एप्रिलच्या सुरुवातीपासून झी टॉकीज वाहिनीवर ‘टॉकीज मनोरंजन लीग’ सुरू झाले आहे. या लीगमध्ये भक्तिपर चित्रपट दाखवण्यात आले. येत्या रविवारी ११ एप्रिल रोजी या लीगमध्ये कॉमेडी चित्रपटांची जुगलबंदी रंगणार आहे. रविवारी सकाळी ९ वाजल्यापासून प्रेक्षकांच्या घरी हास्यस्फोट सुरु होणार आहे. ११ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजता विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डे यांचा ‘हमाल दे धमाल’ हा सुपरहिट चित्रपट दाखवला जाणार आहे. त्यानंतर हास्यसम्राट दादा कोंडके यांचा पोट धरून हसायला लावणारा ‘पळवा-पळवी’ हा चित्रपट दुपारी १२ वाजता, तर गेली ३२ वर्ष प्रेक्षकांचे तितकेच मनोरंजन करणारा सदाबहार चित्रपट ‘अशी ही बनवाबनवी’ दुपारी ३ वाजता प्रसारित होईल. मकरंद अनासपुरे यांचा धमाल विनोदी सिनेमा ‘गाढवाचं लग्न’ संध्याकाळी ६ वाजता दाखवला जाईल आणि या कॉमेडी चित्रपटांच्या मॅरेथॉनचा शेवट रात्री ९ वाजता पुन्हा एकदा दादा कोंडके यांच्या ‘मला घेऊन चला’ या सुपरहिट चित्रपटाने होणार आहे.