शिवसेनेच्या स्थापनेनंतरच्या वर्षात झालेल्या लोकसभा-विधानसभेच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेचा थेट सहभाग नव्हता, पण पाठिंबारूपी सहभाग होता. त्यात शिवसेनेने पक्षभेद केला नव्हता. ज्याला शिवसेनेचा कार्यक्रम मान्य होता आणि जो लोकसभेत, विधानसभेत मराठी माणसाच्या न्याय्य हक्काचा आवाज उठवू शकेल, अशा सर्वपक्षीय उमेदवारांना राष्ट्रनिष्ठा आणि महाराष्ट्रनिष्ठा यांच्या आधारावर पाठिंबा दिला गेला होता. त्या काळात पोथीनिष्ठ कम्युनिस्टांच्या राष्ट्रनिष्ठेबद्दलच शंका यावी, अशा प्रकारचे भारतातल्या कम्युनिस्टांचे वर्तन होते. त्यामुळे हे ‘लालभाई’ देशातील लोकशाहीला विळखा घालणारे साप आहेत, असं चित्रण बाळासाहेबांनी २६ फेब्रुवारी १९६७च्या मार्मिकच्या मुखपृष्ठावर केलं होतं… या सापाच्या अंगावर त्यांनी कम्युनिस्टांच्या पक्षचिन्हाचं डिझाइन बनवलं होतं… आज पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलं आहे की कम्युनिस्टांनी शिवसेनेला ‘मातोश्री’वर जाऊन पाठिंबा जाहीर केला होता मागच्या निवडणुकीत आणि स्वातंत्र्याच्या आयत्या बिळावर नागोबा बनून लोकशाहीचा घास घ्यायला सज्ज झाली आहे ती कुटील कारस्थानी कमळी! बेबंदशाहीचा, अराजकाचा, बिनविरोधशाहीचा चिखल माजवून ती जिकडे तिकडे ओंगळ कमळ फुलवत सुटली आहे. आज बाळासाहेबांनी हे चित्र पुन्हा रेखाटलं असतं तर सापाच्या शरीरावर कमळाचंच डिझाइन असलं असतं, यात शंका नाही.
