• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

डेट

ऋषिराज शेलार (अर्ध्या मुर्ध्या गोष्टी

marmik by marmik
February 20, 2026
in इतर
0
डेट

अर्ध्या आज स्टँडवर आला. आला म्हणजे त्याला रिसेप्शनचं आमंत्रण आलेलं. भैरवनं लव्ह मॅरेज केलेलं. म्हणजे आधी कोर्टात जाऊन रजिस्टर केलं, घरच्यांना न सांगता. आता घरचे नाही लग्नं, तं किमान रिसेप्शन घालून आलेल्या (आणलेल्या) सुनेचं स्वागत करताय. सालं, हे बरं रहातं. आधी विरोध करायचा, जातीत करू म्हणायचं. पण सगळं अवघड वाटल्यावर आणि चुकून पोरांनी असलं काही केल्यावर उसनं अवसान आणून कार्यक्रम करायचे. हे फॅडच सुरू झालेत. तर त्या रिसेप्शनचं आमंत्रण अर्ध्याला फोनवर मिळालं. दुसरं मिळणार कसं म्हणा? त्याचा बाप-चुलता-भाऊ महिनाभर आधी येऊन थोडी बोलणार? आमच्या पोरानं पोर पळवून आणायची ठरवलीय, तुम्ही महिन्यानं रिसेप्शनला या ब्वॉ!
अर्ध्यानं सकाळीच उठून संतूर अंगाला फासून अंघुळ केलेली. वर जरासं बरं दिसणारं ढवळं शर्ट, काळी पॅन्ट अंगात कोंबलेलं. त्याला नम्यानं कुठलं परफ्यूम दिलेलं ते त्यानं वर फवारलेलं. पण कुठलं परफ्युम अंगावर मारायचं र्‍हातं नं कुठलं कपड्यावर मारायचं र्‍हातं यात त्याला काही उमजत नाही. तोंडाला पावडर गरगटली. मग ध्यान आलेलं, एक क्रीम पण आणेल आहे म्हणून. पण आता पावडरवर थोडीच लावणार का? तयार बियार होऊन अर्ध्या पायीच स्टँडपर्यंत आलेला.
इथून जायचं तीस-चाळीस किलोमीटर. जायला बस बरी! म्हणजे खिश्याला! त्यानं पाकीट काढलं. खिशात एक पाचशेची नोट, एक शंभरची, एक पन्नासची. बाकी वीसच्या नोटा आणि चिल्लर थोडी फार! होईल ना? होईल कदाचित! फक्त एखादा लोचट मित्र भेटू नये. नाहीतर दोनशे-तीनशेचा चुराडा करायचा. त्यानं नोटा पाकीटमधी नीट ठेवल्या. आणि पाकीट खिश्यात.
‘अध्वर्यू, बस गेली का हो?’
का हो?… एवढं मान देऊन कोण बोललं?
त्यात हा नाजूक आवाज… अर्ध्याने मान वळवली.
अरे, ही… ती… मागल्या आळीतल्या यादवच्या पोराची मॅडम! पोरगं बारावीला आहे. ही मॅडम बायोलॉजीला! तिला मागं ट्युशनसाठी चौकात जागा शोधून दिली होती. तीच ती! आज साडीत दिसतेय. दिसतेय म्हणजे..! त्यानं झटकन नजर वळवली. नजर वळवली खरी पण डोळ्यासमोरून मोकळे केस सोडलेली तिची मूर्ती हलेल कशी?
‘नाही अजून! म्हणजे बघितलं नाही. पण नसल गेली कदाचित…’ अर्ध्या गडबडतो. तसंही त्याचं बरोबरच आहे की! त्यानं खिश्याच्या चिंतेत पाहिलं कधी?
‘काय मग पार्टीसाठी पैसे मोजत होतात का?’ त्या मॅडमनं विचारलं. हिने बघितलं केव्हा? तो चक्रावतो.
‘तुम्ही काय खावं आमच्या गरीबाकडून?’ अर्ध्या बोलून तर गेला, पण खिश्यातली दौलत आठवली.
‘असू द्या! तुम्हाला म्हंटलं तर तुम्ही काय न्यावं? ही उगाच बस यायची वेळ झाली म्हणून… थांबा. मी विचारून बघते जरा.’ अचानक घड्याळ बघत तिला काहीतरी आठवलं. ती आत कदाचित टाइमटेबल बघायला गेली. तिला जाताना बघून अर्ध्याने मागून नजर वर केली. नजरेला नजर द्यायचं धैर्य त्याला आहे कुठं? त्याच्यात ही मॅडम पाहिली तेव्हापासून मनात भरलीय. पण सांगायचं कसं? आणि कधी? आधीच नोकरी काँट्रॅक्ट बेसिसवर. खिश्यात दमड्या नाही. आणि इतक्या सुंदर, वेल सेटल्ड मुलीला प्रपोझ करायला जावं? हिंमत करायची कशी? केली तरी शिव्या आणि मार पडायचे चान्स जास्ती! मग कुणी सांगितली मगजमारी?
‘हॅलो! लक्ष कुठंय तुमचं? माझी बस अर्धा तास उशिरा आहे! येता का? जरा नाष्टा करू?’ ती मॅडम अगदी डोळ्यापुढं उभं राहून भडाभडा बोलली बी! अरे, ही तर आत गेली होती ना? आली कधी? तो अवाक् होऊन पाहात होता.
‘मला काय नाही तसं! मला दर अर्ध्या तासाला पाठोपाठ तीन बस आहेत. एक हुकली तर दोनचे ऑप्शन आहेच.’ त्याने होकार भरला खरा! पण ही डिनर डेट? का लंच डेट? काय म्हणत काय असतील शहरात याला? मरो! ह्या होकारानं अर्ध्याला रोमांच उठण्याऐवजी धास्ती जास्त भरली. कारण अर्थात खिसा! एक पाचशेची नोट जास्ती असती तर कदाचित मोकळ्या मनानं जाता आलं असतं. पण आता बोलून झालंय की!
‘चला मग! इथं जगदंबाला चव भारी आहे!’
हिला बरं माहिती? अर्ध्याने घाम पुसला! ‘हे जगदंबे! वाचव गं!.. लेकराचा खिसा!’ दुसरी काय प्रार्थना मनात येणार ह्या वेळी? एवढी सुंदर मॅडम चला म्हणतेय! तेही पहिल्यांदा! तिला नाही कसं बोलणार? अर्ध्या तिच्यासोबत चालू पडला. ‘माझ्या गावात या! तिथं एक हॉटेल आहे. चव, सर्व्हिस सगळं भारी. इथं तुमच्या गावात त्यातल्या त्यात हेच बरंय, चवीला वगैरे!’ ती बोलतेच आहे. बघता बघता तिने अर्ध्याच्या गावाची इज्जत काढली. पण अर्ध्याचं लक्ष गुंतलं कुठंय? हे तिच्या कानातलं. डुलणारं. नजर ह्या उजळ चेहर्‍यावर पडण्याआधी तिच्या कानात असलेल्या ह्या दागिन्यावर पडतेय? काय म्हणतात याला?
‘ओ, पुढं बघा ना? पडाल बद्कन.’ तिच्या बोलण्यासरशी अर्ध्या भानावर आला. पुढं रस्त्यात उघडं असलेलं मॅनहोल चुकवून ते दोघं हॉटेलात गेले. पलीकडल्या जराश्या निवांत बाकड्यावर जाऊन दोघं बसले. मॅडम त्याच्या पुढ्यात समोर, अर्ध्या इकडून! दाराकडे पाठ करून! नको एखाद्यानं बघायला! उद्या परत अख्ख्या गावात बोंब! ‘अर्ध्या मॅडमचं लफडंय!’ त्याने ते वाक्य कोपर्‍यावरल्या पोराच्या टोनमध्ये इमॅजिन केलं. नकोच तेच्यायला!
‘काय घेऊयात?’ मॅडम अत्यंत लाघवीपणे विचारताय. काय गोडवा आहे, हिच्या आवाजात? नको डायबिटीस व्हायला!
‘मागवा तुम्हाला काय हवं ते!’ अर्ध्यानं बोलताना जगदंबा, तिचा चेहरा आणि पाकीटमधल्या नोटा एकगठ्ठी  आठवल्या. आता काय व्हायचं ते होवो! बघूच! मनाशी बोलत तो विषयांतर म्हणून मॅडमचा चेहरा न्याहाळत बसला. मॅडमने हातात मेन्यूकार्ड घेतलं, बघू लागली. अर्ध्याला त्यात एकदोन आयटम सोडले तर बाकी काही माहीत नाही. म्हणजे शेवभाजी, जिरा राईस, खाल्लंच तर काय मिक्स भाजी का काय असतं ते! आणि एकदा नम्यानं त्या खेळण्यातल्या बादलीतून वरण घेतलं होतं, ते आठवतं! घ्यायला माणूस काही घेईल. पण खिश्याच्या जिवाला बरं नको? इथं एक मेन्यू पाचशेची नोट खाऊन बसला तर कसं व्हायचं? इथं आठवड्याचा बाजार आई-बाप दोनशे-तीनशेत करत्याय. त्याच्यात बाजारातून आज बी उलीसाक भत्ता आणला तर दिवाळीच्या फराळागत अख्खं घर आळं करून खायला बसतं!
‘मग हे सांगू का…?’ ती काहीतरी मेन्यूकार्डवरचे बारीक शब्द दाखवू लागली. त्याला ते अटी शर्ती लागू टाइप लोनच्या कागदावरल्या अक्षरांपेक्षा बारीक दिसलं. सालं हे मुंग्यांसारख्या बारीक अक्षरांवर आधी बॅन आणलं पाहिजे. त्याला त्या अक्षरांची चीड आली.
‘तुम्हाला हवं ते मागवा! मला मात्र मिल्क शेवभाजीच मागवा स्पेशल! दुसरं नको काही!’ अर्ध्यानं पटकन गुळणा सोडला. इथं जर दोन-अडीचशेचाच खर्च झाला तर भैरवच्या रिसेप्शनला जाऊन येता येईल, हे त्यामागचं गणित. मग अर्ध्या नटला कश्यासाठी आहे?
‘भैय्या, स्टार्टर… हे मंगाव, और एक स्पेशल मिल्क शेवभाजी, एक व्हेज कोल्हापुरी. दाल तडका… और… दो चिल्ड पाणी
बॉटल लावो!’ तिने धडाधड ऑर्डर सोडली. ती काय काय बोलली, हे तो डोक्याला ताण देऊन आठवू लागला. तिच्यापुढलं मेन्यूकार्ड ओढून तो त्या त्या आयटमचे भाव शोधू लागला.
‘तुमचं पण लग्न नाही झालं ना हो अजून? तुम्ही एव्हढे हँडसम, रुबाबदार दिसता करून घ्यायचं ना…’ ती मॅडम काही विचारू बघत होती.
मेन्यूकार्ड न्याहाळता न्याहाळता अर्ध्या फटकन बोलून गेला, ‘हा, परवडलं पण पाहिजे ना!’
‘म्हणजे?’ मॅडम त्याच्या उत्तरानं गोंधळात पडली. तसा अर्ध्या भानावर आला. हे काय बोललं गेलं चुक्रून?
‘तुम्ही का केलं नाही? तुम्हाला तर चटकन तालेवार स्थळ सांगून आलं असतं की!’ अर्ध्याने तोच प्रश्न उलटा केला.
‘पपा योग्य स्थळ शोधता आहेत, पण अजून मनाजोगतं स्थळ मिळत नाहीय. आणि हे असं असतं ना..? थोडं क्लिक व्हायला पाहिजे! तसं मला पण कुणी वाटलं नाहीय.’ ती बट सावरत बोलते.
‘माझं उलटंय! इथं काळजाला क्लिक जरी झालं तरी माझ्या काँट्रॅक्ट बेसिसच्या नोकरीला भुलून कुणी हो म्हणेल का? हा प्रश्न आहे!’ अर्ध्याने वातावरण धीर गंभीर करण्याच्या आत स्टार्टर आलं. तिच्या पुढं सर्व्ह केलं जातं. त्याने नको म्हणून टाळलं खरं, पण ते केशरी तुकडे बघून पोटात कालवाकालव झाली. ती एक तुकडा काटेरी चमच्याने तोंडात टाकते.
‘काय मस्तं आहे? गरम गरम आणलंय अगदी! एक तुम्ही घेऊन बघा! व्हेजच आहे. पनीर क्रिस्पी! मस्त लागतं… घ्या ना एक!’ ती मॅडम अगदी आग्रहाने पनीरचा तुकडा तिच्याच हातातील काटेरी चमच्याने त्याच्या तोंडापुढे धरते.
काय रोमँटिक आहे ना? अर्ध्या गडबडला. तिच्याच चमच्याने एक पनीरचा तुकडा खावा का? अर्ध्या विचारात पडला…

(पुढे काय झालं?… ते पुढच्या भागात पाहू…)

Previous Post

फटकारे बाळासाहेबांचे

Next Post

लढले कोण?‘जिंकले’कोण?

Next Post
लढले कोण?‘जिंकले’कोण?

लढले कोण?‘जिंकले’कोण?

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.