• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

दागिने कोणी चोरले?

इन्स्पेक्टर प्रधान (पंचनामा)

marmik by marmik
March 17, 2026
in पंचनामा
0
दागिने कोणी चोरले?

पूर्वाध
डीसीपी साहेबांचे मित्र असलेल्या शर्मांच्या घरी दागिन्यांची चोरी झाली आणि त्यांनी संशय घेतलेल्या दोन्ही घरकामगार महिलांना पोलिस कोठडीत घेतल्यानंतरही गुन्ह्याचा उलगडा झाला नाही. सुट्टीवर जाणं रद्द करून तपासाला लागलेल्या पीएसआय जमदाडेंनी शर्मांच्या घरातल्या सगळ्यांना संशयितांच्या यादीत गृहीत धरून तपास सुरू केला. शर्मांची मुलं चांगली होती. शिवाय, ज्याच्यावर त्यांचा सर्वाधिक वहीम होता, त्या शर्मांच्या मेहुण्याच्या, दुबेच्या तपासात त्यांना खात्री पटली की हा नक्कीच निर्दोष आहे… आता कोडं आणखी गुंतागुंतीचं झालं… (सविस्तर वाचण्यासाठी  दागिने कोणी चोरले?  इथं क्लिक करा…)

************

पी एसआय जमदाडे यांचा पहिला संशयित दुबे हा निर्दोष निघाला. इतके कष्ट घेऊनही ज्याच्यावर जास्त संशय होता तो अपराधी नाही, या अनपेक्षित अपयशामुळे त्यांना मानसिक थकवा आला होता. ही चोरी हा गुन्हा छोटा होता, पण यातील गुन्हेगार काही साधा नव्हता. तो हुशार आहे, हे त्यांच्या लक्षात आलं.

आता आधीच पकडल्या गेलेल्या दोन घरकामगार महिलाच संशयित म्हणून त्यांच्या नजरेसमोर होत्या. त्यांची पोलिस कोठडी उद्या संपत आहे. त्यांना पोलिसी खाक्या दाखवून माहिती काढायला वेळ नाही. दोघींपैकी एकीनं किंवा दोघींनी मिळून ही चोरी केली?
ज्या गुन्हेगाराने चोरी केली आहे त्याला हे माहीत आहे की त्याच्यावर संशय घेतला जाऊ शकतो. त्याला तपासाला सामोरे जावे लागणार आहे. त्याला कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याचीही त्याला कल्पना आहे. त्यामुळे तो तयारीत आहे. त्याला अपेक्षित असलेले प्रश्नच आपण विचारत आहोत, त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढणार आहे. त्यामुळे, या चोराला पकडायचे असेल तर आपल्याला त्याच्यापुढे जाऊन विचार करावा लागणार आहे. हे लक्षात घेऊन जमदाडेंनी आता तपासाची दिशा बदलायचे ठरविले, नक्की काय करायचे हे कळत नव्हते, पण आजवरच्या अनुभवाच्या आधारे काही ना काही नक्की करू. त्यांच्याशी ज्यावेळी बोलू त्यावेळी काही ना काही क्लू मिळेल, त्याप्रमाणे पुढे जाऊ असे ठरवून त्यांनी पुन्हा नव्या जोमाने तपास करण्यास सुरुवात केली.
दुपारचे दीड वाजले होते. पोलिस ठाण्यात डीबी रूममध्ये संशयित महिला आणि एक महिला पोलिस हजर होत्या. दोघीजणी नुकतेच जेवण करून बसल्या होत्या. त्यांचे जेवलेले ताट कोपर्‍यात ठेवलेले होते. जमदाडे यांनी सर्वप्रथम स्वयंपाकाचे काम करणार्‍या महिलेकडे तपास करायचा ठरवला. दुसर्‍या महिलेला तक्रार कक्षात घेऊन जायला सांगितले आणि त्या महिलेला नाव विचारले तेव्हा तिने शारदाबाई माळी असे नाव सांगितले. ती मूळची सिद्धपुर गावाची अमरावती जिल्ह्यातील आहे. तिचा नवरा टॅक्सी चालवायचा. दहा वर्षांपूर्वीच त्याचा
कॅन्सरनं मृत्यू झाला. तेव्हापासून ती स्वयंपाकाचे काम करत दोन्ही मुलींना वाढवत होती. पाच वर्षांपासून ती शर्मा यांच्याकडे काम करीत होती. शर्मांच्या घरात अनेकदा पैसे, दागिने उघड्यावर असायचे, परंतु त्याकडे आपलं कधीच लक्षही गेलं नाही. दोन-तीन वेळा तर खाली पडलेले पैसे-दागिने आपण त्यांना नेऊन दिले, असंही शारदाबाईंनी सांगितलं. त्या पुढे म्हणाल्या की,’बोलाईदेवीची शपथ घेऊन सांगते, जेव्हापासून ती सरिता कामाला आली आहे, तेव्हापासून हे असे होत आहे. छोट्या छोट्या वस्तू मालकांच्या लक्षात आल्या नाहीत. त्या तिने चोरल्या आहेत. ती जशी दिसते तशी नाही. उगाच सोंग आणते गरीब असल्याचं. तिचा नवरा पण असाच आहे.’ त्यावर जमदाडे तिला म्हणाले,’म्हणजे दागिने सरितानं चोरले असतील असं तुमचं म्हणणं आहे तर…’ त्यावर ती म्हणाली, ’बरोबर साहेब… तुम्ही खरं ओळखलं. तिच्या चेहर्‍यावर जाऊ नका… मी तिच्याकडे लक्षच देत नाही. असल्या बायकांशी काय बोलायचं?.. उगाच त्यांच्यामुळे आपण बदनाम व्हायचं… आपलं काम भलं आणि आपली बोलाई देवी भली. मी देवपूजा केल्याशिवाय जेवत नाही. पाहिजे तर माझ्या आणि तिच्या घराची झडती घ्या. तुमच्या लक्षात येईल, मला विनाकारण तिच्यामुळे त्रास झाला.’

जमदाडे यांनी शारदाबाईंना विचारलं, ’तुम्ही गावी जाता का?’ तेव्हा, ’मुलींच्या लग्नाचे नंतर दोन्ही जावयांना घेऊन देवाच्या पाया पडायला घेऊन गेले होते’, असं सांगून त्या म्हणाल्या, ’माझे जावई एक नंबर आहेत, दोघेही सरकारी नोकरी करतात, घरच चांगलं आहे, स्वतःचं घर शेत आहे, मुलींना सगळं जागेवर मिळतं, सगळ्या कामाला बाई आहे… माझ्या दोन्ही पोरींचं चांगलं आहे म्हणूनच भावकी जळती माझ्यावर. त्यांना माझ्यासारखे चांगले जावई मिळाले नाहीत. दोन्ही मुलींचे नेहरूनगरमध्ये गणेश चौकात श्री रेसिडेन्सी बिल्डिंगमध्ये फ्लॅट आहेत. तुम्हाला तर माहित आहे की तिथे सगळे स्टँडर्ड लोक राहतात. माझ्या मुली उगाच राहतात का तिथे? आमच्या जावयांना जराही वंगाळ वागणं खपत नाही. खानदानी माणसे आहेत.’

ही बाई एक विचारले तर दहा गोष्टी सांगते, त्यामुळे ती डोकं उठवणार म्हणून जमदाडे यांनी जे समजायचं ते समजून घेतले आणि तिला बाहेर पाठवून सरिताला बोलावून घेतले. त्यांनी सरिताला देखील माहिती विचारली. तिने आपले पूर्ण नाव सरिता काळे असं सांगून तिचंही गाव शारदाबाईचे गावाजवळच असल्याचं सांगितलं. आपला नवरा दारू पितो, मारहाण करतो, आर्थिक स्थिती नाजूक आहे, कसेबसे घर भागवते, असे तिने सांगितले. तिला चोरीविषयी विचारले त्यावेळी तिने मुलांची शपथ घेऊन सांगितले की काम करताना हॉलमध्ये टेबलवर सोन्याचे दागिने होते. तिने टेबलाखालून झाडू मारून घेतला पण त्या दागिन्यांना हातही लावला नाही. जमदाडे यांनी विचारले की हे दागिने शारदाबाईनं चोरले असतील का? त्यावर ती म्हणाली, ’मला नाही माहीत’. ते दुबे याने चोरले असतील का? असं जमदाडे यांनी विचारलं, त्यावरही नाही माहीत हेच उत्तर दिलं. तुला आणि तुझ्या नवर्‍याला अटक केल्याशिवाय तू कबूल होणार नाहीस, असं बोलताच ती रडू लागली. विनवण्या करू लागली, मी चोरी केली नाही हेच सांगत होती… जमदाडे यांनी तिला बाहेर घेऊन जायला सांगितले, त्यानंतर जमदाडे यांनी दोघींचे घरझडती अहवाल पाहिले.

पोलिस ठाण्यात आपल्या चेंबरमध्ये जमदाडे यांनी थोडा वेळ विचार केला. अचानक त्यांनी ठाणेदार कक्षातून दोन गणवेशातील महिला पोलिस आणि दोन पुरुष अंमलदार बोलावले आणि डीबी कक्षातून शारदाबाईला घेऊन सरकारी गाडी काढायला सांगितली. ते गाडीत पुढे आणि मागे शारदाबाईला कर्मचार्‍यांसह बसवून गाडी नेहरू नगरच्या दिशेने घ्यायला सांगितली, त्यावर शारदाबाईच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, हे आरशातून जमदाडे यांनी पाहिले आणि त्यांच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास येऊ लागला. यापूर्वी जमदाडे यांच्या चेहर्‍यावर प्रश्नचिन्ह होते आणि शारदाबाईचे चेहर्‍यावर आत्मविश्वास होता. नेहरू नगर येथे गणेश चौकात गाडी थांबवायला सांगितली. कोणालाही कळेना, इथे का गाडी थांबवायला सांगितली ते! सर्वजण खाली उतरल्यावर जमदाडे म्हणाले, ’शारदाबाई चला, कुठे तुमच्या मुली राहतात ते दाखवा…’ हे शब्द ऐकताच शारदाबाईचा चेहरा फिका पडला. ती घाबरली आणि जमदाडे यांना म्हणाली, ’साहेब, माझ्या मुलीच्या घरी कशाला जायचं?.. त्यांचा काय संबंध?’ मग ती, त्यांच्या घरी चालणार नाही हे, माझ्या मुलींचे संसार उद्ध्वस्त होतील, असं जोरजोराने बोलून त्रागा करू लागली. ती जसा त्रागा करू लागली तसा जमदाडे यांचा आत्मविश्वास वाढू लागला. त्यांनी तिला मोठ्या आवाजात सांगितले, नसेल जायचं तर सांग, दागिने कुठे आहेत? त्यावर पुन्हा शारदाबाई ओरडू लागली, ’मी नाही घेतले…गरिबावर अन्याय करताय… तुम्ही मुलींच्या घरी घेऊन गेला तर मी इथेच जीव देईन आणि तुम्हाला सर्वांना लटकवून जाईन… त्यांच्या नवर्‍यांना जर कळलं तर ते सोडून देतील…’ त्यावर जमदाडे म्हणाले, ’तो तुझा प्रश्न आहे… तू चोरीचे दागिने मुलीच्या घरात लपविल्याचा आम्हाला संशय आला म्हणून घरझडती घेतली मी कोर्टाला सांगेन, तू नको काळजी करू. चला रे, ती येत नसेल तर ओढत घेऊन जाऊ या…’ असे म्हणून जमदाडे पुढे चालू लागले आणि कर्मचारी तिला ओढून घेऊन जाऊ लागले.

काही अंतर जाईपर्यंत शारदाबाईने आरडाओरडा केला. तिच्या लक्षात आलं की जमदाडे ऐकत नाहीत… तिनं जमदाडे साहेबांना आवाज दिला, ’साहेब थांबा…’ जमदाडे थांबले आणि हसत तिला म्हणाले, ’बोल आता…’ शारदाबाई म्हणाली,’साहेब, मुलीच्या घरी मला घेऊन जाऊ नका… चोरी मीच केली आहे. दागिने कुठे आहेत ते सर्व मी सांगते तुम्हाला, पण इथून लवकर चला. माझ्या मुलीचे घर इथून जवळच आहे. पाहुण्यांनी पाहिले तर मोठी अडचण होईल… पाया पडते, चला…’ त्यावर जमदाडे म्हणाले, ’आधी सांग दागिने कुठे आहेत ते.’ त्यावर ती म्हणाली, ‘शर्मा साहेबांच्या बंगल्यामागे असलेल्या बागेत एका कोपर्‍यात पुरून ठेवले आहेत. हे प्रकरण सगळं शांत झाले की नंतर काढून घेण्याचा माझा विचार होता. मला माहित होते की चोरी झालेल्या घरात कुणीच शोध घेणार नाही.’

सर्वजण पुन्हा गाडीने शर्मांच्या घरी आले. तिने दाखविलेल्या ठिकाणावरून चोरीचा माल हस्तगत केला. सर्वजण गुन्हा उघडकीस आला या आनंदात परत जात असताना गाडीमध्ये शारदाबाईने जमदाडे यांना विचारले, ’साहेब मी तीन दिवस कुणाहीकडे गुन्हा कबूल केला नाही… मग तुम्ही कसे काय ओळखले मी दागिने चोरले ते.’ जमदाडे म्हणाले, ’ऐक.. शेवटी मी पोलिस आहे. जेव्हा तू विनाकारण विचारल्यापेक्षा जास्त सांगू लागलीस, सरिता हीच कशी चोर आहे हे मला पटवून देऊ लागलीस, त्याच वेळी मला तुझा संशय आला. तू मला तुझं नाव आणि गाव सांगितलंस. त्या भागात मी काम केलेलं असल्यानं तो भाग मला चांगलाच माहिती आहे. तुमचे कुलदैवत भैरवनाथ आहे. इथले लोक सोमवारी नॉनव्हेज खात नाहीत. तू बोलाई देवी कुलदैवत सांगितले. तू ज्या हॉटेलमधून नॉनव्हेज आलेले खाल्ले, ते बोकडाचे आहे. ज्यांना बोलाई देवी आहे ते मरतील पण बोकडाचे मटण खाणार नाहीत. पण, तू तर आमच्या कर्मचार्‍याला नेहमी बोकडाचे मटण कुठून घेतेस हेही सांगितलं. यावरून तर माझा संशय अधिक बळकट झाला. त्यात तू सरितावर आळ घेतला. तेव्हा तू हुशार आहेस आणि माझी दिशाभूल करते आहेस, हे समजले… तूच चोरी केली ही खात्री झालीच, पण तुला मारून देखील तू कबूल होणार नाही हे पक्के माहिती होते… काय करावे हे समजत नव्हते..पण तूच मला दिशा दिली. तुझ्या अति बोलण्याने तुझा घात केला… मी न विचारता ही ज्यावेळी तू मुलींच्या घराबद्दल, जावयाबद्दल सांगू लागलीस, त्यावेळी ज्या पद्धतीने तू इमोशनल झालीस ते पाहून मुली हा तुझा वीक पॉइंट आहे हे मला कळले. तू आपली इमेज त्यांच्यास्ामोर खानदानी ठेवली आहेस. त्यामुळे काहीही झाले तरी तिथे तुझी इमेज घालवणार नाहीस, हेही कळले.. आता तुला सांगतो…मी तुला मुलीच्या घरी घेऊन जाणारच नव्हतो. त्यांच्या घराच्या जवळ गेल्यावरही तू कबूल झाली नसतीस तर परत येणार होतो. तुझ्या मुलींच्या घराची झडती घेतली असती तर त्यांचा संसार उद्ध्वस्त झाला असता, हे मला माहीत आहे. आम्ही पोलिस देखील माणूस आहोत. आम्हालाही कळते. मी कसे असे होऊ दिले असते?…’यावर शारदाबाईचा चेहरा बघण्यासारखा झाला होता…तिने जमदाडे साहेबांना मनोमन हात जोडले.

Previous Post

गंध नवारंभाचा… भिंतीरंगाचा!

Next Post

शाहिरा,घ्या मानाचा मुजरा!

Next Post
शाहिरा,घ्या मानाचा मुजरा!

शाहिरा,घ्या मानाचा मुजरा!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.