□ ऑपरेशन सिंदूरच्या काळात बंकरमध्ये लपण्याचा सल्ला दिला गेला होता : पाकिस्तानी राष्ट्राध्यक्षांची कबुली.
■ दुसर्यांच्या बोळ्याने दूध प्यायल्यावर हीच वेळ येते. कुठे बंकरमध्ये लपण्याचा सल्ला मिळतो, कुठे ताबडतोब युद्ध थांबवण्याचा थेट आदेश!
□ दोन गुजराती मुंबई गिळायला निघाले आहेत, आता तुझं माझं करून निष्ठा विकू नका : उद्धव ठाकरे यांची शिवसैनिकांना साद.
■ अस्सल शिवसैनिक कधीही आईचं दूध विकणार नाही. किती आले, किती गेले तरी शिवसैनिकांची निष्ठा ढळणार नाही, बाणा झुकणार नाही.
□ राडेबाज विकास गोगावलेंचा २५ दिवसांनंतरही शोध नाही.
■ शोध घेतला जातो आहे का, याचा खरंतर शोध घ्यायला हवा. पैसेवाले, सत्ताधारी आणि सत्ताधारी पैसेवाले यांच्या बाबतीत पोलिसांचे हातपाय गळाठतात. सगळं सेटिंग झाल्यावर आपोआप सापडतील किंवा शरणागती पत्करतील.
□ ‘नमो’ नाही शिवसेनेचे ठाणे : राजन विचारेंनी ठणकावले.
■ ठाणेकर गद्दारांना धडा शिकवणार, शिवसेनेच्या विचारांशी एकनिष्ठ राहणार की उगवता सूर्य समजून गल्लीतल्या काजव्यांपुढे नमो नमो करत झुकणार, ते आता पाहायला मिळेल.
□ ११ सरकारी रुग्णालयांतील रेडिओ विभाग खासगी संस्थांच्या घशात.
■ फक्त रेडिओ विभागच दिले आहेत ना खासगी संस्थांना? अजून हॉस्पिटल चालू आहेत ना? हेच फार म्हणायचं. एकदा सत्ता येऊ द्या. मग हॉस्पिटल पण विकली जातील आणि मूर्खासारखे यांना मत देणारे गोरगरीब मोफत उपचारांची सोय नसल्याने घरातल्या घरात तडफडतील.
□ बागेश्वर बाबासाठी सरकारी चार्टर्ड विमान, ऑन ड्युटी पोलिस पडले पाया.
■ सध्या कोणाची चलती आहे ते पोलिसांना बरोबर कळतं. त्यामुळे कुणाच्या पाया पडायचं आणि कुणाला लाथ घालायची, याबद्दलचा त्यांचा अंदाज कधी चुकत नाही. सरकारी बुवा आहे तो, सरकार बदललं की एखाद्या बेटावर पळ काढेल. तोवर पडा पाया…
□ तपोवनातील झाडे तोडून सरकार कोणता धर्म वाचवणार? आदित्य ठाकरे यांचा प्रश्न.
■ आदित्यजी, यांचा एकच धर्म आहे, पैसा. धर्मरक्षण वगैरे मेंदूगहाण लोकांना दाखवण्यासाठी करायचा बनाव आहे. हेही खरंतर स्पष्टपणे दिसत असतं यांच्या वर्तनातून. पण, तरीही लोकांना हे धर्मरक्षक वगैरे वाटत आहेत, हेच दु:खद आश्चर्य.
□ अग्निशामक दलाच्या परीक्षेत ८० हॉटेल व बार नापास.
■ ही परीक्षा ३१ डिसेंबरच्या वेळीच कशी होते, नापासांवर नेमकी काय कारवाई होते, नंतर पुढच्या ३१ डिसेंबरपर्यंत परीक्षाच कशी होत नाही, या प्रश्नांची उत्तरं शोधायला गेलं तर थर्टी फर्स्टचं महत्त्व समजून जाईल.
□ भाजप उमेदवारांसाठी ईव्हीएममध्ये दोन अडीच हजार मते सेट : अजित पवार गटाच्या पदाधिकार्याचा दावा.
■ मग आता येताय का व्होटचोरीविरोधात आंदोलन करायला? पडताय का युतीच्या बाहेर? आहे का हिंमत? ईडी आणि सीबीआयशी लढण्याचं आहे का बळ? नाही, तर मग कशाला करताय खळबळ नी वळवळ?
□ अमेरिकेत २० हजार भारतीय ट्रकचालकांचा परवाना रद्द.
■ कॅनडात तर एका विद्यार्थ्याचा हल्ल्यात मृत्यूही झालेला आहे. भारतातल्या सरकारी पाठबळामुळे मुजोर आणि बेबंद झालेल्या धर्मांध झुंडींनी केलेल्या अतिरेकाची फळं तिकडचे भारतीय, खरंतर हिंदू नागरिक भोगत आहेत आणि यापुढेही भोगणार आहेत. जगभरात भारतविरोधाची लाट उसळवलीत… वा मोदीजी वा!
□ एआयमुळे जगात पाणीटंचाईचा धोका.
■ पाण्याचं काय विशेष? संपलं की दहा रुपयांची बाटली आणायची. एआय मात्र महत्त्वाचं. तेच खरं जीवनावश्यक. तहानेने मरायची पाळी येईल, तेव्हा अक्कल येईल कदाचित. तोही भरवसा नाहीच.
□ मुलांना सोशल मीडियाबंदीचा विचार करण्याची मद्रास उच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला सूचना.
■ अहो मिलॉर्ड, मुलं फक्त टाइमपास करतात मोबाइलवर, सोशल मीडियावर. स्वत:चा वेळ वाया घालवतात फक्त. हे सगळे मुलं परदेशी पाठवून, काँग्रेसकाळातल्या सरकारी नोकरीचं पेन्शन खाऊन दिवसभर देशभक्तीच्या नावाखाली मोदीभक्तीचे बावळट मेसेज फॉरवर्ड करत फिरतात आणि आयटी सेलची रील पाहून वचावचा बोलत सुटतात, त्या अंकल लोकांना सोशल मीडियावरून हद्दपार करा… नव्हे, त्यांना मोबाइलबंदीच करा.
□ निवडणूक काळात पैसे घेऊन फिरताना आढळल्यास कारवाई : निवडणूक आयोगाचा इशारा.
■ आणखी एक विनोद सांगा. इथे प्रत्येक मतदारसंघात मताचा भाव काय, कुणाला किती पैसे कसे वाटले गेले, याची चर्चा उघडपणे होत असते आणि तुम्ही कारवाईचा दम कुणाला देताय? सत्ताधारी पक्षाची चोरी पकडण्याची हिंमत आहे तुमच्यात?
□ शेतकरी कर्जमाफीसाठी गरज ५००० कोटींची, तरतूद ५०० कोटींची.
■ अहो शेतकरीच ते. त्यांना काय एवढी किंमत द्यायची? आपण आपल्या लाडक्या बहिणींना निदान या निवडणुकीपुरते तरी मालामाल करत राहू. निवडणूक संपल्यावर त्यांनाही शेतकर्यांप्रमाणेच वार्यावर सोडून देऊ.
□ तुमच्यासाठी उमेदवारी मागायला जनता यायला हवी : नितीन गडकरींचा इच्छुकांना उपदेश.
■ गडकरी साहेब, तुमच्यासाठी उमेदवारी मागायला कोण येणार? टोल वसुली संस्थाचालक की तुमच्या अद्भुत आणि लोकोत्तर रस्त्यांवरून रखडत प्रवास करणारे, जीव वाचला तर नवस फेडणारे रस्ते प्रवासी?
