
ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा एव्हाना ऐन रंगात आलीय. अनेक जुने आपला प्रभाव अद्याप संपलेला नाही, याची चुणूक दाखवतायत, तर नवे तारे तेजानं लुकलुकतायत. निराळ्या गोलंदाजीच्या शैलीमुळे चर्चेत आलेला पाकिस्तानचा उस्मान तारिक, नामांकित भारतीय क्रिकेटपटूचं वडिलांनी ठेवलेलं नाव सार्थ ठरवणारा कॅनडाचा युवराज सामरा, आयुष्याशी संघर्ष करीत आज नावारूपाला आलेला ‘कालुताराचा अजिंक्यतारा’ श्रीलंकेचा पथुम निसंका आणि पस्तीशीत आयुष्यानं दिलेल्या दुसर्या संधीचं सोनं करणारा अमेरिकेचा अष्टपैलू शॅडली व्हॅन शाल्कविक यांच्या यशोगाथा त्यांच्या कामगिरीइतक्याच रोचक.
उस्मान तारिक : द अनटोल्ड स्टोरी!
भारत-पाकिस्तान यांच्यातील १५ फेब्रुवारीला झालेल्या बहुप्रतिक्षित लढतीहून अधिक लक्षवेधी ठरला, तो उस्मान तारिक. पाकिस्तानचा हा फिरकी गोलंदाज त्याच्या आश्चर्यकारक शैलीमुळे चर्चेचा विषय ठरला. गोलंदाजी करताना चेंडू सोडण्यापूर्वी तो चक्क थांबतो… श्वास घेतो… फलंदाजाचा अंदाज घेतो आणि मगच नेम धरून चेंडू टाकतो. चेंडू टाकताना त्याच्या हाताचं कोपर प्रत्येकदा वेगवेगळ्या अंशांच्या कोनात तो खुबीनं वाकवतो.

तारिकच्या गोलंदाजीच्या शैलीवर २०२४ आणि २०२५ असा दोनदा पाकिस्तान सुपर लीगमध्ये मैदानावरील पंचांनी ठपका ठेवला. पण दोन्ही वेळा त्याची शैली निर्दोष असल्याचा निर्वाळा देण्यात आला. मैदानावरील पंच ‘अन्यायकारक खेळ’ (ळहfaग्r झ्त्aब्) या नियमानुसार कारवाई करू शकतात. यासाठी ते नियम ४१.५चा वापर करू शकतात, जो फलंदाजाला जाणूनबुजून विचलित करणं किंवा फसवणं यासंदर्भात आहे. पण निष्कर्ष असा की, तारिकची गोलंदाजी सध्या तरी ‘आयसीसी’च्या नियमकक्षेत बसत असल्यानं त्याच्यावर कोणताही शिक्का बसलेला नाही. ट्वेंटी-२० विश्वचषकाआधी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत तारिकनं बाद केल्यावर कॅमेरून ग्रीननं त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची नक्कल करीत त्याला हिणवलं; पण नंतर ग्रीननं तारिकची माफीही मागितली.
तारिक हा नौशेरा शहरातला, जे पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात हे. हिंदुस्थानच्या इतिहासात खैबर खिंडीचं फार मोठं महत्त्व आहे. वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानं कुटुंबाचा चरितार्थ हा प्रश्न ऐरणीवर असल्यानं तारिकला क्रिकेटकडे पुरेसं लक्ष देता आलं नाही. पण सुरुवातीच्या काळात तो वेगवान गोलंदाजीही करायचा. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेशामधील अनेक युवकांना आयुष्याला कलाटणी देणारी संयुक्त अरब अमिरातीमधील नोकरी मागील दशकापर्यंत खुणावत होती. तारिकनंही चांगल्या नोकरीसाठी दुबईचा मार्ग पत्करला. २०१५ मध्ये तो दुबईतील एका स्थावर मालमत्ता कंपनीत विक्री समन्वयक म्हणून नोकरीला लागला. सारं सुरळीत चाललं होतं. पण २०१६ मध्ये तारिकनं ‘एमएस धोनी : द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट पाहिला. भारतीय रेल्वेत तिकीट तपासनीस म्हणून नोकरी करणारा धोनी मेहनतीनं भारताचा विश्वविजेता कर्णधार होऊ शकतो, ही यशोगाथा तारिकला भावली. मग त्यानंही पुन्हा क्रिकेटपटू होण्याचा चंग बांधला. दुबई सोडून पुन्हा मायदेशी परतल्यावर एका मित्रानं त्याची ओळख पाकिस्तानचा सलामीवीर फखर झमानशी करून दिली. फखरनं त्याला खैबर पख्तूनख्वा येथे एका स्थानिक प्रशिक्षकाकडे नेलं आणि त्यानंतर पुढील प्रशिक्षणासाठी माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू वजाहतुल्ला वस्तीकडे पाठवलं. त्याच्या संघर्षाचं चीज झालं आणि डिसेंबर २०२३पासून तो पाकिस्तान सुपर लीगमध्ये चमकू लागला. पुढे ऑक्टोबर २०२५मध्ये त्यानं दक्षिण आप्रिâकेविरुद्धच्या मालिकेत आंतरराष्ट्रीय पदार्पण करीत आपलं स्वप्न सत्यात उतरवलं. पाच महिन्यांत ट्वेंटी-२० विश्वचषकात खेळण्याची संधी त्याच्यापुढे चालून आली. सध्या सुपर-८पर्यंत पोहोचणार्या पाकिस्तानकडून सर्वाधिक बळी तारिकच्या खात्यावर आहेत.
युवराज : भाग-२
ट्वेंटी-२० विश्वचषकात कॅनडाचा संघ ओळखला जातो, तो त्यांच्या भारतीय अस्मितेमुळे. या संघातील १५ पैकी ११ क्रिकेटपटू भारतीय वंशाचे आहेत. यापैकीच एक म्हणजे १९ वर्षीय युवराज सामरा. या युवा युवराजानं चेपॉक स्टेडियमवर ६५ चेंडूंत ११ चौकार आणि ६ षटकारांसह ११० धावांची नेत्रदीपक खेळी साकारली. या खेळीनिशी ट्वेंटी-२० विश्वचषकातील एक विश्वविक्रम त्यानं आपल्या नावे केला. तो आहे सर्वात युवा शतकवीराचा. सहयोगी राष्ट्रांकडून पूर्ण सदस्यत्व असलेल्या बड्या राष्ट्रांविरुद्ध शतक नोंदवणाराही तो पहिलाच शतकवीर. म्हणूनच त्याचं अप्रूप.

या युवराजाचा जन्म ब्रँपटन (ओंटारिओ) येथे झाला. भारतातून कॅनडाला स्थलांतर करणारे त्याचे वडील बलजित सिंग यांनी मुलाचं नाव युवराज ठेवलं. कारण या बालकाचा जन्म झाला, तेव्हा भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग भन्नाट फॉर्मात होता. आपल्या मुलानंही मोठेपणी क्रिकेटचं मैदान गाजवावं हीच त्यांची इच्छा. त्यामुळे फक्त मुलाचं नाव युवराज ठेवून समाधान न मानता, क्रिकेटची आवड निर्माण होईल, यासाठी सर्वतोपरी मेहनतही त्यांनी घेतली. योगायोगाने हा युवराजही डावखुरा. बलजित युवराजला लहानपणीपासून स्थानिक सामने पाहायला घेऊन जात. अपेक्षेप्रमाणेच युवराजनं खेळात प्रगती केली आणि टोरंटो जिल्हा क्रिकेट संघटनेचं तो प्रतिनिधित्व करू लागला. पुढे मार्च २०२५मध्ये त्यानं आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. आतापर्यंत ८ एक दिवसीय आणि १९ ट्वेंटी-२० सामने त्याच्या खात्यावर जमा झालेत. गतवर्षी जूनमध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या अमेरिका खंडातील पात्रता स्पर्धेत या पठ्ठ्यानं बहामाजच्या संघाविरुद्ध फक्त १५ चेंडूंत अर्धशतक झळकावून सर्वांचं लक्ष वेधलं होतं. आता यापुढे हा ‘युवराज : भाग-२’ आणखी कोणते पराक्रम करतो, ते पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
कालुताराचा अजिंक्यतारा!
यजमान श्रीलंकेच्या ट्वेंटी-२० विश्वचषकामधील इथवरच्या यशातला महत्त्वाचा शिलेदार म्हणजे सलामीवीर फलंदाज पथुम निसंका. त्याच्या खात्यावर मुबलक धावाही आहेत आणि शतकही. पथुमचं बालपण कालू (काळी) गंगा नदीच्या तीरावरील कालुतारा नगरात अतिशय गरिबीत गेलं. त्याचे वडील सुनील सिल्व्हा कालुतारा हे एस्प्लेनेड स्टेडियमचे मैदान कर्मचारी. सुनील हेच पथुमचे पहिले प्रशिक्षक. त्याची आई कालुतारा मंदिराबाहेर फुलं विकायची. त्सुनामीचा फटका बसलेल्या नागरिकांसाठी श्रीलंकन सरकारनं बांधलेल्या वसाहतीत पथुम लहानाचा मोठा झाला. कालुतारा विद्यालयात पथुमनं शालेय शिक्षण घेतलं, तर कोलंबोच्या इसिपथाना महाविद्यालयात शिकताना त्याला प्रदीप निशांता यांचं मार्गदर्शन लाभलं. शालेय क्रिकेटमध्ये नाबाद द्विशतक झळकावून प्रकाशझोतात आलेला हा पथुम मग मजल दरमजल करीत खेळ उंचावत गेला.

मार्च २०२१पासून तो देशाच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघांचा सलामीवीर फलंदाज म्हणून अविभाज्य भाग आहे. ९ ़फेब्रुवारी २०२४ या दिवशी त्यानं एकदिवसीय क्रिकेटमधील द्विशतक साकारलं. हा पराक्रम करणारा तो पहिला श्रीलंकन क्रिकेटपटू. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या ‘आयपीएल’ लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं चार कोटी रुपयांची बोली लावत त्याला संघात स्थान दिलं. अशा या पथुमला आता क्रिकेटमुळे चांगले दिवस आलेत.
पस्तीशीतली दुसरी संधी स्वप्नपूर्तीची!
ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या गटसाखळीअंती सर्वाधिक बळी शॅडली व्हॅन शाल्कविकच्या खात्यावर होते. ४ सामन्यांत १३ बळी आणि ६.८१ ची इकॉनॉमी राखणारा हा अमेरिकन वेगवान गोलंदाज. यंदाच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच दिवशी वानखेडे स्टेडियमवर भारताचा डाव गडगडला, तो शाल्कविकच्याच भेदक मार्यामुळे. त्यानं इशान किशन, तिलक वर्मा, शिवम दुबे आणि अर्शदीप सिंग अशा चार फलंदाजांना तंबूत धाडलं. सुदैवानं कर्णधार सूर्यकुमार यादवनं भारताला तारलं. विश्वविजेत्यांना आत्मपरीक्षण करायला लावणार्या या शाल्कविकनं पाकिस्तानविरुद्धही २५ धावांत ४ बळी अशी अप्रतिम कामगिरी केली. यावेळी सलीम अयुब, सलमान खान, शादाब खान आणि फहीम अश्रफ हे त्याचे शिकार ठरले. मग नेदरलँड्सविरुद्ध २१ धावांत ३ बळी आणि नामिबियाविरुद्ध ३० धावांत २ बळी त्यानं घेतले.
३७ वर्षांचा अष्टपैलू शाल्कविकला वयाच्या पस्तीशीत असताना अमेरिकेकडून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. हा त्याचा दुसरा ट्वेंटी-२० विश्वचषक. शाल्कविक हा मूळचा दक्षिण आप्रिâकेचा क्रिकेटपटू. शाल्कविक हा वायनबर्ग बॉइज हायस्कूलचा विद्यार्थी. जॅक कॅलिसही याच शाळेचा विद्यार्थी. वेस्ट इंडिजचा महान क्रिकेटपटू ब्रायन लाराला आदर्श मानणार्या शाल्कविकची घरची परिस्थिती बेताचीच होती. क्रिकेट खेळण्यासाठी एकच बुटाची जोड असलेल्या या युवकाला २१व्या वर्षी घरभाडं भरणंही कठीण जायचं. देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करूनही व्यावसायिक करार न मिळाल्यामुळे तो कमालीचा निराश झाला. पण तरीही त्यानं प्रयत्न सोडले नाहीत.

पोटरीला झालेली दुखापत आणि नैराश्यामुळे वयाच्या २८व्या वर्षी शाल्कविकनं क्रिकेटला रामराम ठोकला. मग त्यानं थेट अमेरिका गाठली. पण आयुष्यानं त्याला दुसरी संधी दिली. काही वर्षं स्थिरस्थावर झाल्यानंतर क्रिकेटपासून दुरावा त्याला स्वस्थ बसू देईना. मग पुन्हा त्यानं खेळायला सुरुवात केली. पाहता-पाहता त्याला मेजर लीग क्रिकेटमध्ये नाइट रायडर्स संघाकडून खेळायची संधी मिळाली. ही लीग गाजवल्यामुळे त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न साध्य झालं.
