• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

नाटकातलं दर्जेदार नाटक!

संजय डहाळे (तिसरी घंटा)

marmik by marmik
February 27, 2026
in तिसरी घंटा
0
नाटकातलं दर्जेदार नाटक!

पावणे दोनशे वर्षांची परंपरा असलेले मराठी नाटक. आज अनेक दालनांनी सुसज्ज. बदलत्या काळाप्रमाणे त्याच्या तंत्रज्ञानात बदल हे स्वाभाविकच. त्यातील ‘प्रॉम्टर’ (प्रॉम्प्टर) हा पडद्यामागला माणूस. पार्श्वसूचक, अनुबोधक, पार्श्ववाचक, प्रॉम्टर अशा नावांनी ओळखला जाणारा. एकेकाळी तळघरातून चोरद्वार ठेवून अनुपाठकाची बसण्याची व्यवस्था असायची. प्रेक्षकांना न दिसेल अशी केलेली. नाटक त्याला दिसते आणि नटांना त्याचं ऐकू येतं अशा छुप्या जागी त्याचं वास्तव्य. पूर्वी असा हा पार्श्ववाचक वापरण्याची पद्धत सर्रास होती. पण आता ती जवळ जवळ बंदच झालीय…

काळ उलटला. संगीत नाटकांची जागा गद्य नाटकांनी घेतली. रात्रभर चालणारी नाटके दोन अंकात आणि दीर्घांकापर्यंत पोहचली. काही वर्षांपूर्वी नाटकांच्या शुभारंभी प्रयोगाच्या वेळी त्या नाटकाचे पुस्तक रसिकांना हमखास उपलब्ध व्हायचे. खांद्यावर झोळी घेऊन विक्रेता प्रयोगापूर्वी नाट्यगृहाबाहेर उभा असायचा. ही जणू प्रथाच होती. त्यामुळे ‘प्रॉम्टर’ या जमातीची जबाबदारी अधिकच वाढली, कारण, कलाकारांनाही संहितेबरहुकुम ‘संवाद’ म्हणणं हे भाग पडायचे. त्यातूनच ‘त्याचं’ पडद्यामागलं अस्तित्व हे कलाकारांएवढं महत्त्वाचं ठरायचं. तो आधार ठरायचा. विंगेच्या मागे, सोफ्याच्या आडोशाला त्याची हक्काची जागा असली तरी तो नाटकाचा सर्वार्थाने ‘बोलविता धनीच’ होता!

आता या अंधारातल्या रंगकर्मीची आठवण येण्यामागे खास कारण म्हणजे हे नाटक त्याच्याच जीवनाभोवती बेतलेले आहे. दोन-चार पिढ्यांतल्या त्याच्या बदललेल्या जीवनशैलीवरही त्यात भाष्य आहे. यात संगीत नाटक आहे आणि चित्रपटाचं शूटिंगही आहे. चित्रपटाचे लोकेशन, नाटकघर, कुटुंबघर… सबकुछ नाटकाभोवती फ्लॅशबॅक अन् फॉरवर्ड!. थोडक्यात नाटकात नाटक! सोबत एक
प्रॉम्टर!!

नाटककार, दिग्दर्शक हषिकेश जोशी यांनी भूतकाळ-वर्तमानकाळ ‘बोलविता धनी’त बंदिस्त केलाय, जो नाट्यप्रेमी रसिकांना विविध चष्म्यांतून निश्चितच बघता येईल. आता ‘बोलविता धनी’चा दुहेरी अर्थ यातील कथानकातून घेता येईल. एक जो बोलण्यास भाग पाडतो तो किंवा श्रेष्ठ, मालक या अर्थाने आणि दुसरा आज्ञा देणारी एखादी अदृश्य शक्ती, दबावतंत्र चालविणारी! त्याचा उलगडा यातील दामोदर वाईकर याचा व्यक्तिमत्वातून होतो.

पडदा उघडतो. संगीत नाटकाच्या जमान्यातलं वातावरण. अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नाटकाचे चित्रिकरण सुरू आहे. नाटक कंपनी डोळ्यापुढे येते खरी पण हे चित्रिकरण थांबविण्याचे प्रयत्न होतात. या चित्रपटाच्या जाहिरातीत झेंडू फुले पायदळी तुडविली म्हणून फूलवाल्यांचे नेते दादागिरी करतात, धमकी देतात आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न उभा राहातो. अर्थात असे प्रयत्न हे पूर्वीही झाले होते. ते पणजोबांनी कसे हाताळले यावरही चर्चा होते. नाटकांवर बंदी, विरोध हा नवा नाही. अस्थिरता, अनिश्चितता याचा शापच नाटकांना आहे. अगदी नाटककार खाडिलकर यांचे ‘कीचकवध’ हे रूपकात्मक पौराणिक नाटक. यात ‘कीचक’ म्हणजे हिंदुस्थानात घुसलेला लॉर्ड कर्झन आणि सैरंध्री म्हणजे आपली जनता. सोबत युधिष्ठिर व भीम म्हणजे मवाळ व जहाल पक्ष. त्याकाळी ब्रिटिशांनी या नाटकावर बंदी आणली होती. बंदी आणलेले हे पहिले रूपकात्मक मराठी नाटक ठरले.

या कथानकात ‘शारदा’ नाटक गुंफण्यात आलंय. १८९९ सालचे नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचे हे संगीत नाटक. सामाजिक नाटकांची मुहूर्तमेढ याच नाटकाने केली. या नाटकाचा इफेक्ट म्हणजे त्याने जरठ-बाला विवाह रोखणार्‍या ‘शारदा अ‍ॅक्ट’ला जन्म दिला. गाजलेल्या या नाटकातील तालमीचा प्रसंग उभा करण्यात आलाय. त्यात म्हातारा, लंपट भुजंगनाथ, आर्थिक लोभापोटी मुलीला विकू पाहाणारा कांचनभट, लग्न जुळवून आणणारा स्वार्थी भद्रेश्वर यांच्या प्रसंगातून नाट्य अलगद उभे राहते. तालमीच्या निमित्ताने होणारा गोंधळ, वादविवाद, तालीम मास्तरची दमबाजी, विनोद- हे सारं काही उभं करण्यात आलंय. यात दामोदर हा प्रॉम्टर कम् सांगकाम्या पडेल ते काम करतोय. पुढे प्रॉम्टिंग करता-करता भूमिका साकारण्याची लॉटरी दामोदरला लागते. तो त्या संधीचं सोनं करतो.
दुय्यम, दुर्लक्षित समजल्या जाणाच्या ‘प्रॉम्टर’च्या वैयक्तिक जीवनासोबतच नाट्य या उद्योगातील चढ-उतार, सामाजिक, आर्थिक, कौटुंबिक प्रश्न, आचार, विचार स्वातंत्र्याच्या आड येणारे अडथळे हे खुबीने मांडले आहेत. दामोदर आणि रमा यांचेही प्रकरण उपकथेतून पुढे येते. एकूणच हे नाटक एकाचवेळी दोन वाटांवरून वेगाने निघते. जे प्रत्यक्ष अनुभवणं उत्तम.


लेखक, दिग्दर्शक हृषिकेश जोशी हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्यशाळेचे विद्यार्थी. कल्पकता आणि प्रायोगिकता त्यांच्या अंगी खच्चून भरलेली आहे. विशेषतः मराठी नाटकांच्या सुवर्णकाळाबद्दलचा त्यांचा अभ्यास व संशोधन हे वाखाण्याजोगे आहे. नांदी, गोष्ट संयुक्त मानापमानाची, या दोन्ही नाटकांतून त्यांची प्रचिती रसिकांना आली आहे. जुन्या नाटकांचे संदर्भही नजरेत भरतात.
दोन काळ एकाच वेळी एकाच नाटकात प्रतिबिंबित करण्याची कमाल यात आहे. अगदी पडद्यामागल्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय बदलांचीही यात दखल दिसते. अभ्यासपूर्ण संहिता आणि परिपूर्ण सादरीकरण त्यात आहे. वि.वा. शिरवाडकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून जुन्या जमान्यातील ‘नटसम्राटा’ची शोकांतिका एका उंचीवर पोहचली होती. त्याच प्रकारे अंधारातील
‘प्रॉम्टर’ची व्यक्तिरेखा- जी स्वतंत्रपणे तसेच पूर्ण लक्ष तिच्यावरच केंद्रित करून निश्चितच करता आली असती. पण, तसे न करता दोन नाटकांचा ऐवज या एका नाटकात सामावला आहे. लेखन, दिग्दर्शनाची जबाबदारी एकहाती असल्याने सादरीकरणात नेमकेपणा आहे. एखादी महाकादंबरी दोन अंकात बसविणे जसे जिकरीचे आहे तसेच हे आव्हान हृषिकेशने नाटककार म्हणून पेललं आहे.
प्रॉम्टर दामोदर वाईकर ही मध्यवर्ती भूमिका. नव्या पिढीचा ताकदीचा अभिनेता क्षितिश दाते याने या बहुरुपी भूमिकेला शंभर टक्के न्याय दिलाय. स्वगत, संवाद, देहबोली शोभून दिसते. रंगभूमीवरला एक कलाकार आणि त्याचे जीवन हे विचार करायला लावणारे. अपेक्षा तसेच उपेक्षा याचा हृदयस्पर्शी आलेख त्यामागे आहे. अनोळखी मुखवट्यात चांगले रंग भरलेत. आजवरची वाटचाल बघता क्षितिश हा गुणी व अपेक्षा वाढविणारा अभिनेता आहे. पंधराएक कलाकारांची तयारीची फौज या नाटकात हजर आहे. त्यातील काही प्रत्यक्ष रंगभूमीमागे काम करणारे तंत्रज्ञही आहेत, जे दोन-तीन भूमिकाही सफाईदारपणे करतात. आजकाल कमीत कमी पात्रांची नाटके बघणार्‍यांना ही ‘टीम’ थक्क करून सोडते. त्यात नाटकाचे सूत्रधार दीपक गोडबोले यांच्यासह सारेजण सज्ज आहेत, जे चैतन्य निर्माण करतात, हे देखील या नाटकाचे वेगळेपणच. नृत्य, अभिनय याची उत्तम जाण असणारी आणि एकांकिका स्पर्धांमधली पुरस्कार विजेती सिमरन सैद ही रमाच्या भूमिकेत दामोदरला साथसोबत करतेय. दोघांचे प्रसंग चांगले जुळले आहेत. चित्रपट, नाटक यात अनुभवी मयुरी रानडे पार्वतीच्या भूमिकेत दिसतात. भूमिकेची उत्तम समज त्यांना आहे. सोबतच संग्राम साळवी (देवल), ओंकार कुलकर्णी (शंकरराव/डीके), अजिंक्य पोंक्षे (रामा डबरी), प्रद्युम्न गायकवाड (कार्यकर्ता/ पांडू/ मुलीचा बाप), सागर यार्दी (चिंतोबा/टिळक /नेता), परमेश्वर गट्टे (डांगे वकील/मॅनेजर), निरंजन जावीर (भाऊराव /तात्यासाहेब), दीपक गोडबोले,
(मॅनेजर भिलाजी/नातेवाईक), निलेश गांगुर्डे (हवालदार), सिद्धेश देऊलकर (विष्णू) हे रंगकर्मी आहेत. रंगभूषा ते वेशभूषा, यातही यांचा वावर आहे! एकूण चाळीस भूमिका यात साकारल्या जातात. हाही एक विक्रम.
नाटकाच्या तांत्रिक बाजूंवरही दिग्दर्शकाची करडी नजर असल्याने दोन काळाचे दर्शन होते. भूतकाळ वर्तमानाशी जोडण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. नेपथ्यकार प्रदीप पाटील यांनी संगीत नाटकांची पार्श्वभूमी आणि आजचा काळ हा नेपथ्यरचनेतून हुबेहूब उभा केलाय. भिंतीवरले फोटो, खुर्च्या, कमानी, दगडी भिंत, कठडा सारं काही रंगसंगतीसह आहे. अजित परब यांचे संगीत, तसेच मयुरा रानडे हिची वेशभूषण आणि राजेश परब, अशोक राऊत यांची रंगभूषा नाट्याला पूरक ठरते.
‘एसएसडी’च्या नाट्यतज्ज्ञ अनुराधा कपूर यांनी ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक बघितले. त्या मराठी नाटकांच्या सुवर्णकाळाने भारावून गेल्या. त्यांनी हृषिकेश जोशी यांना प्रॉम्प्टर या व्यक्तिमत्वावर नाटक करायचं सांगितलं. चक्रे फिरली आणि ‘बोलविता धनी’चा जन्म झाला. ही या नाटकाची जन्मकथा. ‘आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची!’- हा संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील ओळी अर्थातच संहितेसाठी प्रमाण ठरल्या.
मराठी रंगभूमीवर पडद्यामागील अनेक रंगकर्मी रंगमंचावर प्रगटले किंवा रंगमंचावरले काहीजण पडद्यामागेही स्थिरावले. नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर मूळचे नाट्य व्यवस्थापक. पण ‘तो मी नव्हेच’च्या अप्रतिम अभिनयामुळे अभिनेते म्हणून गाजले. त्यांना सारे सन्मान मिळाले. अशी अनेक उदाहरणे आहेत. यातील दामोदर हे जरी काल्पनिक पात्र असलं तरी असा अधांतरी अन् काळजाला भिडणारा प्रवास केलेली एक पिढी होती आणि आजही आहे. त्यांनी अपमान सोसले, पण यशही मिळाले. एकूणच हा ‘बोलविता धनी’ चटका लावून जातो.
रंगवलेले पडदे होते, ते गेले. ब्लॅक
बॉक्स संस्कृती आली. नटराजचरणी श्रद्धा, निष्ठा याऐवजी पॉश मार्वेâटिंगचे कार्पोरेट युग आलं. माध्यमांची बलस्थाने बदलली. नाटकांचे व्याकरणही नवे झाले. नवनवीन प्रवाह रंगभूमीच्या मुख्य प्रवाहात मिसळले. यात दुर्लक्षित असलेला ‘प्रॉम्टर’सारखा ‘कॉमन मॅन’ गायब झालाय. त्याची शोकांतिका कथानकातून नजरेत भरते. आता हा नाटककाराने मांडलेला खेळ एका ‘प्रॉम्टर’चा की उभ्या नाट्यक्षेत्राचा, असा प्रश्न पडणे स्वाभाविकच. त्याच्या उत्तरासाठी नाटकाभोवती झपूर्झा घालणार्‍या या ‘बोलविता धनी’ची भेट घ्यावी लागेल… रंजन-अंजनातून नाटकातलं नाटक बघतांना सर्वार्थाने दर्जेदार नाट्य बघितल्याचं समाधान रसिकांना निश्चितच मिळेल!
बोलविता धनी
लेखन/दिग्दर्शन/प्रकाश – हृषीकेश जोशी
नेपथ्य- प्रदीप पाटील
संगीत – अजित परब
वेशभूषा – मयुरा रानडे
रंगभूषा – राजेश परब/ अशोक राऊत
निर्माते – प्रवीण भोसले, समृद्धी तांबे, गंधाली कुलकर्णी, सुनंदा काळुसकर, भरत नारायणदास ठक्कर
सूत्रधार – दीपक गोडबोले
प्रकाशित- रसिकराज
निर्मिती संस्था- अमरदीप/कल्पकता/सृजन थिएटर्स.
छायाचित्रे – संजय पेठे

Previous Post

गंध सुवार्तेचा, भाजल्या रव्याचा…

Next Post

वेबकॅम जेव्हा हॅक होतो…

Next Post
वेबकॅम जेव्हा हॅक होतो…

वेबकॅम जेव्हा हॅक होतो...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.