• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

भंडारा

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी )

marmik by marmik
December 25, 2025
in इतर
0
भंडारा

संध्याकाळची वेळ. अध्वर्यू चौकात गुरगुडे पुतळ्यामागच्या बाकड्यांजवळ येतो. कीर्तन सप्ताहातील भंडार्‍यात जेवणासाठी जाण्याचं नियोजन करण्यासाठी पोरांची वाट बघत बाकड्यावर बसतो. निदान ओळखीपैकी एखादं तरी इथून भंडार्‍याकडे जाईल ही त्याची अपेक्षा. एकटं जाणार कसं ना? कुणी बरोबर असलं तर बरं राहतं ना? इथं भल्या भल्या महापुरुषांच्या पुतळ्यांची दुरवस्था झालेली, तिथं हा पुतळा बरा सुस्थितीत आहे. कारण भैय्यासाहेब! हे भैय्यासाहेबांचे पिताश्री! त्यांचा हा पुतळा! भैय्यासाहेब गावच्या तरुणांचे स्वयंघोषित आधारस्तंभ काय ते! भैय्यासाहेब बर्‍याच प्रयत्नानंतर राखीव कोट्यातून गेल्या टर्मला गावचे सरपंच झाले. आता म्हणे त्यांना पंचायत समिती, झेडपी खुणावतेय. सरपंचपदाला भैय्यासाहेब शिंग मोडून वासरांत शिरले होते. पण आता लढाई जनरल कोट्यात होणार असल्यानं त्यांनी आताच नवी शिंगं लावून फुरफुरायला सुरुवात केलीय. पण अडचण अशीय का ह्या टर्मला गण आणि गटात जातीचं कार्ड जोरात चालंल असे चान्स आहेत. त्यात मागास मतं एकगठ्ठा पडली तर भैय्यासाहेबांचा चौथरा बांधायची वेळ यायची. त्यामुळं भैय्यासाहेब श्रावणापासून कामाला लागलेले, ह्या जातीच्या संतांच्या पालखीला खांदा दे. त्या संताच्या भंडार्‍यात लापशी वाढ. अमुक संताच्या कीर्तनात टाळ कूट. असे प्रकार करून झालेले. आजपण कसले तरी
बॅनर घेऊन पोट्टे गल्लोगल्ली फिरतायत. म्हणजे परत काही कार्यक्रम असंल बहुतेक.

‘काय रे अर्ध्या? भंडार्‍याला जायचं वाटतं? लैच वेळशीर आला ते? आज कंपनीत ओव्हरटाइम नव्हता वाटतं? आँ?’ चिनूशेठ भैय्यासाहेबाचे कट्टर कार्यकर्ते अवचित कुठून तरी उगवतात. हाफ बाहीचा सफेद शर्ट, डोळ्यावर गॉगल असा चिन्याचा अवतार. घर यथातथा, बाहेर थाट मोठा!

‘हां तू येतोय का? आज अजून कुणीच भेटंना मला. तिथं महाराजाचं कीर्तन संपून पंगती बसल्या असतील…’ अर्ध्याला जेवणाची चिंता!
‘अरे, एवढ्या लवकर पंगती बसत असत्या काय? आता कुठं बुवानं भजनाला सुरुवात केली असंल, मागून कीर्तन होईल. त्याला नऊएक वाजतील. त्याच्यापुढं पंगती अन् सारा राघूडा त्याच्यापुढं चालायचा…’ बोलता बोलता चिन्या खिश्यातून मोबाईल काढतो. ‘हल्लोऽऽऽ! मी आता पुतळ्याजवळच आहे… आपलं नियोजन झालंय… अजून एकदोन जण भेटले तर गर्दी दिसंल… गाड्या पॅक होतील. असं बघा… आँ?… हां!’ कानाचा मोबाईल झटकन खिश्यात जातो.

‘मग घरीच जावा वाटतं, कुणी येईना पण सोबतीला! तू येशील? भंडार्‍याला?’ हिरमुसल्या चेहर्‍यानं अर्ध्या चिन्याला गळ घालू बघतो.
‘मी चाललोय भैय्यासाहेबाच्या पक्षप्रवेशाला! आता गाड्या येतील. मलाच गाड्या पॅक करायला दोनेक जण कमी भरताय. तूच येतो का?’ चिन्याला नवा पर्याय दिसतो.

‘कुठं?’ अर्ध्या अचंब्यानं विचारतो.
‘काही नाही, माणिक लॉन्सला भैय्यासाहेबचा पक्षप्रवेश आहे. तिथं फक्त पोरांचा मॉब दिसला पाहिजे. म्हणून आपले पोरं घेऊन जायचे आहे. गाड्याबिड्या सगळं रेडी आहे. पण वरल्या आळीतल्या दोघांना वेळेवर हगवण लागली. ते नाही बोलले. मग आपल्या गाडीत झाल्या ना शिटा खाली! असा गेलो तं भैय्यासाहेब काय बोलतील? म्हणशील पोरं जमवता येत नाही का तुला? इज्जतीचा कचरा होईल ना पार! तवा तू चाल! माझ्याबरोबर बस!’ चिन्या अर्ध्यालाच गळाला लावायला बघतो.
‘पण तिथं किती वेळ लागंल? लवकर येऊ ना? परत भंडारा..?’ अर्ध्याचा जीव भंडार्‍यात गुंतलेला.
‘अरे तिथं अर्धे भाषणं उरकत आलेय. आपण गेलो का डायरेक्ट भैय्यासाहेबामागं स्टेजवर एन्ट्री, गळ्यात माळाबिळा बिल्ले, उपरणे, टोप्या घातल्या का? कल्ला करत डायरेक्ट माघारी यायचं. भैय्यासाहेब पार्टीच्या मीटिंगला एक गाडी घेऊन पुढं जाईल, आपण रिटर्न… चिन्या खिशातून पुडी काढतो. फाडून डायरेक्ट घश्यात ओततो.

‘वेळ नको व्हायला! नाहीतर भंडारा हातचा जायचा… एकतर घरी भंडार्‍याला जातोय सांगून आलोय. तेव्हा घरीपण माझ्या वाटेचं काही बनणार नाहीय. मागाहून नको उपास घडायला…’ अर्ध्याला पोटाची चिंता जाम पडलेली.

‘तू भिऊ नको रे! आपण असताना! भाऊनं सांगितलं आहे. येताना सगळ्या पोरांना नॉन व्हेजची सोय आहे म्हणून! मस्तानी हॉटेलला! इथं भंडार्‍यात डाळ-बट्टी खाण्यापेक्षा तिथं हाडं फोडू! काय? येतो ना?’ चिन्या अर्ध्याला बोकडाची आशा दाखवतो. ते मिळणार असंल तर कोणतं वेडं हे वरण वरबडील?
‘खायला काही हरकत नाही रे! पण नेमकी आज चतुर्थी धरेल होती. उपास सोडायला डायरेक्ट खांडं खायचे म्हणजे… लै माजल्यागत होईल रे!’ अर्ध्याला नवीन घोर!

‘भैय्यासाहेबाचा फेमस डायलॉग आहे. माजला तो गाजला! त्याला काय होतं? पनीर समजून तुकडे चावायचे! तसंही चव शेमच असती दोन्हीची! त्याच्यात आपल्या मनात पाप येऊ द्यायचं नाही. बाकी असतं काय?’ चिन्या अर्ध्याला समजावतो.
‘पण का रे? आज तू कामावर नाही गेलास?’ अर्ध्याला काही वेगळंच सुचतं!
‘सोडलं आपुन ते काम! आता फुल्ल टाइम पॉलिटिक्स करायचं आपल्याला!’ चिन्या
गॉगल सावरत शोभेच्या झुडुपात थुंकतो!
‘पण सुट्ट्याबिट्ट्या कापून अकरा एक पगार खूप होता ना रे!’ अर्ध्या तळमळतो.
‘चांगला होता, काम पण बरं होतं. पण त्या दिवशी स्टँडवर राडा झाला. फक्त बघायला गेलो तर मालक म्हणी, सांगून जायचं ना? आता राडे का सांगून होत्या का? आणि काय सांगायचं? समोरल्या पोरांनी बॅनरला डांबर फासलं, मला जाऊ द्याना म्हणून! अरे हाड!! आपण कट्टर कार्यकर्ते भैय्यासाहेबांचे! कोणी हुं केलं की आपण सगळ्यात आधी उत्तर द्यायला त्याच्यापुढं उभं राहतो. आपल्यासाठी भैय्यासाहेब आणि पॉलिटिक्स इम्पॉर्टंट. बाकी अश्या छपन्न नोकर्‍या ववाळून टाकू आपण, ह्याच्यावरून… बाकड्यावर धूळ नाही ना? बसू का?’ विचारत चिन्या ऐटीत बसतो. याच्या बुडाला आताशी कळ लागली वाटतं!

‘मग तू काय करायचं ठरवलंय? हे नोकरीपाण्याचे महिन्याला दहा-अकरा मिळायचे. आता घरखर्च कसा भागवशील? तुझा पुड्यापाड्यांचा खर्चच तीनचार हजाराचा होत असंल महिन्याला!’ त्याच्या खिशातल्या इमलच्या पुड्या बघत अर्ध्या ताळेबंद मांडतो.
‘तीनचार हजार? पाच हजार बोल! पन्नास रुपयांची एक पुडी. दिवसाला तीनचार होत्याच! आता कर हिशेब! वर आठवड्याला बसावा लागतं! कोरडं नाही बरं? झणझणीत रस्सा, खांडं लागत्याच! तोच खर्च हजार-दीड हजाराचा झाला का? महिन्यात किती हफ्ते झाले? लाव टॅली! सोप्पं नाहीय आपलं…’ चिन्या डोळ्यावरचा गॉगल काढून रंगीतसंगीत उजेड डोळ्यांवर घेतो. ‘आयला ही शिफ्तरं का येईना अजून? इथं माझाच पुतळा व्हायचा!’ चिन्या बोलता बोलता पुन्हा मोबाईल काढतो. एकदोन नंबर लावून पाहतो.
‘मग आता रे? हा खर्च कुठून व्हायचा? अन् घरात काही देतो का नाही?’ अर्ध्याला प्रश्न पडतो.

‘आपुन घरात आधीच बोल्लोय. आपण समाजकार्यात आहे तव्हा घरात आपण कवडी देणार नाही. ठेऊ वाटलं तर ठेवा नाहीतर डायरेक्ट सांगा. निघ म्हणून! भैय्यासाहेब आपल्याला आता व्यवस्था करून देतील. आणि आपलं टार्गेट सेट आहे. ह्या टर्मला भैय्यासाहेब वर आपण ग्रामपंचायतला मेंबर. पुढल्या टर्मला सरपंच आपुन. भैय्यासाहेब आमदारकीला. असं स्टेप बाय स्टेप चढत जायचं!’ चिन्या बसल्याजागी स्वप्नातले मनोरे बांधत जातो.
तोच एक कार पुतळ्याजवळ येऊन थांबते. चारदोन जण डोकी बाहेर काढून भैय्यासाहेबच्या नावानं घोषणा देतात.
‘अय आले का थांबा! ह्यापाय ह्याला पण बरोबर घेऊ…’ चिन्या कुणा एकाकडं बघत सांगू लागतो.
‘अरे चिन्या तुलाच जागा नाहीय गाडीत! तेच सांगायला थांबलो आम्ही.’ एक जण त्याला हसून सांगतो.
‘अरे मागंपुढं सरकून बसू. त्याला काय्ये? व्हईल ना जागा! नाहीतर त्या बारक्याला मांडीवर घेतो मी!’ चिन्या उठून गाडीत डोकावू लागतो.
‘तू बस टपावर! मोठ्ठा आला. चला रे!’ बारक्या बोलतो. तसा हशा पिकतो. गाडी वेगात निघून जाते.
‘अय थांब! भैय्यासाहेबच्या ऑफिसपर्यंत येऊ दे! तिथून मिळंल मला एखादी गाडी…’ म्हणत चिनूशेठ गाडीमागं पळत जातो.
एव्हाना अर्ध्याच्या पोटात बोकड
जॅम वरडायला लागतो. तो नॉनव्हेजवर उपास सोडायला तयार झाल्याबद्दल मनातल्या मनात चार वेळा देवाची माफी मागतो. आणि पायी भंडार्‍याच्या दिशेनं झपाझप पावलं टाकत चालू पडतो… पायातली एक चप्पल बाकड्याजवळ विसरून.

Previous Post

जंगल आम्ही मारलं… आणि फाशी बिबट्याला !

Next Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post
फटकारे बाळासाहेबांचे

फटकारे बाळासाहेबांचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.