
(अध्वर्यू अर्थात अर्ध्याला बस स्टॉपवर भेटलेली इंग्लिशची मॅडम चक्क हॉटेलात घेऊन गेली. तिने छान छान पदार्थ मागवले. आपल्या प्लेटमधला पनीर क्रिस्पीचा तुकडा त्याच्यासमोर धरला… पुढे काय झालं… आधीचा लेख वाचण्यासाठी डेट इथं क्लिक करा)
‘अहो घ्या नं! एव्हढा काय भाव खाताय!’ मॅडमच्या आग्रहाने अर्ध्याची तंद्री भंगली. त्याने गुपचूप पनीर क्रिस्पीचा तुकडा मॅडमनं समोर धरलेल्या काटेरी चमच्यावरून अलगद दोन बोटांनी पकडत उचलला नि तोंडात टाकला. आणि दाताने त्याचा चावा घेताच ताव धरलेल्या पनीरचा त्याच्या जिभेला चटका बसला.
‘आँऽऽऽ! ‘ अर्ध्याने किंचाळत तोंड वेंगाडलं! घास गिळावा की थुंकावा हेच त्याला उमगत नव्हतं.
‘अय्याऽऽऽ गरम होतं का? वेटर पाऽणीऽऽऽ!’ मॅडमने चटकन पाण्यासाठी आवाज दिला. वेटरने तशा पाण्याच्या दोन चिल्ड बॉटल्स घेऊन टेबलवर आणून ठेवल्या. घाईत अर्ध्याने नजरेसमोर आलेली चिल्ड पाणी बॉटल तोंडाला लावून घटाघटा पाणी प्यायलं. आता जरा त्याला हायसं वाटलं.
‘फार चटकलं का हो?’ मॅडमने अतीव काळजीने विचारलं.
‘नाही, काही नाही!’ अर्ध्याने अगदी सहज प्रश्न उडवला. ‘तुम्ही घ्या ना!’ तिच्या प्लेटमधलं शिल्लक पनीर बघून अर्ध्याने आग्रह केला. आता मागवलं आहे तर पैसे तर मोजावे लागतील ना? मग खाऊनच संपवलं तर बरं!
‘तुम्ही कुठं निघालात आज?’ अर्ध्याने पनीरकडं बघून तोंडाला पाणी सुटायला अन् हसू व्हायला नको म्हणून मुद्दाम विषय बदलला.
‘कॉलेजातून दोन दिवस सुट्टी घेतलीय मी! आणि लागून रविवार आलाय. मग तीन दिवस घरी, माझ्या गावी… ‘ तिने पनीरचा तुकडा पाडला.
‘आमच्या गावात करमत नाही वाटतं?’ अर्ध्याने उगाच बालिशपणा केला.
‘न करमायला काय झालं? करमतं की! पण एवढ्यात बरेच दिवस झालेत घरी गेले नाही मी! मग जाऊन येते.’ ती पनीरचा तुकडा चघळत सहज बोलली.
‘काय स्थळ बघायचं चालुय का?’ अर्ध्याने लाईन क्रॉस केली.
‘घरी जायचं म्हणजे फक्त लग्नाचं स्थळ बघायचं असेल असं कश्यावरून? काहीही! उलट मी घरी सांगून ठेवलंय, एखादं स्थळ सांगून आलं तर आधी मुलाचा फोटो पाठवा. बरा वाटला तर मी त्याला भेटून माझ्या अटी सांगणार! त्याला पटल्या तरच पुढलं बोलणं करायचं, हे मान्य नसेल तर मी लग्न करायला तयार नाही. असा अर्थ काढून मोकळं व्हा!’ ती हेही सहज बोलून गेली. अर्ध्या आँ वासून ऐकत राहिला. एवढं कुठल्याही घरात बोलायचं म्हणजे निव्वळ धाडस पाहिजे. सोप्पंय का ते?
‘एवढी हिंमत माझी झाली नाही कधी! घरी असलं काही बोलायची! माझे पपा सरळ घरातून हकालतील मला. ममा तर तोंड रंगवेल माझं!’ अर्ध्याने घरची परिस्थिती सांगितली.
‘माझ्याही घरच्यांनी शांतपणे थोडंच ऐकून घेतलं का? त्यांनीही खळखळ केली. अगदी मुलीच्या जातीनं कसं बोलावं, वागावं? इथपासून ते आदर्श बाईचे गुण कुठले ते सांगायचा प्रयत्न केला. पण मी सरळ सांगितलं. पोर वाईट वळणाची निघाली, असं म्हंटलात तरी चालेल. पण मी माझ्या शब्दावर ठाम आहे. मग हळुहळू कळत गेलं त्यांना, मी बोलते फटकन, पण चुकीच्या गोष्टी करत नाही. मग झाले आपोआप शांत!’ मॅडम अगदी थंडपणे पनीर संपवत बोलली. ही संपवते किती सहज आणि पटकन? तो बघत राहिला. तिच्या कानामागे असलेली बट पुनः पुन्हा चेहर्यावर धावतेय नि ती तितक्याच शांतपणे तिला कानामागे सरकवते आहे. त्याला हळूच पुढं सरकून ती बट सावरावीशी वाटली. पण एक क्षण. पुढल्या क्षणी घरच्यांना सुनावणारी कडकलक्ष्मी त्याच्या डोळ्यापुढे तरळली.
तोच वेटर आला. दोन प्लेट मांडल्या. आधीच्या प्लेट घेऊन गेला. पटकन पुन्हा आला नि आणलेली शेवभाजी वाढून, रोट्या वगैरे ठेऊन निघून गेला. पण बराच वेळ दोघं शांत आहेत. काय बोलावं हे न उमजून अर्ध्या आणि त्याच्या काहीतरी शंका असाव्यात नि तो बोलेल, विचारेल ह्या अपेक्षेने मॅडम. पण अर्ध्याचं धाडस होणार कसं? मुळात कुणाही सुंदर तिर्हाईत मुलीशी तो इतकं कधी बोलल्याचं त्याला आठवत नाही. जेवणाच्या ताटावर? एकाही नाही!
‘मग तुम्ही कुठं चालला होतात?’ आता एक घास रोटीचा घेत मॅडमने विषय काढला. असं कितीवेळ शांत राहणार ना? ह्या टेबलवर आहेत दोघेच! त्यात ही शांतता!
‘मी? हे…. माझ्याबरोबरचा भैरव आहे. त्यानं लव्ह मॅरेज केलं. त्याच्या रिसेप्शनला निघालो होतो,’ अर्ध्याने थोडक्यात संपवलं. तसंही सांगण्यासारखं त्याच्याकडे आहेच काय?
‘अरे अजून तुमचंही लग्नं झालं नाहीय ना? मग तुमचं काय प्लॅनिंग आहे लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज?’ आता ती त्याची खेचते.
‘दगडं! काय डोंबलं प्लॅनिंग करणार? मॅट्रिमोनी साईटवर बायोडाटात काँट्रॅक्ट बेसिसवर नोकरी एवढं वाचूनच मुली तोंड बघायची तसदी घेत नाहीत. आजवर सतराशे साठ नकार आले असतील. त्यावरून रोज घरात खडखड होते. त्यात लव्ह मॅरेज फार लांबची गोष्ट!’ एकाएकी अर्ध्या घडाघडा बोलून मोकळा झाला. मागाहून त्याला पश्चाताप झाला. खरंच इतकं खरं बोलायची गरज होती? पटकन एक रोटीचा तुकडा तोडून त्याने शेवभाजी तोंडात भरली. बोळा नाही, तर किमान घास कोंबलेला वाईट नाही म्हणून!
‘तुम्ही हँडसम दिसता की! पण अजूनही काँट्रॅक्ट बेसिसवर आहात का?’ तिच्या प्रश्नावर त्याच्या काळजात चर्रर्रर्र झालं. काय साली जिंदगी आहे? मुलगी काँट्रॅक्ट बेसिसची नोकरी ऐकून हळवी झाली. जसं कटोरा घेऊन बसलेल्या फाटक्या भिकार्यावर मेहेरबान होत कुणी चाराणे वाडग्यात भिरकावे तसं ही काही रोटीचा तुकडा उगी उगी म्हणत भरवणार नाही ना? अर्ध्या भ्यायला. धास्तावला. त्याला एकदम बेकार वाटलं!
‘हो अजूनही! इथं दिसण्यावर कोण भाळतं? इथं जिंदगीच रुपड्याच्या चाकावर भिरभिरत पळते. ते नसलं तर जिंदगी लंगडी! आणि लंगड्याला केवळ सहानुभूती मिळू शकते.’ अर्ध्याने पुन्हा रोटीचा तुकडा घश्यात कोंबला. त्यालाच प्रश्न पडला, आज कुठला साहित्यिक मच्छर आपल्याला चावला-बिवला की काय म्हणून.
थोडावेळ दोघंही शांत जेवले. तोच वेटरनं पुन्हा कसलीशी भाजी आणून दिली. वाढली नि निघून गेला.
‘तुम्हाला बरं माहीत? इथं जेवण बरं मिळतं म्हणून?’ अर्ध्याने शांतता मोडली.
‘मागे इंग्लिशच्या मॅडम आणि मी आले होते इथं. एकदोनदा! तेव्हा कळलं! तसंही मला टेस्ट नाही आवडली तर मी जात नाही कुठं दुसर्यांदा!’ मॅडमने इतिहास ऐकवला. अर्ध्या मात्र स्वतःशी बोलला, जिथं खिश्याला चटका तिथं मी जात नाही.
‘मी एकदा आलो होतो, मित्रांबरोबर! पण एकदाच!’ अर्ध्याने विषय उगाच लांबवला. दुसरं बोलणार काय ना? मुलींशी कुठल्या विषयावर बोललं पाहिजे? कसं बोललं पाहिजे? याचे खरेतर क्लास लावले पाहिजे, असं अर्ध्याला वाटून गेलं.
‘अय्या तुम्हाला मित्र आहेत?’ ती एकदम खळखळून हसली. यात खरंच हसण्यासारखं काय आहे? त्याला प्रश्न पडला. पण ती हसताना आणखी कमाल दिसतेय. हे बघण्याची संधी त्याने साधली. पुनः पुन्हा थोडीच ती समोर बसून हसणार आहे का?
‘सध्यातरी मित्रच आहे!’ अर्ध्याने वेळ मारून नेली.
‘आणि मैत्रिणी?’ मॅडमने अर्ध्याला पेचात टाकलं.
‘तुम्ही स्वतःला मानून घेतलं तर एक आहे.’ अर्ध्याने गुगलीवर मॅडमची शांतपणे विकेट काढली.
‘डन. फ्रेंडस !’ मॅडमने त्याच्या हातात हात मिळवला. किती मऊ हात आहे ना तिचा? ती त्याचा हात हलवत हसली. पण तो त्या स्पर्शानेच गारद झाला. स्पर्श! तिने त्याचा हात सोडून पुन्हा खाण्यावर लक्ष वळवलं. त्याचं मात्र लक्षच हातावर एकवटलं.
तितक्यात खेळण्यातली बादली भरून वरण आणि शिगलून प्लेट भरून भात घेऊन वेटर आला. दोघांना समसमान वाढून त्यावर वरण ओतून निघून गेला.
‘तुम्हाला मुलगा कसा हवाय? म्हणजे अपेक्षा…’ अर्ध्याने तिच्याकडे आणि स्वतःच्या हाताकडे बघता बघता एकाएकी विचारून टाकलं.
‘तुमच्यासारखा क्यूट…!’ भात कालवत तिने पुन्हा हसून उत्तर दिलं आणि अर्ध्याची विकेट पडली. पण खरंच ती क्युट म्हणाली ना? की साधर्म्यसूचक कुठला मराठी शब्द उच्चारला तिनं? तो गोंधळला नि गपगुमान भाताचं केलेलं गरगुट घश्यात भरलं.
दोघांचं खाऊन झालं. ती बेसिनमध्ये हात धुऊन काउंटरवर गेली.
‘ओ मॅडम! राहू द्या मी भरतो बिल!’ अर्ध्या घाईने तिच्या दिशेने जात बोलला.
‘अध्वर्यू! श्रृतिका म्हणा! मॅडम काय म्हणता? आणि तसंही बिल तुम्हालाच द्यावं लागेल. मी तुमच्या गावात पाव्हणी आहे ना? माझ्या गावात तुम्ही आल्यावर बिल मी भरेन,’ श्रृतिका अगदी लाडानं बडीशेप-खडीसाखर हातावर घेत बोलली नि बाहेर पडली.
अर्ध्या मात्र भीत भीत काउंटरवर गेला, हातात पडलेल्या बिलावर त्याने खिसा रिकामा केला. बाहेर मोरासारखी थुईथुई नाचत काहीबाही बोलत ती उभी दिसतेय. तिच्याकडं बघत मृगजळाच्या मागे धावावं तसा तो रिता होऊन बाहेर पडला. तिच्या मागोमाग स्टँडवर आला. बडबड करत ती बसमध्ये बसून निघून गेली. अर्ध्या हात हलवत उभा राहिला.
‘पहले भी मैं तुमसे मिला हूँ…’ त्याच्या मोबाईलची रिंगटोन वाजली. तसा तो भानावर आला. हा मंतरलेला अर्धा तास संपला? काय उरलं रिकामा खिसा? की काही कुरवाळत ठेवण्यासारखे आठव… त्याला काही उमजत नव्हतं. ती पुन्हा येईल? श्रृतिका? आपल्याला पटेल? प्रपोझ केल्यावर हो म्हणेल? असंख्य प्रश्नाचं एकाएकी काहूर उठलं. आता भैरवच्या रिसेप्शनला जायचं बोंबललं? एक मन त्याला धारेवर धरत होतं. दुसरं अजूनही हाताचा तो मऊ स्पर्श आठवत अंगभर पिसं फिरवत मोहरवत ठेवत होतं… अर्ध्या कित्येक तास उभा न् उभा!

