माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या दारूच्या थेंबालाही स्पर्श करीत नसला तरीही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकत्याच जाहीर केलेला अर्थसंकल्पात दारूच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्यामुळे दारूशौकीनांवर अन्याय झाल्याचे पोक्याचे म्हणणे आहे. पोक्याचे अनेक मित्र अट्टल दारूबाज आहेत. सरकार नेहमीच आमच्याच जीवावर का उठते असा सवाल त्यांनी पोक्याला विचारला. सरकार चालावे, जगावे, त्याच्या उत्पन्नात भर पाडावी या कर्तव्यभावनेने, कितीही महाग असल्या तरीही दारूबाज दारूच्या बाटल्या खरेदी करतो वा बारमध्ये जाऊन पितो ते केवळ देशप्रेमामुळे, ही भावना पोक्याला असंख्य दारूबाजांमध्ये आढळली. त्याने दारूबाजांच्या घेतलेल्या या मुलाखती-
१. वाटले होते या वर्षीच्या बजेटमध्ये तरी दारू स्वस्त होईल, पण त्या सीतारामन बाईंनी एका झटक्यात माझी रात्रीची नशा खाडकन उतरवली. त्यांना माहीत नाही की आम्ही आहोत म्हणून देश भक्कम पायावर उभा आहे. आम्ही डळमळतो, आमचा तोल जातो, आमची पावले वेडीवाकडे पडतात पण देशाचे बजेट आम्ही सावरतो. हिम्मत असेल तर तुम्ही जाहीर करा दारूच्या दरवाढीमुळे दरवर्षी सरकारला किती अब्ज कोटींचे उत्पन्न मिळते ते. बजेट जाहीर झाल्यावर मी आणि माझा पंटर शाम्या दरवाढीचे दुःख विसरण्यासाठी फुटपाथवरच आडोशाला पीत बसलो. शाम्या म्हणाला, उद्यापासून आपण दारू पिणे बंद करूया. पण मला ते मान्य झाले नाही. मी त्याला पुन्हा एक क्वार्टर कच्चीच मारायला दिली आणि म्हणालो, तू अशी तेढी वार्ता करू नकोस. देशाच्या भल्यासाठी आपण जीव गेला तरी दारू सोडायची नाही. मी तर म्हणतो, दारू पिणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि कितीही महाग झाली तरी मी ती पिणारच. विदेशी मिळाली नाही तर देशी पिऊ. राज्य सरकारचे उत्पन्न वाढवू पण ती पिणे बंद करणार नाही, ही शपथ घेऊ या आणि आता एक स्मॉल मारून बायकोच्या शिव्या खायला घरी जाऊ या.
२. हे सरकारने बरोबर केले नाही. आम्ही हातभट्टीची प्यावी असा सरकारचा विचार आहे का? आमच्या इथे झोपडपट्टीत मिळते ती अगदी कडक. आम्ही गावी ताडी-माडीपासून सुरुवात करून आज ब्लॅक लेबल, ब्लू लेबल, ग्रीन लेबलपर्यंत पोचलो आहोत. किंमती कितीही वाढल्या तरी आम्ही क्वालिटी सोडली नाही की बीयर आणि जिनसारख्या मुळमुळीत नशेची साथ केली नाही. इंडियन अॅरिस्टोक्रॅट आणि ऑफिसर्स चॉईस यासारख्या व्हिस्क्यात काही दम नसतो. फॉरीनच्या असली जॉनी वॉकरची चव घेताना कधी ऑन द रॉक प्यायलो तर कधीच व्होडकाच्या मंद नशेत अंतराळात तरंगत राहिलो आणि हे सरकार आमचे वर गेलेले विमान जमिनीवर आणू पाहतेय. अजिबात जमणार नाही. सरकारला हे माहीत आहे की, हे दारुडे कितीही दरवाढ केली तरी दारूचे व्यसन नाही सोडणार. ना मोर्चे काढणार, ना निदर्शने करणार. पण ज्यांच्या जिवावर सरकारची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात तग धरून आहे त्या दारूबाजांसाठी आजपर्यंत एकही विकासयोजना सरकारने कधीही जाहीर केली नाही. आमच्यासाठी गावांगावात, शहराशहरात तळीराम कॉलन्या उभारा, मयखाने सुरू करा. दारू ही शरीराला अपायकारक नसून उलट आरोग्यवर्धक कशी आहे ते पाठ्यपुस्तकातून शिकवा. दारूने बुद्धी तीक्ष्ण होते, प्रतिभाशक्ती जागी होते, मुक्यालाही वाचा फुटते, भीती नाहीशी होते हे पटवून सांगा. दारू सोडा असा उपदेश करणारेही असंख्य लोक सोडा मिळाला नाही तरी पाणी घालून दारू पितात हे एकदा जगाला कळू द्या. राम गणेश गडकरींना फक्त एका सुधाकराची ट्रॅॅजिडी लिहिली पण एकाही नाटककाराला फक्त दारूबाजाच्या जीवनावर एक कॉमेडी लिहावी असे सुचले नाही. कसे सुचणार? मी म्हणतो, सुचण्यासाठीही प्यावी लागते. कितीतरी सिनेमात दारू पिण्याचे सीन असतातच. कोणी आनंदासाठी पितो, तर कोणी घरगुती दुःख विसरण्यासाठी. केश्तो मुखर्जी तर दारूबाजाच्या भूमिका करून अमर झाला. त्यांची थोडीशी तरी कदर करा. केश्तोच्या नावे एखादा केश्तो स्मृती पुरस्कार सिनेमात दारूबाजाची भूमिका करणार्या हिरोला किंवा हिरोईनला द्या. हिंदी सिनेमातली दारू पिण्याच्या दृश्यांंची सर्व गाणी आठवा, मग कळेल जीवनात किती महत्त्व आहे ते. दारूला आणि दारुड्यांना. तोच देशाचा खरा आधार आहे.
३. जे काय झाले ते झाले. झाले गेले विसरून जाऊ, एक एक पेग आणखीन पिऊ. माझे एवढेच म्हणणे आहे की सरकारने पुढाकार घेऊन दारूबाजांचे अखिल भारतीय दारू मराठी साहित्य संमेलन भरवले पाहिजे. आपल्याकडे पिणार्या लेखक, कवी, प्रतिभावंत कलाकारांची मुळीच कमी नाही. हे लक्षात घेऊन साहित्य संमेलन अध्यक्षपदी अट्टल पिणारा अनुभवी साहित्यिक निवडावा. स्वागताध्यक्ष म्हणून एखाद्या ज्येष्ठ पियक्कड मंत्र्याला नेमावा. संमेलनाच्या मंडपात सभोवतालच्या आकर्षक सजावटीमुळे रसिकांना आपण एखाद्या भव्य बारमध्ये आल्याचा फील आला पाहिजे. दारू या एकाच विषयावर संमेलनातील परिसंवाद चर्चासत्रे असावीत. याच विषयावर गालिबपासून आजच्या अनेक कवी शायरांपर्यंत सर्वांचे प्रकाशित साहित्य तसेच हिंदी-मराठी गझला व कव्वालीगीतांच्या सीडीचे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी व विक्रीसाठी उपलब्ध असावे. मेहंदी हसन, अजीज नाझा, गुलाम अली, जगजितसिंह, पंकज उधास, तलत अजीज यांच्या गझल वâव्वालीच्या सीडीज तिथे उपलब्ध असाव्यात. अध्यक्षीय भाषणात दारूचा उगम, इतिहास, विकास आणि सद्यस्थिती यावर अभ्यासपूर्ण विवेचन व रसग्रहण असावे. दुपार व रात्रीच्या जेवणात येथेच्छ पेयपानाची सोय असावी. व्हेज- नॉनव्हेज चकना असावा. घरी जाताना प्रत्येकाला आठवण म्हणून विदेशी दारूच्या बाटल्यांचे सीलबंद बॉक्स द्यावे …
आता तरी केंद्र सरकारला आणि अर्थमंत्र्यांना जाग येईल का?

