
आपण एखादे पर्यटनस्थळ पहायला जातो तेव्हा फक्त तेथील आजूबाजूचा परिसर पाहायला जात नाही; ते ठिकाण ज्या गोष्टीसाठी प्रसिद्ध असेल ती गोष्ट अनुभवण्यासाठी जातो. एखादे ऐतिहासिक महत्वाचे ठिकाण असेल तर त्याबद्दलची माहिती मिळवून, आपला गौरवशाली इतिहास आठवून अगदी गहिवरून जातो. आपल्या रोजच्या चाकोरीबद्ध आणि कंटाळवाण्या दिनचर्येमध्ये काहीतरी उत्साहवर्धक बदल करण्यासाठी आपण पर्यटन करतो. मानवनिर्मित एखादी भव्य वास्तू पाहून आपण आश्चर्यचकित होऊन जातो. तेथील निसर्गसौंदर्य (कधीकधी स्त्रीसौंदर्यसुद्धा!) आपल्याला मोहित करते. त्याचबरोबर तेथील विविध प्रकारचे खाद्यपदार्थही आपल्या रोजच्या थाळीमध्ये एक बदल म्हणून आपण चाखून पाहायला हवेत.
पण बर्याचदा हे सर्व करत असता भाषेचा प्रश्न निर्माण होतो. आपल्याला जे सांगायचे असते ते नेमके समोरच्याला समजत नाही. त्यामुळे गोंधळ उडतो. खाण्याच्या बाबतीत तर अगदी त्रेधातिरपीट उडते. एक तर आपण भुकेलेले असलो की बाकी काही सुचत नाही. आपला धीरसुद्धा दारिद्र्यरेषेखाली आलेला असतो. एकदा कोचीकडून केरळच्या आतील भागात आम्ही फिरत असतानाची गोष्ट. केरळमध्ये शहरी भागात तसा काही भाषेचा प्रश्न येत नाही कारण हिंदी-इंग्रजी मोडकीतोडकी का असेना– बर्याचजणांना अवगत असते. इथल्या खेडेगावात मात्र त्यांची ती प्रसिद्ध मडक्यात दगड घालून हलवल्यावर आवाज येतो तशी भाषा बोलली जाते! आम्ही त्या पत्र्याची शेड टाकलेल्या आणि आत लाकडी बाक असलेल्या ढाब्यासारख्या दिसणार्या हॉटेलात गेलो. सडकून भूक लागली होती. ‘जेवणात काय आहे?’ हे विचारण्यासाठी तोंड आणि पोट दर्शवत हातवारे करून झाले. ‘फिश-रॅईष प्लेट’ हा एकच पदार्थ तेथे तयार होता. दुसरा पर्यायच उपलब्ध नसल्यामुळे अर्थातच सर्वानी तो पदार्थ ऑर्डर केला.
ताटात लालसर उकड्या तांदळाची रास, पिवळा धम्मक फिश करीचा रस्सा, लालभडक तंदूर मसाला लावून तळलेला भला मोठा माशाचा तुकडा आणि लिंबाचे लोणचे असा मस्त थाट होता! आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना ‘थाळी’मध्ये चपाती नसली की घोर फसवणूक झाल्यासारखं वाटतं! त्यात तो लालसर मोत्यासारखे टपोरे दाणे असलेला भात. आपल्यासारखा पांढरा शुभ्र मऊ-मऊ सात्विक भात नाही. त्यामुळे आमच्यापैकी बर्याच जणांनी त्या थाळीला पाहता क्षणी नाके मुरडली. आजूबाजूला पाहिले तर दोन-तीन टेबलवर असलेली गिर्हाइके त्या भाताचा हातात लाडू वळून गपकन् तोंडात टाकत ‘गोळा-फेक’ खेळत बसलेली होती!
‘ए कोनसा फिश है?’
आपले उघडेबंब पोट सावरत खांद्यावर फक्त एक फडके असलेल्या तेथील वेटरला माझ्या बायकोने उत्सुकतेपोटी विचारले.
‘फिफ्टी रुपीज’ त्याने उत्तर दिले!
‘व्हीच फिश- व्हिच फिश?’ बायकोने आता इंटरनॅशनल भाषेत विचारले.
‘फिफ्टी रुपीज’ त्याने परत एकदा सांगितले.
‘अरे, हा कोणता मासा आहे?’ बायकोने हाताने ‘काय’ म्हणून करतात तसा इशारा करत चक्क मराठीत विचारले.
‘फिफ्टी रुपीज!’ त्याने हाताचा पंजा दाखवत जोरात उत्तर दिले!
मग मात्र माझी बायको वैतागली. ‘साधं मराठी पण कळत नाही या माणसाला’ असं म्हणून तिने निमूटपणे जेवण चालू केले.
इकडे भारतात जरी भाषा ओळखीची नसली तरी पदार्थ आपल्या ओळखीचे असतात. कसेबसे उच्चार करून आपण त्यांना ते सांगू शकतो पण बाहेरच्या युरोपियन किंवा आशियाई देशात तुम्ही फिरत असाल तर पदार्थसुद्धा ओळखीचे नसतात. बरं इंग्रजीमध्ये मेनू कार्ड जरी असले तरी त्यांचा उच्चार काही समजत नाही आणि त्या पदार्थात काय जिन्नस वापरलेत ते तर मुळीच समजत नाही. आजूबाजूच्या लोकांच्या प्लेटकडे निलाजरेपणाने पाहात त्यांच्या टेबलवर असलेल्या डिशकडे बोट दाखवत वेटरला सांगावं लागतं. टूर पॅकेजवाली मंडळी त्यामुळेच विदेशातील टूरसाठी आपल्या जाहिरातीत ‘भारतीय जेवणाची सोय’ असा आकर्षक
पॉइंट टाकतात! हे म्हणजे अक्षरश: ‘खाईन तर तुपाशी-नाहीतर उपाशी’ असा बाणा असलेल्या प्रवाशांसाठी.
आम्ही एकदा अशाच टूरवर सिंगापूरला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. सिंगापूरला भारतीय हॉटेल्स भरपूर असल्यामुळे तेथे आमची सोय करणे सोपे होते. ‘कमालीची स्वच्छता’ हा एक फरक सोडल्यास भारतीय आणि तेथील हॉटेलमध्ये बाकी काही फरक नव्हता! त्यामुळे चवीत किंचितसा फरक सोडल्यास बाकी अगदी घरचे जेवण जेवल्यासारखा फील येत होता. एके दिवशी ‘रुचिपालट’ म्हणून त्यांनी आम्हाला ‘व्हिएतनामी जेवण’ देण्याचा बेत केला. (म्हणजे आम्हाला टूर मॅनेजरने तसे सांगितले. कदाचित त्यांना जवळपास भारतीय हॉटेल सापडले नसावे. ही सत्य परिस्थिती सांगितली असती तर कदाचित काही प्रवाशांनी हरकत घेतली असती.)
एका भल्यामोठ्या डायनिंग टेबलवर जेवण मांडून ठेवले होते. शाकाहारी प्राण्यांना वेगळे टेबल होते. आमच्यासमोर रिकाम्या प्लेट आणि बाउल्स ठेवलेले होते. एका मोठ्या कढईमध्ये गढूळ पाण्यासारखे दिसणारे सूप ठेवले होते. एका चौकोनी ट्रेमध्ये शेणाची पाटी असते तशी कुस्करून उकडलेल्या बटाट्याची रास दिसत होती. विचित्र दिसणारे छोटे छोटे तळलेले मासे जणू ‘पहचान कौन?’ विचारत होते. त्यातल्या त्यात चिरलेला कच्चा कोबी (म्हणजे हे सॅलड असावं!) तेवढा परिचयाचा वाटला. सहज म्हणून तेथे पडलेले मेन्यू कार्ड हाती घेतले. पदार्थांच्या नावाचा उच्चारसुद्धा करता येत नव्हता.
एका विएतनामी डिशचे हे नाव पहा. ‘फो बो’ आणि हे दुसरे ‘फो गा.’ ‘फो गा’ म्हणजे चिकन सूप. आता तुम्ही चुकून ‘फो बो’ सांगितले तर तुम्हाला गोमांस वापरून बनवलेले सूप मिळेल. अशा क्षुल्लक चुकीमुळे सूपमध्ये ब्रेडचे तुकडे बुडतात इतक्या सहजतेने तुमचा धर्मही बुडू शकतो. आता हा पदार्थ पहा Sua Chua Nep Cam: Yogurt with fermented black rice. . हो इथे ब्लॅक राईस म्हणजे काळा तांदूळ मिळतो. (आपल्याकडे पूर्वी काळ्या बाजारात पांढरा तांदूळ मिळायचा!) तो बहुतेक आंबवून दह्यासोबत खातात. आता हा दुसरा पदार्थ पाहा Canh Chua : (म्हणजे मला वाटले उंदराच्या कानाचे सूप असावे.) पण त्याच्यापुढे :: Sour soup with fish, tamarind, and vegetables ते असे लिहिलेले आढळले!
हा परिचित नावाचा पदार्थ पाहून ‘बन-मस्का’ आठवला. पण पुढे हा पदार्थ डुक्करच्या मासाचे पॅटिस आहे हे समजले. आता अजून पुढे वाचत बसलो तर भूक उडून जाईल म्हणून मी समोरच्या डिशचा आस्वाद घेऊ लागलो. कशाबरोबर काय खायचे कुणालाच कळेना! कसेबसे चार घास एकेक डिशचे पोटात ढकलले. बटाट्याच्या राशीला कुणी बोटसुद्धा लावले नाही. जेवल्यानंतर गप्पा मारताना शाकाहारी टेबलवर बसलेले एक वयस्कर काका म्हणाले की त्यांना ‘आमटी’ चांगली लागली. मी म्हटले, ‘अहो ती आमटी नव्हती काही… ते सूप होते!’
‘सूप होते होय ? मी आपली ती आमटी समजून भातात मिक्स करून खाल्ली!’ काका आश्चर्यचकित होऊन म्हणाले.
अजून एक बर्याच वर्षांपूर्वीचा प्रसंग. पहाटेच आम्ही बंगलोरला पोहोचलो होतो. आम्ही म्हणजे मी आणि माझा धाकटा भाऊ. त्याची लेखी परीक्षा होती एका प्रायव्हेट कंपनीत. आदल्या दिवशी त्याची तब्येत जरा नरम-गरम असल्यामुळे मीही त्याच्यासोबत बंगलोरला आलो होतो. बसस्टँडजवळच एक बर्यापैकी लॉज पाहून आम्ही आमच्या बॅगा टाकल्या आणि आंघोळी वगैरे आटोपून नास्ता करायला म्हणून एका हॉटेलात गेलो. समोरचे मेन्यूकार्ड पाहून काही उपयोग नव्हता. कारण त्यात कन्नडमध्ये सर्व पदार्थांची नावे होती. वेटरला बोलावून त्याला क्रमश: मराठी, हिंदी व इंग्रजीत ’गरम काय आहे?’ असे विचारले. तो ही गोंधळून आमच्या तोंडाकडे पाहू लागला. मी आजूबाजूला पाहिले. शेजारच्या टेबलवर एक जंबो डोश्यासारखा दिसणारा मद्राशी अण्णा इडली-वड्याचा, आपण हातात लाडू वळतो तसा गोळा करून तोंडात फेकत होता.
‘वडा-वडा!’ मी वेटरला त्याच्याकडे बोट दाखवत सांगितले. हाताने गोलाकार असा आकारही करून दाखवला.
‘औव्डा’ असा काहितरी उच्चार त्याने केला आणि सर्व समजल्यासारखी मान डोलावली.
परत दुसर्याच क्षणी प्रश्नार्थक मुद्रा करून म्हणाला…
‘वंद-वंद, रंड-रंड?’
आता आली का पंचाईत! त्याच्या तमिळ की तेलगुमध्ये आम्हाला काहीच गंध नव्हता. वडा म्हणजे एकतर ‘बटाटा वडा’ आणि दुसरा हा ‘मेदूवडा’ (काही लोक याला ‘मेंदूवडा’ सुद्धा म्हणतात. (त्यांचा मेंदू पण ह्या वड्यासारखाच आत रिकामा असावा. असो.)
मग त्याने एक बोट दाखवत ‘वंद’ म्हटलं आणि दोन बोटे दाखवत ‘रंड’ म्हणाला.
अच्छा म्हणजे एक-एक वडा सिंगल आणू की प्लेटनुसार दोन-दोन आणू? असं विचारत होता तर! मला महायुद्धात शत्रूचा सिक्रेट कोड फोडल्यावर होतो तसा आनंद झाला.
‘रंड-रंड!’ असं मी त्याला त्याच्याच रंडक्या भाषेत सांगितलं.
सपाटून भूक लागल्यामुळे गरम-गरम वड्यावर आम्ही ताव मारला. काट्याने वड्याचा तुकडा चटणीत बुडवत तोंडात टाकला असता माझा भाऊ वेटरकडे पाहून जोरात ओरडून म्हणाला, ‘ए रांडेच्चया!’
मला ठसका लागला! भावाकडे विस्मयचकित नजरेने पाहात मी म्हणालो, ‘अरे, हे काय? असं परप्रांतात येऊन कुणालाही शिव्या द्यायच्या का? मार खायचे धंदे! कुणाला मराठी येत असले म्हणजे?’
‘मी कुठं शिव्या दिल्या?’ भाऊ शांतपणे सांबाराची वाटी तोंडाला लावत म्हणाला.
‘मी दोन चहाची ऑर्डर दिलीय… त्याला बरोबर समजले… तो बघ कसा खुशीत हसतोय!’
मी चमकून वेटरकडे पाहिले. तो बशीत सांडेपर्यंत काठोकाठ भरलेला दोन कप चहाचा ट्रे हातात घेऊन आपल्या मातृभाषेतून संवाद साधणार्या माझ्या भावाकडे आपुलकीच्या भावनेने पाहात होता आणि माझा भाऊ गालातल्या गालात हसत होता!

