‘करून दाखवलंय ते अभिमानाने सांगूया!’ हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मुंबई पदाधिकार्यांच्या मेळाव्याचे अतिशय आकर्षक शीर्षक होते. १६ डिसेंबर २०२५ रोजी वरळीतील एनएससीआय डोम येथे हा मेळावा पार पडला. युवासेनाप्रमुख आणि शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मेळाव्यात मुख्य संबोधन केले. त्यांनी पॉवर पॉइंट प्रेझेंटेशनद्वारे शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत सलग २५ वर्षे सत्तेत असताना केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा मांडला. यात शुद्ध पाणीपुरवठा, नागरी सुविधा, कचर्यातून वीजनिर्मिती, डिजिटल शिक्षण, ५०० चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर सवलत, कोस्टल रोड, बेस्ट बस सेवा सुधारणा आदी कामांचा उल्लेख केला. आदित्य यांनी मुंबईकरांना आवाहन केले की, शिवसेनेने करून दाखवलेली कामे अभिमानाने सांगा आणि मुंबईला ‘अदानीस्तान’ होऊ देऊ नका. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या मेळाव्यात ज्यात आदित्य यांनी आपल्या कामगिरीवर भर देत प्रचाराला सुरुवात केली.

‘ओळखलंत का? अशा पहिल्या चित्राने आदित्य ठाकरे यांनी आपल्या संबोधनास सुरुवात केली. ते म्हणाले, कोरोनाकाळात देशातलं पहिलं लॉकडाऊन आपल्याला वरळीच्या कोळीवाड्यामध्ये लावायला लागलं. उद्धवसाहेबांच्या आदेशानंतर आपण संपूर्ण देशातलं पहिलं फील्ड हॉस्पिटल जिथे उभारलं होतं तेच हे डोम आहे, जिथे आपण बसलो आहोत. इथूनच जीव वाचवायला सुरुवात केली होती. आपल्याला आठवत असेल कोविडच्या काळात कुठेही आपण होर्डिंग नाही लावलेले लोकांचे जीव वाचवले म्हणून.नागरिक जेव्हा त्रस्त होते, तेव्हा जास्तीत जास्त कॅम्पस आपण त्यांच्यासाठी खुले केले होते. आणि काळजीपूर्वक राज्य कसं चालवायचं हे आपण करून दाखवलं. धारावी मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक जागतिक आरोग्य संस्थेने केलं होतं. त्यांच्या मागे एक व्यक्ती होती त्या व्यक्तीचं नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे!‘ अशी भावनिक सुरुवात करून त्यांनी पदाधिकार्यांच्या हृदयालाच हात घातला आणि शिवसेनेने मुंबई महानगरपालिकेत केलेल्या कामांचा २५ वर्षांचा आढावा घेतला.
आर्थिक घडी बसवली
मुंबई महानगरपालिका जेव्हा २५ वर्षांपूर्वी मुंबईकरांनी विश्वासाने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे सुपुर्द केली तेव्हा ही महानगपालिका आर्थिक दृष्ट्या दोलायमान अवस्थेत होती. ६५० कोटींच्या तु्टीत होती. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी याच मुंबई महानगरपालिकेला ९२ हजार कोटींचे एफडीचे कवच निर्माण करेपर्यंत सक्षम केले. आपण मुंबईला अनेक राज्यांपेक्षा अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम केले. मुंबई महानगरपालिका ही कदाचित जगातील एकमेव महानगरपालिका असेल जिच्या २५ वर्षांच्या प्रवासामध्ये आपण कायापालट केला, आपले कर्तव्य म्हणून केला. आपण काय काय केले ते लक्षात ठेवा आणि अभिमानाने सांगा असे आवाहन आदित्य यांनी केले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महानगरपालिकेत केलेल्या कामांचा आढावा घेतला.
शाळांपासून पाण्यापर्यंत सगळंच सावरलं
मुंबई महापालिकेच्या १२३५ शाळा या फक्त आणि फक्त तुमच्या आणि आमच्या शिवसेनेनं केलेल्या आहेत. या १२३५ शाळांमध्ये सव्वातीन लाख विद्यार्थी शिकतात. हे शिक्षण विनामूल्य असतं, एक रूपयासुद्धा आपण घेत नाही. हे आपण केलेले काम आहे हे अभिमानाने सांगायची गरज आहे. राज्यात किंवा देशात आपल्या राइट टू एज्युकेशन आहे, पण राइट टू क्वॉलिटी एज्युकेशन अर्थात दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून जवळपास ६०० वर्गांना जोडलेले आपणच जोडले आहे. जगात मुंबई महापालिकेसारखी अशी दुसरी महापालिका दाखवा जिथे फक्त प्राथमिक आरोग्य केंद्रंच नाहीत तर त्याच्यापुढे जाऊन नर्सिंग कॉलेजही स्वत:ची आहेत. ट्रॉमा केअर सेंटर आहे आणि सगळ्यात चांगले हॉस्पिटल आणि डॉक्टर्स असणारी आपली मुंबई महापालिका आहे.

या शहराची एक महत्त्वाची गोष्ट होती, ओळख होती ती म्हणजे आपली बीईएसटी बस. आपण याचे दर कायम केले, २० रुपयांत आपण फ्लॅट फेअर आणलं, एसी बस आणल्या. तेव्हा बेस्ट बसची प्रवासीसंख्या साधारणपणे ३५ लाख प्रतिदिन एवढ्यावर गेली होती. अजूनही आपले स्वप्न आहे मुंबईमध्ये दहा हजार इलेक्ट्रिक बस आपल्याला रस्त्यावर आणायच्या आहेत.
अनेक वर्षे मुंबई महापालिका फक्त महाराष्ट्रात नाही तर देशातल्या सगळ्या महापालिका किंवा प्रशासकीय संस्थापेक्षा सर्वात स्वस्त पाणी देत आली आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा धरण देणारी आपली महापालिका पुन्हा एकमेव असेल, जिची स्वत:ची धरणे आहेत. सर्वांसाठी पाणी ही आपलं राज्य सरकार असताना योजना आणली होती.
राणीचा बाग अर्थात वीर जिजामाता उद्यानात आजही दररोज हजारो मुंबईकर आणि हजारो पर्यटक जातात. जवळपास साडेचार लाख पर्यटकांनी एका मे महिन्यात येथे भेट दिली होती इथे. महापालिकेला १७३ कोटी रुपयांचे उत्पन्न एका मे २०२३ या एका महिन्यात राणीच्या बागेतून मिळवून दिले होते.
देशातले पहिलं रेनवॉटर होर्डिंग टँक हे गांधी मार्केट आणि हिंदमाता इथे झाले आणि दुसरं रेनवॉटर होर्डिंग टँक आपण मिलन सबवेला केलं. जेणेकरून आज ती जागा पूरमुक्त झालेली आहे, तिथे पूर येत नाही. मुंबई हवामन बदल कृती आराखडा आपण केला होता. इलेक्ट्रिक बस असतील, इलेक्ट्रिक गाड्या असतील, इलेक्ट्रिक धोरण असेल, कचरा व्यवस्थापन असेल, अशी अनेक कामे आपण करून दाखवली. दहिसर, पोइसर, ओशिवरा नदी, मिठी नदी या सगळ्यांसाठी आपण काम केले ते या मुंबई हवामान बदल कृती आराखड्यामार्फत. आपण मुंबई प्रदूषणमुक्तही करू शकतो.
महानगरपालिका आपल्याकडे असताना आणि उद्धवसाहेब मुख्यमंत्री झाल्यावर, एक मुंबईकर मुख्यमंत्री झाल्यावर, आपण मुंबईतील सामान्य माणसांना न्याय मिळवून दिला. पहिला निर्णय आपण घेतला तो म्हणजे ५०० स्क्वे.फुटांपर्यंत ज्यांची घरे आहेत त्यांचा प्रॉपर्टी टॅक्स आपण रद्द केला. आपण पुन्हा सत्तेत आल्यावर आता ७०० चौ. फुटांपर्यंतच्या घरांवरचा प्रॉपर्टी टॅक्स माफ करण्याचे ठरवले आहे.
बीडीडी चाळीत राहणार्यांना पक्की घरे
बीडीडी वरळी, बीडीडी ना.म.जोशी आणि बीडीडी वडाळा आणि बीडीडी शिवडी हे चार प्रकल्प जवळपास गेले २५ वर्षे चर्चेत होते. त्यांचा पुनर्विकास होणार तरी कधी, असा प्रश्न स्थानिक विचारत असत म्हणून एक ऑगस्ट २०२१ला आपण काम सुरू केले आणि तीन वर्षांत पहिला टप्पा पूर्ण झाले. त्याचं चावी वाटप जरी सध्याच्या शासनातील मंत्र्यांनी केले असले तरी चावीवाटप होत असताना सर्वांच्या तोंडी एकच नाव होतं ते आणि ते म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे! बीडीडी चाळीचं काम आपण केलेले आहे, त्याला चालना आपण दिलेली आहे. आणि खर्या अर्थाने त्याची वचनपूर्ती आपण केलेली आहे, हे लोकांना सांगणं गरजेचं आहे.

वरळी-शिवडी कनेक्टरचे जानेवारी २०२१ ते जुलै २०२२ या काळात ४८ टक्के काम आपण पूर्ण केले आणि नंतर जुलै २०२२पासून २०२४पर्यंत अवघे ५ ते ७ टक्के काम झाले. हे याचं गतिमान सरकार आहे. म्हणजे आपल्यावेळी ४८ टक्के एक दीड वर्षांत आणि यांच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये फक्त ९ टक्के काम पूर्ण केलं. अटल सेतूचं काम पहिल्या गर्डरपासून आपण सुरू केलं होतं, ८५ टक्के काम पूर्ण झालं होतं. कोस्टल रोडसाठी २०१३मध्ये उद्धवसाहेबांनी पहिली घोषणा केली की मुंबईसाठी आम्ही कोस्टल रोड करणार आहोत. खोटं बोलायचं कसं हे भाजपकडून शिकावं. मुंबईत अनेक कामं आपण केलेली आहेत, अशी एकानंतर एक उदाहरणे देऊन आदित्य ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सजग केलं.
व्होट चोर, नोट चोर, क्रेडिट चोर भाजपा
आदित्य ठाकरे यांनी या सादरीकरणाच्या अंतिम टप्यात भाजपाला थेट आव्हान दिले. तुम्ही आमच्या कामाचं श्रेय घेऊ नका, आम्ही तुमच्या कामाचं श्रेय घेणार नाही. `व्होट चोर, नोट चोर, क्रेडिट चोर’ असं म्हणत त्यांनी थेट भाजपाच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली आणि शिवसैनिकांनी यांना रोखणं आता गरजेचं आहे असं आवाहन केले. आपण सातत्याने महायुती सरकारचे घोटाळे बाहेर काढत आहोत. रस्ते घोटाळा एक, रस्ता घोटाळा दोन. स्ट्रीट फर्निचर घोटाळा असे अनेक घोटाळे आपण जनतेसमोर मांडले आहेत. महायुतीचे सत्ताधारी सांगत होते, ३६ महिन्यात खड्डेमुक्त करू, पूरमुक्त करू. खिशाचे खड्डे भरलेत त्यांचे, मुंबईचे खड्डे भरले आहेत का? ह्या घोटाळ्यांची उत्तरं त्यांना आता द्यायला लावायचं आहे. जगातला सर्वात मोठा जमीन घोटाळा धारावीत आकार घेतोय. मुंबई ही मुंबईकरांचीच राहिली पाहिजे, मुंबईचं नाव अदानीस्तान होऊ द्यायचं नाही.
पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेत आपली सत्ता आणणं गरजेचं आहे. ही शपथ छत्रपती शिवरायांच्या समोर घेऊन कामाला लागायचं आहे. मुंबई कोणाची? हा प्रश्न जेव्हा जेव्हा उपस्थित करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाईल तेव्हा तेव्हा मुंबई आमच्या साहेबांची एवढंच उत्तर मनामनात उमटलं पाहिजे. मुंबई आपल्याला मिळाली नव्हती. लढवून घ्यायला लागली होती. ज्या मुंबईसाठी आपण लढत आहोत, ज्या मुंबईसाठी आपण जगत आहोत, ज्या मुंबईसाठी आपण जीवही द्यायला तयार आहोत त्या संयुक्त महाराष्ट्रात हे भाजपाचे लोक आपल्याच मराठी माणसात़फूट पाडून त्यांना धाक दपटशा दाखवून मुंबई लुटायला सरसावले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांच्या हातात मशाल घेऊन मुंबई वाचवण्याची वेळ आलेली आहे. हातात मशाल घेऊन महानगरपालिकेवर भगवा फडकवायला तयार राहा. कारण बोलले जे तेच केलंय करून दाखवलंय!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मनामनात रे!!
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
मुखमुखातून रे!!!
(लेखक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ता आणि जनसंपर्कप्रमुख आहेत.)

