मी विमानातून उतरताना पाहिले की मुंबई कुठे सरकली का? हरवली का? उत्तरेकडे गेली का? तर नाही, मला मुंबई आहे तिथेच दिसली. काही लोकांची बुद्धी सरकली आहे…’
हे वक्तव्य आहे बुद्धिवान देवाभाऊ यांचे! यांना आणि यांच्या पक्षाला लोकसभा, विधानसभा निवडणुका आल्या की हिंदू खतरे में का दिसतो?’कटेंगे तो बटेंगे’ हा राग बटवारा ते का आळवतात? महाराष्ट्रातील उद्योग गुजराथकडे किती गेले यावर एक शब्दही हे बुद्धिवान बोलले नाहीत. बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राने पैसे मोजले आहेत की नाही? मग तिची सुरुवात गुजराथमधील बिलीमोरापासून अहमदाबाद अशीच का? मुंबईतील हिरे बाजार गुजराथमध्ये कुणी हलविला? नेहरूंनी? धारावी येथील जागा गुजर्याला कुणी विकली?
नवी मुंबई विमानतळ , छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ याचे सर्व ऑपरेशन्स कुणाकडे सोपविले… गुजराथी दोस्ताकडेच ना?
गुजराथ्यांच्या बिल्डिंगमध्ये मराठी माणसांना विरोध का होतो? अटल सेतू संपल्यावर सर्व जमीन कुठल्या गुजराथी व्यावसायिकाची आहे?
पालघरमधील किती गावांवर गुजराथने हक्क सांगितला आहे? मराठी सक्तीची करणार… कशी? प्रचाराची गुजराथी पत्रके पोस्ट करून?
किती गुजराथी मंत्री होते, आहेत आणि राहतील महाराष्ट्र सरकारमध्ये? मागील टर्ममध्ये किती गुजराथी नगरसेवक जिंकले होते आपल्या पक्षातील?
सर्वात महत्वाचं म्हणजे आता प्रचाराला किती गुजराथी येणार आहेत याची आपण कल्पना तरी करा की हो देवा भाऊ!
बुद्धी कुणाचीही सरकलेली नाही कारण निकष तोच लावला तर पाकिस्तान देखील स्वतंत्र होण्यापूर्वी जिथे होते तिथेच आज देखील आहे… मुंबई जिथल्या तिथे आहे म्हणजे तशीच आहे, असे तुमचे म्हणणे असेल तर काय करावे हे तुम्हाला लहान मुलगा देखील सांगेल…
आपण जे शिवसेना आमदार पळविले ते काय कर्नाटकात गेले होते सर्वप्रथम की छत्तीसगढमध्ये? तर ते गुजराथ येथे नेण्यात आले; पुढे काय झाले हे सांगायला नको की विचारायलाही नको! भाषणात जय गुजराथ म्हणणारे उद्धव ठाकरे होते की एकनाथ शिंदे… हे आपल्याच बुद्धीला एकदाच विचारा! सुझुकी प्लांट महाराष्ट्रात न येता गुजराथ येथे कसा गेला? व्हायब्रंट महाराष्ट्रचा व्हायब्रंट गुजराथ कोणी केला? सत्ता परिवर्तन झाल्यावर जी व्यक्ती आपल्याला उरावर घेऊन नाचली ती मराठी होती की अमराठी? तो आनंद मराठी माणूस का घेऊ शकला नाही? नाशिकचे नारपार योजनेचे पाणी महाराष्ट्राच्या वाट्याला न येता ते गुजराथकडे वळविण्याचे आटोकाट प्रयत्न आपण का हाणून पाडत नाही? मोरारजी देसाई यांना गो बॅक करणार्या आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सामील झालेल्या संघाच्या फक्त दोन क्रांतिकारकांची नावे सांगा? बाबरी पतन होताना शिक्षा झालेले किंवा कारसेवक म्हणून मेलेले दोन गुजराथी कळवा. छत्रपती शिवाजी महाराज यांचा धडा गुजरात पाठ्यपुस्तकातून का वगळला गेला याचे उत्तर देता येईल आपणास?
ठाकरे यांच्या हजार चुका असतील पक्षांतर्गत, तो त्यांचा पक्ष आहे. महाराष्ट्र मात्र त्यांनी जो १८ महिने सांभाळला तो अत्यंत बिकट असा अखंड कोविड काळ होता. आणि निश्चित त्यांनी तो प्रश्न, ते संकट उत्तम हाताळले. तुम्हाला एक कोल्हापूर जिल्ह्याचा महापूर हाताळता आला नव्हता हेही आपण विसरत आहात. आपल्या पहिल्या टर्ममध्ये २०१५ ते २०१९ या चार वर्षांत एकूण १५३२९ शेतकर्यांनी स्वतःला संपविले, याचे कधीतरी शल्य वाटते का आपल्याला?
आज महाराष्ट्रात गुन्हेगारी कुठे नेऊन ठेवली आहे आपण? होय, आपणच, कारण आपण या राज्याचे गृहमंत्री देखील आहात ना?
तुमचा पक्ष मुंबई गुजराथींना आंदण देणार, हे सांगण्यात चुकीचे काय आहे? पाच सात वर्षापूर्वी भारताचे प्रधानमंत्री, भारताचे राष्ट्रपती, भारताचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, भाजपा पक्षाध्यक्ष, नीती आयोग अध्यक्ष सर्व सर्व गुजराथी होते की नव्हते? उद्या ते महाराष्ट्राचे होऊ शकतील? मफतलाल, ढोलकिया, अदानी, अंबानी, अशा अनेक उद्योगपतींची मुंबईतील एकूण उलाढाल किती आहे, हेही आपणास ठाऊक नसावे! आज मेट्रो, मोनोरेल कुणाकडे आहे? त्यामुळे नैसर्गिकरित्याही कुणीही मराठी माणूस मान्य करेल की महाराष्ट्रात मुंबई आहे परंतु मुंबईत महाराष्ट्र नाही!
