२ मार्च १९६९ या तारखेची ही रविवारची जत्रा आहे. बाळासाहेबांच्या व्यंगचित्रकलेबद्दल बोलताना बहुतेक वेळा त्यांच्या जबरदस्त ताकदीने फटकारे देणार्या मुखपृष्ठांची चर्चा खूप होते. त्यामानाने ‘जत्रे’ची चर्चा होत नाही. अनेक व्यंगचित्रकार रेषांच्या रेफरन्ससाठी, त्यांच्या अभ्यासासाठी जत्रा बारकाईने अभ्यासतात. पण, जत्रेतले विषय तात्कालिक असल्यामुळे आणि त्यांतल्या बहुतेक व्यक्तिरेखा काळाच्या आणि विस्मृतीच्या पडद्याआड गेलेल्या असल्याने त्यांचे संदर्भही आता हरवले आहेत. मात्र, मार्मिकच्या प्रारंभीच्या काळात जत्रा हे एक मोठं आकर्षण होतं. एखाद्या चलचित्रपटाप्रमाणे बाळासाहेब ती कौशल्याने खेळवायचे. एक ढोबळ विषय आणि त्यात वेगवेगळी चित्रं असं जत्रेचं स्वरूप असलं तरी रचना अशी नाट्यात्मक की नजर या चित्रावरून त्या चित्रावर जाताना एक सीन पाहून पुढच्या सीनमध्ये जायची आणि काही वेळा ते दोन चित्रांची बेमालूम जोडही करायचे. ही सगळी वैशिष्ट्यं धारण केलेली ही धुळवडीची जत्रा आहे. त्यात हाका आणि बोंब मारणारे काही चेहरे ओळखीचे आणि काही अनोळखी. एकेकाळी बाळासाहेब आणि श्रीकांतजी ठाकरे या बंधूंचं दैवत असलेल्या आचार्य अत्रे यांच्याबाबतीत बाळासाहेबांच्या मनात किती कटुता आली होती, ते इथे दिसते. शिवसेनेच्या नावाने बोंबलणार्यांमध्ये एक काळी टोपी लक्षणीय आहे. राजकारणातले नाना पदर टिपता टिपता अचानक बाळासाहेब वेगळ्याच ठिकाणची तंग परिस्थिती दाखवून जातात… या जत्रेतलं सगळ्यात लक्षवेधी चित्र आहे मुंबईतून मराठी माणसाच्या निर्मूलनाच्या मोहीमेचं. साठ सत्तर वर्षांपासून सुरू असलेली ही मोहीम आजही इथे जोर धरून आहे आणि त्यात मराठी गद्दारच आघाडीवर आहेत हे महाराष्ट्राचे दुर्दैव.
