• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

झिंबाब्वेची हार सकारात्मक,श्रीलंकेची हार नकारात्मक

प्रशांत केणी (खेळियाड)

marmik by marmik
March 11, 2026
in खेळियाड
0
झिंबाब्वेची हार सकारात्मक,श्रीलंकेची हार नकारात्मक

सकारात्मकता आणि नकारात्मकता या एकाच नाण्याच्या दोन बाजू. झिम्बाब्वे आणि श्रीलंका यांचं ट्वेंटी-२० विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलंय. पण झिम्बाब्वेनं इथवर मजल मारताना कमावलीय ती सकारात्मक ऊर्जा, तर श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकानं संघाभोवती पसरलेल्या नकारात्मक वातावरणाबाबत उघडपणे मत प्रकट केलंय. दोन संघांच्या या दोन बाजूंचं हे विश्लेषण.

 

भारतीयांना झिम्बाब्वे देशाची ओळख झाली ती १९८३मध्ये. विश्वचषकात झिम्बाब्वेविरुद्धच्या साखळी लढतीत भारताची ५ बाद १७ अशी त्रेधातिरपीट उडाली असताना कपिल देवने १७५ धावांची वादळी खेळी साकारली आणि त्याच्या महापराक्रमानं संघाला तारलं. याच आत्मविश्वास उंचावणार्‍या खेळीनंतर भारतानं पुढे पहिलंवाहिलं विश्वविजेतेपद पटकावलं. श्रीलंकेशी भारताचं नातं प्राचीन काळापासूनचं. ‘रामायण’ या भारतीय महाग्रंथातील खलनायक रावण हा लंकेतलाच. इथपासून ते ‘ये आकाशवाणी का सिलोन स्टेशन है’ हा अमीन सयानींचा रेडिओवरील आवाज आजही मागील काही पिढ्यांना आठवतो.

ट्वेंटी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या ब-गटात अनपेक्षित घडलं. झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियासारख्या दिग्गज संघाला गटसाखळीत घरचा रस्ता दाखवला. पुढे सुपर-८मध्ये झिम्बाब्वे आणि श्रीलंका या दोन्ही संघांनी गाशा गुंडाळलाय. पण दोन्ही संघांच्या कामगिरीकडे पाहण्याचे दोन टोकाचे दृष्टिकोन आहेत, एक सकारात्मक आणि दुसरा नकारात्मक. झिम्बाब्वेचं आव्हान संपुष्टात आल्यानंतरही त्यांची इथवरची वाटचाल कौतुकास्पद म्हटली जातंय. परंतु श्रीलंका यजमान असल्यानं इतक्या लवकर आव्हान संपुष्टात कसं आलं, हे त्यांना पचवणं कठीण जातंय. श्रीलंकेचा कर्णधार दसून शनाकानं प्रामाणिकपणे आपल्या देशातील क्रिकेटचाहत्यांची माफी मागितली. पण संघाभोवती पसरलेलं नकारात्मक वातावरण दूर करण्यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत, अशी कळकळीची विनंतीही त्यानं केलीय.

…पण झिम्बाब्वेनं मनं जिंकली!
झिम्बाब्वेला १९९२मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी) पूर्ण सदस्यत्व मिळालं. त्यामुळे कसोटी क्रिकेटचा दर्जाही त्यांच्याकडे आहे. पण सातत्यानं खराब कामगिरी करीत राहिल्यानं त्यांना क्रिकेटविश्वात कुणीच खिजगणतीत धरत नाही. फक्त एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० प्रकारचे विश्वचषक हेच त्यांचं कर्तृत्व दाखवण्याचं व्यासपीठ. दुर्दैवानं नव्वदीच्या दशकात झिम्बाब्वेमधील राजकीय परिस्थिती बिघडल्यानं त्यांच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाची कामगिरीही ढासळली. पण १९९९ ते २००२ हा काळ झिम्बाब्वेसाठी सुवर्णकाळ मानला जातो. त्यावेळी यष्टीरक्षक-फलंदाज अँडी फ्लॉवरचा जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून लौकिक होता. या कालखंडात त्याचा भाऊ ग्रँट फ्लॉवर, अष्टपैलू अँडी ब्लिगनॉट, हीथ स्ट्रिक, मरे गुडविन, अ‍ॅयलिस्टर कॅम्पबेल, पॉल स्ट्रिंग, नील जॉन्सन असे असंख्य क्रिकेटपटू उदयास आले. १९९९च्या एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झिम्बाब्वेनं अव्वल ६ म्हणजे दुसर्‍या टप्प्यापर्यंत मजल मारत सर्वांचं लक्ष वेधलं. पण निव्वळ धावगतीमध्ये न्यूझीलंडचा संघ सरस ठरल्यानं उपांत्य फेरी गाठण्यात ते अपयशी ठरले.
२००५मध्ये कसोटी क्रिकेटमधील गचाळ कामगिरी आणि अनेक वरिष्ठ खेळाडूंनी निवृत्ती पत्करल्यामुळे ‘आयसीसी’नं त्यांचा कसोटी दर्जा काढून घेतला. पण काही काळानं तो त्यांना पुन्हा दिला. २००९मध्ये ट्वेंटी-२० विश्वचषकातून झिम्बाब्वेला माघार घ्यावी लागली. मग १८ जुलै २०१९ या दिवशी झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर राजकीय हस्तक्षेपाचा ठपका ठेवत ‘आयसीसी’नं त्यांना निलंबित केलं. त्यामुळे २०२१च्या ट्वेंटी-२० विश्वचषकाला ते मुकले, तर २०२४च्या स्पर्धेत ते पात्रच ठरू शकले नाहीत. याचप्रमाणे २०१९ आणि २०२३च्या एकदिवसीय विश्वचषकालाही ते पात्रतेचा अडथळा ओलंडण्यात अपयशी ठरले. एकंदर हा काळ झिम्बाब्वेच्या क्रिकेटसाठी झगडण्याचा होता.
२०२४पासून पुन्हा एकदा चांगला काळ त्यांच्यासाठी आला. २०२६च्या ट्वेंटी-२० विश्वचषकात झिम्बाब्वेनं ऑस्ट्रेलियावर धक्कादायक विजय मिळवला. तसा कांगारूंना हरवण्याचा पराक्रम त्यांनी २००७च्या विश्वचषकातही दाखवला होता. मग झिम्बाब्वेनं श्रीलंकेवर रोमहर्षक विजय मिळवत आणखी एका संस्मरणीय कामगिरीची नोंद केली. पण सुपर-८मध्ये वेस्ट इंडिज आणि भारताकडून पराभवामुळे त्यांचं आव्हान संपुष्टात आलं.

ट्वेंटी-२० विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात यष्टीरक्षक-फलंदाजाची भूमिका बजावणारा अनुभवी माजी कर्णधार ब्रेंडन टेलर याला दुखापत झाली आणि त्याला उर्वरित स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. तरीही झिम्बाब्वेचा संघ उत्तम लढला. या यशस्वी वाटचालीचे तीन प्रमुख शिल्पकार ठरले. यापैकी पहिला म्हणजे अष्टपैलू कर्णधार सिकंदर रझा. संघ अडचणीत सापडल्यास खंबीरपणे मैदानावर पाय रोवणारा हा मधल्या फळीतला फलंदाज, तसंच चाणाक्ष फिरकी गोलंदाज. परिस्थितीनुरूप निर्णय घेण्याची त्याची वाखाणण्याजोगी क्षमता संघासाठी प्रेरक ठरली. याशिवाय ब्रायन बेनेटनं फलंदाजीत तर ब्लेसिंग मुझरबानीनं गोलंदाजीत छाप पाडली. सलामीला उतरलेल्या बेनेटनं भारताविरुद्ध नाबाद ९७ धावा केल्या. त्याआधी त्यानं दोन अर्धशतकं साकारली, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंकेविरुद्धच्या विजयी स्ाामन्यात. तो फक्त विंडीजविरुद्ध (५) लवकर बाद झाला. पण त्याचं सातत्य आणि उच्च धावगतीनं सलामी हे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यासाठी महत्त्वाचे ठरले. झिम्बाब्वेच्या वेगवान मार्‍याची धुरा सांभाळणारा मुझरबानी हा ६ फूट ८ इंच उंचीचा. सुरुवातीच्या षटकांत अतिरिक्त उसळणारे चेंडू टाकत प्रतिस्पर्धी संघांना हादरे देण्यात तो पटाईत. तसंच उत्तम इकॉनॉमीसुद्धा राखत त्याने सातत्य टिकवलं. अष्टपैलू ब्रॅड इव्हान्सची त्याला तोलामोलाची साथ लाभली. ट्वेंटी-२० विश्वचषकातील झिम्बाब्वेची कामगिरी ही त्यांना क्रिकेटच्या नकाशावर स्पर्धात्मक राष्ट्र म्हणून स्थान मिळवून देणारी ठरली, हीच सकारात्मकता. फक्त ही कामगिरी यापुढेही टिकायला हवी!

कठीण दुष्टचक्रात श्रीलंका!
श्रीलंकेचा संघ यजमान असल्यानं अपेक्षा मोठ्या. त्याची पूर्तता यावेळी झाली नाही. पण लंकेचा कर्णधार शनाकाच्या नैराश्याला आणखी एक कारण होतं. १९९६मध्ये जेव्हा एकदिवसीय प्रकाराचं विश्वविजेतेपद या संघानं जिंकलं, तेव्हाही ते यजमान होते. याचप्रमाणे २०१२मध्ये श्रीलंकेनं ट्वेंटी-२० विश्वचषकाचं यजमानपद सांभाळलं, तेव्हा ते उपविजेते होते. मग २०१४मध्ये त्यांनी या प्रकाराचे जेतेपद मिळवून दाखवलं. यावेळी सनथ जयसूर्या मुख्य प्रशिक्षक आणि लसिथ मलिंगा गोलंदाजीचा प्रशिक्षक असलेल्या श्रीलंकेनं गटसाखळीत ४ पैकी ३ सामने जिंकले. फक्त झिम्बाब्वेनं त्यांना पराभूत केलं. पुढे सुपर-८मध्ये श्रीलंकेला पहिल्याच सामन्यात इंग्लंडनं ५१ धावांनी पराभूत केलं, तर दुसर्‍या सामन्यात न्यूझीलंडनं ६१ धावांनी नामोहरम केलं. त्यामुळे श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात आलंय. श्रीलंकेकडून फलंदाजीत पथुम निशंका, कुशल मेंडिस आणि पवन रत्नायके यांनी चमकदार कामगिरी केली. तर गोलंदाजीत फिरकीपटू माहीश तिक्षणा, वेगवान गोलंदाज दुश्मंथा चामीरा आणि डावखुरा फिरकीपटू ड्युनिथ वेलागे यांनी उत्तम कामगिरी केली.

पण श्रीलंकेला बसलेले तीन धक्के हे त्यांची कामगिरी खालावण्यासाठी कारणीभूत ठरले. ते असते, तर कदाचित चित्र वेगळं असतं. विश्वचषकाचा पहिला चेंडूही पडला नसताना एहसान मलिंगाला स्पर्धेतून माघार घ्यावी लागली. मग सलामीच्या सामन्यात फिरकीपटू वानिंदू हसरंगाच्या मांडीचा स्नायू दुखावला. तर काही दिवसांत पोटरीला दुखापत झाल्यामुळे वेगवान गोलंदाज मथिशा पथिराणालाही स्पर्धेबाहेर जावं लागलं. इंग्लंडविरुद्धचा सामना हरल्यानंतर श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकारा समाजमाध्यमावर म्हणाला की, ‘श्रीलंकेनं फक्त सामनाच गमावलेला नाही. त्यांची लय हरवलीय, स्वतःवरील विश्वास कमी झालाय आणि कदाचित संघ तसंच जनतेच्या विश्वासाचाही धागाही तुटलाय!’

शनाका नेमकं काय सांगू पाहतोय, हे महत्त्वाचं. ही नकारात्मकता ड्रेसिंग रूममधील नाही, तर बाहेरील आहे. समाजमाध्यमांवर सातत्यानं होणारी टीका आणि नकारात्मक प्रतिक्रिया ही संघाच्या मानसिकवर गंभीर परिणाम करत आहे. अनेक वेळा सामने नीट न पाहताही ही मंडळी कठोर शब्दांत भाष्य करतात, हे त्यानं अधोरेखित केले. खेळाडू सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत असले, तरी सातत्यानं येणारी नकारात्मकता त्यांना मानसिकदृष्ट्या कमकुवत करते, असं तो म्हणाला. या नकारात्मकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार किंवा संबंधित यंत्रणांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी शनाकानं केली.

खेळाडूही माणसंच असल्यानं त्यांना भाव-भावना आहेत. समाजमाध्यमांवरील उपहास, दोषारोप आणि भावनिक उद्रेक हे केवळ चाहत्यांच्या निराशेचं प्रतिबिंब नसून खेळाडूंच्या आत्मविश्वासावर आणि मानसिक आरोग्यावर थेट परिणाम करतात. समाजमाध्यमांवर केलेली टीका अधिक प्रक्षुब्ध होते आणि त्या लाटेमुळे सुधारणा होण्याऐवजी नकारात्मक वातावरण पसरतं. शनाकाची वैâफियत ही फक्त श्रीलंका संघापुरती मर्यादित न राहता खेळाडूंना सुरक्षित, सकारात्मक आणि प्रेरक वातावरण मिळावं, हेच मांडू पाहतेय!

Previous Post

रवांडामधला नरसंहार

Next Post

चणे खावे लोखंडाचे

Next Post
चणे खावे लोखंडाचे

चणे खावे लोखंडाचे

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.