• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दागिने चोराचा चकवा!

इन्स्पेक्टर प्रधान (पंचनामा)

marmik by marmik
April 2, 2026
in पंचनामा
0
दागिने चोराचा चकवा!

त्यांच्या डोक्यात अजूनही शंकेचा भुंगा होताच की हा चोर आपल्याला घुमवतो आहे. आपल्याला या ट्रेनभोवतीच काहीतरी पुरावा मिळेल. त्यांनी एक विचार केला की या स्टेशनला एक ते सहा प्लॅटफॉर्म आहेत, प्रत्येक प्लॅटफॉर्म आपण चेक करू या. कोण जाणे, एखाद्या वेळेस काही तरी महत्त्वाचा पुरावा मिळून जाईल.त्यांनी सर्व प्लॅटफॉर्म चेक केले. त्यातून त्यांना दिसले की संशयित ट्रेनमध्ये चढल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी एक बुरखा घातलेली बाई रेल्वे रूळ क्रॉस करून प्लॅटफॉर्मवर चढताना दिसत आहे.

 

आज सोमवार होता. रोशनशेठ जरा आळसावलेलेच होते. दिवाळीच्या सुट्ट्यांना लागून रविवार आला होता. त्यामुळे मस्तपैकी फराळ आणि गोडधोड खाऊन आराम करून झाला होता. आजपासून मात्र पुन्हा तेच दुकान, रोज तेच काम करावे लागणार म्हणून शेठ काहीसे नाराजही होते. नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजता दुकानात जायला निघाले. रिक्षात बसल्यावर त्यांच्या लक्षात आले की दिवाळीत चांगला धंदा झाला होता तरी एक किलोच्या आसपास सोन्याचे आणि तीन किलो चांदीचे दागिने अजून शिल्लक आहेत. या महिन्यात यांचा सेल झाला की मग काळजी नाही, असा विचार करत ते दुकानाजवळ आले. दुकानाबाहेर त्यांचा सगळा स्टाफ उभा होता. रिक्षातून उतरत सगळ्यांना गुड मॉर्निंग करत त्यांनी दुकानाच्या शटरची चावी वॉचमनकडे दिली. वॉचमनने आधी बाहेरचे ग्रिल मग शटर उघडले आणि आत प्रवेश केला. रोशनशेठ आणि स्टाफने आत प्रवेश केला आणि समोरील दृश्य पाहून सगळ्यांना धक्काच बसला. दुकानाच्या आत डाव्या बाजूच्या भिंतीला मोठे भगदाड पडलेले होते. दुकानात विटामातीचा खच पडलेला होता. दुकानाच्या शोकेसमधील सर्व दागिने गायब होते. गल्ला चेक केला तर त्यात दोन लाख रुपयांची हातखर्चाची ठेवलेली रक्कम देखील गायब होती. आतील सीसी कॅमेरे फुटलेले दिसत होते. वॉचमनने भिंतीच्या भगदाडातून आत जाऊन पाहिले तर बाजूच्या गाळ्याच्या मागच्या भिंतीलाही एक भगदाड होते. तो गाळा बरेच दिवस बंद होता. पोलिसांनी सील केलेली ती पतपेढी होती. ती कोर्टाचे आदेशाने उघडणार होती.

रोशनशेठला धक्काच बसला. त्याला काय करावे कळेना. ते वॉचमनला ओरडू लागले. हे कसे झाले तुला कळले नाही का, कोणी हा डाव साधला, अशा अनेक प्रश्नांची सरबत्तीच चालू केली. बिचारा वॉचमन घाबरला आणि रडू लागला. एकच गोंधळ उडाला. हा गोंधळ ऐकून शेजारचे दुकानदारही जमा झाले. त्यात बघ्यांची गर्दी वाढली. त्याचेवळी दुकानाच्या मॅनेजरने पोलिसांना फोन केला.

मनीष नगर पोलीस ठाण्यात पोलीस इन्स्पेक्टर साबळे आपल्या स्टाफला घरून आणलेला फराळ वाटत होते. आपली बायको किती छान फराळ बनवते, आपण किती लकी आहोत हे सांगत होते, तेवढ्यात कंट्रोलचा कॉल आला, मनीष नगरमध्ये ज्वेलरचे दुकान फोडले आहे. तत्काळ स्टेशन ऑफिसरने तिथे रवाना व्हायचे आहे. हे ऐकताच साबळे यांचा दिवाळीच्या आनंदाचा रंग उतरून गेला. त्यांनी फराळाचा डबा बंद केले. काहीसा त्रागा करीत स्टाफला घेऊन निघाले. रस्त्यात जाताना
डॉग स्क्वाड आणि फोरेन्सिक लॅबला कॉल केला. तिथे गेल्यावर सर्व परिस्थिती समजून घेतली. त्यांनी रोशनशेठना सर्व हकीकत विचरली. स्टाफच्या सदस्यांना वेगवेगळ्या पद्धतीने विचारले, फिर्याद लिहून घेतली. सगळ्यांचे जबाब नोंदवले. हे सर्व सोपस्कार केल्यानंतर त्याच्या लक्षात एक गोष्ट आली की रोशनशेठ नेहमी दुकानात एवढे सोने ठेवत नाहीत. यावेळी दिवाळी होती आणि मुलीच्या घरी गावी दोन दिवस जायचे होते, घरी कोणीच नसणार म्हणून सोने दुकानात ठेवले होते. ही गोष्ट त्यांच्या दुकानातील लोकांना माहित होती. त्यातीलच कोणीतरी ही खबर देऊन काम केले.

त्यांनी सर्व कामगारंची माहिती घेण्यास सुरुवात केली. दुकानात एकूण चार जण काऊंटरवर काम करणारे आणि एक
वॉचमन आहे. त्यांची काही गुन्हेगारी प्रवृत्ती आहे काय? गुन्हेगारी इतिहास आहे काय? या कामात त्यांचे दोन दिवस गेले होते. एवढ्या मोठ्या सोनाराकडे चोरी झाल्याने सराफ असोसिएशनने मोर्चा काढला होता. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी सातत्याने विचारणा करत होते. दबाव तर वाढत चालला होता आणि तपासात काही प्रगती होत नव्हती. इन्स्पेक्टर साबळे थोडे निराश झाले होते. त्यांनी सर्व डिटेक्शन ब्रँचला आदेश दिले की लवकरात लवकर अभिलेखावरील सर्व गुन्हेगार तपासून बघा, खबर्‍याकडून माहिती घ्या, दिवस रात्र एक करा, पण गुन्ह्याचा छडा लावा. हे सर्व करूनही काही धागेदोरे लागत नव्हते.

त्यांना एक गोष्ट समजून आली होती की आपण समजतो तेवढा हा गुन्हा सरळ नाही. तो करणारा गुन्हेगार ओव्हरस्मार्ट आहे. त्याला पोलिस चोरीचा काय आणि कसा तपास करतात, याचेही ज्ञान आहे. गुन्हेगार एक तर पोलीस खात्यात काम करणारा किंवा पोलिसांना जवळून पाहणारा माणूसच असू शकतो किंवा सराईत चोर असू शकतो. त्यामुळे आपल्याला तपासाची दिशा बदलावी लागणार आहे. त्यांनी सर्व पुरावे पुन्हा स्वतः तपासून पाहायचे ठरवले. त्यात त्यांच्या मनात विचार आला की सीसी टीव्ही कॅमेरे चेक करून पाहू या. त्यांनी दुकानाबाहेरचे सीसी टीव्ही कॅमेरे चेक केले. शनिवारी रात्री साधारण २.३६ वा. एक मास्वâ घातलेला पुरुष, जो अंगकाठी आणि पेहरावावरून २५ ते ३० या वयोगटातील वाटत होता, तो मोबाइलवर कोणाशी तरी बोलत, कॅमेर्‍याकडे पाहत दोनतीन वेळा दुकानासमोरून ये जा करताना दिसत होता. तो तिथे आहे हे तपासात पोलिसांना समजावे, यासाठीच तो हे करत असणार, नाही तर सुनसान रस्त्यावर रात्री दोन वाजता कोण विनाकारण फिरणार, असा विचार साबळेंच्या मनात चमकून गेला. ओह! मला पकडून दाखवा, असं चॅलेंजच तो एकप्रकारे देतो आहे पोलिसांना! आता काहीही करून त्याला पकडायचंच हे साबळे यांनी ठरविले. त्यांनी लगेच त्या जागेच्या टॉवर लोकेशनवरून डेटा काढून मोबाईल नंबर शोधण्यासाठी टीम नेमली. परंतु त्या टीमच्या हाती काही लागले नाही. म्हणजे तो मोबाइलवर बोलत नव्हताच, तपास भरकटवण्यासाठी त्याने ही खोडी केली होती. जे दिसत आहे त्यावरून तपास करायचा नाही तर नजरेपलीकडे पाहायचे आणि चोराच्या डोक्याने विचार करून तपास करायचा, हा विचार पक्का झाला.

चोरी नक्की कधी झाली हे कळले की पुढची तपासाची दिशा ठरवता येईल, हे लक्षात घेऊन त्यांनी फोरेन्सिक टीमला बोलावून घटनास्थळी जाळलेल्या कागदांचे परीक्षण करून घेतले. एक्स्पर्ट टीमने परीक्षण करून अहवाल दिला की राखेचा थर ओलसर आहे, तसेच रात्रीच्या दवामुळे कागद जमिनीला चिकटलेला होता. तो आदल्या रात्री किंवा त्याच्याही आधी जाळलेला असू शकतो. साबळे यांनी गुन्हा उघडकीला आल्याच्या दोन दिवस आधीपासून म्हणजे शनिवारी रात्रीपासून तपासाला सुरुवात करायचे ठरविले. सीसी कॅमेरामध्ये डोकावलेला संशयित देखील शनिवारी रात्रीच कॅमेर्‍यात दिसला होता, त्यामुळे चोरीची वेळ तीच आहे हे त्यांनी पक्के केले. शनिवारी रात्री दोन वाजता रस्त्याच्या दोन्ही बाजूला जाणार्‍या रस्त्यांवरचे सर्व सीसी टीव्ही कॅमेरे पाहिले, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की दुकानासमोर फिरणारा संशयित रस्त्याने पायीच जाताना दिसत आहे आणि त्याच्या पाठीला बॅग आहे. त्यांनी सर्व सीसी टीव्ही कॅमेर्‍यांवरून त्याचा माग घेतला, तेव्हा तो संशयित रेल्वे स्टेशनमध्ये गेल्याचे दिसले. साबळे यांनी लगेच रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून प्लॅटफॉर्मवरील कॅमेरे चेक केले. हा संशयित स्टेशनच्या आत आला आणि एक नंबर प्लॅटफॉर्मवर उभ्या ट्रेनमध्ये चढला, हे त्यातून कळले. ती वाराणसीला जाणारी ट्रेन होती आणि ती त्या दिवशी दोन तास लेट झालेली होती. साबळेंनी विचार केला की संशयिताला जर खरंच वाराणसीला जायचं असतं तर तो वेळेवर आला असता आणि दिसेल त्या गाडीने जायचे असते तर जी लगेच निघणारी ट्रेन होती, तिने गेला असता. हा याच ट्रेनमध्ये का चढला? त्यांच्या लक्षात आले की मी, म्हणजे तपास अधिकार्‍याने हाच विचार करून वाराणसीपर्यंत जावे, हाच त्याचा इरादा असणार. गालातल्या गालात हसून त्यांनी तपासाचे प्लॅनिंग सुरू केले. दोन कर्मचार्‍यांना त्या गाडीच्या प्रत्येक स्टेशनवर जाऊन तपास करायला पाठवले.

पण त्यांच्या डोक्यात अजूनही शंकेचा भुंगा होताच की हा चोर आपल्याला घुमवतो आहे. आपल्याला या ट्रेनभोवतीच काहीतरी पुरावा मिळेल. त्यांनी एक विचार केला की या स्टेशनला एक ते सहा प्लॅटफॉर्म आहेत, प्रत्येक प्लॅटफॉर्म आपण चेक करू या. कोण जाणे, एखाद्या वेळेस काही तरी महत्त्वाचा पुरावा मिळून जाईल. त्यांनी सर्व प्लॅटफॉर्म चेक केले. त्यातून त्यांना दिसले की संशयित ट्रेनमध्ये चढल्यानंतर साधारण १५ मिनिटांनी एक बुरखा घातलेली बाई रेल्वे रूळ क्रॉस करून प्लॅटफॉर्मवर चढताना दिसत आहे. तिनं रुळावरून प्लॅटफॉर्मवर पाय ठेवला, तेव्हा तिच्या पायात पांढरा स्पोर्ट्स शूज दिसला, तोच संशियताच्या पायात होता. त्याचबरोबर तिच्या पाठीचा भागही फुगीर दिसत होता. त्यावरून त्यांच्या लक्षात आले की ही कोणी मुस्लिम महिला नाही तर हाच संशयित चोर आहे, जो पोलिसांना चकमा देण्यासाठी बुरखा घालून निघाला आहे. कितीही हुशार गुन्हेगार एक तरी चूक करतोच, त्याने पेहराव बदलला पण बूट बदलायचे विसरला.

इन्स्पेक्टर साबळे यांचा आता हुरूप आला आणि आत्मविश्वास ही वाढला. पोलिसांना गंडवल्याच्या समजुतीने स्टेशनच्या बाहेर पडून संशयित गुन्हेगार जसजसा रस्त्याने चालत जात होता, त्याप्रमाणे ते सीसी कॅमेरे चेक करीत गेले. एका ठिकाणी २४ तास चालू असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये संशयिताने काहीतरी खरेदी केलेले दिसले. साधारणपणे तीन मिनिटे तो काऊंटरवर थांबलेला होता. तेथून काही अंतरावर झोपडपट्टीचा भाग लागत होता, तिथे सीसी कॅमेरे नसल्याने तो पुढे कुठे गेला ते समजत नव्हते. आता पुन्हा साबळे यांच्यापुढे नवं आव्हान उभे राहिले.

काही वेळ त्यांनी आपणच लिहिलेल्या तपासाच्या पॉइंट्सवर नजर फिरवली आणि अचानक त्यांना क्लिक झाले की संशयित मेडिकल स्टोअरमध्ये असताना त्याने तिथे एक कागद दाखवला होता. ते डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन असेल तर त्यावरून काहीतरी धागादोरा मिळेल. त्यांनी लगेच मेडिकल स्टोअर गाठले त्यावेळी साधारण सकाळचे ११ वाजले होते. रात्रपाळीचा कुणीही कर्मचारी दुकानात नव्हते. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनबाबत काही माहिती मिळाली नाही. साबळे यांनी थोडा विचार केला आणि पुन्हा सीसी फुटेज पाहिले. त्यांच्या लक्षात आले की आपण दुकानात तिरक्या लावलेल्या कॅमेर्‍यातील फुटेज पाहत आहोत. आतून काऊंटरकडे लावलेल्या कॅमेर्‍यातील फुटेज पाहिले नाही. ते पाहिल्यावर कळले की संशयिताने काऊंटरवर ठेवलेले प्रिस्क्रिप्शन पाहून दुकानातील व्यक्तीने त्याला औषध दिले होते. संशयिताने रोख पैसे दिले होते. साबळे यांनी कॅमेरा झूम करून त्या अंधुक अक्षरांचा स्क्रीन शॉट घेतला आणि त्या फुटेजची प्रत पेनड्राइव्हमध्ये घेऊन फॉरेन्सिक लॅबला दिले.फ्रेम अ‍ॅव्हरेजिंग या तंत्रज्ञानाचा वापर करून लॅबने प्रिस्क्रिप्शन क्लिअर करून दिले. ते चित्र पाहून त्यांना धक्का बसला कारण ते प्रिस्क्रिप्शन रोशनशेठ यांच्या दुकानासमोरच असलेल्या वेदांत डेंटिस्ट या क्लिनिकचे होते. दुकानापासून सुरू झालेला तपास पुन्हा घटनास्थळी येऊन पोहोचला.

इन्स्पेक्टर साबळे यांनी लगेच क्लिनिक गाठले, डॉक्टर काळे यांना प्रिस्क्रिप्शन दाखवले. ते पाहून त्यांनी कम्प्युटरवर चेक करून सांगितले की राधेश्याम दुबे नावाचा मुलगा दाताची ट्रीटमेंट घ्यायला सोमवार ते गुरुवार आलेला होता. त्याची एक दिवसाची शुक्रवारची ट्रीटमेंट राहिली होती. ती घ्यायला तो आलाच नाही. तो नेहमी संध्याकाळी पाच वाजताच यायचा. त्याला सकाळी किंवा उशिरा सात वाजता यायला सांगितले तर तो ऐकत नसे. आता इन्स्पेक्टर साबळे यांना खात्री होती की राधेश्याम दुबे हे नाव खोटं असणार आणि सगळे व्यवहारही याने रोखीत केले असणार. पण तो संध्याकाळी पाच वाजताच का येत होता, हे कोडं काही उलगडत नव्हतं. वेदांत हॉस्पिटलच्या सीसी टीव्ही कॅमेरामध्येही तो मास्क लावलेला आणि कॅप घालून बसलेला दिसत होता. पायात बूट देखील तोच होता. देहबोलीही संशयित चोराचीच होती.

इन्स्पेक्टर साबळे यांनी डॉक्टरांना विचारले, ट्रीटमेंट झाल्यावर लिहून दिलेली औषधे तुम्ही पेशंटना कुठून घ्यायला सांगता? त्यावर
डॉक्टरांनी सांगितले की दवाखान्याच्या बाजूलाच त्यांच्या मेहुण्याचे राज मेडिकल हे दुकान आहे, त्यातून घ्यायला सांगतो. साबळे यांनी लगेच कंट्रोल रूमला फोन करून एक स्केच आर्टिस्ट बोलावला आणि डॉक्टरांकडून संशयिताचे स्केच काढून घ्यायला सांगितले. त्यानंतर साबळे यांनी मोर्चा राज मेडिकल स्टोअरकडे वळविला. तिथले सीसी टीव्ही कॅमेरे चेक केल्यावर त्यांच्या लक्षात आले की सोमवारी संध्याकाळी चार वाजता संशयित व्यक्तीनं तिथे ऑनलाइन पेमेंट केलं आहे. हे पाहताच साबळे यांच्या चेहर्‍यावर आनंद झळकला, जणू आता बाजी त्यांच्या हातात आहे असेच त्यांना वाटू लागले. त्यांनी मेडिकल स्टोअरमधील ऑनलाइन एन्ट्रीवरून मोबाइल नंबर आणि अकाऊंट डिटेल काढून आणायला सांगितले. ते मिळाल्यावर साबळे यांच्या लक्षात आले की हे अकाउंट आणि मोबाइल नंबर ज्याचा आहे, त्याचा पत्ता तो संशयित गेला होता त्याच झोपडपट्टीतला आहे. इन्स्पेक्टर साबळे आणि तपास टीम तिथे पोहोचली आणि त्यांना धक्काच बसला. कारण, ज्याच्या नावावर कार्ड होतं ते राधेशाम दुबे कधीच मरण पावले होते. त्यांची बायको रस्त्यावर भीक मागायची. सहा महिन्यांपूर्वी एका माणसाने दोन हजार रुपये देऊन तिच्या नवर्‍याचं सीमकार्ड विकत घेतले होते. इन्स्पेक्टर साबळे पुन्हा निराश झाले. त्यांचा तपास पुन्हा पहिल्या ठिकाणी येऊन थांबला होता.

(कथेचा उत्तरार्ध ११ एप्रिलच्या अंकात)

Previous Post

आत्मशांती भेळ

Next Post

गंध शुचितेचा… डांबरगोळीचा…

Next Post
गंध शुचितेचा… डांबरगोळीचा…

गंध शुचितेचा... डांबरगोळीचा...

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.