ज्यांना कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या संसदेत येण्याचीही भीती वाटते, त्यांच्या हाती देश सुरक्षित कसा आहे म्हणे?
– स्नेहल जोशी, पालघर
तुम्हाला वाटत असेल, तुमचा प्रश्न लाख रुपये किमतीचा आहे, तर तुमचा हा प्रश्न सोशल मीडियावर टाका, मग ह्या एका प्रश्नाची जितकी उत्तरं मिळतील त्या उत्तरांच्या भाषेवरून तुम्हाला कळेल की तुमच्या प्रश्नाची किंमत ४० पैशांपेक्षा जास्त नाही. (आणि देश सुरक्षित कसा आहे? या तुमच्या प्रश्नाच ‘तुम्हाला हवं तसं उत्तर दिलं’, तर त्या उत्तर देणार्याच्या सुरक्षेचं काय? आधी या प्रश्नाचे उत्तर द्या.)
भारताने पाकिस्तानशी युद्ध थांबवलं आहे, अशी घोषणा कोण करतो, तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. भारताने अमेरिकेबरोबर व्यापार करार केला आहे, याची घोषणा कोण करतो, तर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष. हा काय प्रकार आहे? आपलं सार्वभौमत्व अमेरिकेच्या चरणी गहाण ठेवलं गेलं आहे का?
– निनाद पाटील, बेळगाव
मग काय आपलं सार्वभौमत्व बांगलादेशाच्या चरणी गहाण ठेवायला हवं होतं? अमेरिकेला इतकं कमी लेखू नका. आपलं सार्वभौमत्व ज्याच्या चरणी गहाण आहे तो ‘गॉडचा’ अवतार आहे. त्याच्या फोटोची पूजा केलेले फोटो आणि व्हिडिओ बघितले नाहीत का? त्या गॉडच्या अंशाला काही बोलाल, तर अंशाचा कुणीतरी भक्त तुमच्यावर कुठेतरी एफआयआर करेल, मग तुमचं नाव पोलीस फाईलमध्ये येईल आणि ‘फाईल’मध्ये नाव आल्यावर कसं सार्वभौमत्व कोणाच्या चरणी घाण टाकाव लागतं, याचा अनुभव तुम्हाला घ्यायचा आहे का? त्यापेक्षा देशाचा सोडा, स्वतःच्या सार्वभौमत्वाचा विचार करा.
सरकारची एवढी चमचेगिरी करून वृत्तवाहिन्यांनी काय मिळवलं? ना पत्रकारितेत पत राहिली, ना वाहिनी राहिली. ५० टक्के न्यूज चॅनेल परवाना परत करायला निघाले आहेत म्हणे!
– अनिल देशमुख, लातूर
मग काय त्यांनी ‘आम्हाला आर्थिक मदत करा’ म्हणून लोकांना हात जोडून स्क्रीनवर क्यूआर कोड टाकायचे? आता काय मिळतंय याच्यापेक्षा, त्यांनी आधी काय मिळवलंय याचा शोध घ्या. पण कोणी कितीही काही मिळवलं, मग तो पैसा असेल, पद असेल की, ‘पद्मश्री’- त्याची ‘इतिश्री’ होतेच. ‘जे टिकतं ते सत्य असतं.’ पण यावर त्यांचा विश्वास नाही. ‘सत्याने पोट भरत नाही यावर त्यांचा विश्वास असतो.’ म्हणून ते हाताने न खाता चमचेगिरी करून खातात आणि अशा लोकांसमोर सत्याचाही नाईलाज असतो.
इथून पुढे मुंबई पुणे प्रवासासाठी तंबू आणि चारपाच दिवसांचा शिधा घेतल्याशिवाय बाहेर पडू नका, अशी सूचना एक्स्प्रेसवे टोल कंपनी, रस्ते विकास महामंडळ आणि राज्य सरकार यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे, असा मेसेज मला एका काकांनी एका व्हॉट्सअप ग्रूपवर पाठवला आहे. खरा असेल का तो?
– शुभम जाधव, पिंपरी
थोडे दिवस थांबा, मुंबई पुणे प्रवासात ट्रॅफिकमध्ये अडकणे किती फायदेशीर आहे, आणि त्यासाठीच ट्रॅफिक जाम करण्याचा मास्टर स्ट्रोक राज्य सरकारने स्वतःहून मुद्दाम कसा खेळलेला आहे आणि ही ‘देवाचीच’ कृपा आहे याचे मेसेज फिरायला लागतील. तीर्थक्षेत्री चेंगराचेंगरीत माणसे मेल्यानंतर त्यांना कसा मोक्ष मिळतो हे पटवून देणारे ‘देवाचे’ लोकही कामाला लागतील. ‘या काळात’ सब कुछ ‘मुमकिन’ है शुभम जी.
चार दिवस भाळण्याचे, बाकीचे सांभाळण्याचे, असं वपु काळे की कोणीतरी लग्नाबद्दल म्हटलं आहे म्हणे! तुमचा काय अनुभव?
– नीता ढोले, घाटकोपर
चार दिवस भाळण्याचे बाकीचे सांभाळण्याचे, असं कोणीही म्हटलं तरीही तिचे दिवस वाढण्याचे आणि त्याचे दिवस वाळण्याचे असतात हा प्रत्येकाचा अनुभव आहे. त्यामुळे दुसर्याचा अनुभव विचारून आपल्या अनुभवाचा दाह कमी करण्याचा प्रयत्न करू नका ताई, आलिया भोगासी असावे सादर, पदरी पडलेलं पवित्र करून घ्यावं, ह्या म्हणी आपल्या वाडवडिलांनी त्यांच्या अनुभवावरूनच तयार केलेल्या आहेत, त्यातून आपली सुटका नाही.
जग किती बदललं आहे, ज्यांचं शिक्षण झालंय की नाही, याचाच काही धड पत्ता नाही, ते मुलांना परीक्षा कशी द्यावी याचं मार्गदर्शन करताना दिसतात. यातून मुलांनी नेमका काय धडा घ्यावा?
– बर्नार्ड डिकुन्हा, कल्याण
मुलांना कशातलं काही ‘धड’ कळत नसताना सुद्धा ‘घडा घडा’ आणि ‘धडा धडा’ बोलता यायला हवं. एकीकडे आपलं कुठलं शिक्षण झालेलं नाही असं सांगताना, अभ्यासक्रमात नसलेल्या विषयाची डिग्री आपल्याकडे आहे, असंही त्यांना धडधडीत सांगता यायला पाहिजे. एवढा धडा मुलांनी घेतला तर संपूर्ण देश शंभर टक्के साक्षर होईल आणि उरल्या सुरल्या शाळाही धडाधड बंद करता येतील.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…
