टमाट्याच्या चाळीतला किशा तसा गिरणबाबू. फार तर सहावी-सातवी शिकलेला असेल, पण तरुण आणि गोरापान. कपडेही अगदी सिनेमातल्या हिरोला शोभतील असे. आम्ही त्याला शम्मी कपूरच म्हणायचो. चाळकर्यांच्या दोन कौटुंबिक नाटकांत त्याने हीरोची भूमिका केली होती. पायात बूट, डोळयावर गॉगल आणि गळ्यात रुमाल. बहुतेक वेळा टी शर्टवरच असायचा. बाजूच्या मोठ्या गिरणीत साच्यावर कामाला आहे, यावर कुणाचा विश्वासच बसला नसता. कायम दिवस पाळी. त्यामुळे साडेतीन नंतर घराबाहेरच्या बाकड्यावर सिनेमाची मासिकं चाळत निवांत पडायचा. संध्याकाळी सात वाजले की स्वारी झकपक कपडे करून खाली फिरायला उतरायची. त्याचं फिरणं म्हणजे पंधरा मिनिटांच्या अंतरावर असलेल्या नाक्याच्या पलीकडच्या वाडीत आंटीच्या घरगुती अड्ड्यावर जाऊन ढोसण्याचा एकपात्री कार्यक्रम. त्याला दोस्त वगैरे मंडळींची गरजच कधी भासली नाही. नोकरीबरोबर खाना, पिना और मजा करना एवढंच काम.
घरात म्हातारी आई, साध्या नोकर्या करणारे दोन भाऊ. एक याच्याहून मोठा आणि दुसरा छोटा. कुणाचंच लग्न झालेलं नाही. एक फावल्या वेळेत घरात मटक्याच्या डेल्या घेऊन त्याची गणितं सोडवत असायचा. दुसरा चाळीच्या कबड्डी संघाचा कॅप्टन. कुणाच्याच आल्यागेल्यात नसायचा. किशाला मात्र सिनेमाची खूप आवड. नवीन आलेला एकही हिंदी सिनेमा तो कधी चुकवायचा नाही. आणि जुने जवळजवळ सर्व हिंदी सिनेमे त्याने पाहिले होते. त्यामुळे त्यातील बरीचशी गाणी आणि डायलॉग त्याला पाठ होते. खालून पिऊन आला की बाहेरच्या बाकड्यावर बसून त्याचा वन मॅन शो सुरू व्हायचा. शेरोशायरीची त्याला खूप आवड. तो रंगात आला की मजल्यावरची वयात आलेली पोरं त्याच्या खूप फिरक्या घ्यायची. त्याला गाणी, डायलॉग बोलायला लावायची. त्याला ठराविक एक-दोन शेर पाठ होते. ते म्हणायला लावायची. त्याच्याकडून पार्टीसाठी पैसे उकळायची. पण त्याने कधी कुणाचा राग केला नाही. चाळीत अनेक प्रेमप्रकरणं सुरू होती, पण हा कधी कुणाच्या प्रेमात पडला नाही की चाळीतल्या कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघितलं नाही. हातात असलेल्या सिगारेटचे झुरके मारत तो चाळीचे बत्तीस पायर्यांचे दोन जिने झर्रकन अर्ध्या मिनिटात उतरायचा. एकदा तो पंधरा दिवसांची रजा काढून गावी जाऊन आला आणि रात्री पिऊन आल्यावर दारातल्या बाकड्यावरच त्याने पत्रकार परिषद घेतल्यासारखी आम्हा सर्व मित्रमंडळींसमोर घोषणा केली की आजपासून दारू सोडली. आता पिऊन आलो ती शेवटची. त्याच्यात अचानक आलेला हा बदल सर्वांनाच खटकला. पण त्याने हसत उत्तर दिलं. बर्याच वर्षांनी गावी गेलो होतो. तिथे एका मुलीच्या प्रेमात पडलो. तिला पाहिल्यावर काय झालं ते कळलंच नाही. अक्षरश: झपाटून गेलो. खूप छान आहे. बारावीला आहे. तिलाही माझ्याबरोबर लग्न करून मुंबईत राहायचं आहे.
ताबडतोब आमच्यातल्या एकाने विचारलं, ती वयाने अजून लहान असताना तुझ्याशी लग्नाला तयार झाली? त्यावर किशा उत्तरला, लग्नाची घाई नाही. आणखी चार वर्षांनी करू लग्न. पण अगदी मधुबाला आहे मधुबाला. सध्या स्कर्टवरच असते. पण साडीत काय मस्त दिसते. मे महिन्यात मुंबई दाखवायला आणणारच आहे तिला. तिला विमानात बसायची खूप इच्छा आहे. तिला विमानातून मुंबईची सैर घडवणार आहे मी. किशाच्या स्वप्नाने आम्ही सगळेच चाट झालो.
बारावीला असणारी मुलगी या कागदावर चार अक्षरेही नीट लिहिता न येणार्या हिरोच्या प्रेमात पडली याचंच आश्चर्य वाटत होतं. तू कशी काय कटवलीस तिला, असं विचारल्यावर किशाची रसवंती सुरू झाली. म्हणाला, गावी मी घरासमोरच्या गडग्यावर
गॉगल लावून सिगारेट फुकत बसलो की तिच्या घरातून चोरून बघायची मला. घरात असलो की काही ना काही निमित्त काढून काकूशी गप्पा मारायला यायची आणि जाताना काकूकडे गावचा मेवा म्हणजेच करवंद, जांभुळं, काजू, सुकवलेले गरे असं काहीही देऊन जायची. काकूही म्हणायची, पोर गुणाची हाय. तुझ्या मनात असलं तर सोयरीक जमवू काही वर्षांनी. पण मी लक्ष न दिल्यासारखं केलं. एकदा मात्र ती घरी आल्यावर मी तिला ऐकू जाईल अशा तर्हेने एक शेर मारलाच.
कितने दिन छुपोगी पत्ते की आड में
इक दिन तो आयेगी खुले बाजार मे
आएगा कोई आशिक और तुझे खरीद लेगा
रस रस को चुसकर गुठलिको फेंक देगा
मग मात्र ती चरकली. तिने सरळ काकूकडे जाऊन आपण किशाच्या प्रेमात पडल्याचं सागितलं आणि काकीने आमच्या चोरून भेटीगाठी घेण्याचा मार्ग मोकळा करून दिला. मुंबईला गेल्यावर मला प्रेमपत्र पाठवण्यास विसरू नका काकूच्या पत्त्यावर, असं तिने सांगितल्यावर मात्र माझी हवा गुल झाली. मला ‘संगम’मधल्या राजकपूरचं ‘ये मेरा प्रेमपत्र पढकर’ची आठवण झाली आणि माझी गाळण उडाली.
किशाचं एवढं रामायण आम्ही कुतूहलाने ऐकलं पण नंतर मात्र किशाने मला एकट्यालाच थांबायला सांगितलं. बाकीचे सगळे पांगल्यावर किशा हात जोडून म्हणाला, या प्रेमपत्राच्या संकटातून तूच मला वाचवू शकशील. मला चार ओळी नीट लिहिता येत नाहीत. तर यापुढे माझी प्रेमपत्रं तू लिहून द्यायची. वाटल्यास मी तुला शेरोशायरीची पुस्तकं आणून देतो. तिची पत्रं आल्यावर तुझ्याकडे वाचायला देतो. गुलाबी नक्षीदार कागद लिहिण्यासाठी विकत आणून देतो. पण प्लीज माझ्यासाठी एवढं कर.
तिचं पहिलं पत्र आल्यावर मी स्वत:ला किशा समजून किशाच्या नावाने तिला प्रेमपत्र लिहिलं. त्यासाठी मला एक काल्पनिक प्रेयसी डोळ्यासमोर आणावी लागली. त्याशिवाय त्या प्रेयसीला उद्देशून किशाच्या सांगण्यावरून एक कविता रचून ती त्यात घुसडावी लागली. ती कविता आठवली की आजही मला हसू येतं.
कविता अशी होती- कविता कसली गाणंच होतं ते.
लव्ह लेटर लिहू की
प्रेमपत्र लिहू
की लिहू साधी चिठ्ठी आपली
माझी लाडकी म्हणू की
माय डियर म्हणू
तुला उपमा मी देऊ कसली?
गुलाबी कागद नि गुलाबी शाई
गुलाबी पाकळ्यांची सुंदर छपाई
गुलाबी प्रेमाची गुलाबी अक्षरं
लिहिताना का रुसली?
शब्द जुळवताना होते ही घाई
आठवलेलं सारं डोक्यातून जाई
शेरशायरी करू की, कविता करू
साधी चारोळी नाही सुचली
कविता वाचून किशा अगदी खूष झाला.
सर्व पत्र प्रेमाने न्हाऊन निघालं होतं. किशाला हवी ती शेरोशायरी अधूनमधून पेरली होती. त्याने त्या प्रेमपत्रावर अत्तर शिंपडून त्याला सुगंधी केलं आणि दिलं त्याच्या काकूच्या गावच्या पत्त्यावर पाठवून. ही पत्रापत्री तीन वर्षे म्हणजे किशाचं तिच्याशी लग्न होईपर्यंत सुरू होती. गिरणी संपात गिरण्या बंद झाल्यावर किशा तिला घेऊन कायमचा गावी गेला. टमाट्याच्या चाळीतल्या प्रेमपत्राच्या इतिहासाचा प्रारंभ प्रेम न करता माझ्या हस्ते झाला, याचा आजही अभिमान वाटतो.
मात्र त्या पत्राची कच्ची कॉपी जुन्या कागदपत्रात माझ्या पत्नीच्या हाती सापडली नाही म्हणजे मिळवली!
(लेखक ‘मार्मिक’चे सहसंपादक आहेत)