हे मार्मिकच्या अगदी सुरुवातीच्या दिवसांतले मुखपृष्ठचित्र आहे, मार्मिक सुरू होऊन दुसर्याच वर्षातले. २८ जानेवारी १९६२ या तारखेचा हा अंक आहे. म्हणजे साधारण ६४ वर्षांपूर्वीचा शेतकरी इथे दिसतो आहे…भारत हा स्वतंत्र झाला तेव्हा कृषिप्रधान देश होता. शेतकरी हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा होता. देशाची ७० टक्क्यांपेक्षा जास्त प्रजा शेतीवर जगत होती… याचा राजकीय अर्थ एकच होता…ही एकगठ्ठा मतं होती देशातली… सगळ्यात जास्त मतं. त्यामुळेच सगळेच पक्ष शेतकर्यांना आपल्या मोर्च्यात, मिरवणुकीत ओढण्याचा प्रयत्न करत होती. बरं, राजकीय पक्षांमध्ये इतका मानसन्मान असलेला हा शेतकरी फार संपन्न, सधन वगैरे होता का हो? अजिबात नाही. त्याची अवस्था महात्मा गांधींनी ज्या गरीब, अर्धनग्न भारतीयांचं प्रतिनिधित्व पोषाखातून केलं, त्या शेतकर्यांसारखीच होती. म्हणजे तेव्हाही शेतकर्याला खूष करण्यासाठी बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असा प्रकार केला गेला होता… अर्थात, यानंतरच्या टप्प्यावर हरित क्रांती आणि धवल क्रांतीच्या माध्यमातून शेतकर्यांचं आयुष्य सुधारलंच. तेव्हा शेतकर्याला आपल्याकडे ओढायची सगळ्यांची इच्छा असायची, आता…आता मात्र देशातले सत्ताधीश शेतकर्याला भिकेला लावलं तरी तो आपल्यालाच मतदान करणार आहे, याची खात्री बाळगून आहेत. या सरकारच्या शेतीविषयक धोरणांनी देशभरातल्या शेतकर्यांना नाडलेलं आहे. त्यात आता अमेरिकेतल्या कृषिमालाला भारतात मुक्त शिरकाव करण्याची अट मान्य करून हे सरकार शेतकर्याच्या शवपेटिकेवर शेवटचा खिळा ठोकणार आहे… मात्र, तरीही प्रत्येक निवडणुकीत, अगदी ग्रामपंचायतीच्या पातळीवरही शेतकरी यांनाच मतदान करत आहेत, भरघोस मतांनी निवडून देत आहेत… हे कसे? कारण, तेव्हा शेतकरी फक्त शेतकरी होता… आता त्याची धर्म, जातींमध्ये विभागणी झालेली आहे, वाघाचा काल्पनिक धोका टाळण्यासाठी शेळ्यांनी लांडग्यांवर विश्वास टाकला आहे… आता फडशा तर पडणारच!

