पेंग्विन प्रकाशनाने छापलेलं परंतु अद्याप प्रकाशित न केलेलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच `फ्रेंडशिप वुईथ गद्दार’ हे भलं मोठं आत्मचरित्र योगायोगाने माझा मानलेला परमप्रिय लाडका मित्र पोक्या याच्या हाती लागलं, तेव्हा त्याच्या झेरॉक्स प्रती काढून त्या विधानसभा व विधान परिषद सदस्यांना फुकट वाटाव्या अशी कल्पना त्याच्या डोक्यात आली, पण त्याने ती व्हायरल न करता डोक्यातच ठेवली. फक्त मला त्याने त्या पुस्तकाची प्रत वाचायला दिली. हे कोलीत जर विरोधकांच्या हाती लागलं तर त्या सनसनाटी पुस्तकापेक्षा जास्त गदारोळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशात होईल हे लक्षात घेऊन पोक्याने चुपचाप बसणं पसंत केलं ते राज्यातील शांतता आणि कायदा-सुव्यवस्था बिघडू नये यासाठी. आधीच आगीतून फुफाट्यात, फुफाट्यातून आगीत, कधी शिंद्यांच्या वणव्यात, कधी वणव्याच्या शिंदेशाहीत सार्या प्रकारांना तोंड देता देता फडणवीसांच्या नाकी नऊ आले आहेत, हे लक्षात घेऊन पोक्याने तोंड बंद ठेवलं, हे बरंच झालं असं मला वाटलं. मात्र ते आत्मचरित्र चाळताना त्यात काही गोष्टींची कबुली अगदी प्रांजळपणे फडणवीसांनी दिलेली पाहून त्यांच्या पापभीरू स्वभावाबद्दल कधी नव्हे तो आदर वाटून गेला. त्या आत्मचरित्रातील काही पानातील निवडक उतारे वाचून कुणालाही त्यांच्या प्रामाणिकतेविषयी शंका घेण्याचं कारण उरणार नाही. ते लिहितात-
…घरं फोडणं, कुटुंब फोडणं, पक्ष फोडणं, आमदार फोडणं, खासदार फोडणं हा माझ्या हातचा मळ झाला होता. एखाद्या सराईत घरफोड्यापेक्षाही अधिक कौशल्याने मी हे पक्ष आणि कुटुंब फोडाफोडीचं काम किती तत्परतेने केलं याचं आज मला आश्चर्य वाटतं. एखाद्या विघ्नसंतोषी कजाग बाईप्रमाणे दुसर्या पक्षाच्या संसारात विष कालवणं हा माझा स्वभाव नाही. तरी पक्षाच्या आदेशानुसार मी हे काम माझी सर्व शक्ती पणास लावून करत गेलो आणि एक राज्य उलथून टाकून तिथे आपल्या पक्षाचं साम्राज्य आणण्यात मी यशस्वी झालो. त्याबद्दल पक्षश्रेष्ठींपेक्षा मीच माझी पाठ थोपटून घेतली.
इतर पक्षातून आमच्या पक्षात गणंग-भणंगांची भरती केली. कोण कसा आहे, किती भ्रष्ट आहे, कुठल्या पापाच्या-भ्रष्टाचाराच्या चिखलात लोळला आहे हे न पाहता भाजपचं पवित्र तीर्थ त्यांच्या अंगावर शिंपडून त्यांना स्वच्छ केलं आणि जम्बो वॉशिंगमध्ये धुवायला टाकून त्यांच्या कपड्यांवरचे सर्व डाग कसे नाहीसे होतील याकडे लक्ष पुरवत भाजपा वॉशिंग पावडरने त्यांची उत्तम धुलाई केली. आज आमच्या पक्षाच्या दांडीवर त्यांना कपड्यांसकट वाळत घातलं तरी हे पूर्वी डागाळलेले होते याचा जराही संशय येणार नाही. हे बंदे बाटग्यांपेक्षाही भाजपाशी अधिक प्रामाणिक मिंधे असल्यामुळे विरोधकांवर भू-भू करुन सोडण्यासाठी आम्हाला त्यांचा निश्चित उपयोग होतो. आजपर्यंत तसा पुष्कळच उपयोग झाला त्यांचा. पण त्यांच्या त्या दाढीवाल्या नेत्याच्या डोक्यात आता इतकी हवा शिरलीय की भाजपापेक्षा आपल्या चोरलेल्या तथाकथित पक्षाची ताकद कितीतरी पटीने अधिक आहे, असे भास त्याला सारखे होत असतात. त्याचे एकेक आमदार आणि मंत्री किती नमुनेदार आहेत हे महाराष्ट्रातील जनतेने नेहमीच पाहिलंय. सत्ता आणि पैशाचा माज, त्यांचा असंस्कृतपणा आणि खुनशी वृत्ती आम्ही वेळोवेळी पाहिलीय. संघाच्या शालीन संस्कारात, खाकी हाफ पँटीत वाढलेल्या आमच्यासारख्या सभ्य स्वयंसेवकांना त्यांचे हे विचित्र चाळे पाहताना दुःख होतं. बेडकीने बैलासारखं पोट फुगवण्याचा प्रयत्न केला तरी कधीतरी ते फुटतंच याची यांना कल्पना नाही. मी सहनशीलतेचा धट्टाकट्टा, गोरामोरा पुतळा म्हणून हे सारं सहन करतोय. पण आता पाणी डोक्यावरून जाऊ लागलंय. हमारी बिल्ली और हमीसे म्याँव, अशी काहीशी स्थिती होते माझी. पण ते आता परिचयाचं झालंय. याला आता कोंडीत पकडता येईल, नंतर पकडता येईल, असा विचार करता करता तोच डोईजड ठरेल की काय अशी शंका वाटू लागलीय. महानगरपालिका, नगरपरिषदा, , जिल्हा परिषदांच्या निवडणुकीत त्याने जो धुमाकूळ घातला त्याचा फटका आम्हाला बसला तसा तो त्यांच्या तथाकथित खोट्या पक्षालाही बसला. पण आम्ही मुंबई महापालिकेत त्याच्यापेक्षा सरस ठरलो. त्यांचा पक्ष तिसर्या क्रमांकावर फेकला गेला. तरी त्यांचं शेपूट अजून वळवळतंय ते ठेचण्याचा सरळ सरळ प्रयत्न मी तर मुळीच करणार नाही. ते आपोआपच ठेचलं जाईल. तुम्ही फक्त बघत राहा.
अजितदादांच्या जाण्यामुळे आपण लोकांना भूलथापा मारून, नवनवीन आमिषं दाखवून पैशाच्या जोरावर आपलंसं करून घेऊ, अशी गोड स्वप्नं ते अलीकडे पाहत असतात, असं कानावर आलंय. अजितदादा हे अजितदादाच होते. त्यांच्या प्रशासकीय कौशल्याची काडीचीही सर नसलेले हे दाढीवाले कशाच्या जोरावर या गमजा मारतात हे मलाही पडलेलं कोडंच आहे. योग्य वेळी त्यांना आपली जागा कळेल.
अलीकडे माझी आमच्या पक्षाचे सर्वेसर्वा माननीय विश्वगुरू मोदीसाहेब आणि गुरूंचे गुरू आदरणीय अमितसाहेब शहाजी यांची भेट झाली. त्यांनी, आमच्या पक्षातील सर्वात सहनशील माणूस असा माझा गौरव केला. यातच मी भरून पावलो. त्या शिंद्यांच्या गौहातीपासूनच्या झिंगाट नाट्यापासून आजपर्यंत मी काय काय आणि किती सहन केलं ते फक्त माझं मला माहित. म्ाी शक्य तो बॅलन्स राखूनच बोलतो. आमच्याच महायुतीच्या कोणत्याही नेत्याचे कान उपटायचे असतील तर ते त्याला फार दुखणार नाही, अशा तर्हेने उपटतो. काही नेत्यांच्या पापांवर पांघरूण घालताना त्यांचे उघडे पडलेले पाय लोकांना दिसतील एवढी सावधगिरीही बाळगतो. राजकारणात यांनी दगड मारलेल्या चिखलाच्या डबक्यातील शिंतोडे आमच्या अंगावर उडतच असतात, तरीही मुकाटपणे सारं सहन करावं लागतं. कारण ओढून ताणून जुळवाजुळव केलेली पक्षांची महायुती स्वतः तुटत नाही तोपर्यंत तिला सावरून धरणं हे मी माझं कर्तव्य मानतो. पुढे सगळं माझ्या आणि भाजपाच्या मनासारखं आपोआप होत जाणार असल्याची पुरेपूर खात्री मला आहे.

