• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

‘गलगोटियां’च्या गर्वाचे घर…

मर्मभेद

Nitin Phanse by Nitin Phanse
February 28, 2026
in मर्मभेद
0
‘गलगोटियां’च्या गर्वाचे घर…

‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दृष्टी आणि त्यांचे ध्येय यांच्या आधारावर आमच्या विद्यापीठाचे कार्य सुरू आहे,’ असे बहुचर्चित गलगोटिया विद्यापीठाच्या संज्ञापन विभागाच्या प्रमुख नेहा सिंग सांगत होत्या तेव्हा देशातल्या तमाम ‘गलगोटियां’ची, म्हणजे मोदीभक्तांची छाती अभिमानाने फुलून आली असणार… केवढा दुर्धर प्रसंग होता… या विद्यापीठामुळे देशाची जागतिक पातळीवर बेइज्जती झाली होती… भारताने भरवलेल्या एआय समिटमध्ये चीनचा, बाजारात सहजपणे मिळणारा रोबॉट कुत्रा या बाईंनी आपल्या विद्यापीठाची निर्मिती म्हणून खपवला होता…ते कुभांड चीनने उघडकीला आणल्यानंतर सगळ्या जगात भारताचं हसं झालं होतं… या विद्यापीठाला समिटमधून हुसकावून लावलं गेलं होतं… थोडी लाजलज्जा असलेल्या माणसाची मान शरमेने झुकली असती… पण, बाई बेधडकपणे, अभिमानाने, आत्मविश्वासाने रेटून खोटं बोलत होत्या… हे पाहून देशातल्या तमाम ‘गलगोटियां’ची मान गर्वाने उंच झाली असेल…

विचार करा, केवढी प्रचंड दूरदृष्टी होती या एका कृतीमध्ये. चीनने आपली जमीन बळकावली, आपण त्यांचा रोबॉट कुत्रा बळकावला! फिट्टम फाट केली! त्या कुत्र्याला लाल आँखे दाखवल्यावर तो चिनी असल्यामुळे पिवळा पडला म्हणतात. त्यापुढचा मास्टरस्ट्रोक तर मोदींना सलामी देणाराच होता. गेल्या बारा वर्षांत मोदी सरकारने एकामागून एक योजनांची नावं बदलली, शहरांची नावं बदलली, रस्त्यांची नावं बदलली, आता फक्त मुघलाई बिर्याणीचं नाव दीनदयाळ खिचडी असं ठेवायचं बाकी राहिलेलं आहे. ही किती सोपी गोष्ट आहे. आपण काही बनवायचं नाही. ज्यांनी बनवलं त्यांनी दिलेलं नाव हे गुलामीचं लक्षण आहे (हे सांगतंय कोण तर मुघलांपासून ब्रिटिशांपर्यंत सगळ्या हुजुरांची चोख चाकरी आणि जी हुजुरी करणारी विचारधारा- कोडगेपणाचीही कमाल असते एकेकाच्या), म्हणून त्यांची नावं बदलून टाकायची. आसपासचे सगळे गलगोटिये टाळ्या वाजवायला तयारच असतात. त्यांच्याच व्हिजन आणि मिशननुसार चालणार्‍या या विद्यापीठाने त्या चिनी रोबॉटचं जे काही चिनी हुंग फांग वगैरे नाव असेल, ते बदलून त्याला ओरायन हे नाव दिलं. आपण नाव बदललं की या योजनेची कल्पना आपल्यालाच सुचली होती, हा रस्ता बांधणारे आर्किटेक्ट, किंवा ही संस्था उभारणारे वैज्ञानिक आपणच होतो, अशा थाटात त्याबद्दल अधिकारवाणीने बोलता येतं आणि नंतर ती पायाभूत सुविधा आपल्या ‘मालकां’ना स्वस्तात विकूनही टाकता येते, हे यांच्या प्रेरणास्थानाचं वैशिष्ट्य. तोच कित्ता गलगोटिया विद्यापीठाने गिरवला आणि ती आपलीच निर्मिती असल्याचं बिनदिक्कतपणे ठोकून दिलं. मोदींना अपेक्षित समाजाच्या, शिक्षणाच्या, संस्कृतीच्या निर्मितीमधलं या विद्यापीठाचं हे अमूल्य योगदान लक्षात घेता त्याला एकमेव राष्ट्रीय विद्यापीठाचा दर्जा दिला पाहिजे आणि त्याला खुद्द मोदींचं नावही दिलं पाहिजे. त्याचबरोबर, आपण माती खाल्लेली असताना आत्मविश्वासाने फेकत राहणे न थांबवणार्‍या नेहा सिंग यांचा पुढच्या वर्षी एखाद्या पद्म पुरस्कारासाठी विचार व्हायलाच हवा, अशी शिफारस देशातल्या तमाम गलगोटियांनी केली पाहिजे.

मुळात गलगोटियाला नावं काय ठेवायची? ज्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्राने आपल्या देशाला मोठ्या प्रमाणावर तारलं गेल्या दोन तीन दशकांत, पण तिथेही आपण उद्योजक, प्रवर्तक, संशोधक नव्हतो- स्वस्तात सेवा पुरवणारे आयटी मजूरच होतो. त्या अनुभवातून काही शिकून आपण कृत्रिम प्रज्ञेच्या क्षेत्रात भरघोस काही करू शकलो असतो. पण मोदीकाळात आपण आयटी आणि एआय वापरून स्टार्टअप कोणते सुरू करतो आहोत तर वास्तुदोष दुरुस्त करणारे, भविष्य सांगणारे आणि अज्ञात मंदिरात आपल्या वतीने शुभमुहूर्तांना परस्पर अभिषेक करण्याची जबाबदारी घेणारे अ‍ॅप यांचे! काय अपेक्षा ठेवायची यापुढे?

एआयच्या क्षेत्रात आपल्याकडे सर्वात मोठी गुंतवणूक आजघडीला कशात होणार आहे, तर डेटा सेंटरमध्ये. जगात कोणत्याही प्रगत देशाला नको असलेली, प्रचंड प्रदूषण करणारी, पाणी आणि वीज अव्याहत वापरणारी डेटा सेंटर आपल्या माथी मारण्यात आली आहेत. ती आपण कौतुकाने मिरवतो आहोत. आयटी क्षेत्रात स्वस्त मनुष्यबळाची गरज होती, ती आपण भागवू शकलो. आता एआय आयटी क्षेत्रातल्याही नोकर्‍या घालवत सुटणार आहे. आणि जगात एआय तंत्रज्ञान प्रचंड वेगाने विकसित होत असताना आपली मजल ‘एआय म्हणजे आई’ असे, ‘हवा येऊ द्या’ मध्येही रिजेक्ट होतील, इतके पांचट विनोद करण्यापलीकडे फार नाही. अशावेळी आपण जागतिक एआय समिट आयोजित केलं ते नेमकं कशाच्या बळावर, हा मूळ प्रश्न आहे. या समिटमधले बाकीचे गोंधळ पाहता एआय वगैरे लांब राहिलं, नीट इव्हेंट आयोजित करण्याच्या बाबतीतही आपण जगाच्या फार मागे आहोत, हे स्पष्ट झालं.

या समिटला एआयच्या क्षेत्रातल्या सॅम आल्टमन आदी बड्या मंडळींनी हजेरी लावली, ही (कदाचित एकमेव) सकारात्मक उपलब्धी. पण आपल्याकडे अंबानींच्या लग्नाला जगातल्या मोठमोठ्या सेलिब्रिटी आल्या होत्याच की! तिकडे छन् छन् पैसा बोलत होता, इथे या देशातली प्रचंड लोकसंख्या म्हणजे प्रचंड बाजारपेठ खुणावत असते, हे लक्षात घ्यायला हवं. या सगळ्यांना सोबत घेऊन मोदींनी काय केलं, तर सगळ्यांनी एकमेकांच्या हातात हात गुंफून ते उंचावण्याचा टिपिकल मोदी स्टाइल उपक्रम केला. तो एखाद्या विनोदी सिनेमात खपून जाईल इतका हास्यस्फोटक प्रसंग होता. हे आपल्याकडून नेमकं काय आणि का करवून घेतलं, हे कळलंच नाही, अशा आशयाची ट्वीट यांच्यातल्या काहीजणांनी केलीच!

या सगळ्या फियास्कोमध्ये अचानक युवक काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी अंगावरचे कपडे उतरवून ‘मोदी इज कॉम्प्रमाइज्ड’ (मोदींनी तडजोड केली आहे) अशा आशयाचे फलक झळकवले. आंतरराष्ट्रीय मंचावर हे करायला हवं होतं का, हा वाद जरा बाजूला ठेवायला हवा, कारण त्याविषयी भारतीय जनता पक्षाने नाकाला जीभ लावावी, अशी स्थिती नाही. अशाच प्रकारची आंदोलनं त्यांनी राष्ट्रकुल स्पर्धेत केली होती. तेव्हा ते पंचगव्य होतं आणि काँग्रेसने खाल्लं तेव्हा शेण झालं, असं म्हणणं कठीण! मुळात एखाद्या क्षेत्रात आपली दखलपात्रताही निर्माण करण्याच्या आधीच आपण त्या क्षेत्राचं नेतृत्त्व करायला निघणं ही ‘गलगोटिये’गिरी अधिक लज्जास्पद होती आणि आहे. त्या अनाठायी गर्वाचं घर खाली होणारच होतं, ते झालं!

त्यात देशाची बदनामी झाली, पण तिची आता सवय करून घेतली पाहिजे.

Previous Post

नाय नो नेव्हर

Next Post

तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज

Next Post
तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज

तुकोबाराय आणि छत्रपती शिवाजी महाराज

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.