भोंदू खरातने कोणाकोणाशी संभाषण केलं, त्याचं रेकॉर्ड जाहीर झाल्यामुळे बर्याच जणांचं धाबं दणाणलं आहे म्हणतात. तुम्ही शांत आहात ना, संतोषराव?-माणिक जोंधळे, सातगाव
नाही हो, एका गोष्टीमुळे अशांत आहे. अजून ‘ते’ टेबल बनवणार्याला आरोपी कसं केलं जात नाही या विचाराने डिस्टर्ब आहोत आम्ही. जे काय घडले ते ‘त्या’ टेबलामुळे घडलंय, हे का कळत नाहीये चौकशी करणार्यांना? टेबल बनवणार्याला वाचवलं जातंय का? या प्रश्नाने त्रस्त आहोत आम्ही. व्हिडिओमध्ये दिसणार्यापेक्षा व्हिडिओ बघणार्यांवर कारवाई होत असेल, तर टेबल बनवणार्यावर पण कारवाई व्हायलाच हवी? विचार करा टेबल नसत, तर पुढचं काही घडलं असतं? टेबल बनवणाराच दोषी आहे हे कोणालाच कळत नाही, पण आम्हाला कळतंय म्हणून खूपच अस्वस्थ आहोत आम्ही.
खरात प्रकरण असो की आणखी कोणतंही प्रकरण असो- त्यात ठरावीक पक्षांच्याच मंडळींची नावं येतात किंवा राज्याच्या सर्वोच्च पदावरच्या व्यक्तीला भविष्यात अडचणीच्या ठरू शकतील अशाच त्यांच्या पक्षाच्या नेत्यांची नावं येतात…यांच्या आसपासचे सगळे सुस्वच्छ आहेत आणि बाकीचे तेवढे बरबटलेले?- विलास पाटील, मोरगाव
तुम्ही चिखलात दगड मारताय? की ऑलरेडी दगड मारलेला आहे आणि त्याचा चिखल कधीही अंगावर उडू शकतो म्हणून भीती वाटतेय? तसं असेल तर बरबटलेल्यांमध्ये माझं एकट्याचं नाव घेतलं तर कोण कोण बरबटलेला आहे त्यांची नावं ओपन करू अशी धमकी द्यायच्या फंदात पडू नका. त्यापेक्षा इष्ट ‘देवाची’ पूजा करा आणि कितीही बरबटलेले असाल तरी सुस्वच्छतेची क्लीन चीट मिळवा.
पश्चिम बंगालमध्ये मतदारयादीतून नावं कापली गेलेल्या मतदारांनी सरकारी अधिकार्यांना डांबून ठेवलं याने सुप्रीम कोर्टाचा तीळपापड झाला- आपला मताधिकार कापला गेल्यावर या मतदारांनी संबंधित अधिकार्यांची आरती करायला हवी होती का?-सुगंधा केळेकर, अलिबाग
तुम्ही म्हणताय ते कोर्ट कुठल्या देवाची आरती करतं हे समजून घेतलंत तर पुन्हा असे प्रश्न तुम्हाला पडणार नाहीत.
पुण्यात अर्ध्या तासाच्या पावसात सगळे महत्त्वाचे भाग तुंबले. शहराच्या विकासाचे शिल्पकार साक्षात देवाभौ असताना पावसाची ही हिंमत कशी झाली असेल?-सुहास साबळे, पुणे
पावसाच्या हिंमतीला उत्तर द्यायला सदारत्ने, गोडळकर, चिवाघ, नवबन वगैरे मंडळी समर्थ आहेत. ही नावं आम्ही ज्या पद्धतीने घेतली आहेत त्यावरून तुम्हाला कळलं असेलच की तुमच्या प्रश्नाचं उत्तर स्पष्टपणे द्यायला पावसाएवढी हिम्मत आमच्यात नाही.
व्हॉट्सअप ग्रूपवर आलेला मेसेज, व्हिडिओ, रील आधी आपण पाहायचे असते, त्यात माहिती किंवा बातमी या नावाखाली जे काही सांगितलेले असते, ते खरे आहे का ते तपासायचे असते आणि नंतरच तो मेसेज गावभर पाठवायचा असतो, याचं शिक्षण देणारा एखादा वर्ग आहे का? मला माझे सगळे नातेवाईक आणि शाळेतले, कॉलेजांतले मित्र यांना त्या वर्गात पाठवायचं आहे.-विद्याधर दादरकर, चेंबूर
अजून तुमच्या नातेवाईकांनी आणि शाळा-कॉलेजमधल्या मित्रांनी तुम्ही म्हणताय त्या वर्गात प्रवेश घेतला नाही? म्हणजे ते फारच अज्ञानी, मागासलेले, देशद्रोही दिसतायत. आणि अशांशी तुमचं नातं आणि मैत्री अजून टिकून आहे? म्हणजे तुम्ही फारच लिब्रांडू दिसताय.
आपल्याला प्रेमाची माणसं फसवतात, त्यांच्याशी नातं तुटतं, आपण दुसर्या माणसांशी ते नातं जोडतो आणि त्यांना आपला हा अनुभव सांगतो; ही माणसंही पुढे जाऊन फसवणार नाहीत, इतका कॉन्फिडन्स आपल्याला कशातून येतो?-गौतम पोखरकर, जुन्नर
काही माणसं मरेपर्यंत फक्त शिकत असतात. कितीही वाईट अनुभव आले तरी शहाणी होत नाहीत. याचा अर्थ ती माणसं जन्मजात मूर्ख असतात… असं आम्हाला वाटायचं. पण आता कळलं की तो मूर्खपणा नसतो, तर कॉन्फिडन्स असतो. आजनंतर आम्ही असे तोंडावर पडलो, तरी तेच तोंड वर करून सांगू की ‘आम्ही कॉन्फिडंट आहोत.’ आणि तुमच्या प्रश्नावरून कळलं की तुम्हीही असेच कॉन्फिडंट आहात. प्रश्नाच्या आडून आपला मूर्खपणा दाखवायला पण वेगळाच कॉन्फिडन्स लागतो. (पण या मूर्खपणात जो आनंद असतो तो आम्ही उत्तरामध्ये नाही मांडू शकत.)

