रवांडा युद्धात आठ लाखापेक्षा जास्त टुट्सी मारले गेले. दोन लाख हुटू मेले असावेत. ३० लाख लोक शेजारच्या झैरे, बुरुंडी, तांझानिया या देशात स्थलांतरित झाले. ६ लाख बाहेरच्या देशांतून रवांडात परतले. खुद्द रवांडात टिकले तरीही बेघर झाले अशांची संख्या होती २० लाख.
सिविल वॉर संपल्यानंतर आफ्रिकन युनियनच्या मध्यस्थीनं जमातींमध्ये सख्य आणि चांगले संबंध प्रस्थापित करण्याचे प्रयत्न झाले. सुडाच्या भावनेनं न वागता गुन्हेगारांना क्षमा करावी, शक्यतो त्यांना पुन्हा सामावून घ्यावं, असे प्रयत्न झाले. नेल्सन मंडेला यांच्याकडून ही प्रेरणा घेतली होती.
आरपीएफचं राज्य सुरू झालं. एकेकाळी बंडखोर असलेले टुट्सी नेते रवांडाचे अध्यक्ष झाले. खुद्द त्यांच्यावरही अनेक माणसं मारण्याचे आरोप होते.
टुट्सी रवांडात परतले. पण हज्जारो हुटू देश सोडून पळून गेले. टुट्सींच्या आरपीएफचं राज्य सुरू झाल्यावर १३ लाख हुटू सैनिक, मिलिशिया आपण कांडात निघणार या भीतीनं शेजारच्या झैरेत गेले. तिथं त्यांच्या छावण्या झाल्या. झैरेच्या मोबुतू यांनी या हुटू लोकांचा फायदा घेतला, त्यांचा वापर करून रवांडावर हल्ले करायला सुरुवात केली. रवांडा-झैरे वैर तीव्र झालं.
कोसळलेली अर्थव्यवस्था सावरण्याचा प्रयत्न १९९५ पासून सुरू आहे.
रवांडात जनतंत्र आहे, पण नावालाच. कगामे यांची हुकूमशाही तिथं चालते. कगामे यांची वर्तणूक, चेहरामोहरा, बोलणं इत्यादी आकर्षक आहे, पश्चिमी श्रीमंत देशांना आवडणारं आहे. ते अनेक भाषा लिलया बोलतात. त्यामुळं पश्चिमेतले देश त्यांना मदत करायला उत्सुक असतात. पश्चिमी प्रभावाखाली किगाली ही राजधानी पॉश झालीय, शहरं चकाचक झालीत. हवामान छान असल्यानं रवांडाकडं पर्यटक आकर्षित होतात.
सिविल वॉरची कारणं, जमातींमधला दुरावा-वैर नाहीशी झाल्यासारखी दिसतात. टुट्सी हुटू वैर संपलेलं नाही, पण आटोक्यात आहे. ते वैर आता काहीसं आंतरराष्ट्रीय आहे, पण अडगळीत आहे.
***
नरसंहाराला बरीच पार्श्वभूमी आहे.
हूटू, टुट्सी आणि ट्वा या तीनही जमातींची भाषा एक होती, संस्कृती एक होती, एकाच भूप्रदेशात ते शेकडो वर्षं एकमेकांसोबत गुण्यागोविंदानं नांदत होते. तरीही एक जमात दुसर्या जमातीचा संहार करायला का तयार झाली?
आधुनिकता येण्याच्या आधी, लोकशाही आणि निवडणुका येण्याच्या आधी रवांडात राजकारण नव्हतं. राजा सांगे, जमातीचा प्रमुख सांगे, लोक ते ऐकत. आधुनिकता आली आणि जमातींमधल्या वैविध्यानं जातीय वळण घेतलं, राजकीय वळण घेतलं.
म्हणजे आधुनिकतेवर खापर फोडायचं कां?
तसंही म्हणता येणार नाही.
रवांडा हा देश, भूभाग, आफ्रिकेच्या साधारण मध्यावर आहे. त्याला समुद्रकिनारा नाही. आप्रिâकेच्या किनार्यांवरच्या प्रदेशात माणसं सहजासहजी वसाहती करायला पोहोचली, ते रवांडाच्या बाबतीत फार उशिरा घडलं. १८९०नंतर तिथं जर्मन लोक पोचले. वसाहत चालवत असताना काही जर्मन अभ्यासकांनी रवांडातल्या लोकांचा मानववंशशास्त्रीय अभ्यास सुरू केला. कवट्यांची मापं घेतली. इथियोपियन, बांटू, मंगोल अशी त्यांची वर्गवारी केली. तोपर्यंत रवांडातल्या लोकांना आपल्यात असा फरक आहे हे माहित नव्हतं. दुसर्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला. जर्मनीशी शत्रुत्व असलेल्या बेल्जियमनं रवांडाचा ताबा घेतला. त्यांनी रवांडातल्या लोकांचं औपचारिक वर्गीकरण केलं, त्यांना हुटू, टुट्सी आणि ट्वा अशी नावं दिली. हा १९५० चा सुमार होता. बेल्जियन लोकांनी ताबा घेतला तेव्हां रवांडात राजेशाही होती, एक टुट्सी माणूस राजा होता.
इथं जमातींच्या वेगळेपणाचा एक पैलू येतो. हुटू हे स्थायिक, शेतकरी. आर्थिक परिस्थिती जेमतेम. टुट्सी हे रँचर, म्हणजे जनावरं पाळणारे. जनावरांपासून शेतीच्या तुलनेत जास्त उत्पन्न मिळतं. त्यामुळं टुट्सी धनिक. संख्येनं १५ टक्के पण श्रीमंत. स्वाभाविकपणे समाजावर त्यांचा पगडा होता. राज्य करणं वगैरे कला त्यांना अवगत होती. टुट्सी मालक आणि हुटू त्यांच्या शेतांवर, त्यांच्या जनावरांकडं लक्ष देणारे कामगार. म्हणजे वर्गाच्या हिशोबात दोघांचे वर्ग वेगळे आणि त्यात श्रेणी. टुट्सी वरच्या श्रेणीतले. औद्योगीकरणानंतर जग बदललं, गरीब श्रीमंत अशी वर्गवारी जगात झाली. विषमता निर्माण झाली. रवांडातली जनता एकूणच जगापासून दूर असल्यानं त्या भानगडी रवांडात नव्हत्या. परिणामी स्वाभाविक मानवी कुरबुरी वगळल्या तर टुट्सी-हुटू गुण्यागोविंदानं नांदत होते.

बाजारव्यवस्थेचं लोकशाही हे एक अटळ आवश्यक अंग असतं. रवांडातले लोक दुसर्या महायुद्धात ओढले गेले आणि युद्ध संपता संपता युरोपियन-बेल्जियन राजकीय व्यवहाराची लागण रवांडाला झाली. रवांडात लोकशाही स्थापन झाली. म्हणजे राजकीय पक्ष तयार झाले. पक्ष जातीनिहाय असतात, पंथनिहाय असतात, भाषानिहाय असतात हे आपण अनुभवलंय. टुट्सींचा पक्ष, हुटूंचा पक्ष असं झालंच. सत्ता काबीज करायची तर पक्षाला बहुमत मिळायला हवं. राजकारणात अटळ असलेली स्पर्धा रवांडात सुरू झाली. स्वाभाविक आहे की ८४ टक्के नागरिकांचा हुटू पक्ष बलवान आणि सत्ताधारी राहणार. सरकारांत आणि लष्करात हुटूंचा भरणा झाला, महत्त्वाच्या पदांवरही हुटू. टुट्सीमध्ये असंतोष पसरला. टुट्सी पक्ष आणि हुटू पक्षांत मारामारी सुरू झाली. १९८०नंतर रवांडाची अर्थव्यवस्था डळमळीत्ा झाली. कॉफी हे तिथलं मुख्य पीक- कॉफीची निर्यात होत असे. जगात कॉफीचे भाव कोसळले आणि रवांडाची अर्थव्यवस्था कोसळली.
बेरोजगारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी टुट्सी स्थलांतरित झाले. शेजारच्या बुरुंडी, युगांडा, झैरे या देशात गेले. तिथं त्यांची संख्या लक्षणीय झाली, तिकडल्या राजकारणातही ते सक्रीय झाले. देशाबाहेरच्या भायले टुट्सीचीं संख्या सहा लाख झाली. इकडे रवांडातली परिस्थिती बिकट असल्यानं इतकी मंडळी बाहेर गेली म्हणजे पीडा गेली, असं हेब्यारिमाना यांना वाटलं. पण बाहेर गेलेली मंडळी बाहेर सुखात नव्हती, शेवटी त्यांचं स्थान स्थलांतरित, उपरे असंच होतं. त्यामुळं टुट्सी परतायचा प्रयत्न करीत, रवांडा सरकार त्याना स्वीकारायला तयार नसे, त्यांना आपल्या अर्थव्यवस्थेवरचं ओझं वाढवायचं नव्हतं. परिणामी हुटू आणि टुट्सीमधील तणाव वाढत राहिले.
युगांडातले टुट्सी युगांडातल्या राजकारणात सक्रीय होते. त्यांनी युगाडांत लष्करी कसब आणि शिक्षण आत्मसात केलं. मुसेवेनी यांनी इडी अमीन यांना घालवून सत्ता काबीज केली, तेव्हा त्या बंडात टुट्सींनी त्यांना मदत केली.
रवांडा सरकार टुट्सींना परत घ्यायला तयार नसे, टुट्सींना जायचं तर होतंच. तेव्हा कधी तरी हाणामारी करूनच रवांडात घुसावं लागेल असा हिशोब करून टुट्सींनी रवांडा पेट्रियॉटिक प्रâंट (आरपीएफ) ही संघटना स्थापली. यथावकाश या राजकीय संघटनेची लष्करी शाखाही तयार झाली. या लष्करी शाखेनं रवांडावर हल्ला करण्याची योजना आखली. हल्ला करायचा, रवांडा सरकारचा पराभव करायचा आणि रवांडात आपलं सरकार स्थापन करायचं असा आरपीएफचा कार्यक्रम होता.
आरपीएफ आणि रवांडाचं सैन्य यांच्यात लढाया होऊ लागल्या. वेळ अशी आली की रवांडाच्या सैन्यापेक्षा आरपीएफचं सैन्य मोठं होतं, अधिक शस्त्रसज्ज होतं, अधिक कुशल होतं. १९८५ नंतर चार पाच आक्रमणं आणि लढाया झाल्या. आरपीएफ, टुट्सींचं म्हणणं होतं रवांडा आपली मातृभूमी असल्यानं आपल्या देशात परतण्याचा अधिकार आपल्याला आहे. रवांडा सरकारचं म्हणणं की आरपीएफचे लोक दहशतवादी आहेत, देशद्रोही आहेत, शस्त्रांच्या जोरावर देश काबीज करण्याचा प्रयत्न ते करत आहेत.
१९९० मध्ये आरपीएफनं युगांडा हा आपला तळ केला. इजिप्त, द. आप्रिâका, अमेरिका, चीन यांच्याकडून त्यांना शस्त्रांचा पुरवठा सुरू झाला. जगभरात शस्त्रं पुरवणारे व्यापारी होते. ड्रग्ज उलाढालीतला काळा पैसा शस्त्र बाजारात वापरला जात असे. हज्जारो टुट्सी युरोप आणि अमेरिकेत परागंदा झाले होते, ते पैसे पुरवत. लढाईची तंत्रं आणि कौशल्यं टुट्सीनी प्रामुख्यानं अमेरिकेत आत्मसात केली. रवांडा सैन्यातून पळून आलेल्या लोकांसह आरपीएफकडं चार हजार लोकांचं सैन्य तयार झालं होतं. त्या वेळी रवांडाचं फ्रेंचांनी शिकवून तयार केलेलं सैन्य पाच हजार माणसांचं होतं.
१९९० मध्ये आरपीएफनं हल्ला केला. किगाली या राजधानीपासून पन्नासेक मैलावर असताना रवांडा सरकारनं हूल उठवली की आरपीएफचं सैन्य किगालीत पोचलंय. रवांडा पोलिस आणि सैन्यानं किगालीतल्या दोनेक हजार टुट्सीना मारलं. बेल्जियन, प्रâेंच सैन्यानं मदत केल्यामुळं रवांडाचं सैन्य परिणामकारक ठरलं, आरपीएफनं माघार घेतली. तिथून आरपीएफ सतत रवांडावर हल्ले करत राहिली. रवांडाचं सैन्य चार हजारपेक्षा वाढलं नाही, पण आरपीएफचं सैन्य मात्र २५ हजार सैनिकांचं झालं. आरपीएफची वाढलेली ताकद पाहता रवांडाच्या सरकारला कळलं की आता काही तरी मांडवळ करावी लागणार.
१९९२च्या जुलै महिन्यात शेजारच्या तांझानियात आरुषा या शहरात रवांडा सरकार आणि आरपीएफ यांच्यात समेटाच्या वाटाघाटी सुरू झाल्या. आप्रिâकन युनियननं या वाटाघाटी घडवून आणल्या. १९९३च्या ऑगस्टमध्ये करार तयार झाला. रवांडात एक संयुक्त सरकार स्थापन करावं, त्यात आरपीएफ आणि रवांडातले पाच पक्ष सामील होतील, त्यात महत्त्वाची खाती आरपीएफकडं असतील; निवडणुका होऊन कायद्याचं राज्य प्रस्थापित होईल; बाहेर स्थलांतरित झालेल्या टुट्सींना रवांडात घेतलं जाईल; रवांडाचं सैन्य आणि आरपीएफचं सैन्य एकत्र केलं जाईल, असं करारात ठरलं.
करार झाला खरा, पण आरपीएफ वगळता इतर कोणीही या करारावर खूष नव्हतं. आरपीएफला झुकतं माप दिलं गेलंय, इथून पुढे आरपीएफ म्हणजे टुट्सींची दादागिरी सुरू होणार असं बहुसंख्य हुटूंना वाटलं.
करार झाला खरा, पण तो मोडायचा कसा यावर हुटूनी विचार सुरू केला, तयारी सुरू केली. हबियारिमानानी पक्षाची युवा शाखा सक्रीय केली. मुलं गोळा केली. त्यांना शत्रू कोण आहे ते सांगितलं. त्यांना शस्त्रं दिली. लष्करी अधिकार्यांनी त्यांचं प्रशिक्षण केलं. सरकारतर्पेâ एक नागरी संरक्षण दल तयार केलं. सामान्य नागरिक या दलात घेतले. या दलांवर तरुणांना भरती करण्याची जबाबदारी टाकली. स्वतंत्रपणे या दलांच्या लोकांनाही शत्रू कोण आहे ते सांगून त्यांची तयारी करून घेतली.
रेडियो आणि टीव्हीवर प्रचार सुरू झाला. त्यात टुट्सी कसे देशद्रोही आहेत, ते कसा देश खतम करायला निघाले आहेत, याची वर्णनं केली. त्यांनी कसकसे शस्त्रांचे साठे तयार केलेत त्याची फेक चित्रफीत तयार करून ती प्रसारित करण्यात आली. कसकशी माणसं मारायची याचा तपशीलवार आराखडा कर्नल बॅगोसोरा यांनी तयार केला. सर्वांनाच बंदुका इत्यादी देणं शक्य नव्हत्ां. तरूणांना कोयते पुरवण्यात आले, कोयते शेजारच्या देशातून आयात करण्याची जबाबदारी बिझनेसमनांवर टाकण्यात आली.
हत्याकांड करू नये अशा मताची बरीच माणसं होती, लष्करात आणि सरकारी यंत्रणेत. त्यांना वेचून वेचून ठार मारण्यात आलं. १९९४च्या जानेवारी महिन्यात रंगीत तालीम झाली. काही हजार टुट्सी मारण्यात आले. आरुषा कराराचं पालन करण्यासाठी युनोनं शांतीसैनिक रवांडात ठेवले होते. त्या दलाचे प्रमुख डेलेर यांनी युनोचे बुत्रोस बुत्रोस घाली यांना तार करून कळवलं की कराराचं पालन होत नाहीये, नरसंहाराची तयारी चालली आहे, कृपा करून योग्य पावलं उचला, सैन्य पाठवा.
करार करून नेते किगालीला परत असताना घातपात झाला. युद्ध सुरू झालं.
***
हे ब्यारीमानाना सत्ता सोडायची नव्हती.
हेब्यारीमाना यांनी जमातींमधील अस्वस्थता आणि गैरसमज यांचा वापर राजकीय स्वार्थासाठी केला.
झैरे, बुरुंडी आणि युगांडा या शेजारच्या देशांनी संघर्षाला खतपाणी घातलं.
आंतरराष्ट्रीय संस्था, देशांना रवांडात रस नव्हता. लहान देश, बाजाराच्या हिशोबात महत्त्वाचा नव्हता.
रवांडात लाखो माणसं मेली.

