• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भय इथलं संपत नाही…

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
January 27, 2026
in खेळियाड
0
भय इथलं संपत नाही…

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानं दिल्लीत देशाची मान झुकवणारा धुरळा उडालाय. दिल्लीतील हवामानाच्या गुणवत्तेचा खालावलेला निर्देशांक, घाणीचं साम्राज्य असलेला स्टेडियमचा परिसर, वानराचा प्रेक्षागृहातील वावर आणि कबुतरांची विष्ठा आदी असंख्य मुद्दे वादग्रस्त ठरलेत. त्या निमित्तानं राष्ट्रकुल, ऑलिम्पिक अशी भव्यदिव्य स्वप्नं पाहणार्‍या भारताच्या यजमानपदावर जगभरातून टीका होतेय. या वादात केंद्रस्थानी असलेल्या कबुतर आणि वानरांच्या समूहांचे प्रतिनिधी आपल्या विश्वगुरूंच्या भेटीला आले, तर त्यांची काय चर्चा रंगेल, याचं हे कल्पनारंजन…

********

‘आओ… आओ… आओ…’ पांढर्‍या शुभ्र कपड्यांतले विश्वगुरू पांढर्‍या कबुतराला दाणे टाकत होते. विश्वगुरूंच्या बगीच्यातील हे तसं ‘डीडीएलजे’सारखंच (दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे) दृश्य. इथे ‘बाऊजी… बाऊजी’ करीत राज म्हणजे शाहरुख खान मुळीच सोबतीला आला नाही. समोरच्याच झाडावर एक वानरही बसलं होतं. ते शुभ्र कबुतर आणि वानर हे दोघंही समूह प्रतिनिधी अजिबात विश्वगुरूंना प्रतिसाद देत नव्हते. पण शांततेचे वैâवारी असल्याच्या रुबाबात विश्वगुरू ‘आओ… आओ… आओ…’ अशी साद घालतच होते. कबुतर आणि वानर दोघेही हिरमुसलेले. राजधानीत चालू असलेल्या इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या निमित्तानं आंतरराष्ट्रीय स्तरावर बदनामी झाल्यानं ते खचले होते. त्यांच्यामुळे देशाची इभ्रत मातीमोल ठरू पाहतेय म्हणूनच त्यांची बॅडमिंटन स्टेडियम परिसरातून हकालपट्टी करण्याचं फर्मान निघालं होतं. त्यामुळे बिच्चारे दोघे जीव मुठीत घेऊन विश्वगुरूंकडे वैâफियत मांडायला आले. विश्वगुरूंनीही सहानुभूतीपूर्वक हे प्रकरण हाताळण्याचं धोरण निश्चित केलं. याच भेटीचा हा इतिवृत्तांत-

विश्वगुरू : आओ… आओ… आओ…

कबुतर : मुळीच नाही, कट्टी फू!

वानर : हुप्पा हुय्या. मीसुद्धा झाडावरून अजिबात खाली येणार नाही.

विश्वगुरू : या बाळांनो, या रे या! लवकर भरभर सारे या! आधी छान दाणे खा; मजा करा रे मजा करा! आज दिवस तुमचा समजा…

दोघंही : आमचा! अहो, इथे आमचं जगणं मुश्कील झालंय आणि तुम्ही आम्हाला मजा करा कसं सांगतायत. जगणं ही निव्वळ सजा झालीय.

विश्वगुरू : किमान आपण चर्चा करून यावर काही तरी तोडगा काढूया का?
(कबुतर आणि वानर दोघंही गपगुमान समोर येऊन बसतात. पण खाऊ खात नाहीत.)

दोघंही : (थोडेसे गुर्मीतच; पण आदरानं) विश्वगुरूंना आमचा प्रणाम असो!

विश्वगुरू : मुलांनो तुम्हाला कळतंय. तुम्ही काय केलंयत? तुम्हाला बॅडमिंटनच पाहायचं होतं, तर मी देशाच्या आणि राज्या-राज्यांतल्या वनमंत्र्यांना सांगून अनेक अभयारण्यांत खास तुमच्यासाठी बॅडमिंटन कोर्टच बांधून घेतली असती. अगदी वनतारामध्येसुद्धा ही आलिशान क्रीडा व्यवस्था करता आली असती. पण इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा ही ‘सुपर ७५०’ दर्जाची स्पर्धा तुमच्या आततायीपणामुळे डागाळलीय. अरे वानरा, तू चक्क प्रेक्षागृहात जाऊन खुर्चीत बसलास सामना पाहायला आणि तिथे माकडचाळे केलेस. अरे पारव्या, तुला पॉटी करायला हीच जागा मिळाली. तुम्ही संपूर्ण स्टेडियममध्ये घाणीचं साम्राज्य पसरवलंत. 

वानर : विश्वगुरू, आम्ही दोघे क्षमा मागतो; पण आमच्या बाजूनंही विचार करा. स्टेडियमची साफसफाई नीट झाली नव्हती आणि वातावरणही खराब आहे. वातावरणातील प्रदूषणामुळे काही खेळाडूंना श्वास घेतानाही त्रास झाला. दिल्लीच्या हवामानाच्या गुणवत्तेचा निर्देशांक धोकादायक श्रेणीत आहे. या वातावरणाचा त्रास आम्हालाही होतोय. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत तिसर्‍या क्रमांकावरील डेन्मार्कच्या अँडर्स अ‍ॅन्टनसेननं प्रदूषणाचं कारण देत स्पर्धेतून आधीच माघार घेतली. परंतु जागतिक बॅडमिंटन महासंघानं उलटपक्षी त्यालाच आर्थिक दंड ठोठावला, ही वस्तुस्थिती आहे. आम्ही स्टेडियममध्ये आश्रयाला गेलो; पण याचं खापर फक्त आमच्या चुकीवर फोडलं गेलं. गेल्याच महिन्यात लखनौच्या ईकाना स्टेडियमवरील भारत-दक्षिण आप्रिâका यांच्यातील चौथा सामना रद्द झाला, तो हवामान खराब असल्याने. पण त्याचा कुणीच गवगवा केला नाही. यावेळी आम्हा प्राणिमात्रांना बिनदिक्कत लक्ष्य केलं.

कबुतर : आमच्याकडून चूक झाली, हे मान्य. पण अशाच प्रकारे मुंबईतही आम्हाला लक्ष्य केलं गेलं. आम्हाला खाण्याची भ्रांत. इतकंच कशाला? आमचं गर्वाचं स्थान कबुतरखानाही मोहनजोदेडो-हडप्पा संस्कृतीप्रमाणे नामशेष झाला. ‘कबुतर, जा जा जा…’ हे गाणंही हल्ली कोण गात नाही. म्हणूनच आम्ही स्टेडियम परिसरात घरटी बांधली. पण आम्ही निर्वासित नाहीत.

वानर : शहरात-गावांत तुम्हा मनुष्यप्राण्यांनी आम्हाला जीव नकोसा केलाय. आम्ही वानरं चित्रपटांतूनही हद्दपार झालोय. एके काळी गरिबांचा मसिहा मिथुन चक्रवर्ती यानं आमच्यासोबत अनेक सिनेमे गाजवलेत.

कबुतर : विश्वगुरू, तुम्हाला ‘दिल्ली-६’ आठवतोय. आम्हा दोन्ही पशु-पक्ष्यांसाठी सन्माननीय चित्रपट. आम्हा कबुतर समुदायासाठीचं ‘मसकली… मसकली…’ हे गीत कानावर पडलं की आजही आम्ही ठेका घेतो. हा चित्रपट खरं तर वानरवीरावरचा. दिल्लीच्या मोहल्ल्यात ‘काळं वानर’ (काला बंदर) या वानरमानव सदृश रहस्यमय दहशतीची अफवा पसरते आणि त्यातून हिंदू-मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होते. हे काळं वानर मग समाजातील द्वेष, लालसा, जातीयवाद म्हणजेच सांप्रदायिक विष पसरवतं. खरं काळं वानर मानवी प्रवृत्तीत आहे, हेच मांडणारा हा चित्रपट… (दोघांचेही डोळे अश्रूंनी डबडबले.)

विश्वगुरू : तुम्ही भलतेच भावुक झालात. चला, अश्रू पुसा आणि जरा वास्तवात या. इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या सुरुवातीच्या दिवसांत डेन्मार्कच्या मिया ब्लिंखफेल्डनं कोर्टवरील अस्वच्छ वातावरणाबाबत तक्रार केली. मागील वर्षी मियासह अनेक जण या स्पर्धेत खेळल्यानं आजारी पडले होते. यावेळीही हीच भीती तिला सतावतेय. मग भारताचा जागतिक पदकविजेता एचएस प्रणॉय आणि सिंगापूरचा लो किन येव यांच्यातील उपउपांत्यपूर्व लढत, पारव्या, तुझ्यामुळे दोनदा स्थगित झाली. लो किनला कोर्टवरच उलटी करावीशी वाटत होती. पण त्यानं जेमतेम नियंत्रण मिळवलं. अशाच प्रकारची घटना महिला दुहेरीचा उपांत्य सामना चालू असताना घडली. बॅडमिंटन कोर्टवर अत्यंत थंड वातावरण होतं. तो समतोल साधण्यासाठी हीटरसुद्धा वापरण्यात आले. हे सारं आता नित्याचं झालंय.

वानर : मी प्रेक्षागृहात गेलो, हे बरोब्बर. पण मी सामन्यात कोणताही व्यत्यय आणला नाही.

विश्वगुरू : …पण तुझ्या मर्कटलीलांमुळे खेळाडूंचं लक्ष लागेना, त्याचं काय? सर्वात महत्त्वाचं म्हणजे कडेकोट सुरक्षा व्यवस्था भेदून तू आत गेलासच कसा?

वानर : मी जाऊ शकलो असेन, तर सुरक्षा व्यवस्था कडेकोट होती का, हा प्रश्न पडायला हवा ना गुरुवर्य?
(कबुतरानं त्वरित विश्वगुरूंचे पाय धरले.)

कबुतर : आम्हा कबुतरांकडून मात्र अनेक अक्षम्य चुका झाल्या. त्याबद्दल क्षमस्व!

विश्वगुरू : मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का? या तुमच्या चुकांमुळे देशाची प्रतिमा किती मलीन होतेय ते? येत्या ऑगस्टमध्ये जागतिक बॅडमिंटन स्पर्धा होणार आहे. पण या ताज्या घटनेमुळे आपलं यजमानपद खालसा होऊ शकतं. २०३०च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद अहमदाबादला मिळालंय. ते यशस्वी करून दाखवायचंय. इतकंच नव्हे, तर भारताचं स्वप्न म्हणजे २०३६च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळवणं. पण या घडामोडींमुळे यजमानपद धोक्यात येऊ शकतं. हे वास्तव समजलं, तर आत्मनिर्भर भारत क्रीडाक्षेत्रातही साकारेल.

कबुतर : आम्हा कबुतरांनाही तसंच वाटतंय.

वानर : होय, आमचंही तेच स्वप्न आहे. पण तुम्ही तो परिसर पाहिलात का? इतका गलिच्छपणा तिथे पसरलाय.

विश्वगुरू : मी आजच भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सरचिटणीस संजय मिश्रा यांच्याशी बोलून परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानुसार तातडीनं काही विभागांना निर्देशही देऊन टाकलेत. एकच लक्षात ठेवा, दिस जातील, दिस येतील, भोग सरंल, सुख येईल! पाहा ऑलिम्पिकचे पाच गोल…(विश्वगुरूंसह दोघंही आकाशाकडे पाहतात. मग विश्वगुरूंना नमस्कार करून दोघंही निरोप घेतात. विश्वगुरू नमस्कारासाठी हात जोडतात आणि डोळे मिटतात, तितक्यात कबुतराची विष्ठा त्यांच्या हातावर येऊन पडते.)

विश्वगुरू : (निराश अंत:करणानं) सारी मेहनत पाण्यात गेली. कबुतर-वानरापुढे वाचली गीता, काळचा गोंधळ बरा होता. भय इथलं संपत नाही…

Previous Post

मुंबईच्या ‘महाविजया’ची पोल खोल!

Next Post

कुटुंब विहरतंय आकाशात

Next Post
कुटुंब विहरतंय आकाशात

कुटुंब विहरतंय आकाशात

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.