ए क एप्रिल हा एप्रिल फूल दिवस.
हा दिवस कसा सुरू झाला याच्या अनेक कथा आहेत. त्यातली प्रमुख कथा आहे फ्रान्समधली. १५८२ साली या देशाने ज्युलियन कॅलेंडरचा त्याग केला आणि ग्रेगरियन कॅलेंडर (जे आज जगभरात वापरात आहे) स्वीकारलं. एक एप्रिल हा ज्युलियन कॅलेंडरचा नववर्षदिन. सगळ्या देशाने ग्रेगरियन कॅलेंडर स्वीकारल्यानंतरही काही कट्टर ज्युलियनवाद्यांनी एक एप्रिल रोजीच नवं वर्ष साजरं करण्याची प्रथा चालू ठेवली आणि बाकीचे लोक त्यांच्या या मूर्खपणाची खिल्ली उडवण्यासाठी हा दिवस ‘एप्रिल फूल्स डे’ म्हणून साजरा करू लागले, अशी ही कथा.
हल्लीच्या काळात या दिवशी खोट्या बातम्या पसरवणे, अफवा पसरवणे, एखाद्यावर प्रॅक्टिकल जोक करणे, एखाद्याला निरर्थक कामगिरीवर पाठवणे, असे बनवाबनवीचे, गंडवागंडवीचे साधे सोपे खोड्या काढण्याचे प्रकार केले जातात. कधी कधी काही शहाण्यांनी अख्खं शहर बेवकूफ बनवल्याचीही उदाहरणं इतिहासात नमूद आहेत… पण आजचा काळ त्यापलीकडचा आहे… आज मोठमोठे लोकशाही देश आणि त्यातले नागरिक हातोहात उल्लू बनवले जात आहेत आणि त्यासाठी एक एप्रिलच्या मुहूर्ताची गरज नाही…राजाला जशी दर दिवशी दिवाळी असते, तशी मूर्खांच्या नंदनवनात वावरणार्यांनाही मूर्ख बनण्यासाठी विशिष्ट दिवसाची गरज नसते… त्यांचा रोजचा दिवसच मूर्खदिन असतो.
एकेकाळी एप्रिल फूलच्या दिवशी ज्याचा बकरा, मुर्गा, पोपट बनवला जायचा, तोही हसून दाद द्यायचा, आपण गंडलो, याची कबुली द्यायचा. आता लोकांना मूर्ख बनवणारे इतके शातिर दिमाग झालेले आहेत की आपण मूर्ख बनलो आहोत हेही मूर्ख बनणार्यांना कळत नाही, मान्य होत नाही. आपण शहाणेच आहोत, असं ते सांगत राहतात.
या सुमारांच्या सद्दीतला सर्वात मोठा मूर्खशिरोमणी कोण, या गौरवासाठी स्पर्धाच नाही. सगळं जग एकमताने सांगेल की लोकांना मूर्ख बनवणे आणि स्वत:ही वेडगळ चाळे करणे यात सर्वोच्च स्थानावर आहेत सर्वशक्तिमान अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प. त्यांनी आणि त्यांच्याशी विशेष घट्ट मैत्री असलेल्या (किंवा त्यांना ‘माय प्रâेंड डोलांड’ असे म्हणण्याइतकी आपली जवळीक आहे असे परभारे समजणार्या) इतर नेत्यांनी एकाच पुस्तकातून अभ्यास केला असावा राजकारणाचा. थापेबाजी हे त्यांच्या राजकारणाचं सूत्र. एक थाप आत्मविश्वासाने मारली की बहुसंख्य अर्धवटांना ती पटून जाते आणि शहाणी माणसं तिचा शास्त्रशुद्ध प्रतिवाद करतील तोवर आणखी शंभर थापा मारता येतात. थापेचा प्रतिवाद, सत्यशोधन वगैरे करायला संदर्भ द्यावे लागतात, माहिती शोधावी लागते, अस्सल कागदपत्रं धुंडाळावी लागतात. थापा मारण्यासाठी यातलं काहीच करावं लागत नाही. याचा फायदा ही नेतेमंडळी घेतात.
ट्रम्पतात्यांच्या साध्या इराण युद्धातल्या कोलांटउड्या पाहा. इराणची अण्वस्त्रक्षमता अमेरिकेने उद्ध्वस्त केली आहे, असा दावा त्यांनी गेल्या वर्षीच केला होता. पण, तरीही यावेळी हल्ला का केला, तर इराणची अण्वस्त्रक्षमता कायमची नष्ट करण्यासाठी! मग गेल्या वर्षी काय केलं होतं? इराणच्या जनतेने आपल्याला इराणचा राष्ट्रप्रमुख बनण्याची ऑफर दिली होती, अशीही लोणकढी त्यांनी मारली होती. युद्धात इराणने बाजी पलटवली तेव्हा युद्धस्थगिती जाहीर करताना त्यांनी इराणशी चर्चा सुरू असल्याचं सांगितलं. इराणने त्यांच्याशी कसलीही चर्चा सुरू नसल्याचं सांगितलं. आज अमेरिकेत लाखोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरलेले आहेत आणि ट्रम्पच्या हकालपट्टीची मागणी करत आहेत. हा माणूस सत्तेत आला तर हेच होणार याची खात्री असतानाही अमेरिकन जनतेने त्यांना एकदा नव्हे दोनदा निवडून दिलं… आता सांगा, अमेरिकनांना एक एप्रिलच्या एकमेव एप्रिल फूल्स डेची गरज आहे का?
तिकडे इस्रायलमध्ये ज्यांना इराण नष्टच करून टाकू असा चेव आला होता, तेच आता लढायला माणसं नाहीत, शहरं उद्ध्वस्त झाली आहेत, म्हणून युद्ध थांबवण्याची विनंती करत आहेत. हे युद्ध सुरू झालं तेव्हा अंडरग्राऊंड बंकर्समध्ये टीव्ही पाहात आणि बियरचे घुटके घेत आपण आयपीएल पाहात असल्यासारखे युद्धाचं लाइव्ह प्रक्षेपण पाहायचं आणि टाळ्याशिट्या वाजवायच्या, असं नियोजन केलं होतं या मंडळींनी. यांच्यासाठी एक दिवस पुरेल एप्रिलचा?
आपल्याकडे काही वेगळी परिस्थिती नाही. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरात सुरू आहे. बांगलादेशातून होणारी घुसखोरी हा भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराचा सर्वात मोठा मुद्दा. आसामात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात, आसामात आमची सत्ता आली की घुसखोरीचा प्रश्न संपवून टाकू. अरेच्चा! आसाममध्ये गेली पाच वर्षं तुमचीच सत्ता आहे, त्या काळात लाखो घुसखोर आल्याचा प्रचार करत तुम्ही फक्त दोन हजार घुसखोरांची पाठवणी केलीत. तुमचीच सत्ता आहेच, तरी तुम्हाला परत सत्ता हवी, तोच प्रश्न सोडवायला जो तुम्ही पाच वर्षांत सोडवू शकला नाहीत? या थापा ऐकून टाळ्या वाजवणार्यांसाठी एक एप्रिल पुरेल?
तिकडे बंगालमध्ये अमित शाह पण याच मुद्द्यावर तुणतुणं वाजवतायत. ममता बॅनर्जींच्या राजवटीत घुसखोरीला प्रोत्साहन मिळतं म्हणे! तुमची १२ वर्षं सत्ता आहे देशात. गृहखातं तुमच्या ताब्यात आहे. घुसखोरी हा विषय तुमच्याच विभागाच्या अखत्यारीतला. तो तुम्ही एवढ्या काळात सोडवू शकला नाहीत आणि बिल ममता बॅनर्जींवर फाडताय? काश्मीरचा प्रश्न असो, घुसखोरी असो की यांच्या कार्यकाळातल्या पाकिस्तानच्या तथाकथित दहशतवादी कारवाया असोत- या भाजपच्या दुभत्या गायी आहेत. हे प्रश्न सोडवले तर मतं मागणार कशाच्या बळावर? हे राजकारण ज्यांना दिसत नाही आणि या पक्षाला हिंदूंचा तारणहार म्हणून जे आंधळ्यासारखी मतं देत राहतात, त्यांच्यासाठी रोजचाच दिवस एक एप्रिलच नाही का?
महाराष्ट्रात सत्तेसाठी मिरची हवन करणार्यांमध्ये नरेंद्र दाभोळकरांचा वारस दिसतो, तोही कोणाला, तर ज्यांनी यांचा दुटप्पीपणा उघडा करायचा त्या विरोधी पक्षाच्या जबाबदार नेत्यांना. भोंदू बाबाचं प्रकरण उघड होतं, त्यात बळी जातो, तो फक्त मित्रपक्षातल्या नेत्यांचा. अशा एखाद्या बाबाने सत्ताधारी पक्षात प्रवेश केला तर त्याची सगळी पापं धुवून निघतील आणि त्याच्याकडे महिला, बालकल्याण असे विभागही सोपवले गेले तरी आश्चर्य वाटायला नको.
या अशा उफराट्या काळात एक एप्रिल या फक्त एकाच दिवशी मूर्ख दिन साजरा करणं हा जगभरातल्या मूर्खांचा अपमानच नाही का!
