मी नेहमी गणपत वाण्याकडून तेल घेते. आता मला कळलंय की महिपत वाण्याकडे तेल दहा रुपये स्वस्त मिळतंय. मी थेट त्याच्याकडून तेल घेऊ शकते की त्यासाठी मला अमेरिकेची परवानगी घ्यावी लागेल?
-मंदा म्हापणकर, महाड
नहीें मंदाताई अमेरिकी कुत्तों के सामने मत नाचना… एवढ्यावरून कळलं नसेल तर… आपण गंगू तेल्याकडून तेल घेत राहू, बाकी तो तेल कसं आणि कोणाकडूनही आणेना, आपण गंगू तेल्याचे गुणगान गात राहू… आणि, ताई अमेरिकेला एवढं तेलात पाहू नका. आता आपण सगळेच युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेच्या एका राज्याचे नागरिक होणार आहोत (असा आम्ही नाही बाबा, विरोधक बोलतात). एकदा तसं अधिकृतपणे डिक्लेअर झालं की अमेरिकेच्या परवानगीची गरज नाही. अमेरिकाच आपल्याला सगळं देईल.
आपल्याकडे आलेल्या पाहुण्याला आपल्या दारातच कुणीतरी कानफटलं आणि दाराबाहेरची हद्द माझी नाही, असं म्हणून आपण दार लावून घेतलं तर लोक आपल्याला काय म्हणतील?
– सुरेश पोकर्णा, धनकवडी, पुणे
सरेंडर कॉम्प्रोमाइज सुरेश पोकर्णा (असं तुमचे विरोधक तुम्हाला बोलतील… उगाच आपल्याला म्हणत आम्हाला तुमच्यात घेऊ नका. आम्ही फक्त आमच्या देवासमोरच सरेंडर होतो.) आणि पाहुण्याबद्दल बोलायचं तर त्याला कोणी कानफाटवलं हे आधी बघावं लागेल? कारण आम्ही फार सिलेक्टिव्ह आहोत. कानफाटवणारा ताकदवान असेल तर आम्ही आमच्या तोंडची वाफ फुकट घालवत नाही. आणि कानफटवणारा कमी ताकतीचा असेल तरी आम्ही त्याला कानफटावत नाही. कारण आमच्यापेक्षा जास्त ताकदीचा आम्हाला भांडण लगेच थांबवायला सांगतो आणि आम्हीही लगेच थांबतो. कारण नाही थांबवलं तर ‘तो’ आम्हाला कानफाटवेल याची भीती वाटते. याला आम्ही तरी काय करणार? ज्याच्या हाती सत्ता तो पारधी ही जगाचीच रीत आहे.
पुण्याच्या खासदार संसदेत पुण्याचे प्रश्न मांडायचं त्यांचं मूळ काम सोडून बाकी सगळ्या अनावश्यक आणि कुरापतखोर उचापती करत फिरत असतात. पुणेकरांना आता काय वाटत असेल यांना निवडून दिल्याबद्दल? किंवा काही वाटत असेल का?
– नीलिमा पेटकर, नाशिक
एखादी व्यक्ती तिला नेमून दिलेलं काम इमाने इतबारे करत असेल किंवा त्या व्यक्तीला त्याच कामासाठी नेमलं असेल, तर त्याबद्दल कोणी का काही वाटून घ्यावं? तुमच्या नाशिकमधल्या तपोवनबद्दल ‘तुम्ही म्हणताय त्या पुणेकरांना’ काही वाटलं का? किती काही वाटलं तरी, बोलून उपयोग नाही. काही उत्तर मिळणार नाही. एफआयआरसुद्धा घेतला जाणार नाही असं पुणेकरांना वाटत असावं. त्यामुळे तुम्हीही तसंच वाटून घ्या. पुणेकरांना काय वाटतं याचा विचार सोडून द्या.
सतत लोकांच्या गळ्यात पडून घट्ट मिठ्या मारणे, खोटं खोटं वेडसरासारखं हाहा हुहू करणे, कशातलंही काहीही कळत नसताना कोणत्याही मंचावर जाऊन निरर्थक बडबड करून खूप मोलाचं काहीतरी तत्त्वज्ञान सांगत असल्याचा भास निर्माण करणे, याबरोबर आणखी कोणता गुण असायला हवा सर्वोच्च नेता बनण्यासाठी?
-बंडा कुलकर्णी, उद्गीर
अगदी सोप्या भाषेत बोलायचं तर जे गुण नेहरूंमध्ये नव्हते ते गुण असायला हवेत… तुम्हाला अभिप्रेत असलेला सर्वोच्च नेता बनण्यासाठी.
आपल्याकडच्या नेत्यांना नव्वदीच्या घरात पोहोचल्यावरही संसदेचं सदस्यत्व हवंच आहे. खुर्चीत बसलेले खुर्ची सोडायला तयार नाहीत.
पंचाहत्तरीच्या आसपासचे नेते युद्ध पुकारून सगळ्या जगाचा सत्यानाश करतायत. मग साठाव्या वर्षी निवृत्तीची अट सर्वसामान्य माणसांवर तरी का लादायची?
– अशोक वानवडीकर, मिरज
असं कसं?.. मग मार्गदर्शक मंडळ रिकामं ठेवायचं का? नव्वदीवाल्यांबद्दल बोलायचं तर आयुष्यभर ‘एकच धंदा’ केलेल्याला नव्वदीनंतर दुसरा धंदा कसा जमेल? आणि पंच्याहत्तरीवाल्यांबद्दल बोलायचं तर, देशाचा सत्यानाश करण्याचा अनुभव असणार्यांनी, पंच्याहत्तरीनंतर जगाचा सत्यनाश नाही केला, तर ‘त्या’ अनुभवाचा उपयोग काय? त्यांनी काय एकमेकांच्या ‘अशा तशा’ फाईल ओपन करून त्या जगजाहीर करत राहायचं? त्यापेक्षा जगाचा सत्यानाश करण सोपं आहे. हे तुम्हा आम्हाला नाही कळणार. ज्यांची ‘अशी तशी’ फाईल नसते, त्यांचं युद्धामुळे जळतं, पण ज्यांची ‘अशी तशी’ फाईल असते, त्यांनाच युद्धाचं महत्त्व कळतं.
विचारून टाका प्रश्न
तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

