• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

काकांच्या मृत्यूचे गूढ उलगडले…

इन्स्पेक्टर प्रधान (पंचनामा)

marmik by marmik
February 20, 2026
in पंचनामा
0
काकांच्या मृत्यूचे गूढ उलगडले…

(या कथेच्या पहिल्या भागात आपण पाहिले की दारूच्या, चैनबाजीच्या आहारी गेलेल्या अनूपने रागाच्या भरात आपल्या काकांचा खून केला. तो दडवण्यासाठी चलाख गुन्हेगाराप्रमाणे खोटे पुरावे तयार केले, खरे पुरावे नष्ट केले. त्यांचा मृतदेह दरीत फेकून दिला, त्यांचा फोनही फेकून दिला. काकूबरोबर पोलिसांत काका हरवल्याची तक्रार करायलाही तोच गेला होता… (आधीचा भाग वाचण्यासाठी काकांचा खून पचणार का?  यावर क्लिक करा… ) आता पुढे काय झालं?… वाचा…

 

 

काका तसे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबरचा सीडीआर (कॉल डेटा रेकॉर्ड) काढला, तेव्हा त्या रात्री नऊ वाजता त्यांच्या मोबाईलवरून एका नंबरवर कॉल करून बराच वेळ बोलले गेल्याचे दिसून आले. पोलिसांनी तात्काळ त्याचा एसडीआर (सबस्क्रायबर डिटेल रेकॉर्ड) काढला. ज्या नंबरवर फोन गेला होता त्याने सांगितले की काल या फोनवरून त्याचा मेहुणा काशिनाथ याने त्याला फोन केला होता. पोलिसांनी लगेच काशिनाथच्या पत्त्यावर जाऊन फोन आणि काशिनाथ या दोघांनाही ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली तर तो म्हणाला की खंडोबाच्या घाटात तो गुरे चारायला घेऊन गेला होता, तिथे हा फोन त्याला सापडला. घरी आल्यावर त्याने तो चालू केला होता. तो खरोखरच चालू आहे का, याची खात्री करण्यासाठी बहिणीला त्याने फोन लावला होता. त्याला पोलिसांनी काकांबद्दल माहिती दिली आणि त्यांचे वर्णन सांगितले. त्यावर तो काहीच उत्तर देत नव्हता. पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसी खाक्या दाखवला. परंतु तरीही तो काहीच माहिती देत नव्हता. पोलिसांना काहीतरी घातपात असण्याचा संशय आला आणि त्यांनी लगेच अनुप आणि काकू यांना बोलावून काशिनाथ याला दाखविले, परंतु ते त्याला ओळखत नाहीत, हेच निष्पन्न झाले.
नामगाव पोलिसांनी तात्काळ काकूच्या तक्रारीवरून काकांचे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने अपहरण केल्याचा नामगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आणि तपास पीएसआय अरुण जमदाडे यांच्याकडे दिला. अरुण जमदाडे यांनी लगेच सर्व सूत्रे हलवून वेगाने तपास सुरू केला. त्यांनी काशिनाथकडे तपास केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की काशिनाथकडे अनुपच्या काकांना पळवण्याचा कोणताही हेतू नव्हता, तो काकांना ओळखतही नव्हता. त्याचे यापूर्वीचे गुन्हेगारी रेकॉर्ड पण नसल्यामुळे त्याच्यावरील संशयाची सुई दुसरीकडे वळविण्याचे ठरविले. पीएसआय जमदाडे यांनी पुन्हा काकू आणि अनुप यांच्याकडे चौकशी केली. दोघेही एकसारखी कहाणी सांगत होते. अनुपने दिवसभरात तो काकांना घेऊन कोठे गेला होता, काय काय केले ते सर्व ठिकाणे दाखविली. पोलिसांनी त्याप्रमाणे त्याच्यासोबत जाऊन डायमंड परमिट रूमचे सीसी कॅमेरे चेक केले, अनुप सांगत असल्याप्रमाणे सगळे बरोबर आहे, याची पडताळणी केली. तो सांगत असलेली माहितीही बरोबर आहे, तर मग काकांचे नक्की काय झाले याचा विचार जमदाडे करू लागले. काकांची कोणाशी दुश्मनी नाही, खंडणीसाठी अपहरण करावे अशी श्रीमंती नाही, त्याचे कोणाशी अनैतिक संबंध नाहीत, मग त्यांचे काय झाले, हा विचार जमदाडे करीत होते. सगळे तर सरळ दिसत आहे याची त्यांना खात्री पटली होती, पण जिथे सगळं सरळ असतं, तिथेच काहीतरी लपलेलं आणि समोर असून नजरेआड असलेलं सत्य असतं हेही त्यांना आजपर्यंतच्या अनुभवावरून माहित होते. त्यांनी पुन्हा एकदा पहिल्यापासून सर्व घटना समजून घ्यायचे ठरविले.
पीएसआय जमदाडे यांनी दुसर्‍या दिवशी अनुपला पोलिस ठाण्यात सकाळी १० वाजता बोलावून घेतले. त्यासाठी स्वतः नऊ वाजता येऊन गुन्ह्याची फाईल पुन्हा पुन्हा वाचली. त्यांना त्यात कोणताही क्लू मिळत नव्हता. त्यामुळे त्याची चिडचिड होऊ लागली होती. दिलेल्या वेळेवर अनुप आला. त्याला पुन्हा पुन्हा त्या दिवशीची घटना त्यांनी विचारली, त्यानेही क्रमानुसार पाठ असल्याप्रमाणे तिच घटना सांगितली. त्यावेळी मेडिकल स्टोअरमधून कोणत्या गोळ्या घेतल्या व मेडिकल स्टोअरमधील ओळखीच्या माणसाचे नाव काय, ते विचारले असता त्याने जमदाडे यांच्या समक्ष मेडिकलमधील मित्राला फोन करून गोळ्यांची नावे विचारली आणि ती त्याने खिशातून एक कागद काढून त्यावर लिहिले. तो कागद जमदाडे यांना दिला. तो त्यांनी स्वतःच्या खिशात ठेवला त्यानंतर ते चहा पिण्याची तलफ झाली म्हणून पोलिस स्टेशनच्या गेटबाहेरच्या चहाच्या टपरीवर गेले. त्याचवेळी अनुप ‘जातो’ असं सांगून एक्टिवा स्कूटरवरून त्यांच्यासमोरून निघून गेला. त्यावेळी चहा टपरीच्या मालकाने जमदाडे साहेबांना विचारले, साहेब, हा अनुप ससाणे आहे ना? जमदाडे साहेब हो म्हणाले. चहावाला त्यांना म्हणाला, आज हा टू व्हीलरवर कसा काय आला? हा फार रंगेल माणूस आहे, घरची परिस्थिती चांगली आहे पण, याला दारूचा आणि बायकांचा फार नाद आहे. याच्याकडे एक स्कोडा कार आहे. तिच्या काळ्या काचा कायम बंद असतात आणि गावात तो नेहमी कारमधूनच फिरतो. आज पहिल्यांदाच त्याला टू व्हीलरवर पाहिले आहे… चहा टपरीवाला सहज बोलून गेला, पण जमदाडे साहेबांच्या डोक्यात विचाराची चक्रं फिरू लागली. हा माणूस नेहमीच कारमधून फिरत असेल तर तो आज का टू व्हीलरवर आला? त्याच्या काकांना तो याच गाडीतून घेऊन गेलेला होता, कदाचित या गाडीतच काहीतरी घडलेले असावे… असा विचार करत त्यांनी चहाचे पैसे देण्याकरिता खिशात हात घातला. त्यावेळी त्यांच्या हातात पैशासोबत अनुपने दिलेली चिठ्ठीही आली. एका बाजूला गोळ्यांची नावे लिहिली होती. त्यांनी सहज कागदाची पाठीमागून बाजू पाहिली, तर लक्षात आले की वॉशिंग सेंटरचे बिल होते, त्यावर गाडी क्रमांक आणि गाडी आतून आणि बाहेरून वॉश करून घेतली असे नमूद होते. गाडीचा क्रमांक त्यांना ओळखीचा वाटला. लगेच पोलीस ठाण्यात येऊन त्यांनी अनुपच्या गाडीचा क्रमांक पाहिला. तो पावतीवरचाच नंबर होता. त्यांच्या मनात विचार चमकून गेला की ज्या दिवशी काकांना या गाडीतून सोडले आणि नंतर काका गायब झाले, त्या दिवशी काका सापडलेले नसताना त्यांना शोधण्याऐवजी अनुपने गाडी का वॉश करून घेतली? यात काहीतरी गौडबंगाल आहे अशी त्यांची खात्री झाली. परंतु पुराव्याशिवाय काहीही करता येत नव्हते. अनुप हा कुंटुंबातला सदस्य असल्यामुळे त्याच्यावर डायरेक्ट संशय घेण्यापूर्वी पुरावा हस्तगत करणे फार महत्त्वाचे होते. अन्यथा उलट पोलिसांवरच प्रकरण शेकू शकले असते. हे लक्षात घेऊन त्यांनी एक प्लॅन आखला.

जमदाडे सिव्हिल ड्रेसवर लेखनिकाला सोबत घेऊन अनुपच्या घरी गेले. आराम करत बसलेल्या अनुुपला त्यांना पाहून आश्चर्य वाटले आणि तो काहीसा कावराबावरा झाला. सकाळीच आपण पोलिसांना भेटून आलो, तर आता ते पुन्हा का आले आहेत, याचा तो मागोवा घेऊ लागला. जमदाडे साहेब म्हणाले, सहज इकडे आलो होतो, जाता जाता तुला भेटावं म्हणून. काका सापडत नाहीत, तोवर तुमच्याही डोक्याला ताप आणि आम्हालाही शांतता नाही. त्यामुळे प्रेशर आले आहे. असे वाटते की जाऊन शांतपणे मस्त बियर प्यावी. चल येतो का प्यायला? तुलाही टेन्शन आलेलं आहेच की! जमदाडेंनी गोड बोलून जवळीक साधल्यामुळे अनुपला देखील वाटले की आता जमदाडे साहेब आपल्या बाजूने झाले, आता काही फिकीर करायची गरज नाही. आपल्यावर त्यांचा कधी संशय जाणार नाही.
अनुपचा आपल्या बोलण्यावर विश्वास बसला आहे, हे लक्षात आल्यावर जमदाडे म्हणाले, अरे, तुझ्याकडे कार आहे ना? मलाही कार घ्यायची आहे. पण मी असं ऐकलंय की स्कोडा कारमध्ये इंजिनचा प्रॉब्लेम असतो. गाडीला पिकप पण कमी आहे. हे खरे आहे का? त्यावर अनुप म्हणाला, नाही हो! मी कित्येक वर्षांपासून ही गाडी वापरतोय. एकदम छान आहे आणि या गाडीमुळे लोकांवर इम्प्रेशन पडते, तुम्ही हीच गाडी घ्या. जमदाडे म्हणाले, तुझी गाडी तरी दाखव. पाहूया आतून कशी वाटते. थोडी चालवून पण पाहू या. अनुप लगेच तयार झाला आणि त्याने अंगणात झाकून ठेवलेल्या गाडीवरील कव्हर काढून जमदाडे यांच्याकडे चावी दिली. जमदाडे यांनी गाडी उघडून आतून संपूर्ण गाडीची तपासणी केली, तेव्हा त्यांना ड्रायव्हरच्या शेजारील बाजूस सीटच्या कॉर्नरला दोन-तीन काळे डाग दिसले. कदाचित ते सुकलेले चिकटलेले रक्त असावे असा त्यांना संशय आला. ते अनुपला म्हणाले की आपण थोडी ट्रायल घेऊ आणि तिथून तसेच पुढे शोरूमला जाऊ. तुला या विषयातलं कळतं, म्हणून तू माझ्यासोबत चल. तो देखील आनंदाने तयार झाला. गप्पा मारत त्यांची गाडी पोलीस ठाण्यात आली. पोलीस ठाण्याच्या गेटवर गाडी पार्क करून जमदाडे साहेब अनुपला म्हणाले, चल आपण चहा घेऊ आणि मग एक सही करायची आहे ती झाली की आपण निघू या. चहाला जात असताना कळत जमदाडे यांनी गाडीच्या रिमोटवरून लॉक काढले आणि पूर्वीच फोन करून सांगितल्यामुळे ठरल्याप्रमाणे पोलीस ठाण्यात फॉरेन्सिकची टीम येऊन बसलेली होती. त्यांनी लगेच लपत छपत जाऊन अनुपला दिसणार नाही अशा पद्धतीने गाडीत जाऊन डागांची तपासणी केली. ते डाग मानवी रक्ताचेच असल्याचे सिद्ध झाले. तसा मेसेज त्या टीमने जमदाडे यांना पाठवला. जमदाडे यांनी फुटरेस्टच्या, सीटच्या खालीही तपासायला सांगितले. त्या टीमने संपूर्ण गाडीची तपासणी केली तेव्हा फुटरेस्टच्या खाली सीटजवळ काही ठिकाणी असेच रक्ताचे डाग दिसून आले. तो बी निगेटिव्ह रक्तगट असल्याचेही टीमने सांगितले. जमदाडे यांनी अनुपपासून दूर येऊन अनुपच्या काकूला फोन करून काकांचा रक्तगट विचारला. तो बी निगेटिव्हच होता.
आता जमदाडेंची खात्री पटली की अनुपनेच काकांचे काहीतरी बरे वाईट केलेले आहे. त्यांनी तात्काळ कर्मचार्‍यांना बोलवून अनुपला ताब्यात घ्यायला सांगितले आणि पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसी खाक्या दाखवला. गाडीतले रक्ताचे डाग दाखवले आणि काकांना शोधायचं सोडून गाडी कशासाठी धुतली याची विचारणा केली असता तो उडवाउडवीची उत्तरं देऊ लागला. त्याच्या चेहरा घाबरलेला दिसत होता, जमदाडे साहेबांनी ‘प्रेमाने’ चौकशी केल्यावर मात्र अनुपने गुन्हा कबूल केला. पोलीस टीमने तात्काळ अनुपला सोबत घेऊन घाटात जाऊन पाहणी केली. तिथे दुर्गंधी पसरली होती. तात्काळ गिर्यारोहक टीमला बोलावून दरीत उतरून पाहिले असता तिथे पुरुषाचा सडलेला मृतदेह सापडला. अंगावरील अर्धवट फाटलेले कपडे आणि हातावरील व्रण यांच्यावरून हे मिसिंग असलेले काकाच असल्याचे निष्पन्न झाले.

(आधीचा भाग वाचण्यासाठी काकांचा खून पचणार का?  यावर क्लिक करा…   )

Previous Post

अमृत महोत्सवी रवींद्र साठे

Next Post

झूम बराबर झूम शराबी ऽऽऽ

Next Post
झूम बराबर झूम शराबी ऽऽऽ

झूम बराबर झूम शराबी ऽऽऽ

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.