मुख्यमंत्री फडणवीस
तीन हाती सत्ता मिळता
ओरबाडून ती आम्हीच खावू
दोघांना त्या फूटवून लवकर
आम्हीच मोठा ढेकर देऊ

गरज होती म्हणून आम्ही
इकडून तिकडून केले गोळा
शिरजोर होण्याआधीच करू
साफच त्यांचा चोळामोळा
आत्ता फारच चढून गेले
उतरवू त्यांना लवकर खाली
ना राहतील ते घरके-घाटके
कोणीच राहणार नाही वाली
एकनाथ शिंदे
बघितलीत ना माझी ताकद
भाजपाची कशी जिरवली
बाजार बुणगे हाती धरून
भाजप. हवा कशी फिरवली

त्यांना सुद्धा माहित आहे
लोच्या करण्यात आम्ही एक्सपर्ट
कातडे पांघरून वाघाचेही
डरकाळ्याही देतो चौपट
तरीही मनात वाटते भीती
आत्ता सीएम काढतील उट्टे
बसा म्हणतील असेच लोंबकळत
नाही देणार एवढ्यात रट्टे
अजित पवार
पार्थला वाचवू की मला वाचवू
मलाच आता पडले कोडे
पार्थ कसा इतका वेडा
माझेच आता अडलेय घोडे

बारामतीच्या दादागिरीला
आता बसलाय मोठा चाप
इतकं सगळं पदरात पाडून
मीच ठरलोय वेडा बाप
सगळे उपाय करून थकलो
तोंड झाकून लपतोय घरात
पार्थबरोबर माझी सुद्धा
लवकर निघेल आता वरात
अमित शहा
मीच म्हटले होते त्यांना
पुन्हा करू तुम्हा सीएम
इतके आम्ही नाही वेडे
काम झाल्यावर करूच गेम

आमची युक्ती फळास आली
मोठी शक्ती गळास आली
आता तुमची पुरती भरली
घटका तुमची पुरती भरली
स्वबळावर आम्ही आता
राज्यात पुर्या घालू धुडगूस
बसा तुम्ही दाढी खाजवत
पार्टी तुमची महाबोगस
सुधीर मुनगुंटीवार
महापालिका निवडणुकीत
म्हणती मला शक्ती देऊ
सगळी ताकद पणास लावून
अपयशाला मुक्ती देऊ
यांना सगळे ठाऊक आहे
माझी शक्ती कशात आहे
तेच नेमके टाळून म्हणती
यश आमच्या खिशात आहे

सीएम आमचे पक्के बेरके
आमची नाडी नेमकी हेरती
रोग एक अन् उपाय भलते
शंका-कुशंका मनास घेरती
