नमस्कार ,
या वर्षी मार्मिकने हीरक महोत्सव साजरा केला. मार्मिक म्हणजे शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कुंचल्याच्या धारधार फटकाऱ्यातून साकारलेली मराठी जनांसाठीची चळवळ. ज्याने पुढे शिवसेना नावाच्या तेजस्वी इतिहासाला जन्म दिला. निद्रिस्त समाजाला जागे करीत बाळासाहेब अन्यायाविरोधात लढण्यासाठी कुंचल्याच्या शस्त्रासह लढते झाले.
मार्मिकनेही ६० वर्षांची ही लढाई लढत ‘ एकमेव व्यंगचित्र साप्ताहिक’ अशी आपली ओळख कायम ठेवली आहे.
मार्मिक हे केवळ एक साप्ताहिक नाही, तर तो बाळासाहेबांचा विचार जागृत ठेवणारे एक व्यासपीठ आहे. बाळासाहेबांनी सुरू केलेली व्यंगचित्र कलेची परंपरा आहे.
त्याच प्रेरणेतून बाळासाहेबांचा वारसा पुढे नेत आम्ही मार्मिकला नवीन स्वरूप देत आहोत.
मार्मिकला साता-समुद्रापलिकडील मराठी माणसापर्यंत पोहोचवणारे हे सीमोल्लंघन आहे.
व्यंगचित्रकारांची नवीन पिढी घडविण्याचा हा श्रीगणेशा आहे. त्याचसाठी प्रेरणा म्हणून नव्या स्वरूपातील मार्मिक साकारताना बाळासाहेबांच्या या फटकाऱ्यांच्या आठवणींना उजाळा.