जुन्या काळातली गोष्ट.
नवे नवे फोन आले होते. काळ्या रंगाचे. गोल चकतीच्या डायलचे. गर्रगर्र नंबर फिरवून फोन जोडावा लागायचा. परगावात फोन करायचा असेल, तर टेलिफोन एक्स्चेंजला फोन करून लाँग डिस्टन्स कॉल केला जायचा. हा कॉल खासगी राहू शकत नसे. कारण, तो जोडून देणारा किंवा देणारी ऑपरेटर तो ऐकू शकत असे.
मुल्ला नसरुद्दीनला एक दिवस असाच एक कॉल आला. पलीकडे माजुद्दीन होता. ऑपरेटरने सांगितलं, ‘मुल्ला नसरुद्दीन, तुमच्यासाठी झुमरीतलय्याहून माजुद्दीनचा फोन आहे.’
माजुद्दीन बोलू लागला, ‘हॅलो, नसरू माझा आवाज ऐकायला येतोय का, अरे मी इकडे झुमरीतलय्याला आलोय, माझे सगळे पैसे संपलेत. मला तातडीने हजार रुपये पाठवून देशील का मनीऑर्डरने? आल्यावर देतो तुला.’
मुल्ला इकडे फोनवर ‘हॅलो, हॅलो, कोण बोलतंय, मोठ्याने बोला, काही ऐकायला येत नाहीये… खाजुद्दीन कोणी माझ्या ओळखीचे नाहीत… मजार… कोणती मजार…’ असला टाइमपास करत होता.
अखेर ऑपरेटरने शब्दक्षेप करून मुल्लाला म्हटलं, ‘मुल्ला नसरुद्दीन, तिकडून ते माजुद्दीन जे काही बोलतायत, ते मला अगदी स्पष्ट ऐकू येतंय.’
‘हो का?’ मुल्ला निरागसपणे म्हणाला, ‘मग तुम्हीच पाठवून द्या ना हजार रुपये त्याला!!!’