गॅस सिलेंडरसाठी सार्या महाराष्ट्रभर लागलेल्या बाया-बापड्या आणि पुरुषांच्या रांगा पाहून माझा मानलेला परमप्रिय मित्र पोक्या हताश झाला. तरीही यात सरकारचा काही दोष नाही, सिलेंडर्सचा तुटवडा नाही हे मुख्यमंत्री फडणवीसांचे वक्तव्य ऐकून पोक्याच्या संतापाचा पारा वर चढतच होता. डोळ्यासमोर दिसणारी दृश्यं खरी मानावी, सिलेंडर्सअभावी बंद पडत चाललेली हॉटेल्स, खानावळी यांची वाढती संख्या खरी मानावी, खुद्द विधानभवन, आमदार निवास येथे गॅस पुरवठा पुरेसा नसल्यामुळे तिथल्या खाद्यपदार्थांवर आलेलं संकट खरं मानावं की फडणवीसांची, सिलेंडर टंचाई मुळीच नाही ही थाप खरी मानावी, असा प्रश्न पोक्याला पडला होता. मी त्याला म्हटलं, पोक्या वस्तुस्थिती काय आहे हे सगळ्या जनतेला माहीत आहे. तिचा त्रास घराघरात दिसतोय. मंत्र्यांच्या घरात गॅसचा तुटवडा नसेल, ते फाइव्ह स्टार हॉटेल्समध्ये जाऊन यथेच्छ खाऊ-पिऊ शकतील. पण सामान्य जनतेचं काय, याची पर्वा कोणीच करत नाही. हे महायुतीचे नेते आणि मंत्री यावर काय उत्तरे देतात हे तू त्यांच्या मुलाखती घेऊन जाणून घे. हे ऐकल्यावर पोक्या तडक निघाला आणि एका दिवसात मुलाखती घेऊन परतही आला. त्याच या मुलाखती-
देवेंद्र फडणवीस : कोण म्हणतो, गॅस सिलेंडर्सचा तुटवडा आहे म्हणून? असे अजिबात नाही. सिलेंडर्सचा भरपूर साठा आपल्याकडे आहे. रांगा लावणारे लोक बिनडोक आहेत, असं मी म्हणणार नाही, पण ते चुकीच्या मार्गाचा अवलंब करत आहेत. आपले लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदीसाहेबांनी जनतेचा आश्वस्त केलं आहे की देशात कुठे गॅस सिलेंडर्सचा तुटवडा नाही. आणि ते जे म्हणतात त्यात मुळीच चूक नाही. हे विरोधी पक्षाचे कारस्थान आहे आणि तेही महायुती सरकारला आणि आदरणीय मोदीसाहेबांना बदनाम करण्यासाठी. मी मोदीसाहेबांशी याबाबत लघु नव्हे तर प्रदीर्घ चर्चा केली. त्यावेळी ते म्हणाले, देवेंद्र तू घाबरून जाऊ नकोस. देशात कुठेही गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही, हे मी पूर्ण विचार करून बोलतो. तशीच वेळ आली तर मी जगातल्या कुठल्याही देशाच्या अध्यक्ष किंवा पंतप्रधानांना फोन केला तर ते गॅस सिलेंडर्स नव्हे तर गॅस भरलेले अब्जावधी पाईप गॅस एका दिवसात पाठवतील. मग लावा कुठे लावायचे ते. इराणच्या तर दोन बोटी पेट्रोल, डिझेल,
रॉकेल, गोडतेल, खोबरेल घेऊन गुजरातच्या बंदरात दाखलही झाल्या आहेत. तुम्ही विचाराल की गुजरातच का? भाऊचा धक्का का नाही? त्याला उत्तर एकच. ते म्हणजे या देशाच्या उन्नतीत, विकासात गुजरातचा जेवढा वाटा आहे, तितका कोणत्याच राज्याचा नाही. त्यामुळे भूमिपुत्र म्हणून तिथल्या जनतेचे पांग फेडणं हे माझं राष्ट्रीय कर्तव्य आहे. त्यामुळे उद्या कसलीही मदत देशासाठी आली तर ती सर्वप्रथम गुजरातला दिली जाईल. गुजरातनेच या देशाला माझ्यासारखा कर्तबगार विश्वगुरू पंतप्रधान दिला आणि अमित शहांसारखा चाणाक्ष गृहमंत्री दिला. आम्ही सत्तेवर आल्यावर देश किती झपाटाने प्रगती करतोय हे तुम्ही पाहतच आहात. गॅस सिलेंडर ही एकदम क्षुल्लक गोष्ट आहे. त्यासाठी दिवसभर रांगा लावणे हे देशाला लांच्छनास्पद आहे. त्यामुळे रांगा सोडा आणि घरी जा. उद्या वेळ आली तर आम्ही सीलबंद जेवणाची पाकिटे प्रत्येकाच्या घरी पोहोचवण्याची तातडीची व्यवस्था करू. आता फाफडा खा आणि झोपा असं माझं जनतेला आव्हान आहे.
एकनाथ शिंदे : मोदीसाहेब म्हणतात तेच १०० टक्के सत्य आहे. कारण ते जे जे म्हणतात त्याला माझा नेहमीच सर्व बाजूने पाठिंबा असतो. जनतेनेही त्यांना सगळे मान-अपमान विसरून त्यांच्या धोरणांना, वागण्याला पूर्ण पाठिंबा द्यावा, अशी माझी सर्व जनतेला कळकळीची आणि तळमळीची विनंती आणि हाक आहे. कारण आज त्यांच्यामुळे देश उभा आहे. आणि मी सुद्धा उभा आहे. त्यांनी मला आधाराचं कार्ड दिलं नसतं तर मी आज कुठे खितपत पडलो असतो त्याचा पत्ताही लागला नसता. मला ते इतकं मानतात की सांगता सोय नाही. त्यामुळेच मला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याचं भाग्य लाभलं. गिनीज बुकात नाव होईल, अशी विक्रमी पक्षफोडी मी केली त्याचं ते अजून कौतुक करतात. माझ्याशी दोन-दोन तास चर्चा करतात. तुझ्यापासून खूप शिकण्यासारखं आहे, अशी माझी खुशामतही करतात. उद्या आमचं धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गोठवलं गेलं तर मला भाजपमध्ये ते सन्मानाने प्रवेश देतील. गुजरातमध्ये स्थायिक व्हायला सांगतील गुजरातचा मुख्यमंत्रीही करतील याची मला खात्री आणि विश्वास आहे. मोदी साहेबांसारखा जनतेची नाडी अचूक ओळखणारा पंतप्रधान या देशाला लाभला हे या देशाचं भाग्य नव्हे तर परमभाग्य आहे. त्यामुळे जनतेने गॅस सिलेंडरची चिंता करू नये. मोदीसाहेबांच्या परवानगीने पाचपाखाडी इथे गॅस सिलेंडर्सचा अतिविशाल कारखाना उभारण्याची माझी इच्छा आहे. त्याला ते नाही म्हणणार नाहीत, याची मला खात्री आहे.
बावनकुळे : आभासी गॅस टंचाईला मोदी सरकार किंवा महाराष्ट्राचे सरकार अजिबात जबाबदार नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आणि मोदीसाहेबांचे परममित्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी या गॅसचा फुगा भारतात सोडला आहे तो केवळ मोदीसाहेबांची मस्करी करण्यासाठी. भारतीय नेत्यांची कशी तारांबळ उडते हे पाहण्यासाठी. ही जगातील दोन बड्या नेत्यांमध्ये चाललेले मौजमस्ती आहे. ती फार सीरियसली घेण्याची गोष्टच नाही. आज या नसलेल्या गॅस टंचाईमुळे अनेक प्रतिभावंतांच्या कल्पनाशक्तीला बहर आला आहे ही सामान्य गोष्ट नाही. मिम्स, सोशल मीडियावर धमाल हसवणारी कार्टून्स, विनोद कविता, खुसखुशीत विनोद यांचं पेव फुटलं आहे. घराघरातून व्यक्त होणार्या स्त्री -पुरुषांच्या प्रतिक्रिया आणि गॅसऐवजी पर्यायी साधनांचा शोध यात कल्पकतेला उधाण आलं आहे. याबद्दल आपण या कृत्रिम गॅस टंचाईचे आभारच मानले पाहिजेत.
