कपट काही एक।
नेणे भुलवावयाचे लोक ।।१ ।।
तुमचे करितो कीर्तन।
गातो उत्तम ते गुण ।।२ ।।
दाऊ नेणे जडीबुटी।
चमत्कार उठाउठी ।।३ ।।
नाही शिष्यशाखा।
सांगो आयाचित लोका ।।४ ।।
नव्हे मठपती।
नाही चाहुरांची वृत्ती ।।५ ।।
नाही देवार्चन।
असे मांडिले दुकान ।।६ ।।
नाही वेताळ प्रसन्न।
काही सांगो खाणखुण ।।७ ।।
नव्हे पुराणिक।
करणे सांगणे आणिक ।।८ ।।
नाही जाळीत भणदी।
उदो म्हणोनि आनंदी ।।९ ।।
नेणे वाद घटा पटा।
करिता पंडित करंटा ।।१० ।।
नाही हलवीत माळा।
भोवते मेळवूनि गबाळा ।।११ ।।
आगमीचे कुडे नेणे ।
स्तंभन मोहन उच्चाटणे ।।१२ ।।
नोहे त्यांच्या ऐसा।
तुका निरयवासी पिसा ।।१३ ।।
तुकाराम महाराज त्यांच्या काळात ख्यातनाम संत होते. त्यांची जवळपास १४०० वारकर्यांची दिंडी होती. त्यांच्या हयातीतच त्यांच्या अभंगावर इतर लोक गावोगावी कीर्तन करायला लागले होते. महाराष्ट्रभर तुकोबांचा गाजावाजा होता. ‘नेले वार्याहाती माप।’ असं ते म्हणतात त्याप्रमाणे वार्याच्या वेगाने तुकोबांची कीर्ती पसरली होती. प्रसिद्धीच्या शिखरावर असतानाही त्यांच्या रुढ राहणीत कोणताही फरक पडला नाही. त्यांचा पोशाख त्या काळच्या शेतकर्यांच्या पोशाखासारखाच होता. त्यांनी ना भगवं पांघरलं, ना जटादाढी वाढवली. एखादा मठही बांधला नाही आणि पुराणिक बनून पोथ्याही चालू केल्या नाहीत. घटापटाचे पाठ देणारे वेदांती पंडितही ते बनले नाहीत आणि जडीबुटी देऊन कोणाचा आजार बरा केल्याचा दावाही त्यांनी केला नाही. स्तंभन-मोहनाची गूढ विद्या अवगत असल्याचा डंका वाजवला नाही. एखादा चमत्कार नाही आणि शिष्यांची शाखाही नाही. बावळटांना जमवून माळा जपण्याचा उद्योगही त्यांनी केला नाही. तुकोबाराय फक्त कीर्तन करत असत. त्यात विठ्ठलाच्या भक्तिप्रेमाचा आविष्कार ते घडवत. लोकांना विठ्ठलभक्तीची गोडी लागावी यासाठी त्यांची धडपड होती.
काही लोकांना मात्र तुकोबांनी मठ बांधावा, शिष्यशाखा निर्माण करावी, वेदांती पाठ शिकून पंडित-पुराणिक व्हावं, स्तंभन-मोहनाची विद्या अवगत करावी, जडीबुटी देऊन आजार बरे करावेत, असं वाटत होतं. त्यासाठी हे लोक तुकोबांना सतत आग्रह करत असत. त्यातल्या काहींची भावना प्रामाणिकही असावी. या गोष्टी केल्या तरच त्यांचं संतत्व सिद्ध होईल असं काहींना वाटत असावं. काही लोकांना तुकोबांच्या प्रसिद्धीचा लाभ मिळवून घ्यायचा होता. त्यासाठी ते त्यांना आपल्या संप्रदायात आमंत्रित करत होते.
असाच एक वेदांती पंडित विवेकसिंधू नावाचा ग्रंथ घेऊन तुकोबांकडे आला होता. मुकुंदराजांनी अद्वैत वेदांतावर लिहिलेला हा ग्रंथ आहे. तुकोबांनी तो ग्रंथ ऐकावा अशी त्या पंडिताची भावना होती. त्यानं तो ग्रंथ ऐकवायला सुरुवात केली खरी पण तुकोबांना ते आवडलं नाही. त्यांनी थेट कान बंद करुन घेतले. बर्याच वेळाने त्याच्या लक्षात आलं की तुकोबारायांनी कान बंद केलेले आहेत. अशा त्रास देणार्या लोकांना कंटाळून तुकोबांना एखाद्या वनात जाऊन एकांती चिंतन करत बसावं असं वाटायला लागलं. तुकोबारायांचा यासंदर्भातला एक अभंगही प्रसिद्ध आहे.
याजसाठी वनांतरा।
जातो सांडुनिया घरा ।।१ ।।
माझे दिठावेल प्रेम।
बुद्धि होईल निष्काम ।।२ ।।
अद्वैताची वाणी।
नाही ऐकत मी कानी ।।३ ।।
तुका म्हणे अहंब्रह्म।
आड येऊ नेदी भ्रम ।।४ ।।
असाच एक बीड परगण्याचा ब्राह्मणही तुकोबांकडे आला होता. तो पहिल्यांदा पंढरपूरला गेला. ग्रंथांचा अर्थ कळावा, त्यातून वेदांताचे ज्ञान व्हावे आणि ज्ञानाने मोक्ष मिळावा अशी त्याची अपेक्षा होती. पंढरपुरातून तो आळंदीला ज्ञानोबारायांकडे गेला. त्यांनाही त्याने तेच साकडे घातले. ४२ दिवस त्याने आळंदीत उपोषण धरलं. त्यानंतर त्यासाठीच तिथून तो देहूला तुकोबांकडे आला. तुकोबारायांनी त्याला फटकारले आणि स्पष्ट शब्दात सांगितले -‘नाही देवापाशी मोक्षाचे गाठोळे । आणुनि निराळे द्यावे हाती ।।’ देवाजवळ काही मोक्षाचे गाठोडे नाही. एखादा माणूस मोक्ष मागायला आला की गाठोड्यातून मोक्ष काढून द्यावा अशी देवाची पद्धत नाही हे समजावून सांगितले. तुकोबांनी याच प्रकारचा उपदेश जवळपास ११ अभंगातून केला. अद्वैत वेदांती ग्रंथांच्या भरी पडू नकोस असे तुकोबांनी त्याला पहिल्यांदाच सुनावले. ‘नको काही पडो ग्रंथाचिये भरी।’ असे सांगून त्यांनी कोणत्याही प्रकारच्या कर्मकांडी साधनातून उद्धार होणार नाही हे त्याच्या लक्षात आणून दिले. ‘साधने घालती काळाचिये मुखी।’ हे वास्तव सांगताना, त्याने आळंदीला केलेल्या ४२ दिवसांच्या उपवासाचा धागा पकडून तुकोबांनी त्याला सांगितले की या प्रकारे उपवास, पारणी आणि अक्षरांचा काथ्याकूट करण्याची गरज नाही. ‘उपवास पारणी अक्षरांची आटी।’ करण्याऐवजी ‘सुखे खावे अन्न। त्याचे करावे चिंतन ।।’ असा सल्ला त्यांनी दिला. वेदपठण, उपवास-पारणी, तपतीर्थाटण आणि यज्ञयागादी कर्मकांडांतला फोलपणा तुकोबांनी सांगितला. हा उपदेश मात्र त्याला मानवला असे दिसत नाही. त्याचा तुकोबादी संतांवर आणि वारकरी विचारांवर विश्वासच नव्हता. त्याने तुकोबांच्या उपदेशरुपी प्रसादाचा त्याग केला असा कथाभाग सांगितला जातो.
अद्वैत वेदांताचा ग्रंथ तुकोबांना ऐकवायला आलेला पंडित असो की वेदांती ज्ञान मिळवायला आलेला बीडचा धरणेकरी ब्राह्मण असो, असे अनेक लोक तुकोबांकडे येत असत. काही भाबडे लोक आजारी पडल्यावर जडीबुटी मागायलाही येत असणार. काही सधन लोक तुकोबारायांनी मठ बांधावा म्हणून जमीन दान देण्यासाठीही येत असावेत. तुकोबांनी आपल्याला शिष्य मानून गुह्यज्ञानाचा उपदेश करावा असं काहींना वाटत असणार. त्यांना त्या वेळच्या इतर तथाकथित साधूंप्रमाणेच एक समजणारे बरेच लोक त्यांच्या अवतीभोवती होते. त्यामुळे एके दिवशी तुकोबारायांना आपण तशा साधूंपैकी नाही हे स्पष्ट करावे लागले. आपण फक्त देवाचे गुण गाणारे हरिभक्त असून निर्मळ भक्ती करत आहोत हे लोकांना सांगण्यासाठी तुकोबारायांनी प्रस्तुत अभंग रचला.
ते सुरुवातीलाच स्पष्ट करतात की मी साधुत्वाच्या नावाने लोकांना भुलवणारी कपटबाजी करत नाही. मी फक्त देवाचे कीर्तन करतो आणि त्यात देवाचे उत्तम गुण गातो. मी कोणतीही जडीबुटी दाखवत नाही आणि उठाउठी घडणारे चमत्कार करून लोकांना दिपवतही नाही. तुकोबा सांगतात की माझी शिष्यशाखा नाही. मी लोकांना न विचारता उपदेश करतो. मुळात वारकरी संप्रदायात गुरुबाजी नाही. ‘गुरु शिष्यपण। हे तो अधमाचे लक्षण ।।’ असे तुकोबा म्हणतात. गुरुबाजीच्या नावाने शिष्यांची फसवणूक होते हा भाग वेगळाच, पण गुरुपरंपरेमुळे ज्ञानावरही मर्यादा येतात. वैदिक आणि इतर भारतीय परंपरेतही एका गुरुने एकावेळी एकाच शिष्याला गोपनीय पद्धतीने ज्ञान देण्याची परंपरा होती. त्याला वारकरी संप्रदायाने छेद दिला. ज्ञानाची गोपनीयता त्यांनी झुगारली. संतांनी उघडपणे एकाचवेळी अनेकांना उपदेश करण्याची परंपरा सुरू केली. त्यात पात्रापात्रतेचा विचार केला नाही. ज्याप्रमाणे पाऊस सगळीकडे कोसळतो तसाच उपदेश केला पाहिजे ही संतांची भावना होती. ‘नाही विचारित मेघ। हागणदारी आणि शेत।।’ असे तुकोबाराय म्हणतात. ज्याप्रमाणे शेतातही पाऊस पडतो आणि हागणदारीतही पडतो त्याप्रमाणे सज्जन – दुर्जन, आस्तिक – नास्तिक, भाविक – अभाविक असा कोणताही भेदभाव न करता संत सर्वांना उपदेश करतात.
तुकोबा स्पष्ट करतात की मी मठपती नाही आणि मला चाहुरांची वृत्तीही नाही. चाहुर म्हणजे चार बिघे जमीन आणि वृत्ती म्हणजे इनाम. पूर्वी मठांसाठी जमीन इनाम दिली जात असे. ‘वृत्ती भूमी द्रव्य दान उपार्जिती। जाणा त्या निश्चिती देव नाही ।।’ ही संतांची भूमिका आहे. देवाच्या नावाने इनाम जमीन आणि द्रव्य मिळवणे संतांच्या तत्त्वात बसत नाही. मुळात मठ-पीठ हे निसंग आणि निर्मोही साधकाला भोगवादात अडकवतात. मठा-पीठाच्या जंजाळात अडकून अनेक लोक फसतात. मठा-पीठाचे वाद होतात. त्यामुळेच ज्ञानोबारायांनी मठ म्हणजे नि:संग साधकाला अडकवण्यासाठी घातलेले फासे आहेत असे म्हटलेले आहे. ‘शिष्यशाखेचेनि विलासे। मठादीमुद्रेचेनि मिसे। घातले आहेती फासे। निसंगा जेणे ।।’ असे ज्ञानोबाराय म्हणतात.
माझे आजोबा भोजलिंग महाराज ही ओवी कीर्तनात नेहमी सांगत असत. ते म्हणायचे की संसार ही लोखंडाची बेडी आहे तर मठ ही सोन्याची बेडी आहे. ती वरकरणी चकाकणारी दिसत असली तरी ती शेवटी बेडीच आहे. संसाराच्या बेडीतून एकवेळ सुटता येईल पण मठा-पीठाच्या बेडीतून सुटता येत नाही. त्यामुळेच ज्ञानोबा-तुकोबादी संतांनी तो खटाटोप केला नाही. तुकोबा सांगतात की मी पौरोहित्य करत नाही. पौरोहित्य म्हणजे देवपूजेचे दुकान. ते मांडून धंदा करणारा मी पुरोहित नाही. वेताळ प्रसन्न झाल्याचा दावा करुन खाणाखुणा सांगणारा मी ज्योतिषी नाही. देवऋषी भगत नाही. त्याचबरोबर कथणी आणि करणीत जमीनअस्मानाचा फरक करणारा पुराणिकही नाही.
तुकोबांच्या काळातील पुराणिक फारच भ्रष्ट होते. पुराणात अनेक विधिनिषेधांची जंत्री आहे. बारीक सारीक कठोर नियम आहेत. त्यामुळे पुराणांनुसार सहसा आचरण करता येत नाही. पुराण हे पुराणिकांच्या उपजीविकेचे साधन असले तरी ते त्यानुसार जीवन जगू शकत नाहीत. पुराणात निषिद्ध असलेला कांदा ते घरी खात असत. वारकरी संप्रदायात कांदा खाण्याला विरोधच नाही. ‘वांगे भाजून भरीत करी। वरी कांद्याची कोशिंबिरी।’ असा एका नामदेवरायांनी रचलेल्या गवळणीत कृष्णाने कांद्याची कोशिंबीर खाल्ल्याच्या उल्लेख आहे. बहुतेक पारंपरिक वारकरी कांदा खात असत. त्यांनी कांदा खाण्याला तुकोबांचा विरोध नव्हताच, पण एका बाजूला पुराणात कांदा खाऊ नका म्हणून सांगणारे पुराणिक घरी जाऊन कांदा खात, त्यातल्या दुटप्पी भूमिकेला तुकोबाराय विरोध करतात. ‘पुराणिक म्हणविती। जाऊन कांदे ते भक्षिती।।’ असे तुकोबा सांगतात. केवळ शब्दच्छल करणारे पुराणिक त्या पुराणांचा खरा अर्थ सांगत नाहीत असे तुकोबारायांचे म्हणणे होते. ‘अर्थे लोपली पुराणे। नाश केला शब्दज्ञाने। विषयलोभी मने। साधने बुडवली ।।’ अशी त्यांची पुराणिकांबद्दल तक्रार होती. संत हे ‘बोले तैसा चाले।’ या वृत्तीचे असतात. त्यामुळे ते पुराणिक बनू शकत नाहीत.
अलीकडेच एक कीर्तनकार कीर्तनातून लोकांना साधेपणाने विवाह करायला सांगत असत. स्वतः मात्र मुलीचा साखरपुडा शाही पद्धतीने साजरा केला. यावरुन पुराणिकांच्या वृत्तीची लागण कीर्तनकारांनाही झाली आहे असे म्हणता येते. तुकोबा म्हणतात की मी उदो उदो म्हणून भणदी जाळत नाही. (भणदी म्हणजे धूप जाळण्याचं पात्र.) मी घटापटाचे वाद करणारा करंटा पंडित नाही. पंडित शाब्दिक वाद करतो पण त्यातला भावार्थ समजून घेत नसल्यामुळे तो करंटा ठरतो. भोवताली बावळट लोक जमवून जपाची ढोंगबाजीही आपण करत नाही आणि आगमातील स्तंभन आणि मोहिनी वगैरे विद्याही अवगत नाहीत हे तुकोबा सांगतात.
तुकोबाराय अभंगाच्या शेवटच्या चरणात फारच मार्मिक टोला मारतात. आधीच्या पूर्ण अभंगात पुराणिक, पंडित, मठपती, जपी, पुरोहित, भगत, ज्योतिषी, गुरू आणि जडीबुटीवाला वगैरे लोकांपैकी आपण एक नाही असे सांगून शेवटच्या चरणात या लोकांना ते वेडपट आणि नरकवासी म्हणतात. ‘नोहे त्यांच्या ऐसा। तुका निरयवासी पिसा ।।’ असे ते म्हणतात. निरयवासी म्हणजे नरकवासी आणि पिसा म्हणजे वेडा. तुकोबाराय या सर्व भोंदू लोकांना सुरुवातीलाच कपटी आणि लोकांना भुलवणारे म्हणतात, तर शेवटी वेडपट आणि नरकवासी म्हणतात. तुकोबारायांची भाषा मुळात रोखठोक, स्पष्ट, फटकळ, जहाल आणि परखड तर आहेच पण त्याचबरोबर ती मार्मिकही आहे. त्यांच्या हजारो अभंगात अशा भोंदू लोकांचा चांगलाच समाचार घेतला गेला आहे. अलीकडेच एका मंत्रीमहोदयांनी कुंभमेळ्याच्या पार्र्श्वभूमीवर साधू महंतांबद्दल अपशब्द वापरल्यास फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल अशी तंबी दिली आहे. त्यामुळेच आपण ते न करता फक्त तुकोबांचे अभंग मोठमोठ्याने म्हणत रहावे.
