• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाय नो नेव्हर

संतोष पवार

marmik by marmik
March 12, 2026
in भाष्य, विनोदी लेख
0
नाय नो नेव्हर

संतोषराव, बायकोला मी किती वेळा सांगितलं की दुसर्‍या कुणाचाही मोबाइल त्याला न सांगता उघडून चाळू नये, ते असभ्यपणाचं आहे. तर ती म्हणते, माझ्याच नवर्‍याचा मोबाइल तपासते आहे ना, मग त्यात काय एवढं! आता तिला मी कसं समजावून सांगू?
– विनय पेटकर, परभणी
एवढे कां घाबरताय? तुमच्या मोबाईलमध्ये एखादी अशी तशी फाईल आहे का? असेल तर अजिबात समजवण्याच्या फंदात पडू नका. सरळ ‘सरेंडर’ व्हा. बायको सांगेल तसं करा. ती म्हणाली तर नाचून गाऊन दाखवा. देशी विदेशी घडामोडींचा अंदाज घ्या… मग कळेल जो डर गया वो सरेंडर हो गया. और जो सरेंडर हो गया वो बच गया (पण बकरे की अम्मा कब तक खैर मनायेगी ही पण कहावत लक्षात ठेवा…)

शेकडो लहान मुलांसह हजारो निष्पाप नागरिकांचे जीव घेणार्‍या युद्धखोर देशाच्या हिटलरी खाक्याच्या प्रमुखाची गळाभेट घेणं कोणत्याही सुसंस्कृत देशाच्या प्रमुखाला शोभतं का?
– स्वाती जोशी, पंढरपूर
गळाभेट घेणार्‍याचा देश खरोखर सुसंस्कृत आहे का याचा तपास करा. जसा राजा तशी प्रजा असते असं म्हणतात. अशा प्रजेचा गळा, अशा गळाभेटीवर दाटून येतो. पण राजासारखी नसणारी प्रजा अशा गळाभेटीविरोधात गळा काढते. आणि दोन्हीकडचे नसणारी प्रजा ‘आपलं बरं चाललंय ना’ म्हणून गप्प बसते. आता तुम्ही कशात बसता हे बघा. म्हणजे ही गळाभेट शोभते का? याचे उत्तर तुम्हाला मिळेल.

पाठ्यपुस्तकामध्ये न्यायव्यवस्थेतल्या भ्रष्टाचारावर एक प्रकरण देण्याची आयडिया मला फारच आवडली. पण मग त्या पाठ्यपुस्तकात सरकारी असल्याचं भासवणारा खासगी, बेहिशोबी पीएम केअर्स फंड, नोंदणीकृत नसलेल्या संघटनेची पंचतारांकित कार्यालयं, लाडक्या बहिणींच्या नावाखाली सरसकट कोणालाही सरकारी पैशाचं वाटप, याबद्दलही प्रकरणं असली पाहिजेत ना?
– प्रभाकर गुंडेवार, सोलापूर
बहुतेक भूतकाळात तुमचं कसलंच काही प्रकरण घडलेलं दिसत नाहीये. पण म्हणून नाकाला जीभ लावू नका. नसलेलं प्रकरण अंगाला लावलं जातं आणि असे प्रश्न विचारणं अंगाशी येतं.

उठसूट बायकांची मापं काढणं यापलीकडे बहुतेक विनोदी पुरुष लेखकांची आणि पुरुष व्यंगचित्रकारांची विनोदबुद्धी का जात नाही?
– रसिका पाटील, हातकणंगले
अशा लेखक आणि व्यंगचित्रकारांची बुद्धीच तेवढी असते असं समजा. फार मनावर घेऊ नका. आपण त्या बायकांमध्ये येत नाही असा विचार करा ताई… पण आपल्याला राग नक्की कशाचा येतो आहे? तो विनोदाचा आहे की बायकांची मापं काढतात त्याचा आहे? लेखक आणि व्यंगचित्रकारांना सांगायला पाहिजे की जसं बाईचं वय विचारत नाहीत, तशी तिची मापंही काढायची नसतात. पण त्यांच्या आजूबाजूला असेच विनोद घडत असतील आणि लोकांनाही तेच आवडत असतील तर त्याला ते लेखक आणि व्यंगचित्रकार तरी काय करणार? मग मागणी तसा पुरवठा करत राहतात बिचारे!!

आपल्याकडच्या एका पक्षात मला प्रवेश घ्यायचा आहे. पण त्यांच्याकडे प्रवेशाचं धोरण काय आहे ते समजत नाही. तिथे जाण्यासाठी मुळात जन्मजात मठ्ठ असावं लागतं की बुद्धीचा वापर कधीही न करण्याचा बाँड लिहून घेतात ते? तुम्हाला काही आयडिया?
– विद्याधर शेट्ये, धनकवडी, पुणे
एवढं करण्यापेक्षा ज्या पक्षात जायचे त्या पक्षाच्या विरोधकांना शिव्याशाप द्या, मग बघा, तुम्हाला हव्या त्या पक्षात घेण्यासाठी त्यांच्याकडूनच पायघड्या अंथरल्या जातील. लोक आपल्याला गद्दार म्हणतील याचा विचार करू नका. आपल्या पक्षातून दुसर्‍या पक्षात जातात त्याला गद्दारी म्हणतात. दुसर्‍या पक्षातून आपल्या पक्षात येतात त्याला म्हणतात पक्षप्रवेश. थोडक्यात दुसर्‍याची ती घाण, आपला तो सलमान खान!

अरविंद केजरीवालांसह आम आदमी पक्षाच्या नेत्यांची नुकतीच एका खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली. एखाद्याचं राजकीय करियरच संपुष्टात आणू पाहणार्‍या अशा खोट्या खटल्यांसाठी संबंधित अधिकार्‍यांना सस्पेंड करून त्यांच्या नोकरीचे सगळे लाभ रद्द करून त्यांच्याकडून नुकसानभरपाई घेणे, त्यांना कारस्थानासाठी तुरुंगात टाकणे अशी शिक्षा का नाही करत न्यायालय?
– स्वप्ना सावंत, पेण
स्वप्नाताई, तुम्ही स्वप्नातल्या न्यायालयाबद्दल बोलत आहात बहुतेक. वास्तवात या. जिथे न्याय देणार्‍यांनाच खोट्या खटल्यांची भीती असेल तिथे मांजराच्या गळ्यात घंटा कोण बांधणार? आणि आम्ही काय तुम्हाला ‘अशा’ मांजराचे ‘कॅट लव्हर’ वाटलो? लक्षात ठेवा कॅट लव्हर्सना असे प्रश्न विचारले तर ‘त्या’ कॅट पेक्षा ‘त्या’ कॅटचे लव्हरच जास्त फिसकारून अंगावर येतात.

 

विचारून टाका प्रश्न

तुम्हालाही अभिनेते संतोष पवार यांना प्रश्न विचारायचाय…? मग वाट कसली बघताय…? उचला पेन आणि टाका विचारून प्रश्न… हा प्रश्न थेट ‘मार्मिक’च्या [email protected] या ईमेल आयडीवर पाठवून द्या… किंवा आमच्या पत्त्यावर पाठवा. मार्मिक प्रश्नाला संतोष पवार उत्तर देतील…

Previous Post

राशीभविष्य ७ ते १३ मार्च २०२६

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.