• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डॉलरमियांचा जोडीदार

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
February 9, 2026
in खेळियाड
0
डॉलरमियांचा जोडीदार

भारताला १९८७ आणि १९९६च्या विश्वचषकाचं यजमानपद मिळवून देणं आणि देशाच्या क्रिकेट संघटनेला श्रीमंतीचे दिवस दाखवण्यात जगमोहन दालमिया यांच्यासोबत इंदरजितसिंग बिंद्रा यांचा सिंहाचा वाटा होता. प्रक्षेपण उद्योगाचं अर्थकारण जाणणारा हा द्रष्टा प्रशासक नुकताच काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या कारकीर्दीवर दृष्टिक्षेप.

****

१९७०च्या दशकात ‘चॅनेल नाइन’ दूरचित्रवाणी क्रीडा वाहिनीचा मालक कॅरी पॅकरनं ‘वर्ल्ड क्रिकेट सिरिज’ ही रंगीत गणवेशात प्रकाशझोतात सामन्यांची टूम काढली. त्याच्या सामन्यांची ‘पॅकर सर्कस’ म्हणून हेटाळणी करण्यात आली. परंतु कालांतरानं त्याचंच अर्थकारण क्रिकेटजगताला स्वीकारावं लागलं. क्रिकेट सामने प्रक्षेपण आणि विपणनातून खूप पैसा मिळू शकतो, हे गणित पॅकरला पक्कं ठाऊक होतं. भारतीय क्रिकेटमधील इंदरजितसिंग बिंद्रा यांनीही तेच सूत्र जोपासलं. आज आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) तिजोरीच्या चाव्या इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि भारत या तीन देशांच्या (बिग थ्री) हाती आहेत, तर जय शाह रूबाबात ‘आयसीसी’चे कार्याध्यक्षपद सांभाळत आहेत. ही क्रांती काही एका रात्रीत घडलेली नाही. भारतीय क्रिकेटच्या या आर्थिक साम्राज्यनिर्मितीत दोघांचा सिंहाचा वाटा आहे. यापैकी एक म्हणजे ‘डॉलरमिया’ जगमोहन दालमिया (२०१५ मध्ये निधन) आणि दुसरे म्हणजे आयएस बिंद्रा. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचं (बीसीसीआय) अध्यक्षपद भूषवलेले बिंद्रा यांचं नुकतंच निधन झालं. दालमिया आणि बिंद्रा या दोघांच्या प्रयत्नांमुळे १९८७ आणि १९९६च्या विश्वचषकांचं यजमानपद भारताकडे चालून आलं. बिंद्रा हे इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) जनक ललित मोदीच्या पाठीशी राहिले. या लीगद्वारे सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना हा लौकिक भारताला मिळाला आणि तो आजमितीपर्यंत टिकून आहे.

बिंद्रा १९७०च्या दशकाच्या पूर्वार्धात ‘यूपीएससी’ची नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण झाले. मग पतियाळा जिल्ह्याचे उपायुक्त म्हणून ते रुजू झाले. प्रशासन, महसूल, कायदा सुव्यवस्था आणि विकास या त्यांच्या पदाच्या प्रमुख जबाबदार्‍या होत्या. १९७५मध्ये बिंद्रा यांनी क्रिकेट प्रशासन कारकीर्दीला प्रारंभ करताना थेट पंजाब क्रिकेट संघटनेचं उपाध्यक्षपद पटकावलं. मग तीनच वर्षांत ते संघटनेचे अध्यक्ष झाले, जे २३ ऑगस्ट २०१४ या दिवशी त्यांनी राजीनामा देईपर्यंत तीन तपं टिकलं. या कार्यकाळात आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या पूर्वसंध्येला पंजाब क्रिकेट संघटनेकडून बिंद्रा खास मेजवानीचं आयोजन करायचे. त्यामुळेच क्रीडा पत्रकारांशी त्यांचा संवाद व्हायचा आणि दिलखुलास गप्पा व्हायच्या.
एकदिवसीय क्रिकेटच्या विश्वचषक पर्वाला प्रारंभ झाला, तेव्हा सुरुवातीच्या वर्षांत ही स्पर्धा इंग्लंडलाच व्हायची. १९८३मध्ये भारताने अनपेक्षितरीत्या क्रिकेट विश्वचषक जिंकला. एकीकडे हॉकीमध्ये भारताची कामगिरी घसरत असताना क्रिकेटने देशाला नवी ओळख मिळवून दिली. सुनील गावस्कर, कपिल देव हे देशातले क्रिकेट महानायक उदयास आले. त्यावेळी काँग्रेसचे नेते एनकेपी साळवे हे ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष होते. १९८३च्या विश्वचषकाप्रसंगी जादा तिकिटांची त्यांनी केलेली मागणी यजमान इंग्लंडनं फेटाळून लावल्यामुळे संतप्त साळवे यांनी मग षड्यंंत्र रचून १९८७च्या विश्वचषकाचं यजमानपद भारताला मिळवून दिलं. इंग्लंड-ऑस्ट्रेलियाची एकाधिकारशाही संपुष्टात आणण्यासाठी साळवे, दालमिया आणि बिंद्रा या त्रिकुटानं केलेले प्रयत्न महत्त्वाचे ठरले.

१९९३मध्ये इंग्लिश संघ भारतीय दौर्‍यावर येणार होता आणि भारतात प्रक्षेपण करणार्‍या दूरदर्शनची मक्तेदारी मोडित काढण्यासाठी कट शिजला. काँग्रेसचे माधवराव शिंदे त्यावेळी ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष होते, तर बिंद्रा यांनी या वाटाघाटींमध्ये पुढाकार घेतला. दरम्यान ट्रान्स वर्ल्ड इंटरनॅशनलनं भारतीय क्रिकेट प्रक्षेपणविश्वात प्रवेश केला. माधवराव शिंदे यांच्यानंतर १९९३मध्ये बिंद्रा ‘बीसीसीआय’च्या अध्यक्षपदी विराजमान झाले. १९९४मध्ये हिरो चषक स्पर्धेच्या प्रक्षेपणाच्या वेळी दूरदर्शन आणि ‘बीसीसीआय’ यांच्यातील वाद पुन्हा उफाळून आला. अखेर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे दूरदर्शनची एकाधिकारशाही मोडीत निघाली. यावेळी मात्र ट्रान्स वर्ल्डप्रमाणेच ईएसपीएन आणि स्टार स्पोर्ट्स यांनी भारतातील प्रक्षेपणाबाबत उत्सुकता दर्शवली. यात ईएसपीएनला यश मिळालं.

या क्रीडावाहिनीच्या भारतीय प्रक्षेपण बाजारपेठेतील प्रवेशाप्रीत्यर्थ बंगळुरूला जंगी मेजवानीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ललित मोदी यांचं भारतीय क्रिकेटला सर्वप्रथम दर्शन घडलं. ईएसपीएननं भारतातील मार्केटिंगची सूत्रं मोदी एंटरटेन्मेंटकडे सोपवली. अनेक नावाजलेल्या वाहिन्यांच्या मार्केटिंगचा अनुभव गाठीशी असलेल्या मोदी एंटरटेन्मेंटची धुरा त्यावेळी ललित यांचे वडील के. के. मोदी सांभाळत होते.

१९९६पर्यंतच्या बिंद्रा यांच्या कार्यकाळात संघटनेची व्यावसायिकता प्रकर्षानं अधोरेखित झाली. राज्य संघटनांशी संबंध प्रस्थापित करताना संघटनेच्या कारभाराची चौकट बळकट केली. या टप्प्यात १९९६च्या विश्वचषकाचं पाकिस्तान आणि श्रीलंकेसह यशस्वीपणे यजमानपद भूषवलं. यावेळी दालमिया ‘आयसीसी’चे प्रभारी कार्याध्यक्ष होते. त्यामुळे मुख्य प्रायोजक विल्स आणि दूरचित्रवाणी प्रक्षेपण याद्वारे मोठ्या प्रमाणात पैसा उभारला गेला. क्रीडा प्रक्षेपण महसुलानं नव्वदीच्या उत्तरार्धात वार्षिक १० कोटी डॉलर्सचा आकडा ओलांडला. त्यामुळे खेळाडूंचं मानधन आणि पायाभूत सुविधा याकडे लक्ष केंद्रित करता आलं.मोदी यांनी १९९६मध्ये इंटरसिटीफ्रँचायझी मॉडेल (मर्यादित ५० षटकांच्या सामन्यांचे) बिंद्रा यांना सादर केले. बिंद्रा यांनी हा प्रस्ताव दालमिया यांच्याकडे सुपूर्द केला. परंतु स्पर्धेची तयारी पूर्णत्वाकडे येत असताना दालमिया यांनी या स्पर्धेला ‘खो’ घातला. मोदी यांचे कोट्यवधी रुपये वाया गेले. परंतु मोदी हार मानणार्‍यांमधले मुळीच नव्हते. त्यांनी दालमिया यांच्याविरोधात दंड थोपटले. १९९९मध्ये बिंद्रा यांनीच मोदी यांना हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेचं सदस्यत्व मिळवून दिलं. दालमिया-बिंद्रा यांचातील वितुष्ट यावेळी ऐरणीवर होतं. फेब्रुवारी २००१मध्ये ‘बीसीसीआय’चे अध्यक्ष दालमिया यांनी बिंद्रा यांच्यावर दोन वर्षांची बंदी घालून संघटनेच्या बैठकींपासून दूर ठेवण्याचं षडयंत्र रचलं. बिंद्रा यांनी या निर्णयाला मग कायदेशीर आव्हान दिलं.

२००५मध्ये शरद पवार बीसीसीआयचे अध्यक्ष झाले आणि मोदी उपाध्यक्ष. त्यामुळेच २००८ पासून ‘आयपीएल’च्या पर्वाला प्रारंभ झाला. त्याआधी २००६मध्ये १९९६च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दालमिया यांच्यावर ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी पवार यांनी चौकशी समितीसुद्धा नियुक्त केली होती आणि त्यांना ‘बीसीसीआय’च्या तसेच संलग्न संघटनांच्या पदावर राहण्यास मज्जाव करण्यात आला होता. आर्थिक घोटाळ्याचे हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालय आणि मग सर्वोच्च न्यायालयात गाजले. पवार आणि बिंद्रा यांचे संबंध सलोख्याचे होते. त्यामुळेच २०१० ते २०१२ या काळात शरद पवार ‘आयसीसी’चे अध्यक्ष झाले, तेव्हा बिंद्रा यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली.

‘बीसीसीआय’च्या राजकारणातलं हे वादळ पुढेही घोंघावत राहिलं. २०११मध्ये चेन्नईचे उद्योगपती एन. श्रीनिवासन अध्यक्ष झाले. पण बिंद्रा यांनी त्यांच्या नेतृत्वाला कायम विरोध केला. २०१३मध्ये आयपीएल निकाल निश्चिती प्रकरणी श्रीनिवासन यांचा जावई गुरूनाथ मयप्पन दोषी आढळला. त्यावेळी बिंद्रा यांनी श्रीनिवासनसारख्या व्यक्तीला भारतीय क्रिकेटचं प्रतिनिधित्व करणं योग्य नव्हे, अशी जाहीर टीका केली. मग श्रीनिवासन यांच्यामुळे संघटनेला १० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले, हे मांडताना बिंद्रा यांनी त्यांचे वाभाडे काढले. भारतीय क्रिकेट प्रशासनाची आणखी नाचक्की टाळण्यासाठी श्रीनिवासन यांनी राजीनामा द्यावा, यासाठी बिंद्रा यांनी आवाज उठवला. अखेरीस आयपीएल सट्टेबाजी प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे व्हावी, यासाठी मार्च २०१४मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार श्रीनिवासन यांना पद सोडावं लागलं. हा बिंद्रा यांचा नैतिक विजय होता. पुढे काही महिन्यांत बिंद्रा यांनीही आपली प्रशासकीय कारकीर्द स्थगित केली.
बिंद्रा यांच्या कारकीर्दीत पंजाब क्रिकेटच्या दृष्टीनं महत्त्वाची आणखी एक घटना घडली, ती म्हणजे १९९३मध्ये मोहालीत ‘पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम’ बांधण्यात आलं. त्यासाठी २५ कोटी रुपये खर्च झाला आणि तीन वर्षं लागले. त्याचं २०१५मध्ये ‘आयएस बिंद्रा पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम’ असं नामकरण करण्यात आलं. १९९६च्या विश्वचषकाचा ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिज उपांत्य सामना, २०११च्या विश्वचषकाचा बहुचर्चित भारत-पाकिस्तान उपांत्य सामना आणि २०१६च्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा भारत-ऑस्ट्रेलिया उपांत्यपूर्व सामना या मैदानावर झाला. पण गेल्या काही वर्षांत पंजाबला दुर्लक्षित करण्याचे प्रयत्न सुरू झाले. परिणामी २०२३चा एकदिवसीय आणि आगामी ट्वेंटी-२० विश्वचषकासाठी बिंद्रा स्टेडियमला स्थान देण्यात आलं नाही.

बिंद्रा यांचा वारसा चालवू शकेल, असा खंदा प्रशासकही पंजाबमध्ये उदयास आला नाही. याचप्रमाणे ३८ हजार प्रेक्षकक्षमतेचं महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम म्हणजेच न्यू पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियमची निर्मिती झाल्यामुळे बिंद्रा स्टेडियमचं महत्त्व आपसूकच कमी झालं. पण इंदरजितसिंग बिंद्रा हे नाव भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अजरामर राहील.

Previous Post

एका कर्मयोग्याची शोकांतिका! नाटक : हिमालयाची सावली

Next Post

पंडित नेहरुंना मंटोंचे पत्र!

Next Post
पंडित नेहरुंना मंटोंचे पत्र!

पंडित नेहरुंना मंटोंचे पत्र!

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.