• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

और एक पाकिस्तान?

मर्मभेद

marmik by marmik
December 25, 2025
in मर्मभेद
0
और एक पाकिस्तान?

नुकताच धुरंधर नावाचा एक (अप)प्रचारपट प्रदर्शित झाला. तो तुफान गर्दी खेचतो आहे, गल्ला कमावतो आहे. सत्यघटनांवरून प्रेरित काल्पनिक सिनेमा असं म्हणायचं, त्यातल्या खोटेपणाकडे बोट दाखवलं की सिनेमा काल्पनिक आहे असं म्हणायचं, मग सिनेमात वास्तवातल्या घटना, वास्तवातली माणसं यांचा उल्लेख, त्या काळातल्या बातम्यांचं सोयीस्कर फुटेज, वगैरे गोष्टी का वापरल्या आहेत, असं विचारलं की तो सत्यघटनांवरूनच प्रेरित आहे, हे सांगायचं, असा हा खेळ असतो. पण, खोट्याचा रेटा फार काळ टिकत नाही. यूट्यूबर ध्रुव राठीने या सिनेमातल्या थापांचा जबरदस्त पंचनामा केला आहे. या सिनेमात अजित डोवाल यांच्यावर बेतलेल्या व्यक्तिरेखेचा उदो उदो करण्यात आला आहे, मात्र, डोवाल हे पूर्वीपासूनच कसे अपयशी अधिकारी आहेत, याचे पुरावे त्यामुळे पुन्हा एकदा खणून बाहेर काढले जात आहेत… राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार या पदावर असलेल्या दोवाल यांचं या मालिकेतलं ताजं अपयश म्हणजे बांगलादेशासारखा शेजारी देश भारताचा शत्रू बनून बसणं…

…याची सुरुवात होते ती दोवाल यांच्या या वर्षीच्याच आणखी एका ढळढळीत अपयशापासून. पहलगामच्या हल्ल्यापासून. अतिरंजित कथा सांगून हिरो बनवल्या गेलेल्या दोवाल यांच्या नाकाखालून देशात आत घुसून पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाममध्ये पर्यटकांवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने सुरू केलेल्या ऑपरेशन सिंदूर या कारवाईतून नेमकं काय घडलं, याबद्दल दोन्ही देशांकडून दावे-प्रतिदावे केले गेले. युद्धाच्या पहिल्याच दिवशी पाकिस्तानने भारताला नमवलं, असा अतिशयोक्त दावा पाकिस्तानचे लष्करशहा असीम मुनीर करत आहेत. तो वायफळपणा सोडून दिला तरी भारताने ऑपरेशन सिंदूरमध्ये निर्णायक विजय मिळवला नाही, पाकिस्तानला नमवलं नाही, उलट आपली बरीच हानी झाली आणि तिसर्‍याच देशाचे, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘आदेशाने’ आपण युद्ध थांबवलं, हे पुरेसं स्पष्ट झालेलं आहे.

हे सगळंही घटकाभर खोटंच मानलं, तरी जे झाकता येणार नाही, असं एक सत्य म्हणजे तालिबानांचा अफगाणिस्तान वगळता आसपासचा एकही देश आपल्या बाजूने उभा राहिलेला नाही. उलट पाकिस्तानच जगभरात व्हिक्टिम कार्ड खेळला आणि ते कार्ड बर्‍यापैकी चाललंसुद्धा. त्यामुळे फुशारलेल्या पाकिस्तानच्या जोडीला आता एकेकाळचा पूर्व पाकिस्तान म्हणजे बांगलादेशही भारताविरुद्ध फुत्कार टाकतो आहे, हा फार मोठा दैवदुर्विलास आहे… हा देश जन्माला आला तोच भारतामुळे.

फाळणीनंतर पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान असे दोन देश तयार झाले होते. पश्चिम पाकिस्तानपेक्षा पूर्व पाकिस्तान आकाराने मोठा. पण, पश्चिम पाकिस्तानातल्या ऊर्दूची सक्ती आणि पंजाबीभाषकांच्या दादागिरीमुळे बंगाली भाषा बोलणारा आणि तीच संस्कृती मानणारा पूर्व पाकिस्तान रोषाने खदखदू लागला. त्यांच्यातल्या आंतरिक संघर्षात वंगबंधू शेख मुजीबुर रहमान यांच्या हाकेला ओ देऊन भारताने त्या संघर्षात उडी घेतली आणि पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला… बांगला देश निर्माण झाला. आज तोच बांगला देश त्याच पश्चिम पाकिस्तानशी म्हणजे पाकिस्तानशी जुळवून घेतो आहे आणि ‘जन्मदात्या’ भारताशी त्याने जाहीर शत्रुत्व घेतलेलं आहे.

बांगलादेशात काही काळापूर्वी विद्यार्थ्यांचा हिंसक उठाव झाला. या ‘जेन झी’ उठावाची धग इतकी होती की तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना यांना देश सोडून पलायन करावं लागलं. त्यांना भारताने आश्रय दिला. हे बांगलादेशाच्या रोषाचं पहिलं कारण. त्यांच्याजागी विद्यार्थ्यांनी नोबेल पुरस्कारविजेते अर्थतज्ज्ञ डॉ. मोहम्मद युनूस यांच्याकडे हंगामी सरकारची धुरा सोपवली. पण युनूस यांना ही जबाबदारी फार चांगल्या प्रकारे पार पाडता आलेली नाही. त्यात ढाक्यात प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेला विद्यार्थी नेता शरीफ उस्मान हादी याचं सिंगापूरच्या इस्पितळात निधन झाल्यानंतर नव्याने हिंसेचा भडका उडाला आहे. विद्यार्थ्यांच्या उठावानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवरील, मंदिरांवरील हल्ले वाढले होते. बंगालचा लोकोत्सव असलेल्या दुर्गापूजेवरही हिंसेचं सावट होतं. आता हादीच्या निधनानंतर पुन्हा एकदा अल्पसंख्याक हिंदू लक्ष्य होताना दिसत आहेत. हादी याच्यावरचा हल्ला भारताने घडवून आणला असून हल्लेखोर भारतातच पळून गेले, असा या विद्यार्थी नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा रोष आणखी वाढतो आहे.

मुळात पूर्व बंगालच्या मुस्लिम समुदायाने धर्माच्या आधारावर फाळणी स्वीकारून पूर्व ‘पाकिस्तान’ बनणं स्वीकारलं होतं. पण तरीही पश्चिम पाकिस्तानशी संघर्ष झाला तो भाषा आणि संस्कृती यांच्या मुद्द्यावरून. धर्मापेक्षा भाषा आणि संस्कृती तेव्हा मोठी मानली गेली आणि शेख मुजीबुर रहमान यांनी तेव्हापुरता का असेना, सेक्युलर मूल्यांचा स्वीकार केला होता. दुर्गा म्हणून गौरवल्या गेलेल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी हा चमत्कार घडवून आणला होता. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये तिथे धर्मांधतेचा प्रसार वाढत गेला, पुन्हा धर्मांध शक्ती डोकं वर काढू लागल्या. बांगलादेशाने ज्यांचं गीत राष्ट्रगीत म्हणून स्वीकारलं आहे, त्या (आज बांगलादेशात असलेल्या प्रदेशात जन्मलेल्या) रवींद्रनाथ टागोरांना आपले राष्ट्रपुरुष मानायला नकार देण्यापर्यंत त्यांची मजल गेली.

हे सगळं विपरीत घडत असताना आपले बिलंदर धुरंधर शांत बसले होते. त्यांना या देशातल्या बदललेल्या हवेचा पत्ताच लागला नाही. त्यात सरकारने ज्यांच्याविरुद्ध उद्रेक झाला, त्या शेख हसीनांना उदार मनाने आश्रय दिला आणि या देशाला आणखी दूर लोटलं. आता संधीचा फायदा घेऊन चीनने बांगलादेशात हवाई तळ उभारण्याचा प्रस्ताव दिलेला आहे. एका पाकिस्तानने चिनी शस्त्रास्त्रांची ऑपरेशन सिंदूरमध्ये ‘यशस्वी’ चाचणी करून दिली, आता ‘दुसरा पाकिस्तान’ही त्यांच्या कह्यात गेलेला आहे. ईशान्य भारताला भारताशी जोडणारा चिकन नेक हा चिंचोळा प्रदेश ताब्यात घेऊन संपर्कच तोडण्याची भाषा आता तिथे सुरू झाली आहे.

‘मोदी डोवाल जोडीने किया होगा तो सोचकेही किया होगा’ असं मानणारे आजही या सगळ्यावर खूष असतील. त्यांनी विचारपूर्वक हे केलं असेलच, पण तो विचार राष्ट्रहिताचा असेल की आपला विद्वेषी अजेंडा रेटण्याचा पक्षीय राजकीय हिताचा विचार असेल, याबद्दल तर्क लढवायचीही गरज नाही.

शेवटी भोगायचे आहे ते आपल्या देशाला, एवढे लक्षात ठेवा.

Previous Post

आम्ही टॅक्स का भरावा…?

Next Post

चिकित्सा `दगलबाज शिवाजी’ची

Next Post
चिकित्सा `दगलबाज शिवाजी’ची

चिकित्सा `दगलबाज शिवाजी’ची

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.