुटबॉलप्रेमी, नेतेमंडळी हेच त्याचे लाभार्थी ठरले. बाकी तुम्हा-आम्हासारख्या सर्वसामान्यांनी टीव्ही/डिजिटल माध्यमांवर हा खेळ पाहिला. कुणी बोट दाखवू नये, म्हणून या कमाईतील काही भाग सामाजिक कर्तव्यभावनेतून ‘महा-देवा’सारखे उपक्रम देशात उभे करीत त्या मुलांनाही मेसीसोबत काही वेळ घालवण्याचं पुण्यकर्म करण्यात आलं.

दौर्याच्या प्रारंभीच कोलकातामधील लेक डाऊन परिसरात विश्वविजेत्या मेसीच्या पुतळ्याचं अनावरण झालं. त्यावर १० कोटी खर्च झाले. त्याचवेळी २०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयानं अखिल भारतीय फुटबॉल महासंघाला दिलेला निधी आहे अवघा ८.७८ कोटी रुपयांचा. ही आकड्यांची तफावत बरीचशी बोलकी आहे. मेसीच्या या अफाट यशस्वी दौर्यातून किंवा त्याच्या पुतळ्याकडून प्रेरणा घेत आपल्या देशात जागतिक किंवा क्लब दर्जाचे फुटबॉलपटू घडतील का? म्हणूनच प्रश्न पडतो, मेसीचं आपण काय करायचं? जागतिक लोकसंख्येत भारतानं चीनलाही मागे टाकत अग्रस्थान गाठलंय. तसंच जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलेला हा देश आहे. पण ‘फिफा’च्या जागतिक फुटबॉल क्रमवारीत भारताचं स्थान १४२वं आहे. जे अत्यंत निराशाजनक आहे. अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा या देशांमध्ये पुढील वर्षी होणार्या विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ४८ देश खेळणार आहेत; पण भारत त्यांच्या खिजगणतीतही नाही. जेमतेम दीड लाख लोकसंख्येचं कुराकाओ हे कॅरेबियन राष्ट्र आणि सव्वापाच लोकसंख्येचं केप वर्दे हे आप्रिâकन राष्ट्रही विश्वचषकासाठी पात्र ठरतं; पण क्रिकेटपेक्षाही कमी खर्चिक अशा फुटबॉलमध्ये भारताला हे साध्य करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
भारतीय फुटबॉलसाठी उत्तमोत्तम खेळाडू घडावे, ‘आयपीएल’सारखं अर्थकारण निर्माण व्हावं आणि खेळाडूंना पैसा मिळावा, या हेतूनं इंडियन सुपर लीग (आयएसएल) रडत-खडत चालू होती. ती चालू ठेवण्यासाठी वर्षाला २७५ कोटी रुपये लागतात. पण हा खर्च करायला कुणीच धजावत नाही. सध्या आर्थिक गुंतागुंत सोडवण्याची कुणाचीही इच्छा नसल्यामुळे या लीगचं भवितव्य अधांतरी आहे. श्रीमंत सौदी अरेबियातील अल नासर फुटबॉल क्लबनं जसं ख्रिस्तीयानो रोनाल्डोला खेळवून जगात आपला रुबाब दाखवला, तो प्रयोग मेसीला ‘आयएसएल’मध्ये खेळवून दाखवता आला असता आणि अर्थकारणही उंचावता आलं असतं. पण याचं गांभीर्य कुणाला कळणार? २०२६मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक भारतात होतोय. मग २०३०ची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धाही भारतात होतेय. अहो, २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या यजमानपदाची दावेदारी केली जातेय. केंद्रबिंदू अर्थात अहमदाबाद; पण फुटबॉलबाबत असा काही महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्याची मानसिकता देशातील क्रीडाधुरिणांकडे नाही.
देशातील फुटबॉलची शिखर संघटना म्हणजे अखिल भारतीय फुटबॉल महासंघ. त्यांच्या कारभाराबाबतही ‘फिफा’ समाधानी नाही. परिणामी पुन्हा निलंबनाची कारवाई झाल्यास मुळीच आश्चर्य वाटू नये. या संघटनेचे अध्यक्ष कल्याण चौबे माजी
फुटबॉलपटू आहेत. परंतु देशातील सर्व क्रीडा संघटनांवर भाजपाचं नेतृत्व असावं, याच भूमिकेतून त्यांच्याकडे हे पद चालून आलंय. या चौबे यांनी भारतीय फुटबॉलचा महानायक बायच्युंग भूतियाला हरवून अध्यक्षपद मिळवलंय, हेच त्यांचं मोठेपण. इतकं यश मिळवून देशात फुटबॉल संस्कृती घडण्यासाठी काही ठोस पावलं उचलली गेली असती, तर निश्चितच कौतुकास्पद ठरलं असतं.

आठ वर्षांपूर्वी भारताचा तारांकित फुटबॉलपटू सुनील छेत्री याने मुंबईत फुटबॉलचाहत्यांना आर्जवी हाक देताना म्हटलेलं की, ‘‘आमच्यावर रागावा, हवं तर शिव्याही द्या; पण आमचा खेळ पाहायला मैदानावर या!’’ वानखेडे स्टेडियमवर रविवारी झालेल्या प्रदर्शनीय सामन्यात छेत्री खेळला. मेसीसाठी इतके पैसे खर्चून देशवासी आलेत, हे पाहून तोही भारावला. क्लब फुटबॉल, युरोप, आप्रिâकन, ‘फिफा’ विश्वचषकाच्या उत्सवात रमणारे आणि त्यांचे सामने पाहण्यासाठी रात्रभर जागणारे हे देशवासी मेसीलाच नव्हे, तर रोनाल्डो, नेयमार, एम्बाप्पे या जागतिक कीर्तीच्या तार्यांना डोक्यावर घेतात. मँचेस्टर युनायटेड, रेयाल माद्रिद, बार्सिलोना, इत्यादी काही फुटबॉल क्लब आणि त्यांच्याकडून खेळणार्या जागतिक तारांकित फुटबॉलपटूंच्या नोंदीही तोंडपाठ ठेवतात. पण देशातल्या फुटबॉलविषयी त्यांना कोणतंच सोयरंसुतक नसतं.
१९५० आणि १९६०च्या दशकांमध्ये प्रशिक्षक सय्यद अब्दुल रहीम यांनी भारतीय फुटबॉलला सुवर्णकाळ दाखवला. गतवर्षी प्रदर्शित झालेला अजय देवगणचा ‘मैदान’ हा हिंदी चित्रपट रहीम यांच्यावरच बेतलेला; पण तो सिनेमाही देशात अयशस्वी ठरला. २३५ कोटी रुपयांच्या ‘मैदान’नं जेमतेम ६८ कोटींची कमाई केली. अजय देवगणही मेसीभेटीच्या भाऊगर्दीत हजर होता. रहीम यांच्या काळात चुन्नी गोस्वामी, पीके बॅनर्जी आणि तुलसीदास बलराम ही भारतीय फुटबॉलमधील त्रिमूर्ती बरीच गाजली. या तिघांपैकी कुणाचाही पुतळा देशात अस्तित्वात नाही. या त्रिमूर्तीमुळे भारताला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्णपदकं कमावता आली.
ऑलिम्पिकमध्ये भारतानं पराक्रम गाजवला, तर विश्वचषकात खेळण्याचं स्वप्न शूजचा अभाव, आर्थिक अडचणी, ९० मिनिटांचा सामना खेळण्याची असमर्थता, आदी अनेक कारणास्तव अधुरं राहिलं. या सुवर्णकाळानंतर भारतातील दोन तेजस्वी फुटबॉलपटूंनी दखल घेण्यास भाग पाडलं. त्यापैकी एक म्हणजे भुतिया, जो निवृत्तीनंतर संघटनात्मक घडी लावण्यासाठी धडपडतोय. तर दुसरा छेत्री, आपला वारसा चालवू शकेल असा पर्याय नसल्यानं निवृत्ती मागे घेत ४१व्या वर्षीही खेळतोय. पण तरीही मेसी आम्हांसी आवडे, तर छेत्रीचे वावडे! आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील सर्वाधिक गोल करणार्या फुटबॉलपटूंच्या यादीत पोर्तुगालचा रोनाल्डो (१४३ गोल) अग्रस्थानी आहे, तर मेसी (११५ गोल) दुसर्या आणि अली दाई (१०८ गोल) तिसर्या स्थानावर आहे. पण यादीतल्या चौथ्या क्रमांकावर ९५ गोल खात्यावर असलेल्या भारताच्या छेत्रीच्या नोंदी काही मोजक्याच देशी फुटबॉलरसिकांचं लक्ष वेधतात.
बरं मेसीचे विचार भारतात ऐकावे आणि त्यातून प्रेरणा घेत खेळाडू घडावे, तर तिथेही निराशा. मेसीला इंग्रजीही बोलताच येत नाही. त्यामुळे मेसीच्या भारत दौर्यातील प्रमुख उद्देश म्हणजे दूर-दर्शन आणि त्याद्वारे आयोजक आणि या महानायकाची कमाई हाच होता, हे सूर्यप्रकाशाइतकं सुस्पष्ट. म्हणूनच मेसीचं काय करायचं? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरित राहतं…
