संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा हा अभंग फार प्रसिद्ध आहे. वारकरी संप्रदायाच्या नित्यपाठात तो असेलच. गंगाधर लोंढे यांच्या सुस्वर गायनामुळे हा अभंग महाराष्ट्रात प्रत्येकाने कधी ना कधी ऐकल्याचं स्मरत असेलच. सगळा महाराष्ट्र गेली काहीशे वर्षे हा अभंग ऐकत आहे, गात आहे, पण त्याला तुकोबांनी विचारलेला प्रश्न कधी पडलेला दिसत नाही. कर्म करोनि म्हणती साधू अशा वृत्तीचे, म्हणजे वाईट कर्म करून स्वत:ला साधू, साध्वी, योगी, महाराज, बाबा, बुवा वगैरे म्हणवून घेणारे लोक तुकोबारायांच्या काळातही होते आणि आजही त्यांची बजबजपुरी कमी झालेली नाही. महाराष्ट्राने तुकोबारायांची शिकवण टाळमृदुंगाच्या गजरात हरवली नसती, मेंदू जागा ठेवून, भोंदू कसे तयार होतात, यावर लक्ष ठेवलं असतं, तर ही वेळ आलीच नसती.
स्वत:ला कॅप्टन म्हणवून घेणार्या अर्धशिक्षित अशोक खरातचे उद्योग, त्यातून त्याने सत्तेच्या अंतर्गृहात मिळवलेला प्रवेश आणि कमावलेली माया पाहता बुवाबाजी हा यापुढे चांगलं करियर करण्याचा उत्तम मार्ग आहे, असं तरुण पिढीला वाटू लागलं, तर त्यात त्यांना दोष देण्याचं कारण नाही. विद्यमान सत्ताधार्यांचं धर्मप्रेम पाहता बुवाबाजीचे कोर्सही आयआयटीमध्ये सुरू झाले तर आश्चर्य वाटू नये. काही भाबड्या वाचकांना वाटेल की खरातने कितीही ऊतमात केला असला तरी शेवटी त्याला बेड्या पडल्याच आहेत. त्याचं सगळं संस्थान खालसा झालेलंच आहे. त्याचा भोंदूगिरीचा बाजार उठलाच आहे… बरोबर! पण राज्याच्या कानाकोपर्यात खरातसारखेच किती बाबा बुवा राजरोस बोकाळले आहेत हे पाहिलं तर त्यांच्यातल्या एकाचा पर्दाफाश होणं म्हणजे निव्वळ दर्यामे खसखस आहे. शिवाय, या अमृतकाळात आसाराम आणि रामरहीम यांच्यासारख्या, बलात्काराच्याच आरोपांखाली शिक्षा होऊन तुरुंगात गेलेल्या बाबांना हवा तेव्हा हवा तेवढा पॅरोल मिळण्याची सोय आहे, पंचतारांकित जीवनशैली उपलब्ध आहे. अभिनेते अतुल कुलकर्णी यांनी याबाबतीत विचारलेला प्रश्न फार मोलाचा आहे. ते म्हणतात, जो पकडला गेल्यानंतर भोंदू ठरतो, तो पकडण्याआधी काय असतो? पकडा गया वो भोंदू ठरवला की बाकीच्या भोंदूंचा कारभार बिनबोभाट सुरू राहतो. कुणी त्याच्याविरुद्ध तक्रार करण्याची हिंमत केली आणि या केसमधून काही आर्थिक घबाड किंवा राजकीय फायदा मिळणार असेल तरच ती उघडकीला येणार आणि त्या बाबाच्या भोंदुत्वावर शिक्कामोर्तब होणार!
तुकोबांच्या काळात, हे भोंदू ‘अंगी लावूनिया राख, डोळे झांकुनि करती पाप’ एवढी तरी लाज बाळगणारे होते. आता राख, भस्म वगैरे लावण्याचे, कफनी वगैरे घालण्याचे आणि पाप करताना डोळे झाकण्याचेही टेन्शन नाही; उघडपणे, डंके की चोट पे सगळं काही करता येतं. आज खरातला ताब्यात घेऊन मुख्यमंत्री (जे गृहमंत्रीही आहेत) स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. खरातला पाणीपुरवठा करणारे आम्हाला काय बोलणार, या विषयाचा राजकीय वापर कराल तर सगळ्यात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत, अशा माफिया डॉनसारख्या धमक्याही ते विरोधकांना देत आहेत. खरंतर खरातच्या कृष्णकृत्यांचा पर्दाफाश एक वर्षापूर्वीच झाला होता. त्यावेळी गृहखाते झोपले होते की मुख्यमंत्र्यांचे मिंधे प्रतिस्पर्धी दिल्लीत जाऊन किती लांबीचे उड्डाण करतात, याचे मोजमाप घेणे सुरू होते. या वर्षभरात या भोंदू बुवाने अनेक अश्राप बायकांना नासवलं आहे, इतरही अनेक कृष्णकृत्यं केलेली आहेत. निव्वळ राजकीय सोयीची वेळ नाही म्हणून हे सगळं होऊ देणं म्हणजे गुन्हेगाराची साथ करण्यासारखंच आहे. आताही हे प्रकरण उजेडात आलं ते काही अंधश्रद्धा निर्मूलनाच्या उदात्त हेतूने नव्हे किंवा हिंदू माताभगिनींना न्याय मिळवून देण्याच्या हेतूनेही नव्हे; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याला धूळ चारून, अडचणीत आणून आपणच महाराष्ट्राचे एकमेव नेते आहोत, हे सिद्ध करण्याचा आणि त्याच दगडात दिल्लीलाही घायाळ करण्याचा हा एक डावपेच आहे.
देवाभाऊंना किंवा त्यांच्या पक्षानेच गेल्या १२ वर्षांत हे भोंदू पोसले आहेत, मोठे केले आहेत, त्यांना साधुसंत अशा उपाध्या देऊन लोकांची डोकी नासवण्याचं मिशन त्यांना दिलं आहे. वैज्ञानिक विचार नष्ट करायचा, वारकरी संप्रदायाची, भागवत संप्रदायाची सहिष्णुतेची सर्वसमावेशकतेची शिकवण नष्ट करायची, धर्माधर्मात लावालाव्या करायच्या, हे यांचे तथाकथित ‘आध्यात्मिक’ उपक्रम आणि सत्संग बनून बसलेले आहेत. त्याबदल्यात हे भोंदू बुवा बाबा ‘दावूनि वैराग्याच्या कळा, भोगी विषयांचा सोहळा’ साजरा करत असतात!
विद्यमान सरकारचे, फक्त अन्यधर्मीयांच्या नावाने गरळ ओकत फिरणारे तथाकथित हिंदू धर्मरक्षक या प्रकरणात मूग गिळून बसलेले आहेत, हा काही योगायोग नव्हे. खरातने ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं, त्या आयाबाया हिंदूच आहेत. ज्यांनी याला पोसले, मोठे केले, डोक्यावर घेतले, गुरू म्हणून या भामट्याचे पाय धुतले तेही हिंदूच आहेत. गेले वर्षभर ज्यांनी खरातचे रक्षण केले, तेही हिंदूच आहेत. पण, यांचे भोंदू धर्मरक्षक चिडीचुप्प आहेत! खरात आणि त्याची वकिली करत फिरणार्या रूपाली चाकणकर यांची जात काढून याजागी आमच्या जातीचा कोणी असता, तर किती गहजब उडाला असता, असा शहाजोग कांगावा एका गोटातून सुरू आहे. खरातच्या जागी एखादा खान असता, तर महाराष्ट्र कसा पेटवला गेला असता, याची कल्पना तरी वावरता येते का?
तुकोबांचा उपदेश आजच्या महाराष्ट्रात व्यर्थ गेला आहे. एका नराधमाने धमक्या देऊन, ब्लॅकमेल करून बायकांशी कुकर्म केलं, तर सोशल मीडियावरचे पुरुष ‘लिंकम देही’ म्हणजे लिंक द्या, ब्लर व्हिडिओ नको, क्लियर व्हिडिओ द्या अशा मागण्या करतायत आणि त्यातल्या स्त्रियांचे चेहरे स्पष्ट करून ते फोटो एकमेकांत फिरवत आहेत. वर, त्या बायकांना लाज नव्हती का, असं म्हणून बळींनाच गुन्ह्यातले साथीदार सिद्ध करू पाहतायत. आपल्या माताभगिनींपैकी कोणी या जागी असतं तर आपली काय प्रतिक्रिया झाली असती, असा विचारही या विकृतांच्या मनाला शिवत नाही.
जिथे सगळा समाजच विषयविकृतींच्या भांगेच्या शेतासारखा झालेला आहे, तिथे तुळस कुठून उगवणार, तिथे खरातच पैदा होणार, राजकीय सोयीने पकडला गेला, राजकीय सोयीनेच तो संपवलाही जाणार.
‘तुका म्हणे सांगो किती, जळो तयांचि संगती’ ही तुकोबांची तळमळ भोंदूराज्य बनून बसलेल्या महाराष्ट्रातच फुकट जावी, हे दुर्दैव!

