
□ शक्तिशाली देशांच्या यादीत भारत १२व्या क्रमांकावर, द. कोरिया, इस्रायल, सौदी अरेबिया हे छोटे देशही भारताच्या पुढे.
■ तरी ही यादी आकारमान, लोकसंख्या, अर्थव्यवस्था आणि दरडोई उत्पन्न यांच्या निकषांवर नाही, मग तर आपण १०० बाहेर असलो असतो- आपण किती अशक्त बनलो आहोत, ते ऑपरेशन सिंदूरनंतर रोज अमेरिका ज्या प्रकारे थोबडतो आहे आणि दुसरीकडे चीन कसे लचके तोडतो आहे, त्यातूनच कळून जायला हवं होतं.
□ मद्य, बिर्याणी, भेटवस्तू अगदी संक्रांतीच्या भेटींचीही मतदारांवर लयलूट.
■ या असल्या चिरकुट गोष्टींसाठी किंवा एखाद्या पाकिटासाठी आपलं, आपल्या मुलाबाळांचं भवितव्य पणाला लावणार्या मतदारांमुळेच देशाची वाट लागलेली आहे… उमेदवाराकडून कोणत्याही स्वरूपाची लाच स्वीकारणार्या मतदारांना मतदानबंदी करायला हवी… त्याशिवाय मताचं खरं मोल कळणार नाही.
□ पालघरमध्ये कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलांना गार जमिनीवर ठेवले.
■ सरकारी आरोग्य केंद्रांची अशी अवस्था का आहे, असा जाब या, दोडक्या भावांनी मूर्ख बनवलेल्या लाडक्या बहिणी विचारू शकतील का? सरकारी गणंग त्यांना काय जबाब देतील? म्हणतील, महिन्याला दीड हजार मिळतायत ना! त्यात घ्या की खासगी हॉस्पिटलांमध्ये उपचार!
□ भाजपचे राष्ट्र प्रथम नव्हे, भ्रष्ट प्रथम : उद्धव ठाकरे यांचा घणाघात.
■ धर्माची भूल देऊन ‘राष्ट्र प्रथम’ ताब्यात घ्यायचे आणि मग ‘भ्रष्ट प्रथम’ या मूळ अजेंडाप्रमाणे भ्रष्टांच्या हाती देशाच्या सगळ्या चाव्या द्यायच्या, असा हा देशविघातक उपक्रम आहे. त्याचा दुसरा टप्पा आता जोरात सुरू आहे उद्धव साहेब!
□ भाजपचा स्वीकृत नगरसेवक तुषार आपटे याचा राजीनामा.
■ निर्लज्जपणा कोणत्या टोकाला जातोय ते पाहा. लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या संवेदनशील प्रकरणात या सरकारने आरोपी ठरवलेल्या इसमाला संशयास्पद रीतीने एन्काऊंटर करून मारून टाकले आणि शाळेतलं सीसीटीव्ही फुटेज म्हणजे पुरावा नष्ट करणार्याला सत्ताधारी पायघड्या घालतायत? केवढी ही मस्ती!!
□ मोदींविरोधात बोलणारे डॉ. संग्राम पाटील यांची पोलिसांकडून १४ तास चौकशी.
■ नशीब डॉ. संग्राम पाटील हे ब्रिटिश रहिवासी आहेत. नाहीतर त्यांना अटक करून त्यांच्यावर कोणकोणते गुन्हे लावले गेले असते. मोदींचे चिल्लर चेलेचपाटे रोज नेहरू, गांधी यांच्यासह असंख्य राष्ट्रपुरुषांवर विखारी, अश्लील गरळ ओकत असतात. मोदींच्या धोरणावर संयत टीका करणे हा गुन्हा कधीपासून झाला. या सगळ्यात भारताची कोणती प्रतिमा परदेशांत जाते आहे. तिकडे वसलेल्या भारतीयांना तिकडच्यांनी हाकलल्यावरच आपल्याला अक्कल येणार आहे का?

□ माजी खासदार बृजभूषण सिंग मंचावर तोंडावर आपटले.
■ कुठे राष्ट्रकथा सांगायला गेले होते, तिकडे एखाद्या जागृत दैवताने या विकृताला जागा दाखवून दिलेली दिसते.
□ शिवसेनाप्रमुखांनी भारतीय जनता पक्षाला वाचवलं नसतं, तर त्यांचा केव्हाच राजकीय मृत्यू झाला असता : उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
■ आदरणीय साहेब आज हयात असते, तर त्यांना याचा फार मोठा पश्चात्ताप झाला असता आणि तो त्यांनी अतिशय जळजळीत शब्दांमध्ये व्यक्तही केला असता!
□ जा…नोटाला मतदान करा, आम्ही आमच्या जिवावर निवडून येऊ : विकासकामांचा जाब विचारणार्या मतदारांवर मिंध्या उमेदवाराची मुजोरी.
■ ही मुजोरी सत्तेच्या आणि पैशाच्या बळावर तयार होते. एकदा जनतेने या आमिषांना न भुलता माज उतरवला की येतील जागेवर.
□ विकासकामे केली नाहीत तर राजीनामा देईन : शिवसेनेच्या महिला उमेदवाराने लिहून दिला बाँड.
■ अतिशय कौतुकास्पद पाऊल आहे हे. पण, दर वर्षाला दिलेली वचनं, केलेली कामं यांचा आढावा घ्यायलाच हवा आणि त्याबद्दल मतदारांनी जाब विचारायलाच हवा. राइट टु रिकॉल म्हणजे उमेदवाराला परत बोलावण्याचा अधिकार असता तर गद्दार मिंधे क्षणार्धात घरी बसले असते. लोकशाहीचा खेळखंडोबा झाला नसता.
□ भाजपने परवानगी दिली तर शिंदेंचा टांगा पलटी करेन : गणेश नाईक.
■ काय ही युती आणि काय यांची मती आणि भाषा खाते माती! अरे किती कराल अती? हे सगळे कधी ना कधी एकमेकांच्या उरावर बसतील आणि लोक गोळा होऊन टाळ्या पिटत फक्त तमाशा पाहतील, इतक्या खालच्या थराला आणलं यांनी सगळंच राजकारण!

□ मुंबई हे महाराष्ट्रातलं शहर नाही, आंतरराष्ट्रीय शहर आहे : भाजपनेते अण्णामलाई.
■ राज ठाकरे यांच्याकडून थोडी भाषा उधार घेऊन- ही रसमलाई तामीळनाडूची. तिथे याला कुणी कुत्रा विचारत नाही. याला स्वत:चं डिपॉझिट वाचवता येत नाही. आणि इथे आला आम्हाला शहाणपणा शिकवायला? न्यू यॉर्क, लंडन, पॅरिस ही आंतरराष्ट्रीय शहरं आहेत तर ती अनुक्रमे अमेरिका, इंग्लंड आणि फ्रान्स यांचा भाग नाहीत का रे टरमाळ्या!
□ तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक धोरण संस्थेवर छापा मारणार्या ईडीवर ममता बॅनर्जी यांचा छापा, संवेदनशील माहितीच्या फायली त्यांच्याकडून काढून घेतल्या.
■ कधीतरी हे होणारच होतं आणि ही हिंमत बंगालच्या वाघिणीमध्येच होती. ईडीने सत्ताधार्यांचा पट्टा गळ्यात घातला नसता, तर ही वेळ आली नसती. सतत नको तिथे तंगड्या वर करत सुटलं की कधीतरी कोणीतरी पेकाटात लाथ घालतोच.
