• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
January 2, 2026
in खेळियाड
0
भारतीय क्रीडापटूंचा नववर्ष संकल्प!

२०२५मध्ये भारतीय क्रीडापटूंनी छाप पाडली. आता लक्ष्य आहे, २०२६चे. या वर्षात जग ‘फिफा’ विश्वचषक फुटबॉलमध्ये मश्गुल होईल. पण भारतासाठी ती केवळ पाहण्याची अनुभूती असेल. भारतीय क्रीडाक्षेत्राची खरी अग्निपरीक्षा क्रिकेटमध्ये असेल. याशिवाय बुद्धिबळ, हॉकी, कबड्डी, राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेचे आव्हान भारतापुढे असेल. भारताच्या क्रीडापटूंनी नव्या वर्षाचे कोणते नवे संकल्प केले असतील, याचा हा आढावा.

 

रो-को : विश्वचषकापर्यंत शानदार खेळू!
रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने २०२४चा ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेट प्रकारातून निवृत्ती पत्करली. पण २०२४च्या उत्तरार्धात न्यूझीलंडविरुद्ध मायदेशात मानहानिकारक पराभव पत्करल्यानंतर २०२५मध्ये ऑस्ट्रेलियाकडून ३-१ अशी हार पत्करली. परिणामी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर आणि प्रशिक्षक गंभीर यांनी दोघांना कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेणे भाग पाडले. तसेच आगामी एकदिवसीय प्रकाराच्या विश्वचषकासाठी संघात स्थान टिकवायचे असेल, तर कामगिरी सिद्ध करावी आणि देशांतर्गत क्रिकेट खेळावे, असे आवाहन केले. हे आव्हान ‘रो-को’ जोडीने लिलया पेलले. चॅम्पियन्स करंडकचे जेतेपद ही भारताची ठळक कामगिरी. सध्या आयसीसीच्या एकदिवसीय प्रकाराच्या जागतिक क्रमवारीत रोहित पहिल्या आणि विराट दुसर्‍या स्थानावर विराजमान आहे. विराटने या वर्षी १३ सामन्यांत ६५.१०च्या सरासरीने ६५१ धावा केल्या आहेत. यात तीन शतके आणि चार अर्धशतकांचा समावेश आहे. तसेच रोहितने १४ सामन्यांत ५०च्या सरासरीने दोन शतके आणि चार अर्धशतकांच्या सहाय्याने ६५० धावा केल्या आहेत. याशिवाय विजय हजारे करंडक स्थानिक क्रिकेटमध्ये दोघे खेळले. त्यामुळे २०२७चा एकदिवसीय विश्वचषक आम्ही खेळणारच, असा संकल्प या दोघांनी केला आहे.

गंभीर : ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकणार!
मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या मार्गदर्शनाखाली भारताचा कसोटी संघ जरी झगडत असला, तरी मर्यादित षटकांच्या दोन्ही क्रिकेटमध्ये हा संघ रुबाबात उत्तम कामगिरी करीत आहे. २०२५मध्ये एकदिवसीय प्रकारात भारताने १४ सामन्यांपैकी ११ विजय मिळवले आहेत, तर ट्वेंटी-२० प्रकारात सामन्यांपैकी १६ विजय मिळवले आहेत. या दोन्ही प्रकरांची यशाची टक्केवारी ७८टक्केपर्यंत उंचावते. या वर्षी भारताने चॅम्पियन्स करंडक एकदिवसीय स्पर्धा जिंकली, तर आशिया चषक ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेवरही निर्विवाद वर्चस्व राखले. त्यामुळे २१ फेब्रुवारी-मार्चमध्ये भारतात सुरू होणार्‍या ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याचा निर्धार गंभीरने केला आहे.

बीसीसीआय : नवा कसोटी प्रशिक्षक
गंभीरच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कारकीर्दीत भारतीय संघ १९ सामने खेळला. त्यापैकी १० सामने गमावले, २ अनिर्णित राखले आणि फक्त ७ विजय मिळवले. म्हणजे विजयाची टक्केवारी फक्त ३६टक्के होते. गंभीरने किमान मायदेशात तरी वर्चस्व राखावे, तर तिथेही घोर निराशा केली आहे. ९ कसोटी सामन्यांपैकी ५ पराभव आणि ४ विजय. यापैकी न्यूझीलंड आणि आप्रिâकेकडून अनुक्रमे ०-३ आणि ०-२ असा ‘व्हाइट वॉश’ पत्करला आहे. मिळालेल्या विजयांपैकी २ वेस्ट इंडिजसारख्या दुबळ्या संघाविरुद्ध मिळवलेले आहेत. परदेशात १० पैकी ३ सामन्यांत विजय, ५ पराभव आणि २ अनिर्णित ही आकडेवारी. याआधीचे दोन प्रशिक्षक रवी शास्त्री आणि राहुल द्रविड यांची तुलना केल्यास गंभीरची कसोटी क्रिकेटमधील एकंदर कामगिरी अत्यंत खराब म्हणता येईल. म्हणूनच कसोटी क्रिकेटचा कार्यभार गंभीरकडून काढून घेत तो अन्य प्रशिक्षकाकडे देण्याची नितांत आवश्यकता आहे. ‘बीसीसीआय’कडून या पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मणची नियुक्ती केल्यास भारताला कसोटी क्रिकेटमध्ये नवसंजीवनी मिळू शकेल.

आयुष, सूर्या, हरमन :विश्वचषक पटकावणार!
भारतीय क्रिकेट संघाला २०२६मध्ये तीन विश्वचषक (वरिष्ठ पुरुष, वरिष्ठ महिला आणि १९ वर्षांखालील) क्रिकेट स्पर्धांचे आव्हान असेल. मुंबईच्या आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा (१९ वर्षांखालील) संघाला झिम्बाब्वे-नामिबिया येथे जानेवारीत एकदिवसीय प्रकारचा विश्वचषक खेळायचाय. या भारतीय संघात १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा समावेश आहे. मग फेब्रुवारीत सूर्यकुमारच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ट्वेंटी-२० विश्वचषक आपल्याकडे पुन्हा राखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करतील. पस्तीशीच्या सूर्याच्या कामगिरीचा ढासळता आलेख पाहता ही त्याची अखेरची ट्वेंटी-२० विश्वचषक स्पर्धा ठरण्याची दाट शक्यता आहे. २०२५मध्ये ऐतिहासिक एकदिवसीय प्रकाराची विश्वचषक स्पर्धा जिंकणार्‍या हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला संघाचा इंग्लंड-वेल्समध्ये ट्वेंटी-२० विश्वचषक जिंकण्याचा संकल्प केला आहे.

पुणेरी पलटण : यंदा जेतेपद आमचेच!
कबड्डीमध्ये पुणेरी पलटणने या वर्षी झालेल्या १२व्या हंगामात दिमाखदार कामगिरी केली; पण अंतिम सामन्यात दबंग दिल्लीकडून पराभव पत्करल्यामुळे थोडक्यात विजेतेपद हुकले. अस्लम इनामदारचे नेतृत्व, अजय ठाकूरचे मार्गदर्शन आणि अशोक शिंदे यांची रणनीती या बळावर पुणेरी पलटणने २०२५मध्ये अप्रतिम कामगिरी केली.

साखळीत १८पैकी १३ सामने जिंकत आपले वर्चस्व दाखवले. पंकज मोहितेची हनुमानउडी, आदित्य शिंदेच्या चतुरस्र चढाया आणि भक्कम बचाव ही पुण्याची वैशिष्ट्य होती. २०२६च्या १३व्या हंगामात विजेतेपद आमचेच असा निर्धार पुणेरी पलटणने केला आहे.

भारतीय फुटबॉल :‘आयएसएल’चे पुनरुज्जीवन
२०२५ हे वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अत्यंत वाईट ठरले. कारण पुरस्कर्ते नाहीत म्हणून इंडियन सुपर लीग आणि आय-लीग या लीग होऊच शकल्या नाहीत. पण पुरस्कर्ते आणि देशातील पैसेवाले यांची अचूक मोट बांधून लिओनेल मेसीचा दौरा कसा पैसा कमवू शकतो, हे एक भारतीय गृहस्थ आणि त्याच्या कंपनीने दाखवून दिले. इगोर स्टीमॅच, मॅनोलो मार्कीझ यांनी प्रशिक्षकपद सोडल्यानंतर ऑगस्टपासून खलिद जमिल यांच्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय फुटबॉल संघ २०२५मध्ये १२ सामने खेळला. यातील कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. परंतु अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने याहून अधिक वेळा न्यायालयाच्या पायर्‍या झिजवल्या. भरत छेत्रीने निवृत्ती मागे घेत पुनरागमन केले. पण भारतीय संघ २०२७च्या एएफसी आशिया चषकासाठी पात्र न ठरल्यामुळे २०२६मध्ये कोणतीही आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायची नाही. एकंदरीत ‘आयएसएल’चे पुनरुज्जीवन हाच भारतीय फुटबॉलसाठी आशादायी संकल्प आहे.

गुकेश की प्रज्ञानंद? :विश्वविजेतेपद जिंकणार!

भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी २०२५ हे वर्ष संमिश्र स्वरूपाचे ठरले. विश्वविजेता डी. गुकेश झगडताना आढळला. गोव्यात झालेल्या फिडे विश्वचषक स्पर्धेतही त्याच्याकडून समाधानकारक कामगिरी झाली नाही. अर्जुन एरिगसीने मॅग्नस कार्लसनला हरवून खळबळ माजवली, तर आर प्रज्ञानंदने दमदार कामगिरी करीत विश्वचषक आव्हानवीर स्पर्धेतील स्थान निश्चित केले. २०२६मध्ये फिडे विश्वविजेतेपदाची लढत होणार असून, गुकेशला विश्वविजेतेपद टिकवताना आव्हानवीर स्पर्धेत जिंकल्यास प्रज्ञानंदचे आव्हान उभे ठाकण्याची दाट शक्यता आहे. २०२५मध्ये दिव्या देशमुखने विश्वचषक जेतेपद पटकावले. आता यावर्षी होणार्‍या महिला फिडे विश्वचषक आव्हानवीर स्पर्धेत दिव्या, कोनेरू हम्पी आणि आर वैशाली अशा तीन भारतीय खेळाडू पात्र ठरल्या आहेत. त्यामुळे भारतीय बुद्धिबळपटूंनी विश्वविजेतेपद जिंकण्याचा संकल्प केला आहे.

हॉकी : विश्वचषक जिंकण्याचा निर्धार
ऑगस्ट २०२६मध्ये बेल्जियम-नेदरलँड्स येथे एफआयएच विश्वचषक हॉकी स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत पदक जिंकण्याचा निर्धार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली भारताने केला आहे. २०२५मधील आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात दक्षिण कोरियाला ४-१ असे हरवून भारताने विश्वचषक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. भारताने १९७५मध्ये एकमेव विश्वचषक विजेतेपद जिंकले असून १९७३मध्ये रौप्य आणि १९७१मध्ये कांस्य पदक जिंकले आहे. गेल्या काही वर्षांतली भारतीय हॉकीची प्रगती पाहता पदकाचा संकल्प भारतीय हॉकी संघ सत्यात उतरवू शकतो.

भारतीय क्रीडापटू : एशियाड-राष्ट्रकुल गाजवणार

२०२८मधील लॉसएंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेकडे वाटचाल करताना २०२६मधील आशियाई आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा ही त्याची रंगीत तालीम ठरेल. ग्लासगो (स्कॉटलंड) येथे २३ जुलै ते २ ऑगस्ट, २०२६ या कालावधीत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा होणार आहे. २०२२च्या बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चौथा क्रमांक मिळवणार्‍या भारताने २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य अशी एकूण ६१ पदकांची कमाई केली होती. याचप्रमाणे ऐची-नागोया (जपान) येथे १९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर, २०२६ या दरम्यान आशियाई क्रीडा स्पर्धा होतील. २०२२च्या हँगझो आशियाई स्पर्धेत भारताने चौथे स्थान मिळवताना २८ सुवर्ण, ३८ रौप्य आणि ४० कांस्य अशी एकूण १०६ पदके कमावली होती. त्यामुळेच एशियाड आणि राष्ट्रकुल स्पर्धा गाजवण्याचा संकल्प भारतीय क्रीडापटूंनी केला आहे.

Previous Post

पण आपण कट्टर!

Next Post

बांगला देशाचा स्वातंत्र्यलढा

Next Post
बांगला देशाचा स्वातंत्र्यलढा

बांगला देशाचा स्वातंत्र्यलढा

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.