मे महिन्याचा पहिलाच आठवडा होता. सातपीर पोलीस ठाण्यातला जुना फॅन त्याचं अस्तित्व जाणवेल अशा पद्धतीनं कुरकुर आवाज करत सुरू होता. मी अजूनही उपयोगी आहे, हे जणू ओरडून सांगतोय, असंच वाटत होतं. त्यात मुंबईच्या दमट वातावरणात जीव नकोसा झाल्यानं त्या पंख्याची हवा त्याच्या आवाजापेक्षा कमी असली तरी फार उपयोगी वाटत होती. हवालदार माने तक्रार कक्षात आले त्यावेळी पीएसआय जमदाडे कुणाला तरी उद्या त्यांच्या गावाला असणार्या कार्यक्रमाविषयी भरभरून सांगत होते. अचानक माने तिथे आले आणि त्यांनी जमदाडे यांना सीनिअर साहेबांनी बोलावल्याचा निरोप दिला. निरोप ऐकताच जमदाडे साहेबांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि त्यांच्या चेहर्यावरील हावभाव बदलले.
मनात असंख्य प्रश्न सुरू झाले… कारण त्यांना उद्या बायकोमुलांना गावी घेऊन जायचं होतं. सगळी तयारीही झालेली होती. गावाकडे देखील निरोप पाठवून झाला होता… आता कशाला साहेबांनी बोलावलं? नक्कीच काहीतरी काम लावणार आणि माझ्या सुट्टीचं वाट्टोळ करणार! माझ्याच बाबतीत असं का घडतंय? अशा अनेक प्रश्नांचं काहूर त्यांच्या डोक्यात सुरू होतं.
काहीसे हताशपणे आणि काहीसे गुश्श्यातच जमदाडे सीनियर साहेबांच्या चेंबरमध्ये गेले. सीनिअर साहेब त्यांची चातकासारखी वाट पाहत होते. जमदाडे यांनी सॅल्युट मारताच सीनिअर साहेब म्हणाले, ’जमदाडे, हे शर्मा ज्वेलरीमध्ये झालेल्या चोरीचे केसचे पेपर आहेत. तुम्हाला तर माहित आहे की, शर्मा ही मोठी असामी आहे आणि आपल्या डीसीपी साहेबांचे जवळचे मित्र आहेत. त्यांच्या घरात चोरी झाली असून त्यांच्याकडे काम करणार्या स्वयंपाकीण बाई आणि लादीपोछा करणार्या बाईवर त्यांचा संशय आहे. या दोघींना शर्मा यांच्या सांगण्यावरून आपण अटक तर केली आहे, पण अजून चोरीचा माल रिकव्हर झालेला नाही. त्यामुळे खरा आरोपी कोण हे अद्याप उघड झालेलं नाही. उद्या त्या दोघींची पोलीस कोठडी संपत आहे. उद्यापर्यंत चोराचा तपास आणि चोरी झालेला माल रिकव्हर झाला नाही तर कोर्ट आणि डीसीपी सर दोघंही आपल्याला सोडणार नाहीत. त्या काळेकडे केस होती. त्याला पीसी (पोलिस कोठडी) मिळून पण रिकव्हरी झालेली नाही. आपला डीबी स्क्वॉड (गुन्हे अन्वेषण पथक) पण दोन दिवस झाले त्यांना थर्ड डिग्री देतो आहे. पण काहीही उपयोग झालेला नाही. तुम्ही मागे एका बँक रॉबरीचा तपास फार चांगला केला होता, त्यामुळे हा तपास तुमच्याकडे द्यायला सांगितला आहे.’
साहेबांचं बोलणं पूर्ण झाल्यावर जमदाडे त्यांना म्हणाले, ’साहेब, माझी उद्यापासून रजा असून मी गावाला चाललो आहे. त्यामुळे मला ही केस जमणार नाही. दुसर्या कुणाला तरी ही केस द्या प्लीज.’
जमदाडेंचा नकार ऐकल्यावर थोड्या रागात आणि चढ्या आवाजात सीनिअर साहेब म्हणाले, ‘जमत नाही हे डीसीपी सरांना जाऊन सांगा. जमदाडे हे पोलिस खाते आहे. आधी ड्युटी, मग फॅमिली कळलं का?’ हे सुनावून सीनिअर सरांनी जमदाडे यांच्यासमोरच्या टेबलवर फाईल ठेवली.
पीएसआय जमदाडे यांनी सॅल्युट मारला आणि फाईल घेऊन बाहेर आले. आता बायकोला काय सांगू? ती आता मला जगूच देणार नाही?.. तिला भांडायला आयतं कारणच मिळालं… झक माराली आणि ती बँक रॉबरीची केस सोडवली. पोलिस खात्यात जो काम करतो त्याच्याच मागं काम लागतं. या केसमध्ये डीबीवाले (डिटेक्शन ब्रँच) काहीही करू शकले नाहीत आणि आता ऐनवेळी ही केस माझ्याकडे दिली. आता मी काय जेम्स बाँड आहे का?.. असं मनातल्या मनात बोलत जमदाडे डीबी रूममध्ये गेले. त्या रूमच्या कोपर्यात दोन महिला खाली बसलेल्या दिसल्या. त्यातल्या एकीच्या मांडीवर एक-दीड वर्षाचं बाळ होतं. एक महिला पोलिस कर्मचारी खुर्ची टाकून त्यांच्यासमोर बसली होती. यावरून जमिनीवर बसलेल्या या त्या दोघी संशयित आरोपी महिला आहेत, हे लक्षात आलं.
तिथं गेल्यावर जमदाडेंनी एक खुर्ची मागविली आणि त्यावर बसून गुन्ह्याचे केसपेपर वाचायला सुरुवात केली. पेपर वाचत असताना त्यांच्या डोक्यात बायकोला आता काय कारणं देऊ, नातेवाईक, भाऊ हे सगळे मिळून आपल्याला कशी नावं ठेवणार? याबरोबरच सीनिअर साहेब आपल्यालाचं कसं मुद्दाम टार्गेट करत आहेत, अशा अनेक विचारांचा कोलाहाल सुरू होता. अचानक लहान मुलाच्या रडण्यानं जमदाडेंची विचारांची तंद्री तुटली आणि ते भानावर आले आणि ते जोरात ओरडले, ’अरे या पोराला शांत कर. किती रडतंय, डोक्याला नुसता ताप…!’ हे ऐकताच त्या बाईनं मुलाला मांडीवर झोपवत दूध पाजण्यासाठी घेतलं. तेवढ्यात ’डीबी’चे हवालदार कदम आले. कदम म्हणजे गुन्हेगारांचे कर्दनकाळ. त्यांनी देखील त्या दोन्ही बायकांकडे तपास केला होता. परंतु काहीच उपयोग झाला नव्हता.
कदमांनी जमदाडे यांना सांगितलं की, ’दोघी एकमेकींना मिळालेल्या आहेत. दोघीजणी काहीही खरं सांगत नाहीयेत. दोघींची पोलिस कोठडी वाढवून घ्या…’ त्यावर जमदाडे त्रासून म्हणाले की, ’या आधी या दोघींना पोलीस कोठडी मिळूनही काहीच निष्पन्न झालं नाही. मग कोर्ट कशाच्या आधारे आता या दोघींची पोलिस कोठडी वाढवून देईल?.. उगाच काहीही सांगू नका.’ साहेबांना असं चिडलेलं पाहून कदमांनी तेथून पळ काढला.
काही वेळ शांतपणं विचार करून जमदाडेंनी ठरवलं की, आता आपल्याला कर्तव्याला प्राधान्य दिलं पाहिजे. त्याशिवाय आता काहीही पर्याय नाही. त्यांनी शांतपणं तपासाची पूर्ण कागदपत्रं वाचली. त्यानंतर ते तडक घटनास्थळी म्हणजे शर्मा यांच्या घरी निघाले. जमदाडेंनी संपूर्ण घर आणि घराचा आसपासचा परिसर चेक केला. मिस्टर आणि मिसेस शर्मा, मुलगा आणि मुलीकडे चौकशी केली. ज्या दिवशी चोरी झाली त्या दिवशी दोघी कामवाल्या बायांच्या व्यतिरीक्त एकचजण घरी आली होती. ती व्यक्ती म्हणजे मिसेस शर्मा यांचा भाऊ बद्रीप्रसाद दुबे. चोरी झाली त्या दिवशी सकाळी दहा वाजता दुबे घरी आला होता आणि अर्ध्या तासात म्हणजे साडेदहाच्या सुमारास तो निघूनही गेला होता.
मिस्टर शर्मा यांनी या दुबेला जवळचा नातेवाईक म्हणून दुकानात कामाला ठेवलं होतं. परंतु त्याला जुगाराचा नाद असल्यानं तो कर्जबाजारी होता. एकदा तर दुकानासाठी माल खरेदीकरता दिलेले पैसे दुबेनं जुगारात गमावले होते. हे जेव्हा शर्मांना समजलं तेव्हा दुबेला त्यांनी कामावरून काढून टाकलं. या प्रसंगानंतर शर्मा घरी असताना दुबे कधीही त्यांच्या घरी जायचा नाही. ही माहिती जमदाडे यांना समजली तेव्हा या दुबेकडे संशयाची सुई वळली. चोरी झाली त्या दिवशी दुबे तुमच्या घरी कशाला आला होता, असा प्रश्न त्यांनी मिसेस शर्मा यांना विचारला. तेव्हा त्यांनी सांगितलं की, ’जुगाराच्या व्यसनामुळे त्याच्यावर कर्ज झालं होतं. अनेकांचे पैसे त्याला द्यायचे असल्यानं त्यानं माझ्याकडे ५० हजार रुपयांची मागणी केली. परंतु मी त्यांना स्पष्ट शब्दात नाही असं सांगितलं आणि घरातून निघून जायला सांगितलं.’ मिसेस शर्मांनी दिलेल्या माहितीनंतर जमदाडेंनी ’डीबी स्कॉड’मधील दोघा कर्मचार्यांना दुबेला शोधून काढून त्याला पोलीस ठाण्यात आणण्यास सांगितलं.
चोरीच्या दिवशी आणखी काय काय घडलं… त्या दिवशीचा आणखी काही पुरावा मिळतो का हे पाहण्यासाठी जमदाडे यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक करायला घेतले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आलं की ज्या दिवशी शर्मांच्या घरी चोरी झाली त्या दिवशी सकाळी दूध आणि पेपरवाला सकाळी आठ वाजता येऊन गेले होते. मात्र हे दोघेही घरात आले नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर संशय घेऊन काहीच उपयोग नव्हता. शर्मांच्या घरातून सोन्याची चेन, अंगठी आणि मंगळसूत्र हा सर्व ऐवज मिसेस शर्मांनी हे दोघे येऊन गेल्यानंतर
म्हणजे सकाळी नऊ वाजता हॉलमध्ये असलेल्या टेबलावर काढून ठेवला होता. त्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता लादीपोछा करणारी विमला शिंदे घरात येताना सीसीटीव्हीमध्ये दिसली. त्यानंतर दहाच मिनिटांनी स्वयंपाकीणबाई शारदा माळी आलेली दिसत आहे. या दोघींनंतर सकाळी १० वाजता बद्रीप्रसाद दुबे शर्मांच्या घरी आला आणि अर्ध्या तासातच म्हणजे साडेदहाच्या सुमारास तो बाहेर देखील पडलेला दिसत आहे. त्यानंतर सकाळी ११.२० वा. विमला शिंदे गेली आणि ११.४० वा. शारदा माळी देखील गेली. या दोघीजणी बाहेर पडल्या तेव्हा त्यांच्या हातात काहीही सामान दिसलं नाही. अर्थात सोन्याचे दागिने चोरीला गेले असल्यानं ते अंगावर लपवून नेणंही सहज शक्य असल्याचा कयास जमदाडे यांनी लावला. मग नेमकी चोरी केली कुणी? असा प्रश्न जमदाडे यांना पडला… आता त्यांच्या संशयितांच्या यादीत दुबे आणि दोन्ही कामवाल्या बायकांबरोबरच मिसेस शर्मा, त्यांचा मुलगा आणि मुलगी हेदेखील आले होते. मात्र या चौघांची चौकशी काळजीपूर्वक करायला लागणार, याचा अंदाज एव्हाना जमदाडे यांना आला होता. कारण शर्मा फॅमिलीचे डीसीपी सरांशी असलेले घरगुती संबंध… त्यामुळे यांना पुराव्याशिवाय ताब्यात घेऊन चालणार नव्हतं. या चौघांवर पाळत ठेवून त्यातून काही हाती आलं तरच आपल्याला पुढे जाता येईल, हे जमदाडे यांना समजलं होतं. त्यामुळे त्यांनी ’डीबी’ पथकातल्या एका हुशार कर्मचार्याला दोन्ही मुलांची गोपनीय माहिती काढायला सांगितली.
शर्मांचं घर, तिथले सीसीटीव्ही कॅमेरे आणि घरातील सदस्यांकडे चौकशी केल्यानंतर जमदाडे परत यायला निघाले. त्यावेळी त्यांच्या डोक्यात ही केस आणि त्याच्या तपासाची चक्र फिरू लागली होती. शर्मा कुटुंबातल्या सर्वांनीच घरात काम करणार्या दोन्ही कामवाल्यांवर संशय घेतला होता. मिसेस शर्मांचा भाऊ दुबे हा देखील चोरी करू शकत होता, परंतु शर्मांनी त्यांचं नाव घेतलं नव्हतं. मिसेस शर्मांच्या माहेरची बदनामी होऊ नये म्हणूनही त्यांचं नाव घेतलं नसावं. दुबे कर्जबाजारी होता आणि यापूर्वी देखील त्यानं पैशांची चोरी केलेली होती, याकडे जमदाडे याचं सतत लक्ष जात होतं.
दुसरीकडे शर्मांच्या घरी या दोन्ही बायका दोन वर्षांपासून काम करत होत्या. दोघीजणी गुन्हेगारांच्या वास्तव्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या रामवाडी झोपडपट्टीत राहतात असल्यानं चोरी झाल्यानंतर संशयाची सुई त्यांच्यावरच जाणं स्वाभाविक होतं. दोघींपैकी एकीनं अथवा दोघींनी मिळून चोरी केली असण्याची शक्यताही दाट होती. या सर्व शक्यता जमदाडे यांच्या डोक्यात होत्या. त्यानंतर त्यांनी पुढे जाऊन विचार केला की चोरी कोणी केली याच्यापेक्षा कुणाला चोरी करण्याची गरज जास्त होती हे शोधलं पाहिजे. इतर केसमध्ये ज्याप्रमाणे चोरीच्या पद्धतीवरून चोर शोधावा लागतो तो निकष इथे वापरता येणार नव्हता. कारण यापैकी कुणीही सराईत गुन्हेगार नाही हे तर स्पष्ट कळत आहे. मग चोरी का झाली? अशी कोणती गरज होती की एवढा मोठा धोका पत्करला?.. या चोरीचा तपास पारंपरिक पद्धतीनं न करता मनोविश्लेषण पद्धतीनं करावा लागेल, ही गोष्ट जमदाडेंच्या लक्षात आली होती. थर्ड डिग्रीचा वापर करून उपयोग होणार नाही, हे कळले होते. कसे करायचे हे काही ठरले नाही पण आपल्याला चोर मिळेल, याची पक्की खात्री झाली होती.
आपल्याला फॅमिली प्रोग्रामला जायचं होतं, हे आता खुद्द जमदाडे विसरूनही गेले होते. या केसमध्ये ते पूर्णपणं गुंतून गेले होते. केसमधील प्रत्येक संशयिताचा वेगवेगळा तपास करायचा असं त्यांनी ठरवलं. शर्मा यांच्या दोन्ही मुलांची माहिती काढायला नेमलेल्या कर्मचार्याला जमदाडे यांनी बोलावून घेतलं. कॉन्स्टेबलनं दिवसभरात त्यांचा पाठलाग केला. कॉलेजमध्ये माहिती घेतली. शर्मा यांच्या मुलीचं लग्न ठरलं होतं. ती अनेकदा आईला कॉलेजला जात आहे असं सांगून भावी नवर्याला भेटायला जायची. तो मुलगाही चांगल्या घरतला असल्यानं त्याचा चोरीत सहभाग असण्याची शक्यता नव्हती. शर्मा यांच्या कॉलेजवयीन मुलाचा मित्र परिवारही ठीकठाक असल्यानं तो ही असं काही करेल असे वाटत नसल्याची माहिती कॉन्स्टेबलनं जमदाडेंना दिली. त्यामुळे आता जमदाडेंनी तपासाचा रोख दुबेकडे वळवला. दुबेची चौकशी स्वतःच करायचं असं जमदाडे यांनी ठरवलं. दुबे पोलीस ठाण्यात आला तेव्हा जमदाडे त्याचं बारकाईनं निरीक्षण करत होते. त्याच्या चेहर्यावर कोणती भीती, चिंता किंवा अपराधीपणाची भावना दिसत नव्हती. त्याच्या शारीरिक हालचाली देखील एकदम सहज होत्या. त्यावरून एकतर हा सराईत गुन्हेगार आहे किंवा यानं खरोखरच काहीही केलेलं नसणार, असा प्राथमिक अंदाज जमदाडे यांनी बांधला. पण याच्या मुळाशी जायचं असा निर्धार जमदाडे यांनी केला. दुबेचा पूर्वइतिहास पाहता तो गुन्हेगार असण्याची शक्यता अधिक होती. पण, जे दिसते त्याच्या पलीकडे जाऊन सत्य शोधण्यासाठी त्रयस्थ भूमिकेतून तपास करायचा असं ठरवून जमदाडे यांनी चौकशीला सुरुवात केली.
ज्या दिवशी शर्मांच्या घरात चोरी झाली, तेव्हा दुबेनं काय काय केलं असा प्रश्न जमदाडेंनी त्याला विचारला. त्यावर दुबेनं जे काही सांगितलं तसंच सीसीटीव्हीमध्ये ही दिसून आलं होतं. दुबेच्या बोलण्यावरून तो फार हुशार असल्याचं जमदाडेंच्या लक्षात येत होतं. त्याला फार काळजीपूर्वक हाताळावे लागणार आहे हे त्यांना उमगलं होतं. दुबे फार इमोशनल आहे, त्याचं आपल्या बहिणीवर प्रेम आहे. मात्र मेव्हण्याबद्दल त्याला फार प्रेम नाही. शर्मा त्याला कायमच पाण्यात बघत असल्यानं त्यांच्याबद्दल याच्या मनात अढी होती.
जमदाडेंना आपल्यावर संशय असल्याचं दुबेच्या लक्षात आलं होतं. त्यामुळे तो जमदाडेंना थेटच म्हणाला, ’साहेब, चोरीला गेलेले दागिने माझ्या मेव्हण्याचे असते तर, मी कदाचित चोरलेही असते. परंतु माझ्या मोठ्या बहिणीचे ते दागिने आहेत. आईनंतर तिनंच आम्हाला वाढवलंय. तिच्याशी मी असं कधीच वागू शकणार नाही. साहेब, माझ्यावर बरंच कर्ज आहे. मी त्या दिवशी टेबलावर दागिने पाहिले होते. माझी चलबिचल झाली होती, पण लगेच आईचा चेहरा दिसला आणि मी लगेच भानावर आलो… मी दागिने चोरले नाहीत… मी काही केले नाही… माझा भूतकाळ खराब आहे, त्यामुळे सगळ्यांचा संशय माझ्यावरच येणार हे खरे आहे…’असं बोलून तो खिडकीतून हताशपणे बाहेर पाहू लागला.. त्याचे डोळे पाणावले होते… त्याच्या डोळ्यात लाचारी आणि अपराधाची भावना एकत्र दिसत होती. जमदाडे यांनी त्याला विचारले, ’मग दागिने कोणी चोरले असतील? तुला काय वाटते.’ त्यावर दुबे म्हणाला की, ’नक्की सांगू शकत नाही. मी जाईपर्यंत तर दागिने होते एवढेच खात्रीशीरपणे सांगू शकतो.’ त्यावर पुन्हा जमदाडे म्हणाले की, ’त्या दोघींपैकी कोणी चोरले असतील का?’ त्यावर दुबे म्हणाली, ’काही सांगता येत नाही.’ जमदाडे म्हणाले, ’ठीक आहे गरज पडली तर पुन्हा बोलावून घेऊ. मला विचारल्याशिवाय शहर सोडायचं नाही.’ ’ठीक आहे’ असं म्हणून दुबे बाहेर पडला.
तो गेल्यावर जमदाडे त्याची पाठमोरी प्रतिमा पाहत विचार करीत होते की यानं चोरी केली असती तर आपला तपास भरकटवण्यासाठी नक्कीच दोघांपैकी कोणावर तरी आळ घेतला असता. कारण माणूस अपराध करतो त्यावेळी तो प्रत्येक क्षणाला पकडला जाण्याच्या भीतीने सगळ्यांचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करतो. आपण कसे निष्पाप आहोत हे दाखविण्याचा प्रयत्न करतो. दुबे दोषी असता त्याने आपल्याला चोरी करण्याचा मोह झाला होता, हेही सांगितले नसते. जमदाडे यांची खात्री झाली की दुबे निष्पाप आहे.
(क्रमश:- कथेचा उत्तरार्ध १४ मार्चच्या अंकात.)

