छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण भारताचं आराध्य दैवत आहे, असं आपण मराठीजन समजतो. त्यात आजच्या काळात कितपत तथ्य आहे, ते तपासायचं असेल तर शिवजयंतीच्या आसपास फेसबुक, ‘एक्स’ यांसारख्या समाजमाध्यमात अन्य प्रांतांमधून शिवरायांबद्दल किती विखार व्यक्त केला जातो, ते पाहा. भानावर येईल महाराष्ट्र. अर्थात, महाराष्ट्र तरी खरोखर भानावर आहे का? इथे शिवरायांच्या जन्माबद्दल, त्यांच्यात स्वराज्याची प्रेरणा कुणी उत्पन्न केली याबद्दल, त्यांना मार्गदर्शन कोणी केलं याबद्दल आणि त्यांची लढाई कोणासाठी, कशासाठी होती, याबद्दल केवढे मोठे संभ्रम निर्माण केले गेले आहेत. त्यांच्या चारित्र्याविषयी, राजकीय समजेविषयी आणि कारकीर्दीविषयी कंड्या पिकवणारे नीच या मातीतच पैदा झालेले आहेत आणि विद्यमान राजवट त्यांना पाठिशी घालताना दिसते, पण मराठी माणूस काही त्याने विचलित होत नाही. तो इतका दळभद्री आणि लाचार बनून बसलेला असल्यामुळेच काळी टोपी कोश्यारी इथे त्यांची आणि इतर महापुरुषांची बिनदिक्कत बेइज्जती करतो आणि त्याला पद्म पुरस्काराची बक्षिसी मिळते. मराठीभाषकच जिथे शिवरायांचा द्वेष करणार्यांना, शिवद्रोह्यांना डोक्यावर घेऊन नाचतायत, तिथे अन्यप्रांतीय त्यांची बदनामी करतात, यात आश्चर्य काय? हे मुखपृष्ठ आहे १९८१ सालातलं. त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, राष्ट्रपती झैलसिंग महाराष्ट्रातल्या सामान्य मराठी शेतकर्याला बजावतायत, शिवराय सगळ्या देशाचे होते! तेव्हा मराठी शेतकरी निदान त्यांच्याकडे ही अपेक्षा करू शकत होता की शिवराय सगळ्यांचे होते हे इतर राज्यांनाही सांगा! आता तीही सोय उरलेली नाही, ना राज्यात, ना केंद्रात!

