
सन्मित्र रवींद्र साठे
सस्नेह सप्रेम नमस्कार.
हे जाहीर पत्र तुझ्या हाती येईपर्यंत तुझा ७५ पूर्ण, अमृत महोत्सवी वाढदिवस उत्साहाने साजरा होऊन तू थोडासा अंतर्मुख झाला असशील. तुझ्यावर फोनचा, पत्रांचा, हार गुच्छांचा, प्रेमळ भेटीचा आणि विविध माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाचा प्रेमाचा, आशीर्वादाचा, अभिनंदनाचा आणि गुणगौरवाचा इतका वर्षाव झाला असेल की एकूणच तुझ्या प्रसिद्धीपराङ््मुख स्वभावाला `खरंच’ इतका मी मोठा आहे? इतका मी जनप्रिय आहे? इतका मी गुणी आहे? असे प्रश्न पडले असतील. पण या पत्रमाध्यमातून मी हे जाहीरपणे प्रगट करतो की या सर्व गुणगौरवाला तू एकशे एक टक्के पात्र आहेस. माझे हे पत्र मन लावून वाचावे म्हणजे माझे शब्द किती अचूक आहेत, अत्यंत योग्य आहेत, याचा प्रत्यय तुझा तुलाच येईल.
असो. नमनाला घडाभर तेल जाळत नाही. पुढे सुरू करतो-
सुमारे ५३ वर्षांपूर्वी आपण एकत्र आलो. त्यापूर्वी ना आपली ओळख ना पाळख. निमित्त होते सुरुवातीला, ज्याने आपल्याला गाजवून ठेवलेले आणि नंतर जगभर गाजलेले नाटक `घाशीराम कोतवाल’ हे नाटक. त्या नाटकाच्या संचात काम करणार्या किंवा नाटकाशी संबंधित असणार्या दोन-चार व्यक्तींपेक्षा अधिक लोकांचा माझा अजिबात परिचय नव्हता. म्हणजे मी त्यांना ओळखत होतो ते त्यांची रंगमंचावरची कामगिरी बघून. त्यांची पुरुषोत्तम राज्य नाट्य स्पर्धेतील नाटके बघून. आपणही यांचे बरोबर काम केले पाहिजे, यांच्या गटात सामील झाले पाहिजे, याची प्रचंड ओढ होती. पण, संधी गवसत नव्हती. पण अचानक एक दिवस संधी चालून आली. मी टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन, पुणे येथे ‘पक्का’ मास्तर होण्यासाठी बी.एड करीत होतो. योगायोगाने त्याच वर्षी पीडीएचे (प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन) श्रीधर उर्फ अण्णा राजगुरू एम.एड. करीत होते. त्यांच्या दिग्दर्शनाखाली मी त्या वर्षी पुरुषोत्तम कॉलेजमधील नाटके केली. त्यांना नाट्यातील नाटकाची विलक्षण आवड जाणवली असावी. त्यांचे बोट धरून मी `घाशीराम कोतवाल’च्या कलाकार निवडीच्या परीक्षेला चुकलेला वासरासारखा हरवलेल्या पावलांनी हजर झालो.

माझ्या आधीच त्या ठिकाणी तीस-पस्तीस मुले हजर होती. बहुतेकजण वीस-बावीस वर्षांचे! कॉलेज तरुण. गोरीगोमटी, घार्या डोळ्यांची, तरुण, तडफदार मुले, कुणी काही, कुणी काही जमेल तसे गाणं, नाटकातील संवाद असे काहीसे करीत होते. यातील बर्याच मुलांना मी पुरुषोत्तमच्या रंगमंचावर पाहिलं होतं. जब्बार पटेल त्या दिवशी नाटकातील कलाकारांची निवड करणार होता. `घाशीराम’साठी किमान गाणं येणार्यांची गरज होती. मलाही काहीतरी करून दाखव असं सांगण्यात आलं. मी राष्ट्रसेवा दलाच्या पुणे शहर कलापथकात त्यावेळी निळू फुलेच्या मार्गदर्शनाखाली `बिनबियांचे झाड’, `कुणाचा कुणाला नेम नाही’,` पुढारी पाहिजे येरा गबाळ्याचे काम नव्हे’, `चिनी आक्रमणाचा फार्स’ अशा लोकनाट्यांतून काम करीत होतो.आमच्या कार्यक्रमाचे स्वरूप असे असायचे – मध्यंतरापर्यंत देशभक्तीपर गीते, लोकगीते, पोवाडे, समूहनृत्य आणि मध्यंतरानंतर वगाला सुरुवात. मला गाण्याचा गळा नाही, पण पोवाड्याला जी-जी-जी करत साथ देण्याइतपत माझी तयारी. मी कानावर हात ठेवून प्राध्यापक वसंत बापट यांचा –
ही मराठी भूमी धन्य।
अशी नाही अन्य।
देऊन धनधान्य।
वाढवी आम्हा काळी आर्ट।
आधी वंदन तिच्या पायी।
शाहीर तिची कीर्ती गायी।
जी-जी-जी असा जसा मला जमला तसा पोवाडा अभिनयासकट म्हटला. त्यानंतर एका इतर देखण्या मुलांपेक्षाही जरा अधिकच देखण्या मुलाने `सर्वात्मका सर्वेश्वरा’ ही कविवर्य कुसुमाग्रज यांनी लिहिलेली आणि पं. जितेंद्र अभिषेकी यांनी संगीतबद्ध केलेली आणि गायलेली प्रार्थना सादर केली. आम्ही सर्वच मंत्रमुग्ध झालो. त्या मुलाचा आवाज, शब्दोचार, गाणे सादर करण्याची पद्धत, बैठक उत्तम होतीच होती. शिवाय रूप देखणे भुलविणारे असेच होते. काळेभोर, कुरळे केस, घारे कोकणस्थ डोळे, गोरा रंग, रुंद खांदे, फार उंच नाही, फार बुटका नाही, असा बांधा! अरे, याला यापूर्वी मी कुठेतरी पाहिला आहे, कोण बरे हा आणि डोक्यात एकदम ट्युब पेटली. अरे! आपण याला खो-खोच्या मैदानावर बघितला आहे. पुण्यात त्यावेळी हाताच्या बोटावर मोजण्याइतके खो-खोचे संघ होते. त्यापैकी `सन्मित्र संघ’ आणि `नवमहाराष्ट्र’ संघ हे सतत परस्परांविरुद्ध शड्डू ठोकून उभे राहणारे संघ! मला बालपणापासूनच हुतुतू, खो-खो, आटापाट्या, लंगडी, मलखांब, कुस्ती, पळणे, पोहणे या मैदानी आणि मर्दानी खेळांची आवड असल्यामुळे पुण्यात या खेळांचे सामने असतील तर आवर्जून उपस्थित असतो, आजही माझे हे `व्यसन’ कायम आहे. तर सांगायचा मुद्दा हा की ह्या गाणार्या मुलाला मी मैदानावर बघितले आहे. आपली निवड या वासरांत होणार नाही अशी मनाची समजूत घालूनच मी थोड्या निराश मनाने घरी परतलो.
काही दिवसांनी पुरुषोत्तम करंडक स्पर्धा सुरू झाली. `चुकला फकीर मशिदीत’ या न्यायाने मी फर्गसनच्या अफी थिएटरमध्ये रोजच्या रोज हजेरी लावू लागलो. एके सायंकाळी सुरेश बसाळे आणि सतीश आळेकर त्या ठिकाणी मला भेटले आणि त्यांनी सांगितले `घाशीराम कोतवाल’च्या टीममध्ये जब्बारने तुझी निवड केली आहे. लवकरच आपण तालमी सुरू करत आहोत. निवडलेली सर्व मुले पुन्हा एकवार एकत्र जमली आणि त्यावेळी मला कळले की `सर्वात्मका सर्वेश्वरा’ ही प्रार्थना म्हणणार्या मुलाचे नाव आहे रवींद्र साठे. पूर्ण नाव आहे रवींद्र मोरेश्वर साठे. `मोरेश्वर साठे’ आपणास बातम्या देत आहे, हे वाक्य मी अनेक वेळा आकाशवाणी पुणे केंद्रावरून ऐकत आलो आहे. अच्छा! ये बात है।
`घाशीराम’च्या तालमीचा पहिला दिवस आठवला की आजही मला दरदरून घाम फुटतो. `चुकलं बामणोजी’, `माफी असावी बामणोजी’, `पाया पडतो बामणोजी’ असे सूत्रधारांच्या तोंडी असलेले संवाद म्हणता म्हणता मला फेपरे यायचे. पण कळ सापडावी आणि दरवाजा उघडावा असा प्रकार घडला आणि मी प्रमुख सूत्रधार म्हणून निवडला गेलो. मूळ `घाशीराम’च्या संहितेत सूत्रधार हाच निवेदक, गायक- म्हणजे कीर्तन, ठुमरी, लावणी, कव्वाली, पोवाडा- सर्व प्रकारचा गायक! माझ्यापाशी सर्वार्थाने ही शक्ती शून्य! याचा अर्थ `सूत्रधारांची भूमिका’ मी करणार नाही हे उघड. पण `देणेवाला जबभी देता पूरा छप्पर फाडके देता’ या न्यायाने माझा त्रिफळा उडाला नाही. उलट जब्बारने एका सूत्रधाराचे तीन बनवले आणि मला टीममध्ये कायम ठेवले. गद्य निवेदन, लोकसंगीताच्या बाजाची गाणी, अस्सल शास्त्रीय बैठकीवर आधारलेली गाणी रवींद्र साठे आणि भजन, अभंग, अभंगातून लावणी अशी गीते चंद्रकांत काळे अशी त्यांच्या त्यांच्या वकुबाप्रमाणे विभागणी झाली आणि तालमीला रंग भरू लागला. संगीतकार भास्कर चंदावरकरांनी मला धीर दिला. रानडे, तुम्ही तुमच्या पद्धतीने कसेही गात राहा, तुम्हाला सांभाळून घ्यायला डाव्या-उजव्या हाताला साठे, काळे आहेत. अशी आमची ब्रह्मा, विष्णू, महेश ही त्रिमूर्ती घाशीरामात प्रगट झाली. अर्थात स्नेहही वाढू लागला. स्वभावातीला खाचा-खोचा कळू लागला.

आम्हा तिघांचे, तिघांचेच काय `घाशीराम’मध्ये रंगमंचावर असो, अथवा रंगपटात असो, बारीक-सारीक काम करणार्या कलाकारांचा एक समूहाने अत्यंत जीव लावून काम करणार्या कलाकारांचा एकजिनसी संघ तयार झाला. रवींद्र, आज तो अडीच-तीन महिन्यांचा `घाशीराम’चा काळ नुसता डोळ्यापुढे उभारला तरी उरात दाटून येते. खरोखरच मंतरलेले, भारलेले आणि भारावलेले दिवस दिवस होते ते!
प्रोग्रेसिव्ह ड्रॅमेटिक असोसिएशन या संस्थेतर्फे महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेत पुणे केंद्रावरून भरत नाट्य मंदिराच्या रंगमंचावर १६ डिसेंबर १९७२ रोजी `घाशीराम’ पहिला प्रयोग रंगला. प्राथमिक फेरीचा निकाल जाहीर झाला. `घाशीराम’ दुसर्या क्रमांकाने निवडले गेले. आम्ही नाराज झालो, पण धीर खचला नाही. मुंबईच्या अंतिम फेरीत बाजी मारू हा आत्मविश्वास होता.
रवी, तुला तो दिवस स्मरणात आहे का? मुंबईची अंतिम फेरी जिंकण्यासाठी आपण सारे दुपारच्या वेळी पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात एकत्र जमू लागलो होतो. अजून गाडी निघायला थोडा वेळ होता. काहीजण अजून यायचे होते. माझ्या मनात नेमके काय आले ते बाप्पाच जाणे. मी तुला म्हटले- रवी गाडी सुटायला अजून वेळ आहे. चल आपण जवळपासच्या गणपतीचे दर्शन घेऊ, त्यांचे आशीर्वाद घेऊ आणि टाकोटाक परत येऊ. क्षणाचाही विचार न करता तू आणि मी जंगली महाराज रस्ता पार करून त्याच्यापुढे असलेल्या मॉडेल कॉलनी रोडवरच्या छोट्याशा गणपती मंदिरासमोर उभे राहिलो आणि भक्तिभावाने नमस्कार केला, मनोमनी काय मागायचं ते मागितले आणि एक शब्दही न उच्चारता जसे गेलो त्यापेक्षाही अधिक वेगाने बालगंधर्वाला पोहचलो. आज आठवण आली म्हणून हे तुला पत्राने कळवतो आहे.
रवींद्र नाट्य मंदिरातला `घाशीराम’चा प्रयोग भन्नाटच झाला, पण इथे माशी शिंकली. `घाशीराम’ हे नाटकच नाही, त्याची दखल घेऊ नये असा आग्रह काही परीक्षकांनी धरला. बडी बहस हुयी और `घाशीराम’को दूसरे नंबरपर रखा गया. तुला संगीताचे स्वतंत्र बक्षीस, जब्बारला दिग्दर्शन, मोहन आगाशेला अभिनयाचे आणि मला पुणे केंद्रावरील अभिनयाचे प्रशस्तिपत्रक अशी बक्षिसे मिळाली. पण पहिला नंबर हुकला याची बोच अनेक काळ मनात सलत राहिली.

त्यानंतर `घाशीराम’वर जो वादळ उठलं त्याचे आपण साक्षीदार आहोतच. `पीडीए’ दुभंगली आणि आपण तरुण तुर्कांनी सतीश आळेकर यांच्या शनवार पेठेतील घराच्या गच्चीवर दिनांक २७ मार्च १९७३ रोजी `थिएटर अकॅडमी’ या नवीन प्रायोगिक नाट्यसंस्थेच्या `श्रीगणेशा’ केला आणि नाट्य चळवळ पुन्हा जोमाने सुरू करण्याचा संकल्प केला. त्या दरम्यान `माधवी एक देणे’ या नावाचा पु.शि.रेगे यांच्या नाटिकेत तू काम करायचास, हे अंधुकसे स्मरते आहे. नाट्य चळवळ जिवंत राखण्यासाठी सोसायट्यांच्या गच्चीवर जाऊन आपले तरुण कलाकार `टीए’तर्फे एकांकिका, प्रयोग सादर करीत असत. काही काळानंतर आपण पुन्हा नव्याने `घाशीराम’ची उभारणी केली- आणि त्याचा पहिला प्रयोग फिल्म इन्स्टिट्यूटच्या तुझ्या शिक्षण संस्थेच्या थिएटरात केला, हा दिवस तुलाही चांगलाच स्मरत असेल.
तू एफ.टी.आय.आय.मधून साऊंड रेकॉर्डिंगचा शिक्षणक्रम पूर्ण करून मुंबई दूरदर्शन केंद्रावर नोकरीसाठी रुजू झालास. त्या अर्थाने तुझा पुण्याशी संबंध दुरावला. `घाशीराम’चा प्रयोग असेल तेव्हा मात्र सर्व अडचणींवर मात करून तू रंगमंचावर हजर. त्या दिवशीचा `घाशीराम’चा बालगंधर्वाचा प्रयोग तुला चांगलाच स्मरणात असेल. तिसरी घंटा झाली तरी तुझा पत्ता नाही. शेवटी तुझा वाट बघून नाईलाजाने तुझ्याविनाच प्रयोग सुरू केला. चंद्रकांत काळे आणि मी त्या दिवशी खिंड लढवत होतो. नानांची एंट्रीत झाली. नाना, गुलाबी आणि बावन्नखणीत गुंगलेले सारे ब्राह्मण राधा कृष्ण हरी, मुकुंद मुरारीच्या घोषणात नाचू लागले आणि अचानक नानांचा पाय मुरगळला आणि ते एकाच पायावर नाचू लागले. `घाशीरामा’ने त्यांचा तो मुरगळलेला पाय बैठक मारून आपल्या गुडघ्यांवर तोलला आणि (तुझ्याशिवायच) मी आणि चंदूने `नाचता नाचता काय घडले? श्रीमंत नाना जाया जाहले! पाय मुरगळले हो मुरगळले’ आणि मी नानांना विचारतो – काय घडले? असं नानाकडे बघून म्हणणार्या मी, कंबरेचे उपकरणे घट्ट आवळत रंगमंचावर प्रवेश करणार्या तुलाच पुढचे प्रश्न विचारले? कसे घडले? कोठे पडले? आणि परस्पर तूच उत्तर दिलेस धडपडले, तळमळले, अडमडले पाऊल वाकुडे पडले मग मी साळसूदपणे नानांकडे पाहात नेहमीचा प्रश्न केला, श्रीमंत! काय घडले? आणि नानांनीही तितक्या सहजपणे सानुनासिक आवाजात `काही नाही पाय जरासे मुरगळले आणि आम्ही तिघे आणि ब्राह्मणांचा जथा` पाय मुरगळलेले हो मुरगळले’ असा कोरस गात रंगमंंचावर आपापल्या जागी स्थिरावलो.
रवी, ह्या दिवशी मुंबईहून पुण्याला येताना असाच काहीसा प्रकार घडला होता आणि तुला प्रयोगाला यायला विलंब लागला होता. आलास तो एकदम रंगमंचावरच!
`सामना’ चित्रपटाची जुळवाजुळव सुरू होती. जब्बारचा हा पहिलाच चित्रपट. रामदास फुटाणे आणि गनबोटे हे त्याचे निर्माते. निळू फुले आणि डॉ.श्रीराम लागू हे त्यातील मुख्य कलाकार. इतर कलाकार निवडण्याचे जब्बारला पूर्ण स्वातंत्र्य होते. संगीत भास्कर चंदावरकर, गीतकार आरती प्रभू, जगदीश खेबुडकर असा सारा संच. `घाशीराम’मुळे आपण जब्बारच्या सहवासात होतोच. त्यानेच ‘घाशीराम’मधील कलाकारांना संधी देऊन रुपेरी पडद्यावर आणलं. त्यातील मी एक! आणि तुझ्या बाबतीत सांगायचं तर ‘सामना’मुळं तुझं जगच बदललं. भास्कर चंदावरकर आणि तुझं एक वेगळंच नातं. तुम्ही दोघेही फिल्म अँड टेलिव्हिजन संस्थेत प्राध्यापक, विद्यार्थी या नात्याने एकत्र काम करणारे. रोजचा सहवास. त्यांनी तुझ्या आवाजाचा पोत, तुझे शब्दोच्चार, तुझी गाण्याची आणि कष्ट करण्याची तयारी बरोबर हेरली. शिवाय तुझा साऊंड रेकॉर्डिंगचा अनुभव जाणला. तुझी प्रयोगशीलता त्यांना रुचली. ‘घाशीराम’ची तू सांभाळत असलेली शास्त्रीय संगीताची भक्कम बाजू ते नित्य पाहातच होते. जब्बारचेही तुझ्यावर आणि तुझ्या गायकीवर जबरदस्त प्रेम! या सर्वांचा परिणाम म्हणूनच ‘कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे…’ या ‘सामना’मधील थीम साँगची निर्मिती झाली. रवींद्र साठे! आजही तेच गीत तितकेच ताजे, टवटवीत आणि काळजाला पीळ पाडणारे आहे.
या गाण्याची तू सांगितलेली एक आठवण पुन्हा एकवार रसिक वाचकांना आवर्जून सांगावीशी वाटते. त्यावेळी तू दूरदर्शन, मुंबई इथं नोकरीला होतास. ‘फुलराणी’ भक्ती बर्वेही तिथंच काम करायच्या. चिं.त्र्यं खानोलकर म्हणजे आरती प्रभू १९७६मध्ये ऐन तारुण्यात निवर्तले. भक्ती बर्वे यांनी तुला विनंती केली की ज्या वेळी आरती प्रभूंच्या अंत्ययात्रेची दृश्ये दूरदर्शनच्या पडद्यावर दाखवली जातील, त्यावेळी त्यांनी लिहिलेल्या ‘कुणाच्या खांद्यावर…’ या गीतामधील एक कडवे ‘लाइव्ह’ गावे! बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून! तुला प्रत्यक्ष लाईव्ह गाणे गाताना भावना दाटून येतील आणि तोंडातून शब्द फुटणार नाहीत अशी शंका आली. म्हणून तुम्ही ते तातडीनं ध्वनिमुद्रित केले आणि तेच वाजवले गेले. वास्तविक या गीतात तीन कडवी आहेत. त्यातील दोन कडवी ‘सामना’मध्ये समाविष्ट आहेत. तिसरे कडवे अधिकच प्रभावी आहे ते असे…
अंत झाला अस्ताआधी, जन्म एक व्याधी
वेदनांची गाणी म्हणजे पोकळ समाधी
देई कोण हाळी त्याचा पडे बळी आधी
हारापरी हौतात्म्य हे त्याच्या गळी साजे
कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे!
मराठी रंगभूमीची आपली लाडकी फुलराणीही अशीच काळाच्या आधीच कायमची निघून गेली. या अचानक निघून गेलेल्या कलाकारांच्या वारंवार आठवणी येतात. तेव्हा आरती प्रभूंच्या काव्यपंक्ती डोळ्यासमोर तरळतात…
संपूर्ण मी तसं की
आहे नगण्य पर्ण
सांगेल राख माझी
गेल्यावरी जळून
समस्त कवींनो, कलावंतांनो, तुम्ही संपूर्ण तरूच आहात आणि तुमच्या उबदार छायेतच आम्हा लहान मोठ्या कलाकारांचा कलाप्रवास सुरू आहे.
‘घाशीराम’चे आपण तीन परदेश दौरे केले. त्यातील पहिला दौरा जर्मनी पूर्व आणि पश्चिम, फ्रान्स, इंग्लंड, हॉलंड, इटली अशा देशांचा होता. हा दौरा सर्वच दृष्टीने अतिशय गाजला. हे नाटक परदेशी गेलं नाही पाहिजे, असा मतप्रवाह असणारा एक पक्ष आणि कसे जात नाही तेच बघू, असे म्हणत आव्हान देणारा दुसरा प्रतिस्पर्धी आमचा पक्ष! हा सांस्कृतिक वाद त्या काळी (१९८०) इतका चिघळला की अवघा महाराष्ट्र-भारत आणि जगातील काही देशांतील लोकांचा तो वितंडवादाचा विषय झाला. अखेर गनिमी काव्याने शिवछत्रपतींच्या रणनीतीचा वापर करून आपण परदेशी पोहोचलो. आपले काही प्रयोग फ्रान्समध्ये पॅरिस शहरात होते. तेथे आपली राहण्याची सोय फ्रेंच कुटुंबात केली होती. मी आणि तू जिथं उतरलो होतो ती दोन्ही कुटुंबं शेजारी शेजारी असलेल्या इमारतीमध्ये होती. त्यांनी आपले आदरातिथ्य अत्यंत उत्तम रीतीने केले. एके रात्री आपले दोन्ही परिवार रात्रीच्या भोजनासाठी एकत्र जमलो. गप्पा सुरू झाल्या. फ्रेंच माणसे शक्यतो इंग्रजी बोलणे टाळतात. पण तरीही तोडक्या मोडक्या इंग्रजीत संभाषण, चर्चा सुरू झाली. त्यावेळी भारतात आणीबाणी सुरू होती आणि विनोबांच्या भाषेत सांगायचे तर ‘अनुशासन पर्व’ सुरू होते. आम्हाला सक्त सूचना होती की राजकीय विषय, आणीबाणी, इंदिरा गांधींची पॉलिसी याविषयी ब्र काढायचा नाही. जमलेल्या मंडळींमध्ये एक कोणीतरी पत्रकार असावा. चर्चेला तो नेमके हेच प्रश्न आम्हाला विचारत होता. त्याचे हे खोदून खोदून विचारणे तुझ्या नेमके लक्षात आले. अगदी शेजारी बसलेल्या मला, तू माझ्या मांडीला चिमटा काढत, ‘एक शब्द काढू नकोस’ असा इशारा दिला. त्याच्या वारंवार विचारल्या जाणार्या प्रश्नाला, आम्ही कलाकार मंडळी आहोत, राजकारणाशी आमचा दूरान्वयेही संबंध नाही हेच म्हणणे विविध रागात आळवून, रवी तू त्याला पटवण्याचा प्रयत्न करत होतास! दूरदर्शनसारख्या प्रसारमाध्यमात तू काम करत असल्याने हे सर्व प्रश्न अत्यंत चतुराईने परतवून लावत होतास… मला ‘गप्प’ करून आणि प्रश्नकर्त्याचे तोंड बंद करून. मी बोलत बसलो असतो तर इंग्रजी भाषेच्या नको इतक्या चिंध्या करून त्यांच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे देण्याची ‘नस्ती उठाठेव’ केली असती आणि विनाकारण गोत्यात आलो असतो.

परदेशी प्रयोगातला एक प्रयोग मला विशेष आठतो तो असा… आपला प्रयोग रशियाच्या नाट्यगृहात झाला. नाटक संपले आणि कर्टन
कॉल सुरू झाला. प्रेक्षकांच्या टाळ्यांचा गजर थांबेच ना! सहा-सात वेळा पडदा उघडला, पडदा मिटला. पण टाळ्यांचा आवाज वाढतच होता. मी सूत्रधार, त्यामुळे प्रेक्षकातील कोणी तरी यायचे आणि माझ्या हाती पुष्पगुच्छ द्यायचे. आपणा सर्वांच्या वतीने मी तो स्वीकारायचो. कलाकारातील केवळ ‘वयपरत्वे’ मान म्हणून मी हे स्वीकारायचो. त्या दिवशी प्रेक्षकांमधून एक रशियन मुलगी धावत धावत रंगमंचावर आली. तिच्या हातात छानसा पुष्पगुच्छ होता. सरावप्रमाणे तो स्वीकारण्यासाठी मी थोडासा पुढे सरकलो. पण तिने पुप्षगुच्छ निळ्या पगडीतल्या रवींद्र साठेच्या हाती दिला. टाळ्यांचा प्रचंड कडकडाट! त्या दिवशी मनाशी खूणगाठ बांधली. रामभाऊ, तुम्ही खुशाल रंगमंचावर चपळाईने धावपळ करा, `घाशीराम’चे कथानक प्रेक्षकांना उलगडून दाखवण्याचा अट्टाहास करा पण रवींद्र साठे तो रवींद्र साठेच! एक ठुमरी, एक कव्वाली, एक जोरकस तान, एक करुण आलाप-त्याच्यापुढे तुमचे सगळे कर्तृत्व फ्लॉप. असो रवींद्र! मी आणि चंदू काळे किती भाग्यवान! `घाशीराम’ची ठुमरी गाताना आम्ही दोघे अगदी तुझ्या शेजारी बसून तानपुरा वाजवण्याचं, छेडण्याचं मायमिंग करत असू.
जागी सारी रतियाँ
नाही समझत पिया
कैसे समझाऊ!
सुरुवातीच्या काही प्रयोगांत तू वरील ओळीच परत परत आळवायचास. एका प्रयोगाला पु.ल.आले होते. त्यांनी तुला विचारले, ‘अरे रवींद्र! तू पूर्ण ठुमरी का नाही गायलीस?’ तू म्हणाला, ’प्रसंगाच्या आवश्यकतेनुसार केवळ मधला वेळ भरून काढण्यासाठी मी ती गातो आणि ठुमरीचे पुढचे शब्द इथं कोणालाच ठाऊक नाहीत.’ त्यावर पु.ल. म्हणाले, ‘मी आहे ना! मी लिहून देतो तुला.’ त्याक्षणी त्यांनी कागद मागवला, पेन सरसावले आणि एका टाकाने अंतरा लिहून दिला…
सौतन के संग प्रीत बढाई
अब काहे को बनाये झुठी बतियाँ
पुढच्या प्रयोगापासून तू पुलंनी त्यांच्या हस्ताक्षरात लिहून दिलेल्या अंतर्यासह ठुमरी पेश करू लागलास आणि मला, `घाशीराम’च्या सर्व कलाकारांना आणि रसिकांना स्वर्गानंदाचा लाभ होत गेला. १९७२ ते १९९२ अशी अखंड २० वर्षे आपण `घाशीराम’चे प्रयोग महाराष्ट्रासह देशा-परदेशात गाजवले आणि मराठी नाटकाचा झेंडा जगाच्या पाठीवरही नाचवला.
‘तीन पैशांचा तमाशा’, ‘पडघम’ या नाटकांतही तू सहभागी होतास. तीन पैशांचा तमाशा या नाटकाचीr आठवण झाली आणि माझी कशी त्रेधातिरपीट उडाली याचा तू प्रत्यक्ष साक्षीदार आहेस. या नाटकात प्रचंड इच्छा असूनही मी भाग घेतला नव्हता. जब्बारने मला त्यातील सूत्रधाराची भूमिका देऊ केली होती. पण `घाशीराम’मध्ये मी सूत्रधारच असल्यामुळे त्याच धाटणीची भूमिका करण्याचे मी नाकारले. मग जब्बारने विजय जोशीला सूत्रधार बनविला. तो येणार नसेल तर मोहन आगाशे सूत्रधार रंगवू लागला. पण एक अशी वेळ आली की दोघेही उपलब्ध नाहीत. बालगंधर्वला संध्याकाळचा प्रयोग निश्चित झाला होता. प्रयोग रद्द करणे अशक्यच होते आणि कुणीतरी मला सूत्रधार करण्याची गळ घातली. शो मस्ट गो ऑन या न्यायाने मी सूत्रे आपणहून गळ्यात अडकवून घेतली. पण एकाही दिवशी संपूर्ण संचासह तालीम झाली नाही. तीन पैशाचा तमाशाची ऑडियो कॅसेट नंदू पोळने मला दिली आणि सोबत तीन पैशाचा तमाशाची टाईप केलेली संहिता (हे स्क्रिप्ट आजही माझ्या संग्रही जपून ठेवले आहे. जशी तू पुलंनी लिहून दिलेल्या ठुमरीचा कागद जपून ठेवला आहेस.) मी ऐकून आणि वाचून माझे संवाद चोख रीतीने पाठ करीत होतो. पण प्रत्यक्ष अशी एकही तालीम नाही. नाटकात पंचवीस-तीस स्त्री-पुरुष कलाकार, शिवाय भलामोठा वाद्यवृंद! स्टेजवर माईक वायरची भेंडोळी सापासारखी. मी ते नाटक प्रेक्षकांत किंवा विंगेत उभं राहून अनेक वेळा बघितले असल्यामुळे सूत्रधाराच्या हालचालींचे, त्याच्या संवादफेकीच्या वजनाचे ढोबळपणे निरीक्षण झाले होते. पण हौद्यातील वुâस्ती आणि मैदानातील कुस्ती यात जमीन आस्मानाचा फरक असतो, हे मी स्वानुभवातून शिकलो.
भरीस भर म्हणून जब्बारच्या उंबरठा (मराठी) आणि सुबह (हिंदी) या चित्रपटांचे शूटिंग त्याचवेळी येरवडा औद्योगिक विद्यालयात सुरू होते. नेहमीचेच यशस्वी आणि खात्रीचे कलाकार या यादीत माझेही नाव होते. पत्रकार तिरोडकरची एक छोटीशी भूमिका त्याने मला देऊ केली. ज्या दिवशी संध्याकाळी तीन पैशाचा तमाशाचा बालगंधर्वला प्रयोग होता त्याच दिवशी माझा उंबरठामधला स्मिता पाटीलबरोबरचा प्रेसमधला प्रसंग शूट होणार होता. रवी, तू त्या चित्रपटात साऊंड रेकॉर्डिस्ट म्हणून काम करत होतास. माझी अटकळ अशी की सकाळी शॉट होईल, मी घरी येईन. पुन्हा एकवार माझ्या हालचालींसह तीन पैशाचा तमाशाची तालीम करून आणि प्रयोगापूर्वी एक ते दीड तास आधी नाट्यगृहात जाऊन असतील त्या कलाकारांबरोबर किमान संवादांची तालीम करून प्रयोगाला उभा राहीन. पण कसचं काय अन् काय… लंचब्रेक झाला तरी माझा शॉटचा पत्ताच नाही. माझी आणि तुझी चुळबूळ वाढू लागली. कारण तूही तीन पैशांचा तमाशामध्ये गायकाची महत्त्वाची भूमिका करत होतास. अखेर दुपारी दोन-अडीच वाजता तिथल्याच प्रेसमध्ये शॉट सुरू झाला. माझ्या मनावर प्रचंड ताण. कारण अभिनयातील्या वाघिणीबरोबर- स्मिता पाटीलसमवेत माझा शॉट होता. सुदैवाने फर्स्ट टेक ओके झाला. अगदी कोणाचीही परवानगी न घेता आपण तिथून सटकलो. मिळेल ती रिक्षा पकडून बालगंधर्वला पोहोचलो. आपण आल्याचे दिसताच अण्णा राजगुरुने ‘हुश्श’ करून दिलेला हुंकार आजही माझ्या कानात घुमतो आहे. प्रयोग सुरू झाला आणि सर्वांच्या सहकार्यामुळे तो सुव्यवस्थित पार पडला. माझ्यामुळे ‘पडला’ नाही ‘कोसळला’ नाही, हीच त्या नटेश्वरची कृपा. तरी एका वाक्यावर मी फाफललोच. खाण तशी माती आणि कापूस तशा वाती असं एक वाक्य सूत्रधाराच्या तोंडी आहे. माझी आई खाण तशी माती आणि कुंभार तशी लोटी अशी म्हण वारंवार वापरायची. अनावधानाने मी तसेच म्हणालो. रंगमंचावर कुणीतरी कुचकट हसलं. त्या कुचकट हसण्याचा दुर्गंध दर्प आजही माझ्या नाकाला जाणवतो. नदी में डुबके मरना यार, तुम शादी मत न करना चालीवर मी आजही म्हणू शकतो,‘नदी मे डुबके मरना यार, पर कभी भी नाटक में सबस्टिट्यूट रोल मत करना…’
रवी, एका वेगळ्याच कारणामुळे तू आणि तुझी पत्नी यांनी माझ्या हृदयात स्थान निर्माण केले. आपला दोघांचा मित्र कै. विलास आडकर एका महाराजांच्या गीतलेखनाचा प्रकल्प संगीतबद्ध करत होता. मी त्यांच्या शब्दात आवश्यक ते बदल करण्यासाठी, काही नवीन कडवी लिहून देण्यासाठी सहाय्य करत होतो. आमचा मुक्काम मुंबईतच होता. गायक म्हणून सुरेश वाडकर, सुदेश भोसले, देवकी पंडित, अनुराधा पौडवाल, रवींद्र साठे, आरती दीक्षित, आरती अंकलीकर असे बडे बडे कलाकार होते. गाणे ध्वनीमुद्रित झाल्यावर तुमचे कॅश पेमेंट करण्याचे काम काही वेळा मला करावे लागले. तुझे चार गाण्यांचे रेकॉर्डिंग झाले आणि घरी परत जाताना बर्यापैकी मोठी रक्कम असलेले पाकीट तुझ्या हाती ठेवले. तू गेलास आणि आम्ही पुढील कलाकाराच्या गाण्याच्या ध्वनीमुद्रणासाठी तयारी करू लागलो. दुसर्या दिवशी तुझ्या पत्नीचा, सौ. नूतनचा मला फोन आला. ‘अहो रानडे. काल तुम्ही रवीला मानधनाची रोख रक्कम दिली, त्यात ठरलेल्या रक्कमेपेक्षा पाच हजार रुपये अधिक आले आहेत. रवीने ते मोजून पाहिले आणि आमची खात्री पटली की रक्कम जास्त आली आहे. ती मी बाजूला काढून ठेवली आहे. आपली भेट झाली की मी ती तुमच्या हवाली करेन.’ त्याक्षणी मी तुम्हा उभयतांना मनोमन साष्टांग प्रणिपात केला. इतका निर्मळ, प्रामाणिकपणा आजवर अनुभवायला मिळणं म्हणजे केवळ अशक्यच! मी पुढील वाक्य आवर्जून लिहितो आहे. तो प्रकल्प पूर्ण झाला. सर्वांचे सर्व मानधन दिले गेले. ते पाच हजार रुपये ज्याचे त्याला परत केले. माझे मानधन एका गुरुपौर्णिमेच्या दिवशी शाल, श्रीफळ, पेढे, पुष्पगुच्छ यासह अर्पण करण्यासाठी विलास आडकर माझ्या घरी येणार होता. पण हाय रे दुर्दैवा! ती गुरुपौर्णिमा उगवण्यापूर्वीच विलास हे जग सोडून कायमचा निघून गेला. कालाय तस्मै नम:!
माझी काही लेखनकामही सुरू असते हे तुला माहिती आहे. गण, गवळण, लावणी, बतावणी, पोवाडा, भावगीत, भक्तीगीत, प्रेमगीत, अभंग, ओवी, विराणी अशा अनेक प्रकारच्या रचना मी करत असतो. महाराष्ट्र वाल्मिकी ग. दि. माडगूळकरांचा मी एकलव्य शिष्य आहे. मी लिहिलेल्या काही रचना तू स्वतः आनंद मोडक, राहुल घोरपडे, ओंकार केळकर यांच्या संगीत मार्गदर्शनाखाली गायल्या आहेस. पण त्यांना हवी तशी प्रसिद्धी मिळाली नाही आणि मला गीतकार-कवी म्हणून मान्यता मिळाली नाही ही माझ्या मनीची खंत तुझ्यासारख्या मित्राजवळ व्यक्त करताना किंचितही कमीपणा वाटत नाही.

तुला एक गोष्ट निश्चितपणे लक्षात आली असेल की तू इतका मोठा नामवंत पार्श्वगायक आणि उत्तम ध्वनी तंत्रज्ञ असूनही मी त्या गुणांचा अधिक ऊहापोह या पत्रात केला नाही. कारण मला शंभर टक्के माहिती आहे की या क्षेत्रातला मी कानसेन आहे, तानसेन नाही. आपल्याला ज्या विषयातले काहीही कळत नाही आणि त्यावर मी तारे तोडणार नाही, हे तत्त्व मी तंतोतंत पाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. ‘बालिश बहू बायकांत बडबडला’ अशी आपल्या हीन-दीन पतित अवस्था व्हायला नको.
मध्यंतरी आपल्या ओझरत्या भेटीत तुला तुझा आजवरचा पार्श्वगायन, ध्वनिमुद्रण आणि इतर सांसारिक प्रवास, अनुभव लिहून काढ असा आग्रह करत होतो. ‘अरे मी माझे आत्मचरित्र लिहायला गेलो तर माझे बालपण सुखवस्तू कुटुंबात गेलेले, बालपणी मला सर्व सुखसोयी सहजपणे प्राप्त झालेले आहे. मी का हे सगळे लिहू?’ असे तुझे अनपेक्षित उत्तर आले. आपल्या आपल्या क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी बालपणी गरीबीच असली पाहिजे, म्युनिसिपाल्टीच्या दिव्याखाली बसूनच अभ्यास केला पाहिजे, चार दारी ‘ओम भवति भिक्षां देही’ म्हणत झोळी घेऊन दारोदार माधुकरी मागितली पाहिजे, अशा काही अटी नसतात. प्रश्न हा असतो की मिळालेल्या संधीचा तुम्ही किती प्रामाणिकपणे उपयोग केलात, ध्येयाकडे दृष्टी ठेवून तुम्ही कशी वाटचाल केलीत. आयुष्यात तुम्हाला कसे कडू-गोड अनुभव आले. कोणते बरेवाईट सहकारी मिळाले आणि आज तुम्ही कुठे कसे आणि कुठवर जीवन प्रवास केलात! माझ्या मते तू हे सारे शब्दबद्ध केले पाहिजेस.
अगदी नेमकी तारीख सांगतो- २० नोव्हेंबर २०१५, वार- गुरुवार, संध्याकाळी सात-साडेसातच्या सुमारास आपण तुझ्या पुण्यातील डहाणूकर कॉलनीतील ब्लॉकमध्ये भेटलो. सोबतीला होते तुझी पत्नी नयन, माझी पत्नी संजीवनी आणि नुकतीच अमेरिकेमधून पुण्याला आलेली माझी धाकटी कन्या डॉ. आरती रानडे. आपल्या छान गप्पा रंगल्या. तू तुझ्या आठवणींची पोतडी आमच्यासमोर उघडी केलीस. खिचडी, कढी, पापड आणि लोणकढं साजूक तूप असा साधा, स्वादिष्ट, चविष्ट बेत! अन्नदाता सुखी भव असं म्हणत आपण पानावरून उठलो. पोटोबा शांत झाला होता आणि काही वेळातच ‘ती’ गोड बातमी आमच्या कानी घातलीस. मी माझे अनुभव लिहून काढले आहेत. ८० टक्के काम पूर्ण झाले आहे. उरलेले लवकरच लिहून काढीन. प्रकाशकाबरोबर प्राथमिक बोलणी झाली आहे. छायाचित्रे, मला आलेली पत्रे, पारितोषिके, मानपत्रे, सन्मान, पुरस्कार सारे साहित्य मी आणि नयन एकत्र करीत आहोत.
वा रवी वा! आज ७ फेब्रुवारी २०२६ तू वयाची ७५ वर्षे पूर्ण करून ७६व्या वर्षांत पदार्पण करतो आहेस. हे तुझे आयुष्याचे अमृतमहोत्सवी वर्ष! या शुभदिनी तुझे आणि तुझ्या सर्व परिवाराचे अभिष्टचिंतन. भावबंधनमधल्या भोळ्या धुंडिराजाच्या शब्दांत ‘दोन हस्तक आणि एक मस्तक नमवून सादर नमस्कार आणि केवळ वयाचा वडीलपणा मिरवून तुला अनेक शुभाशीर्वाद!’ तुझे पुस्तक वाजत गाजत, संगीताचे सप्तसुरात निनादत कधी प्रकाशित होणार याची अत्यंत उत्सुकतेने वाट पाहतो आहे हा तुझा मित्र.

