अभिनेता टायगर श्रॉफ आपल्या ‘हीरोपंती-2’ या सिनेमाचे चित्रीकरण येत्या 3 एप्रिलपासून सुरू करणार आहे. हे शूटिंग मुंबईतच सुरू होईल. निर्माते साजिद नाडियाडवाला आपल्या या सिनेमाच्या प्री-प्रोडक्शनच्या कामात सध्या व्यस्त आहेत. ‘बागी-2’ आणि ‘बागी-3’ पाठोपाठ ‘हीरोपंती-2’द्वारे टायगर आणि दिग्दर्शक अहमद खान तिसऱ्यांदा एकत्र काम करणार आहेत. प्रोडक्शनमधील एका सुत्राने सांगितले की, ‘हीरोपंती 2’चे पहिले शेड्यूल मुंबईत पार पडणार आहे. यानंतर कोविडचे संकट कमी झाले तर पुढील शूटिंग देशीतील अन्य काही लोकेशन्सवर होणार आहे. शूटिंग सुरू झाल्यावर यातली नायिका तारा सुतारिया या टीम मध्ये आठवडाभरानंतर सामील होणार आहे. निर्माते साजिद यांनी यापूर्वीच संगीतकार ए. आर. रहमान आणि गीतकार मेहबूब या प्रसिद्ध जोडीलाही या टीममध्ये समाविष्ट करून घेतले आहे. ए. आर. रहमान, गीतकार महबूब आणि दिग्दर्शक अहमद खान या त्रयीचा ‘रंगीला’ सुपरहीट झाला होता. ‘हीरोपंती 2’ याच वर्षी 3 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.