• Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा
मार्मिक
No Result
View All Result
No Result
View All Result
मार्मिक
No Result
View All Result

आमचे बी.जी. सर!

निरंजन घाटे

marmik by marmik
January 31, 2026
in इतर
0
आमचे बी.जी. सर!

डॉ. बा. गं. देशपांडे
२९/११/१९१९ – २५/१/२००१
बी.जी. डिपार्टमेंट हेड म्हणून येणार ही बातमी एक दिवस भूशास्त्र विभागात पसरली. सर सकाळी लौकरच विभागात हजर झाले. बुटके, हसतमुख डोक्यावर विरळ होत चाललेले कुरळे केस, सोनेरी काडीचा चष्मा, अशी त्यांची मूर्ती भरभर पावले टाकत चालत असे. त्यांच्याबरोबर चालताना भल्याभल्यांची दमछाक होत असे. पुढे एकदा ओएनजीसीच्या भडोच इथल्या भेटीच्या वेळी त्यांच्या हाताखाली काम केलेल्या एका माणसाशी बोलत होतो. तो अतिशय आदरयुक्त प्रेमाने म्हणाला, ’काय म्हणतोय वाघ?’.

खरंच सर कामाला वाघ होते. सकाळी सगळ्यात आधी ते ऑफिसमध्ये हजर असत. पुढे पुणे विद्यापीठातही हीच प्रथा त्यांनी पाळली. कुठलीही अडचण असो, त्यांना आम्ही बिनधास्त सांगू शकत होतो. मी डेहराडूनला जाऊन एरियल फोटोग्राफी या त्या काळात नवीन असलेल्या तंत्रज्ञानाचा अभ्यासक्रम पूर्ण करावा असं त्यांना वाटत होतं. मी माझ्या आईच्या आजारपणाची त्यांना कल्पना दिली. घरची परिस्थिती सांगितली. तेव्हा त्यांनी मला हैद्राबाद येथील एनजीआरआयच्या (नॅशनल जिओफिजिकल रिसर्च इन्स्टिट्यूट) एक महिन्याच्या अभ्यासक्रमास पाठवलं. त्यांच्या आग्रहामुळे मी लखनौच्या पॅलिओबॉटनी इन्स्टिट्यूटचा पुरावनस्पती विज्ञानाचा एक आठवड्याचा मार्गदर्शनपर अभ्यासक्रम पूर्ण करून आलो. माझ्या प्रत्येक शोध निबंधाचं ते कौतुक करीत असत.

सर नंतर ब्रिटिश पूर्व आफ्रिकेतील दार-एस्-सलाम इथं गेले होते. खंबायतच्या आखातात खनिज तेल शोधणारे शास्त्रज्ञ म्हणून त्यांनी नावलौकिक मिळविला होता. ’बॉम्बे हाय’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या सागरी खनिज तेल क्षेत्राच्या उभारणीत त्यांचा हातभार लागला होता. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर खनिज तेलाचे साठे असतील तर आफ्रिकेच्या पूर्व किनार्‍यावर तसेच साठे असणार हा त्यांचा आडाखा होता. त्यांनी त्या वेळच्या ब्रिटिशपूर्व आफ्रिकन  देशांमध्ये सागरतटी खनिज तेल आणि वायू सापडण्याची शक्यता वर्तवली. त्या वसाहतीत ते सल्लागार म्हणून गेले. तिथे त्यांनी दारेसलाम विद्यापीठात भूशास्त्र विभागाची स्थापना केली. स्थानिक प्राध्यापक तयार व्हायला हवेत म्हणून त्यांना भारत, इंग्लंड, अमेरिका आदी देशांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवलं.

पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागात सर असतानाच्या दोन गमती सांगितल्याशिवाय राहवत नाही. सर वागणुकीच्या बाबतीत एकदम ब्रिटिश. आमच्या विभागातले प्यून सगळे गावठी आणि ग्रामीण संस्कृतीत वाढलेले. गोविंदा नावाचा एक प्यून होता. हुशार होता. कामात अव्वल. एकदा सरांनी त्याला कार्पेंटर आणायला सांगितले. गोविंदा तडक निघाला आणि थोड्याच वेळात एका माणसाला घेऊन आला. त्याचे कपडे मळकट, अंगावर एप्रन, त्यावर रंगाचे डाग, असा तो माणूस सरांच्या केबिनमध्ये गेला. सरांना अव्यवस्थित, गबाळग्रंथी माणसं अजिबात आवडत नसत. प्यूनचा गणवेश व्यवस्थित असायला हवा, यावर त्यांचा कटाक्ष असे. ’साहेब, कार्पेंटर आनलाय,’ गोविंदा म्हणाला. सरांनी त्या माणसाकडे बघताच तो माणूस म्हणाला, ’साहेब गाडीच्या किल्ल्या देता का?’

’किल्ल्या?’ सरांनी विचारले. ’गाडी रंगवायची ना? गॅरेजमध्ये बरी पडेल’ वगैरे तो बोलत होता. त्याला हाताने थांबवून सरांनी गोविंदाला विचारले,’अहो, गाडी रंगवायला कुणी सांगितलं, मला सुतार हवा होता.’ यानंतर टी क्लबवर सरांकडून आणि मधल्या फावल्या वेळात गोविंदाकडून दोघांचं म्हणणं ऐकावं लागलं. खूप हसलो. सरांचा दुधावर का कोण जाणे राग होता. ते बिन दुधाचा एक डिप् पिशवी बुडवलेला चहा पीत असत. माझे तेव्हा आकाशवाणी पुणे केंद्रावर दोन तीन कार्यक्रम झाले होते. सर प्रत्येक बाबतीत अत्यंत काटेकोरपणे तयारी करीत असत. त्यांना आकाशवाणीच्या पुणे केंद्राने ‘भूकंपात घ्यायची काळजी’, या विषयावर मुलाखतीसाठी बोलावले होते. एक दिवस सर माझ्या टेबलाजवळ आले. मी खाडकन उभा राहिलो. त्यांनी बोलावले असते तर मी धावत गेलो असतो. सरांच्या मते काम त्यांचे होते, तेव्हां मला बोलावून घेणे, त्यांच्या एटिकेट्समध्ये बसत नव्हते.

‘रविवारी काय करता?’ सरांनी विचारले.
‘क्रिकेट खेळतो. आमचा क्रिकेट क्लब आहे. त्याच्या मॅचेस असतात.’ मी उत्तर दिले.
‘बरं एरवी केव्हा वेळ असतो?’
‘सर,असं का विचारताय’? मी म्हणालो.
‘आकाशवाणीवर माझी मुलाखत घ्यायची आहे. तुम्हाला वेळ आहे का? आपल्याला तयारी करावी लागेल. प्रश्न काय विचारायचे, उत्तरं काय द्यायची, सगळं ठरवावं लागेल,’ सरांनी सांगितले. मी मनोहरसाठी मुलाखत घेताना असं कधी केलं नव्हतं. आकाशवाणीवर एक दोन मुलाखती घेतल्या त्या वेळीही आधी तयारी न करता त्या घेतल्या होत्या. त्या उत्स्फूर्त वाटायला हव्यात म्हणून असं केलेलं होतं. मनोहरमुळे आकाशवाणीवर ओळखी झाल्या होत्या. त्यांनीच मला हे सांगितलं होतं. हे मी सरांना सांगितलं. सर म्हणाले, ’आपण त्याचीही प्रॅक्टिस करुया.’ सुदैवाने ती प्रॅक्टिस केलेली उत्स्फूर्त मुलाखत चांगली झाली.

सर कोयना भूकंपाचा अभ्यास करणार्‍या समितीचे अध्यक्ष होते. त्यानंतर मुंबईत मेट्रो रेल्वे प्रकल्प आला तेव्हा जागोजागी विंधनछिद्रे घेतली गेली. त्या क्रोडांचा अभ्यास करण्याची जबाबदारी सरांनी माझ्यावर सोपवली होती. त्यावर मी विस्तृत अहवाल सादर केला होता. माझ्याबरोबर पराडकर मदतीला होता. सरांना त्यावर त्यांचे नाव टाकणे प्रशस्त वाटले नाही. त्यांनी ‘I am forwarding the report prepared by N.S. Ghate & A.G. Paradkar herewith’, म्हणून शासनाकडे पाठवला.

खंबायतच्या आखातात तेल सापडेल याची त्यांना खात्री होती. त्याप्रमाणे ते सापडले. मुंबईच्या सागरतटीचे बॉम्बे हाय हे त्यांच्या दूरदृष्टीने अस्तित्वात आले. त्यामुळे भारतीय खनिज तेल आणि वायू महामंडळाच्या सल्लागारपदी पंतप्रधानांचे सल्लागार म्हणून नेमणूक त्यांची निवृत्तीनंतर नेमणूक करण्यात आली होती. भारतीय राष्ट्रीय विज्ञान परिषदेच्या वार्षिक संमेलनात भूशास्त्र विभागाचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी घेतलेला भारतीय खनिज तेल उद्योगाचा आढावा पुस्तिकारूपाने प्रसिद्ध झाला. ते भाषण त्यांनी टाईप करून घेतल्यानंतर विभागातील सर्वांना वाचायला दिले आणि त्यातील ‘चुका दुरुस्त करून परत द्या’ असे सांगितले. आपण शक्य तितके बिनचूक असायला हवे, याबाबत ते फार काटेकोर होते.

निवृत्त झाल्यावर स्वस्थ बसणे त्यांच्या स्वभावात नव्हते. एक दिवस ते आमच्या घरी आले. ती चित्रशाळेची इमारत म्हणजे आधुनिक चक्रव्यूह आहे. सरांना आमची सदनिका सापडली नव्हती. त्यांनी पहिल्या मजल्यावरील एका गृहस्थांकडे त्यांचे व्हिजिटिंग कार्ड दिले. आपल्याला जी मासिके येतात, त्यावर पत्त्याच्या चिठ्ठ्या चिकटविलेल्या असतात. त्या व्यवस्थितपणे सोडवून त्यांचा वापर सर ‘व्हिजिटिंग कार्ड’ म्हणून करत. हा चिक्कूपणा नव्हता तर काटकसर होती. त्यांना भरपूर पेन्शन मिळत होती. त्यांची कामं करण्यासाठी ते महाविद्यालयीन शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना नेमत आणि त्यांची फी भरून वरखर्चाला पैसही देत. माझ्याकडे ते आले तेव्हा मी घरी नव्हतो, ते येऊन गेले हे कळल्यावर तसाच त्यांच्याकडे पोहोचलो. त्यांनी एक पत्रक तयार केलं होतं. ’सर, तुम्ही कशाला आलात? मला निरोप पाठवायचा. मी आलो असतो,’ मी म्हणालो.
‘घाटे, हे बघा हे पत्रक मी तयार केले आहे. किल्लारीला चाललोय. तिथे जमिनीतून आवाज ऐकू येतात. तिथले गावकरी घाबरले आहेत. त्यांना धीर द्यायला हवा.
जिऑलॉजिस्ट म्हणून ते आपले काम आहे.’ वयाची सत्तरी ओलांडलेल्या सरांनी स्वखर्चाने ती पत्रके छापून घेतली. किल्लारीला जाऊन ती वाटली. भूकंप होण्याची शक्यता असली तरी घाबरून जायचे काही कारण नाही, असं सांगत सर त्या परिसरात फिरले. झालाच तर काय काळजी घ्यायची, हे सांगणारी पत्रके त्यांनी वाटली. किल्लारीची दुर्घटना घडली, तो निसर्गाने माणसाला दिलेला अनपेक्षित धक्का होता. गावकर्‍यांनी सरांवर शिव्यांची लाखोली वाहिली. खरंतर त्यात सरांची काहीच चूक नव्हती. किल्लारीच्या पुनर्वसनाच्या वेळी सरांनी आदर्श घरे कशी असावीत, याचा प्रचार केला पण तिकडे गावकर्‍यांनी दुर्लक्ष केले.


सर ऐन पंचविशीत भूशास्त्रीय सर्वेक्षण विभागामध्ये (Geological Survey of India) नोकरी करू लागले.त्यांच्या कामाने त्यांचे वरिष्ठ प्रभावित झाले. १९४६मध्ये त्यांना प्रशिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात पाठविण्यात आले. तिथल्या कोळसा खाणींचा सरांनी अभ्यास केला. तिथून भारतात परतल्यावर त्यांनी ओरिसातील भारतीय कोळसा खाणींवर काही काळ काम केले.

ऑइल अ‍ॅन्ड नॅचरल गॅस कमिशनची स्थापना होताच सरांची त्या आस्थापनेतील भूशास्त्र विभाग प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली. आसामात काही काळ काम केल्यानंतर ते खंबायतच्या आखातात दाखल झाले. इथे खनिज तेल सापडेल याची त्यांना खात्री वाटू लागली. तसे ते सापडलेही. त्यानंतर बाँबे हाय या भारतीय पश्चिम किनार्‍यावरील क्षेत्रात ड्रिलिंग सुरू करण्यासाठी त्यांनी निवृत्तीपूर्वी आग्रही भूमिका घेतली. भारतातील खनिज तेल आणि वायू उत्पादनाचे जनक असं त्यांना या क्षेत्रातील मान्यवर जाणकार म्हणत. सरांनी भारतीय उर्जा उत्पादन साधनांवर पुस्तक लिहायला हवं होतं. त्यांनी इंडियन सायन्स काँग्रेसच्या अधिवेशनात भूशास्त्र विभागाचे अध्यक्ष म्हणून दिलेल्या भाषणाची पुस्तिका छापली होती. त्याची एखादी प्रत अजूनही मिळाली तर बघायला हवं. ती आजही अभ्यासकांना उपयुक्त ठरेल.
त्यांनी निवृत्तीनंतर चीनला भेट दिली. प्राण्यांची वर्तणूक आणि भूकंप, या विषयावर तिथल्या भूकंप अभ्यासकांशी त्यांनी वैचारिक देवाणघेवाण केली. तिथून परतल्यावर त्यांनी सुमारे चारशे पानांचे एक पुस्तक लिहिले. सर नंतर आघारकर संशोधन संस्थेत भूशास्त्राचे मानद प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. २५ जानेवारी २००१ आणि २६ जानेवारी २००१च्या पहाटे दरम्यान सरांचे झोपेतच निधन झाले. २६ तारखेला भूशास्त्रातले आम्ही सर्वजण वैकुंठ स्मशानभूमीत सरांच्या अंत्यविधीसाठी हजर होतो. तेवढ्यात भूज इथे भूकंप झाल्याची बातमी आली. हा एक विलक्षण योगायोग होता. कुणीतरी म्हणाले, लौकर अंत्यविधी उरकून घ्या, नाहीतर सर उठून म्हणतील, मला भूजला न्या मग माझं काय करायचं ते करा. मला वाटतं, ती सरांना वाहिलेली योग्य श्रद्धांजली होती. त्यातून सरांचं त्यांच्या विषयाशी असलेलं तादात्म्य स्पष्ट होतं. सर जाऊन पंचवीस वर्षे लोटली पण कुठेही महत्त्वाची भूशास्त्रीय घटना घडली की सरांची आठवण आल्याशिवाय रहात नाही. माझ्या पाठीवर नेहमीच प्रोत्साहनयुक्त कौतुकाची थाप पाडणार्‍या या माझ्या गुरूंना ही आदरांजली.

Previous Post

नाय नो नेव्हर

  • Contact
  • Privacy Policy
  • उचला कुंचला
  • जुने अंक
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

No Result
View All Result
  • Contact
  • Privacy Policy
    • TERMS OF SERVICE
  • उचला कुंचला
  • जुने अंक
    • १४ जुलै २०१३
    • १८ ऑगस्ट २०१३
  • बाळासाहेबांच्या कुंचल्यातून
  • मार्मिक परिवार
  • मार्मिक विषयी
  • मार्मिकची वाटचाल
  • मुख्य पृष्ठ
  • वर्गणीदार व्हा

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.