२७ ऑगस्ट १९६१ या तारखेच्या मार्मिकच्या मुखपृष्ठावरील हे व्यंगचित्र. मार्मिक सुरू होऊन जेमतेम एक वर्ष लोटलं होतं. बाळासाहेबांच्या फटकार्यांमध्ये आपल्याला त्यांनी फ्री प्रेसमध्ये काढलेल्या व्यंगचित्रांच्या शैलीची झलक मिळते. समुद्राच्या लाटांमधून त्यांनी युद्धाचा महाराक्षस किती प्रत्ययकारी, भेसूर चित्रित केला आहे ते पाहण्यासारखे आहे. नारळी पुनवेला खवळलेल्या समुद्राला नारळ अर्पण करून तो शांत व्हावा, अशी विनंती कोळी बांधव करतात. ही कल्पना बाळासाहेबांच्या व्यंगचित्रांत अनेकदा येते. इथेही सगळं जग हे कोळीबांधवांच्या रूपात युद्धाच्या भडकलेल्या सागरात श्रीफळ अर्पण करताना दिसते. आज जगावर पुन्हा एकदा युद्धाचं सावट आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातला संघर्ष कधीही विकोपाला जाऊन जागतिक महायुद्धात रूपांतरित होईल, अशी भीती आहे. बाळासाहेबांनी नुकत्याच झालेल्या होळीच्या सणाचं रूपक वापरून होळीच्या लालभडक ज्वाळांमध्ये श्रीफळ अर्पण करून होलिकामातेला हा युद्धाचा भडका कमी करण्याची प्रार्थना करणारी वसुंधरा कशी रेखाटली असती, याची कल्पना या चित्रावरून सहज करता येईल.

