• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
April 2, 2026
in खेळियाड
0
परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन…

इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १९व्या हंगामाला २८ मार्चपासून प्रारंभ होत आहे. या निमित्तानं महेंद्रसिंह धोनी गुरूकुलात एक महिन्याच्या विशेष कार्यशाळेचं आयोजन केलं गेलं. या गुरूकुलाचे क्रिकेट-कुलगुरू धोनी सर यांचं मार्गदर्शन घेऊन या लीगसाठी सज्ज होण्याकरिता वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे, साहिल पारिख यांच्यासारखे अनेक उगवते तारे उपस्थित राहिलेत. याच कार्यशाळेच्या प्रारंभाचा हा इतिवृत्तांत-

 

झारखंडची राजधानी रांचीच्या टागोर टेकडी परिसरात महेंद्रसिंह धोनी गुरूकुल रुबाबात उभं आहे. या वास्तूच्या बाह्यभागावर धोनीची दोन्ही विश्वविजेतेपदं आणि पाच ‘आयपीएल’ विजेतेपदांसह प्रेरणादायी छायाचित्रं होती. २०११चा विश्वचषक जिंकून देणार्‍या षटकाराचं छायाचित्रं तर बरोब्बर मध्यभागी आकर्षित करीत होतं. या इमारतीच्या पुढे हिरवंगार क्रिकेटचं मैदान सरावासाठी उपलब्ध होतं. स्वाभाविकपणे खेळपट्टी, सीमारेषा, त्यापलीकडे थोड्या अंतरावर गोलंदाजीचं यंत्र, आदी साहित्य-यंत्रणांनी सुसज्ज असं हे गुरुकुल. ‘यत्र प्रतिभा अवसरं प्राप्नोति।’ हे ब्रीदवाक्य ‘आयपी­एल’च्या चषकावर कोरलंय. जिथे प्रतिभेला संधी मिळते, असा या संस्कृत वाक्याचा अर्थ. ‘आयपीएल’मधील नव्या पिढीला शिस्तीचं महत्त्व पटावं म्हणून महेंद्रसिंह धोनी गुरूकुलात एक महिन्याच्या विशेष कार्यशाळेचं हे नियोजन करण्यात आलंय. या गुरूकुलाचे क्रिकेट-कुलगुरू महेंद्रसिंह धोनी यांच्या व्याख्यानानं त्याला प्रारंभ होतोय.

किटबॅगचं ओझं घेत धावत-पळत १४ वर्षीय वैभव सूर्यवंशी, युवा विश्वविजेता कर्णधार आयुष म्हात्रे, धडाकेबाज सलामीवीर अभिषेक शर्मा, साहिल पारिख, सात्त्विक देशवाल, विहान मल्होत्रा, इत्यादी २० तरुण गुरूकुलातील मुख्य दालनात डेरेदाखल होतात. सर्वांना चार रांगांमध्ये यथायोग्य उभं केलं जातं. मग माही सूर्याला नमस्कार करीत या दालनात प्रवेश करतो. चेन्नई सुपर किंग्जच्या पिवळ्या रंगाचाच त्याचा वेश असतो. धीरोदात्त चालत तो व्यासपीठावर मधोमध उभा राहतो. मागे मोठ्ठ्या स्क्रीनवर गुरूकुलाचा लोगो आणि त्याखालील प्रखर सूर्याची आकृती सर्वांचं लक्ष वेधतं. धोनी कार्यशाळेत सहभागी सर्व खेळाडूंना पाहतो आणि स्वागतपर भाषणाला प्रारंभ करतो…
धोनी : परंपरा, प्रतिष्ठा, अनुशासन… हे या गुरूकुलाचे तीन स्तंभ आहेत. ह्याच आदर्शांच्या बळावर आम्ही तुमचं उद्याचं भविष्य घडवतो. तुमच्या आधी जे ‘आयपीएल’ खेळून गेले, ते तुमच्यासाठी खूप मोठमोठे विक्रम नोंदवून गेलेत. आज त्यांचे आकडे विक्रमांच्या यादीत येणार्‍या पिढीला साद घालतायत. काही धडाकेबाज फलंदाज, प्रभावी गोलंदाज, चपळ क्षेत्ररक्षक झाले, तर काहींनी निष्णात विश्वविजेते संघनायक किंवा मार्गदर्शक म्हणून नावलौकिक कमावलंय. पण या सर्वांच्या बाबतीत एक बाब सामायिक होती. हे सर्व जण एमएसडी गुरूकुलात आत्मसात केलेल्या तत्त्वांनुसार जगले. आज तुम्हा सर्वांना या परंपरेचा भाग होण्याची संधी मिळालीय. आम्ही तुम्हा सर्वांना देशातील विविध भागांतून गुणवत्ता शोध आणि निवड प्रक्रिया राबवून आणलंय. कारण तुमच्यात एक यशस्वी क्रिकेटपटू बनण्याची क्षमता आहे. पण कोणतंही यश इतक्या सहजपणे मिळत नाही. प्रत्येक मोठ्या यशामागे मोठं बलिदान दडलं असतं. आज या गुरूकुलात प्रवेश करताच तुमचा बाहेरच्या जगाशी संपर्क तुटलाय. जोवर तुम्ही इथे आहात, तोवर गुरूकुलच तुमचं विश्व आहे. मी अपेक्षा करतो की, तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करून ही विशेष कार्यशाळा पूर्ण कराल आणि ते करताना येथील नियमांचं काटेकोर पालन कराल. कोणत्याही खेळाडूकडून येथील परंपरा आणि शिस्तीचा भंग झाल्यास त्याला त्वरित गुरूकुलातून काढून टाकण्यात येईल. आणि एक लक्षात ठेवा, येथून काढून टाकल्यास ‘आयपीएल’सह देशातील सर्व संलग्न राज्य क्रिकेट संघटनांची दारे त्या खेळाडूसाठी बंद होतील. त्यामुळे तुमच्यापैकी जर कुणी ही मेहनत घेण्यासाठी तयार नसेल, तर तो गुरूकुलाबाहेर आत्ताच जाऊ शकतो. पण तुम्ही इथे थांबण्याचा निर्णय घेतला असेल, तर ते प्रवेशद्वार आणि बाहेरचं जग तुमच्यासाठी बंद असेल. आता माझी अशी इच्छा आहे की, तुम्ही सर्वांनी डोळे बंद करून डोकं खाली झुकवून मी म्हटलेला प्रत्येक शब्द जाणीवपूर्वक ऐकावा आणि आपापला निर्णय स्वत: घ्यावा.
‘ॐ क्रिकेटाय नमः
तत् खेलस्य वरेण्यं
परिश्रमस्य तेजो धीमहि
धियो नः विजयः प्रचोदयात’
(सर्व खेळाडू एकमुखानं ही प्रार्थना म्हणतात.)

तुम्हा सर्वांमध्ये काहीतरी खास आहे, म्हणून तुम्ही इथे आहात. तुम्हाला क्रिकेटपटू म्हणून कारकीर्द घडवताना कसा दृष्टिकोन हवा, यासंदर्भात काही प्रश्न असल्यास मला विचारू शकता. वैभव हात वर करतो. माही त्याला बोल, असं हातानं खुणावतात.
वैभव : ‘धोनीज लॉ ऑफ प्रोसेस’ म्हणजे काय?
धोनी : (मंद स्मित करीत) बालका, (हशा पिकतो) उत्तम प्रश्न! धोनीचा प्रक्रियेचा सिद्धांत. निकालावर लक्ष केंद्रित करू नका, प्रक्रियेवर लक्ष द्या. प्रक्रिया योग्य असेल, तर निकाल आपोआप तुमच्या बाजूने येईल! त्यामुळे प्रक्रियेला महत्त्व द्या. (सर्वच क्रिकेटपटूंना हा सिद्धांत आवडतो. त्यामुळे ते टाळ्या वाजवतात.)
अभिषेक : (भीतभीत) माही सर, द… दडपणाशी कसा सामना करायचा?
धोनी : बेबी हिटमॅन, ट्वेंटी-२० विश्वचषकात आम्हाला धावांचा Dाभिषेक पाहायचा होता; पण चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू पाहायला मिळाला. हे का माहितीये? दडपण सामन्याचं नसतंच; ते अपेक्षांचं असतं! आपण क्रिकेटचाहत्यांसाठी खेळत नाही, तर राष्ट्रासाठी खेळतोय, हे मनात बिंबायला हवं. तोंडानं कमी बोलावं, तुमची बॅट किंवा बॉलच अधिक क्षमतेनं बोलायला हवा. जेव्हा तुम्हाला काय करायचं आहे, हे माहीत नसतं, तेव्हाच दडपण जाणवतं. (उत्तर मिळाल्याचं समाधान अभिषेकच्या चेहर्‍यावर दिसत होतं.)
आयुष : सर, नेतृत्वाकडे कशा रीतीनं पाहायचं?
धोनी : (धोनी आयुषला व्यासपीठावर बोलावतो. तो बाकीच्या क्रिकेटपटूंकडे पाहात हळूवार चालत तिथे पोहोचतो. आयुषच्या पाठीवर हात ठेवत माही सांगू लागतो.) ‘सुपर किंग बॉय’, भारताचा भावी कर्णधार, तुझा आत्मविश्वास मला आवडतो म्हणूनच तुला माझ्या संघात स्थान दिलंय. तर नेतृत्व म्हणजे दृष्टीला वास्तवात उतरवण्याची क्षमता. कर्णधार म्हणून सामन्यातील काही निर्णय किंवा रणनीती चुकली तर त्याची जबाबदारी घ्यावी लागते. मी मैदानावर नेहमी १०० टक्क्यांपेक्षा अधिक कामगिरी करण्यावर विश्वास ठेवतो आणि निकालाची चिंता करत नाही. शिकणं महत्त्वाचं आहे आणि चुका पुन्हा न करण्याची काळजी घ्यायला हवी!
साहिल : सर, आयुष्य आणि दृष्टिकोन यांचा खेळाडू म्हणून कसा विचार करावा?
धोनी : (पुन्हा स्मित करीत) पूर्णविराम येईपर्यंत वाक्य पूर्ण होत नाही, अगदी तसाच. स्वतःवरचा विश्वास आणि कष्ट नेहमीच तुम्हाला यश मिळवून देतं. जिंकण्यापेक्षा पराभवातून आपण जास्त शिकतो. तुमच्याकडे स्वप्न नसेल, तर तुम्ही स्वतःला पुढे नेऊ शकत नाही. आयुष्यात जोखीम पत्करा. तुम्ही जिंकलात, तर राज्य कराल आणि हरलात तर मार्गदर्शन कराल!
वैभव : सर, आगामी ‘आयपीएल’मध्ये वयाच्या ४४व्या वर्षी खेळताना तुमची कोणती भूमिका असेल?

धोनी : तुम्ही १०० टक्के तंदुरुस्त नाहीत आणि उत्तम कामगिरीही दाखवत नसाल, तर तुम्ही फसवणूक करीत आहात, असं माझं मत आहे. मी वयाच्या या टप्प्यावर स्वतःला काही सिद्ध करण्याच्या हेतूनं मुळीच खेळत नाही. आता मी शतकं किंवा आकडेवारीच्या मागे पळत नाही, तर क्रिकेटचा निस्सीम आनंद घेत संघासाठी योगदान देतोय. फलंदाज म्हणून उत्तरार्धात उतरायचं उंच फटके खेळायचे. प्रथम फलंदाजी असेल तर धावसंख्येत मोठी भर घालणं आणि पाठलाग करताना विजयवीर म्हणून सामना संपवणं. क्षेत्ररक्षक म्हणून यष्टीरक्षकाची अदाकारी करायची, तर संघनायकाला रणनीती आखण्यासाठी मदत करावी… हीच माझी भूमिका असेल. पण मी अजूनही खेळतोय, ते पैशासाठी नव्हे, तर क्रिकेटसाठी. बाकी माझ्या मैदानी अविष्काराला तुम्ही ‘थाला’ म्हणा किंवा अन्य काहीही…
अभिषेक : माही सर, ‘धोनी रीव्ह्यू सिस्टीम’च्या अचूकतेचं रहस्य काय?
धोनी : ‘डीआरएस’चा हा अर्थ लोकांनी काढलाय, मी नव्हे! माझं अजूनही ‘डीआरएस’संदर्भात समाधान झालेलं नाही. ‘डीआरएस’चा उद्देश योग्य आणि अचूक निर्णय देणं हा आहे. जर मी लाइफ जॅकेट विकत घेत असेन आणि त्यावर कोणतीही हमी दिली जात नसेल, तर ते मी का खरेदी करावं? मला त्यावर काहीतरी हमी हवीच. जर तंत्रज्ञान विशेषतः बॉल ट्रॅकिंग आणि अंपायर्स
कॉल प्रसंगी १०० टक्के अचूक नसेल, तर ते मानवी निर्णयाला बदलण्यासाठी वापरू नये, असं मला वाटतं.
धोनी : आता मला एखाद्या पत्रकार परिषदेलाच मी सामोरं जातोय, असा भास होतोय. हे शंका-निरसन आता थांबवूया आणि प्रत्यक्ष मैदानी सरावाकडे कूच करूया! तुम्हा सर्वांना ‘आयपीएल’साठी शुभेच्छा!!

(मग धोनी स्वत: पळत दालनातून बाहेर मैदानाकडे जातो. त्याच्यामागून क्रिकेटपटूही जातात.)

Previous Post

बाळासाहेबांचे फटकारे

Next Post

आत्मशांती भेळ

Next Post
आत्मशांती भेळ

आत्मशांती भेळ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.