स्वच्छता सर्वेक्षणात पहिला नंबर पटकावणार्या इंदूरमध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइनवर शौचालय बांधल्यामुळे दूषित झालेलं पाणी पिऊन १३ जणांचा मृत्यू झालेला आहे. हा पहिला नंबर देणार्यांनी काय पिऊन निवड केली असेल?
– पुरुषोत्तम जोंधळे, सोलापूर
गोमूत्र! जर ते नाही म्हणाले किंवा या उत्तराला कोणी विरोध करत असेल तर ते धर्मद्रोही असतील. (ये आम्हालाही कुणालाही धर्मद्रोही, देशद्रोही ठरवता यायला लागलं… म्हणजे आम्ही प्रवक्ता बनायला हरकत नाही.. आधी विरोधात बोलणारा नंतर त्याच पक्षाचा प्रवक्ता ‘बन’तो असं ऐकून, पाहून आहे म्हणून वाटलं…) एक मिनिट… तरीही आमचं उत्तर झोंबलंच कोणाला, तर आम्ही ज्या गोमूत्राबद्दल बोललोय ते गोमातेचं नाही तर ‘मिथुन’मातेचं आहे असं समजा आणि हे काय ‘घंटा’ उत्तर आहे का, असंच आम्हालाच विचारा आणि सोडून द्या!
काय मग संतोषराव, तुमचं मत कशाला? विकासाला, अस्मितेला, गद्दारीला, की ज्याने जास्त ‘माल’वाटला त्याला?
– अमित शेंडे, जिंतूर
जो आमच्या मताला ‘किंमत’ देईल त्याला..
मला फडणवीस, शिंदे यांचं एक कळत नाही हो! फडणवीसांचा पक्ष ज्या काळात शिवसेनेच्या मांडीला मांडी लावून महापालिकेत सत्तेत होता आणि शिंदे शिवसेनेचा भाग होते- त्या काळात केवढा भ्रष्टाचार झाला, काहीच नीट कारभार झाला नाही, असं हे आता कोकलतायत, तेव्हा यांची तोंडं कशाने शिवलेली होती?
– प्रकाश परब, लोअर परळ
तेव्हा कशाने तोंडं शिवलेली होती हे पाहण्यापेक्षा, आता कशाने तोंडं उचकटली आहेत ते बघा… नसेल कळत तर आता भ्रष्टाचार भ्रष्टाचार म्हणून कोकलणार्यांना विचारू नका, कारण त्यावर बोलताना त्यांची तोंडं शिवलेली आहेत.
राजसाहेब ठाकरे नाशकात म्हणाले की (निवडणुकीच्या राजकारणाचा) कॅरम असा फुटलाय की कोणत्या सोंगट्या कोणत्या भोकात गेलेल्या आहेत, हे कळतच नाहीये. तुम्हाला कळतंय का काही?
– पांडुरंग पानसरे, आजरा
आम्हाला कशाला काय कळायला हवं? आम्हाला काय भोकातल्या सोंगट्या काढायच्यायत? आम्हाला एवढं कळतं की भोकात गेलेल्या सोंगट्यांना काहीही फायदा नसतो. जो जास्त सोंगट्या भोकात घालतो तो जिंकतो. हे भोकात गेलेल्या सोंगट्यांना कळत नसेल, तर त्यांना सांगायला जाण्याची दुनियादारी आम्ही करणार नाही. म्हणतात ना तेरी मेरी यारी भोकात गेली दुनियादारी… ( दुनियादारी चित्रपटाचा संवाद आठवला, समर्पक वाटला म्हणून इथे पाठवला)…
रामाच्या नावाने मतं मिळवून झाली, आता पंतप्रधानांनी सोमनाथचा लढा सुरू केलेला आहे. हे लोक धर्माच्या नावाने लोकांना मूर्ख बनवणं थांबवणार तरी कधी? ज्यासाठी यांना निवडून देतात लोक ती कामं करणार तरी कधी?
– उल्हास गोडबोले, कराड
या प्रश्नांची अनेक उत्तरं सुचतायत, एक तर लोकांनी स्वतःला धर्माच्या नावाने मूर्ख बनवण्यासाठीच निवडून दिलेलं आहे असं ‘त्यांना’ वाटत असेल, किंवा लोकांना जे हवंय ती कामं आपण केली तर लोक आपल्याला निवडून देणार नाहीत, याची ‘त्यांना’
गॅरंटी असेल. किंवा लोक आपल्याला निवडून देतच नाहीत याची त्यांना खात्री असेल किंवा आपल्याला लोकांनी निवडून दिलं नाही तरी आपल्याला कोण निवडून देतो हे त्यांना माहीत असेल.
ममता बॅनर्जी यांनी छाप्याच्या नावाखाली त्यांच्या पक्षाची निवडणूक रणनीती चोरायला आलेल्या ईडीवरच छापा घालून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. ही हिंमत इतर राज्यांतल्या नेत्यांनी आधीच दाखवली असती तर?
– विलास भणगे, ओतूर
ममता बॅनर्जींच्या हिंमतीचं सोडा, तुम्ही जो प्रश्न विचारलायत, असे प्रश्न विचारण्याची हिंमत जर इतर राज्यातल्या नेत्यांनी आधीच दाखवली असती, तर तुमच्या या प्रश्नाला उत्तर देण्याची वेळ आमच्यावर आली नसती.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…
