
ट्वेंटी-२० विश्वचषकातील भारत-पाकिस्तान या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांमधील लढत विलक्षण एकतर्फी ठरली. पण तिचं कवित्व मोठं. भारताविरुद्ध सामन्यावर बहिष्काराचं पाकिस्ताननं उगारलेलं राजनैतिक अस्त्र का पुन्हा म्यान करण्यात आलं? राष्ट्रप्रेमाच्या भावनांची गुंतवणूक करून अर्थप्राप्ती हे सूत्र कुणाच्या फायद्याचं ठरतं? गेल्या तीन-चार दशकांत प्रतिष्ठा पणाला लावणारा भारत-पाकिस्तान सामन्याचा अट्टाहास नेमका कशासाठी असतो? याच प्रश्नांची उत्तरं शोधणारा हा लेखाजोखा.
भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना म्हणजे साक्षात धर्मयुद्धच असतं, असं पाकिस्तानचा माजी विश्वविजेता कर्णधार आणि माजी पंतप्रधान इम्रान खान एके काळी अभिमानानं म्हणायचा. आता या परंपरागत प्रतिस्पर्ध्यांची लढत फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) जागतिक स्पर्धांमध्ये अनुभवायला मिळते. बाप आखिर बाप होता है… परंपरा, प्रतिष्ठा और अनुशासन… अशा प्रक्षेपण वाहिन्यांच्या अनेक जाहिरातींमधून या सामन्याचं मोठेपण विस्तारलं जातं. यात प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमं महायुद्ध, हाय व्होल्टेज
मॅच, मैदान ए जंग, जिहाद आदी अनेक विशेषणांसह भर घालतात. समाजमाध्यमांवर तर युद्ध पेटतं. या निमित्तानं दोन संघांमधील ज्वलंत इतिहासाची पानं पुन्हा चाळली जातात.
जावेद मियाँदादनं चेतन शर्माला शारजात मारलेला षटकार असो, जावेद मियाँदाद आणि किरण मोरे यांच्यातील जुगलबंदी असो, सचिन तेंडुलकर आणि शोएब अख्तर यांच्यातील द्वंद्व असो, पहिल्या ट्वेन्टी-२० विश्वचषकात साखळीतील सामना ‘टाय’ झाल्यानंतरचा ‘बॉल आऊट’चा थरार आणि मग अंतिम सामन्यातील जोगिंदर शर्माच्या अखेरच्या षटकानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली उंचावलेलं विश्वविजेतेपद असो, या सर्वोच्च वैराला महत्त्व प्राप्त झाल्यानंतर सचिनचं आणि नंतर विराट कोहलीचं आक्रमण असो, किंवा हस्तांदोलन टाळण्याची भूमिका असो… हे सर्व डोळ्यांसमोर उभे केले गेले. इतकी सारी उत्सुकता, उत्कंठा आणि उत्कटता असली तरी प्रत्यक्ष मैदानावर ना रोमहर्षक लढत, ना खुन्नसमय लढत. एकतर्फी सामन्यानं त्याची सांगता. १५ फेब्रुवारीला याच इतिहासाचं आणखी एक पान लिहिलं गेलं. भारतानं पाकिस्तानवर ६१ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
१९७५पासून एकदिवसीय प्रकारातील विश्वचषकाला प्रारंभ झाला. पण पहिल्या चारही विश्वचषकांत दोन्ही संघ एकमेकांशी भिडले नव्हते. १९९२ची विश्वचषक स्पर्धा ही अनेक दृष्टीनं महत्त्वाची होती. रंगीत गणवेश आणि त्यावर खेळाडूंची नावं, पांढरा चेंडू, प्रकाशझोतातील सामने, क्षेत्ररक्षणाच्या वर्तुळाचा नियम, इत्यादी. याच विश्वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान संघ एकमेकांशी पहिल्यांदा भिडले. मियाँदादनं मोरेची कळ काढून या सामन्यात नाट्य आणलं. माध्यमांना हेच नाट्य टिपायचं आणि जोपासायचं, हे कळून चुकलं. पण प्रत्यक्षात भारत-पाकिस्तान क्रिकेटद्वंद्वाची विश्वचषकातील आकडेवारी ही मात्र विलक्षण एकतर्फी आहे. एकदिवसीय विश्वचषकातील आठपैकी आठ सामने भारताने जिंकलेत. ट्वेंटी-२० विश्वचषकातील नऊपैकी आठ सामन्यांत भारतानं विजय मिळवलाय. अपवाद फक्त २०२१च्या विश्वचषकाचा ठरलाय. दुबईत पाकिस्ताननं १० गडी राखून विजय मिळवलेला. ‘आयसीसी’ चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतच फक्त दोन्ही संघांनी प्रत्येकी ३-३ सामने जिंकलेत.
विश्वचषकातील भारताचं वर्चस्व अबाधित असतानाही हा सामना पाहावा असं दोन्हीकडच्या जनतेला वाटतं. कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमची क्षमता होती, जेमतेम ३५ हजार. पण ८५ हजार क्रिकेटचाहत्यांना हा सामना पाहायची इच्छा होती. त्यामुळे तिकीटांचे दर, भारत-श्रीलंका हवाई प्रवास भाडे, कोलंबोतील हॉटेल भाडे हे सारे गगनाला भिडलेले. यातून लंकेत अर्थकारण नक्की निर्माण झालं. पण यापेक्षा खूप मोठी अर्थप्राप्ती या सामन्याच्या प्रक्षेपणातून झाली. सध्या जाहिरात दरही २५ टक्के वाढवण्यात आलेत. १० सेकंदांच्या टीव्ही जाहिरातीसाठी ३०-४० लाख रुपये, तर डिजिटल जाहिरातीसाठी १५-२० लाख रुपये मोजावे लागले. कारण जवळपास ४७ कोटी प्रेक्षकसंख्या. अपेक्षेप्रमाणेच हा सामना पाहण्याचा विक्रम मोडीतही निघाला. जवळपास एक-तृतीयांश भारतीयांनी हा सामना पाहिला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील विश्वचषकाचा सामना झाला नसता, तर आयसीसीचं १४७० कोटी रुपयांचं नुकसान झालं असतं. यात प्रक्षेपण हक्क असलेल्या ़कंपनीस नुकसान भरपाई, तिकीटविक्रीतून होणारं नुकसान, पुरस्कर्त्यांना भरपाई यांचा समावेश होता. भारत-पाकिस्तान सामना हा विश्वचषकाचा आर्थिक कणा आहे, असं ‘आयसीसी’चे माजी मुख्य वित्त अधिकारी फैजल गहसन यांनी म्हटलेलं. कारण विश्वचषकाची कार्यक्रमपत्रिका ठरवताना म्हणजेच गटवारीनुसार सामन्यांची योजना आखताना भारत-पाकिस्तान यांच्यात किमान एक आणि बाद फेरीत पोहोचल्यास संभाव्य एक सामना होईल, याची काळजी घेतली जाते. कारण जिओस्टारचा ‘आयसीसी’शी भारतामधील प्रक्षेपण हक्काचा २०२४-२७साठीचा करार सुमारे ३.०४ अब्ज डॉलर्स रकमेचा आहे. यात प्रत्येक वर्षी किमान एक जागतिक स्पर्धा होईल, असं आश्वासन देण्यात आलंय. त्यानुसार २०२४मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धा, २०२५ मध्ये चॅम्पियन्स करंडक स्पर्धा, सध्या चालू असलेली ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धा आणि पुढील वर्षी होणारी एकदिवसीय प्रकाराची विश्वचषक स्पर्धा यांचं नियोजन आहे. पण गतवर्षी डिसेंबरमध्ये जिओस्टारनं आयसीसीला आपण हा करार स्थगित करू इच्छितो, असं सांगून दडपण आणलं. जिओस्टारनं चालू करारात तोटा झाल्याचे आकडे सादर करून कराररकमेत कपात करण्याची मागणी केली. अडचणीत आलेल्या (?) ‘आयसीसी’नं नव्या प्रक्षेपण कंपनीची शोधाशोध सुरू केली. पण भारतदेशी रिलायन्सच्या मालकीच्या जिओस्टारची एकाधिकारशाही (मोनोपली) असल्यानं नवा पर्याय मिळणं सोपं नाही, याची सर्वांनाच कल्पना होती. पण भारत-पाकिस्तान सामना व्हावा, यासाठीचंच हे दडपण होतं.

या सर्व राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली, ती मुस्ताफिझूर रेहमान प्रकरणामुळे. ‘आयपीएल’च्या लिलावात खरेदी केलेल्या या एकमेव बांगलादेशी खेळाडूला संघात स्थान देऊ नये, असा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानं ‘बीसीसीआय’नं घेतल्यामुळे हे वातावरण चिघळलं. बांगलादेशमध्ये ‘आयपीएल’चं प्रक्षेपण स्थगित करण्याचे आदेश निघाले. हे प्रकरण राजनैतिक झालं आणि बांगलादेशनं विश्वचषकासाठी भारतात जाणं सुरक्षेच्या दृष्टीनं धोक्याचं ठरेल, असं सांगत ते त्रयस्थ ठिकाणी म्हणजे श्रीलंकेला स्थलांतरित करण्याची मागणी केली. ही मागणी पाकिस्तान वगळता सर्व देशांच्या पाठबळामुळे १४-२ असं मतदान घेऊन फेटाळण्यात आली. तसंच बांगलादेश क्रिकेट मंडळाची हकालपट्टी करीत त्या जागी स्कॉटलंडचा समावेशही करण्यात आला. नेमक्या याच कालखंडात पाकिस्तानला आपलं नाट्य उभं करायची संधी मिळाली. आशिया चषक घेऊन पळून गेलेले पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे कार्याध्यक्ष ‘नटसम्राट’ मोहसीन नक्वी यांनी भारताशी विश्वचषकात खेळणार नाही, असा अबोला धरला. पाकिस्तानच्या सरकारनंही नक्वी यांच्या नकलांचं समर्थन केलं. पण अखेरीस त्यांनी ‘आयसीसी’च्या निर्देशाकडे मान झुकवली. यासाठी आधी बर्याच मागण्या करीत वेठीस धरण्याचा प्रयत्न झाला. पण त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यांना या आडकाठीच्या वृत्तीमुळे फार तर थोडा आणखी पैसा मिळेल.
बांगलादेशनं जेव्हा विश्वचषकातून बाहेर पडण्याची धमकी दिली, तेव्हा त्याचं कुणालाच गांभीर्य वाटलं नाही. पण पाकिस्ताननं जेव्हा भारताशी खेळणार नाही, असं फर्मान काढलं, तेव्हा मात्र ‘आयसीसी’ला खडाडून जाग आली. कारण तोटा त्यांच्याच वाट्याला येणार होता. मग त्यांचं मन वळवण्यासाठी खास शिष्टमंडळ नेमण्यात आलं आणि त्यांनी आपली भूमिका चोख बजावलीही. या सर्व प्रक्रियेत पाकिस्तानची सोबत करणार्या बांगलादेशानंही आर्थिक दंड माफ करून घेतला आणि काही मागण्यांच्या खिरापतीही पदरी पाडून घेतल्या. एकेकाळी हिंदुस्थानचाच भाग असलेल्या या दोन देशांना दोन स्वतंत्र नियम कशासाठी? कारण भारत-बांगलादेश सामना झाला काय किंवा नाही झाला काय, तो पाहण्यात कोणतंही अर्थकारण नाही. परंतु भारत-पाकिस्तान सामन्यात मोठी आर्थिक गणितं आहेत. भावनांची गोळाबेरीज करून गल्ला भरण्यासाठी हा सामना हवाच. म्हणून हा सामना कोणत्याही परिस्थितीत होणार याची क्रिकेटरसिकांना खात्री होती.
भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थिती काही आजचीच नाही. १९७१पासून दोन देशांमधील वातावरण हे बिघडलेलंच आहे. गेल्या काही दशकांत पाकिस्तानच्या दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत. १९९१मध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाकिस्तानला भारतात खेळू देणार नाही, अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी शिशिर शिंदे यांनी शिवसैनिकांच्या साथीनं वानखेडे स्टेडियमची खेळपट्टी खणली होती. त्यानंतर भारत-पाकिस्तान सामने कमी होऊ लागले. १९९९मध्ये कारगिल युद्ध चालू असतानाही इंग्लंडमध्ये एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना झाला. उभय संघांमधील अखेरची कसोटी मालिका झाली, ती नोव्हेंबर २००७मध्ये. मग २००८च्या मुंबई हल्ल्यामुळे दोन्ही देशांतील राजनैतिक संबंध बिघडले. पुढे २००९मध्ये लाहोरच्या गदाफी स्टेडियमबाहेर श्रीलंकन क्रिकेट संघाच्या बसवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट ठप्प झालं. मग २०१२मध्ये छोटेखानी एकदिवसीय मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. ही दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांमधील अखेरची मालिका. भारतानं पाकिस्तानमध्ये जाणं थांबवलं आणि त्यांच्यासोबत ‘आयसीसी’चं सहयजमानपद सांभाळणं टाळण्याचंही धोरण स्वीकारलं. या दरम्यान पाकिस्तानचा संघ २०१६मध्ये ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतात आला आणि कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला. मग २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकात. हा प्रतिष्ठेचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. पण गतवर्षीच्या ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पाकिस्तानशी लढत योजनापूर्वक त्रयस्थ ठिकाणी होईल, याची काळजी घेतली जाते.
भारत-पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्यांची संख्या आता रोडावलीय. ‘आयसीसी’च्या जागतिक स्पर्धा आणि आशिया चषकातच या दोन संघांमधील द्वंद्व क्रिकेटरसिकांना अनुभवता येते. म्हणजेच वर्षाला एक किंवा दोनच. म्हणूनच या सामन्याची उत्सुकता आणि उत्कंठा मोठी. राष्ट्रप्रेमाच्या भावनांची गुंतवणूक करून अर्थप्राप्ती हेच साधं सूत्र. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याचा अट्टहास नेमका याचसाठी!

