तोफा गर्जणार नाहीत. गोळीबारही नसेल. कदाचित कळणारही नाही. कळेल तेव्हा उशीर झालेला असेल. सारं काही संपलं असेल. पण परिणाम तोच. संहार महाभीषणच झाला असेल. सर्वस्व गमावताना हतबलतेनं पाहण्याशिवाय हाती काहीच नसेल. कारण हातातील शस्त्रे-साधने सारे सारे आपल्या हातात असली तरी नियंत्रण अन्य कुणीतरी बळकावलेलं असेल. हे सारं वाचताना एखाद्या विज्ञानकथेसारखं वाटू शकतं…हॉलिवूडच्या साय-फाय चित्रपट मनात झळकू शकतो पण हे असं घडू शकतं. नव्हे; त्याची झलक मिळू लागली आहे. कारण आता काळ अणुयुद्धाच्याही पुढचा म्हणजे सायबर युद्धाचा आहे.
वीज यंत्रणेवरचा चिनी हल्ला एक अलर्ट कॉल
गेल्या वर्षी १२ ऑक्टोबरला आपल्या मुंबईतील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यामागे चिनी हॅकर्सचा हात असल्याचे उघड झाले. त्यादिवशी सुमारे १० ते १२ तास वीजपुरवठा खंडित झाला होता. वीज पुरवठा खंडित होण्याचा सर्वात मोठा प्रकार म्हणून त्या घटनेचा उल्लेख झाला. त्याचवेळी अनेक जाणकारांनी थेट नाही पण आडवळणाने किंवा खाजगीत संशय व्यक्त केला की हा घातपात असावा.
नेमका त्याचवेळी भारत आणि चीनदरम्यान गलवानच्या खोर्यात संघर्ष सुरू होता. काही दिवसांपर्ू्वी अमेरिकेतील
न्यूयॉर्क टाइम्सने तशा आशयाची बातमी एका सायबर संस्थेच्या हवाल्याने दिली. त्यानंतर तो विषय सायबर हल्ला म्हणून चर्चेत आला. खरंतर आपल्या महाराष्ट्र सायबर पोलिसांच्या तपासाचा निष्कर्ष तसाच निघाला होता. मात्र, तो अहवाल नंतर सादर झाला.
सीमेवर तणाव आणि भारतात शत्रूंकडून सायबर घातपात हे प्रथमच घडलं असं नाही. यापूर्वी पुलवामात पाक पुरस्कृत भेकड दहशतवाद्यांनी सीआरपीएफ बसवर भ्याड हल्ला केला होता. त्याचवेळी पाकिस्तानी हॅकर्सनी भारत सरकारशी संबंधित अतिसंवेदनशील अशा ९० वेबसाइट हॅक करण्याचा प्रयत्न केल्याची बातमी आली होती. त्यांचा उद्देश भारतीयांमध्ये सरकारबद्दल, सरकारी यंत्रणेच्या सज्जतेबद्दल गोंधळ निर्माण करण्याचा होता. पण पाकिस्तानी हॅकर्सना ते पूर्णपणे जमले नाही. त्यांना भारतीय वेबसाइटच्या फायरवॉल आणि अन्य सुरक्षेला भेदता आले नाही. त्याचवेळी टीम आय-क्रू या भारतीय हॅकर्स समूहाने मात्र पाकिस्तानच्या वेबसाइट हॅक करून त्यांच्या होमपेजवर पुलवामा शहिदांना श्रद्धांजलीचे संदेश आणि पेटती मेणबत्ती पोस्ट केली.
अमेरिकन माध्यमांमधील महाराष्ट्रातील वीज यंत्रणेवरचा चिनी सायबर हल्ला बातमीचा केंद्र सरकारच्या ऊर्जा मंत्र्यांनी तातडीने इन्कार केला. एक प्रकारे त्यांनी महाराष्ट्र सायबरच्या अहवालाकडेही दुर्लक्ष केले. खरंतर असे होऊ नये. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील विषयांच्याबाबतीत तरी राजकारण होऊ नये. पण आपल्याकडे ते सर्रास होते. तसे या प्रकरणातही झाले.
अनेकांना राष्ट्रीय सुरक्षेच्या दुष्टीने महत्वाचे विषय आणि सायबर हल्ले याचा संबंध जोडलेले खटकेल. शक्य आहे. पण तेच लक्षात घेतलं पाहिजे. काळ बदलत आहे. युद्धाचे स्वरूपही बदलत राहणार आहे. आणि युद्धाची साधनंही. सध्याचा काळ हा डिजिटल युगाचा आहे. त्यात परंपरागत साधनं, रणनीती हे सारेच कालबाह्य होत जाणार आहे. त्यामुळेच व्यक्ती असो संस्था असो की राष्ट्र…प्रत्येकानेच नव्या युगातील नव्या युद्धाची नवी शस्त्रे, नवी साधने, नवी रणनीती समजून घेतली पाहिजे.
सायबर हल्ले म्हणजे नेमकं काय?
सायबर हल्ले म्हणजे कोणत्याही शस्त्राचा वापर न करता इंटरनेटच्या माध्यमातून इतरांच्या काँप्युटर सिस्टममध्ये केला गेलेला घातपात. हा व्यक्तीच्या, संस्थेच्या किंवा देशाच्या बाबतीत असू शकतो. आता अनेकांना वाटेल, त्यात काय एवढं! अनेकदा आमच्या पीसीत, लॅपटॉपमध्येही व्हायरस येतो. काम मंदावते. होत नाही. भलते घडू लागते. यंत्रे बंदही पडतात. पण आम्ही आमच्या आयटी टीमकडून ते दुरुस्त करतो. आता तर आम्हाला फायरवॉल दिली आहे. काहीच जास्त त्रास होत नाही. मग उगाच सायबर हल्ल्यांचा बाऊ कशाला? खरं तर हेही सायबर हल्लेच. पण वैयक्तिक कमी महत्वाच्या सिस्टमवरील असल्यानं त्यांचं गांभीर्य कळत नाही. वैयक्तिक नुकसान कमी होत असल्यानं चर्चाही होत नाही. अनेकांना त्यातील गांभीर्यही कळत नाही. वैयक्तिक सायबर हल्ल्यांमागे फार मोठे तज्ज्ञ किंवा महागडी यंत्रणा असतेच असेही नाही. त्या व्यक्तीच्या स्थानावर ते अवलंबून असते. त्यामुळे त्याच्या परिणामाचे आकलनही योग्यरीत्या होत नाही. याउलट तेच जेव्हा एखादी मोठी कंपनी, वीज वितरणासारखी यंत्रणा, संरक्षण संस्था, वैद्यकीय संस्था यांच्याबाबतीत होतं तेव्हा ते प्रचंड मोठं आर्थिक नुकसान करणारं ठरतंच पण जीवघेणेही ठरू शकते. वीज वितरण यंत्रणा कोलमडल्याने काही नाही तरी उद्योगांचे शेकडो कोटींचे किंवा त्याही पेक्षा जास्त नुकसान झाले असेल. ही संहारकता लक्षात घेऊन या नव्या हल्ल्यांकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे.
हॅकिंग
सायबर हल्ल्यासाठी जे तंत्र वापरले जाते त्याला हॅकिंग म्हणतात. हॅकिंग म्हणजे एक प्रकारे दुसर्याच्या मालमत्तेत विनापरवानगी केलेले अतिक्रमण. बेकायदा प्रवेश. इंग्रजीत ट्रेसपासिंग म्हणतात तेच. पण ते प्रत्यक्षात एखाद्या वास्तू किंवा जागेत होते. जेव्हा दुसर्याच्या काँप्युटर सिस्टममध्ये त्यांची परवानगी न घेता प्रवेश केला जातो, तेथे बदल घडवले जातात, म्हणजेच अतिक्रमण केले जाते ते म्हणजेच हॅकिंग!
हॅकर कोण असतात?
हॅकिंग करतात ते हॅकर. एवढं सोपं सर्वांनाच माहित असतं. मात्र, हॅकिंग करणे किंवा हॅकर बनणे तसं सोपं नसतं.
हॅकिंगला सध्याच्या काँप्युटर सिस्टम्सची, संगणकीय भाषेची माहिती असतेच. ते त्यांच्यात प्रवीण असतात. केवळ आलं मनात आणि झालो हॅकर असं नसतं. आता हॅकिंगचे तर कोर्सही असतात. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देणारे. पण बरेच हॅकर हे हौसेखातर हॅकिंग करू लागतात. आपल्यापेक्षा दुसर्याचं काय चाललंय हे डोकावून पाहण्याची सवय असते पाहा. म्हणजे चालता चालता दुसर्याच्या घरात, गाडीत डोकावणे, सार्वजनिक ठिकाणी हळूच दुसरा मोबाइलवर काय करतो आहे ते पाहणे हे जसं सर्वसामान्यांपैकी अनेकांना आवडतं त्याच प्रवृत्तीतून काहीजण हॅकिंग करतात. अर्थात तसं करणारे हे खूपच हौशी, बरेचसे निरुपद्रवी असतात. पण त्याही पलीकडचे काही असतात. म्हणजे केवळ डोकावण्यावर न थांबता दरवाजे, खिडकी यांच्या कड्या उचकटवून, टाळे फोडून दुसर्याच्या मालमत्तेत बेकायदा प्रवेश करून आत बेकायदा कृत्य करतात तसे. ते हॅकर हे व्यावसायिक हॅकर असतात.
व्हाइट हॅट हॅकर
जे हॅकर नैतिकता पाळत हॅकिंग करतात ते व्हाइट हॅट हॅकर. चांगल्या उद्देशाने हॅकिंग करणारे म्हणून यांना एथिकल हॅकरही म्हटले जाते. यांना सुरक्षेसाठीही उपयोगात आणले जाते. त्यांना संस्था किंवा सरकार सेवेत घेतात.
ब्लॅक हॅट हॅकर
हे हॅकर नैतिकता वगैरे काही पाळत नाहीत. त्यांचा उद्देश सिस्टम क्रॅक करून कसंही करून आपला हेतू साध्य करणं हा असतो. त्यांना क्रॅकर्सही म्हटले जाते. खासगी माहिती चोरणे, अकाऊंट हॅक करणे, वेबसाइट हॅक करणे, सिस्टममध्ये घुसून विध्वंस घडवणे, काहीवेळा सिस्टम ओलीस ठेऊन खंडणी उकळणे असे अनेक गुन्हेगारी उद्योग ते करत असतात.
ग्रे हॅट हॅकर
यांना गुन्हेगारी उद्देशाच्या हॅकिंगमध्ये गैर वाटत नाही पण यांच्या संवेदना जाग्या असल्याने ते चांगल्या उद्देशानेही हॅकिंग करतात. काही वेळा वाईट तर काहीवेळा चांगले असे दोन्ही कामे करत असल्याने त्यांना ग्रे हॅट हॅकर म्हणतात.
हॅकर कोणतेही असो त्यांचे काम, त्याचा दर्जा हा त्यांची तांत्रिक माहिती, अनुभव यातून विकसित झालेल्या कौशल्यावरच अवलंबून असतो. मुख्यत्वे बहुतेक हॅकर (अपवाद वगळता) ओळख लपवूनच हॅकिंगची कामगिरी बजावतात. कधी त्या चांगल्या असतात तर कधी कारवाया असतात.
हॅकर नेमके काय काय करतात, तेही माहित असले पाहिजे. त्यासाठी वापरले जाणारे शब्द आणि त्यातून नेमके काय घडते तेही खूप वेगळे आहे. आपल्यातील अनेकांना तर आता हे वाचताना लक्षात येईल, हे तर आपल्या बाबतीतही झालेले, याला असे म्हणतात होय!
फिशिंग म्हणजे काय?
फिशिंग तसे नवे नाही. गेली अनेक वर्षे हा शब्द कानावर येतो. पण लोक भुलतात, फसतात. मासे पकडणारा जसं आमीष लावून मासे पकडण्याचं फिशिंग करतो तसंच हे फिशिंग. फक्त ऑनलाइन सायबर स्पेसमध्ये घडणारे.
म्हणजे कसे तर आपल्याला मेल येतात, मेसेज येतात. त्यात एखादी भन्नाट ऑफर असते. मोहात पाडणारी. अनेकदा आपण ती पाठवणारी बँक, संस्था खरंच त्यांचेच ते नंबर किंवा ईमेल आयडी किंवा वेबसाइटचा अॅड्रेस तोच आहे की काहीसा वेगळा, तेही तपासत नाही. किंवा तेवढी जागरूकता नसते. त्यातून मग लिंक क्लिक केली जाते, एकप्रकारे चोरांना दरवाजा उघडून दिला जातो.
बर्याचदा अशा लिंक पुरुषांना मोहात टाकणार्या साहित्याच्या असतात. एकप्रकारे व्हर्च्युअल हनी ट्रॅपच असतो. पण भले-भले भुलतात. फिशिंगला बळी पडतात. फसतात.
वैयक्तिक असेल तरी ठीक. मात्र, अनेकदा असे संस्था, कंपनी किंवा मोठी यंत्रणा यांच्याही सुरक्षेला धोक्यात आणणारे ठरते.
काही महाभाग तर मोहाने आंधळे होतात आणि नको ती सर्व माहिती भरून मोकळे होतात. म्हणजे चोरांना खजिन्याच्या सर्वच चाव्याच नाही तर चोरदरवाजेही दाखवले जातात.
कितीही मोह झाला तरी खात्री केल्याशिवाय पुढील माहिती शेअर करू नका:
– ई-मेल
– पासवर्ड
– यूजर आयडी
– पासवर्ड
– मोबाइल नंबर
– पत्ता
– जन्म दिनांक
– बँक खाते क्रमांक
– एटीएम-डेबिट, क्रेडिट खाते क्रमांक
– पिन क्रमांक
हॅकर हॅकिंग का करतात?
हॅकर हॅकिंग करतात ते स्वत:च्या फायद्यासाठीच. अगदी एथिकल म्हटले तरी त्यांना त्यातून समाधान आणि मानधनही मिळवायचे असतेच. त्यांना ते सरकार किंवा संबंधित संस्था देते.
ब्लॅक हॅट हॅकर आणि ग्रे हॅट हॅकर त्यासाठी गुन्हेगारांप्रमाणेच सुपारीचा किंवा खंडणीचा मार्ग स्वीकारतात. त्यासाठी ते शस्त्र न वापरता सॉफ्टवेअरसारखे पण विध्वसक असणारे मालवेअर वापरतात. थेट मानधन किंवा खंडणी न घेता, क्रिप्टोकरन्सीच्या रुपात घेतात. त्यामुळे कोणी दिली आणि कुणाला दिली ते शक्यतो सहज कळत नाही.
हॅकर खंडणीसाठी जी साधनं वापरतात ती व्हर्च्युअल म्हणजे आभासी असतात. पण तेवढीच विध्वंसक किंवा जास्तच घातक म्हटलं तरी चालेल.
रॅनसमवेअर म्हणजे काय?
आपण चांगल्या कामांसाठी वापरतो ते सॉफ्टवेअर सर्वांनाच माहित असते.
हॅकर त्यांच्या कारवायांसाठी मालवेअर तयार करतात. त्यांचा हेतू विध्वंसक घातकी असतो. त्यातीलच ज्या मालवेअरचा वापर खंडणीवसुलीसाठी केला जातो ते म्हणजे रॅनसमवेअर!
रॅनसमवेअर ज्या सिस्टिममध्ये जाते तेथे ते सर्व डेटा ताब्यात घेते. आता तुम्हाला वाटेल असं कसं होऊ शकेल? तर आठवा एखादा गुन्हेगार एखादी बँक कशी ताब्यात घेतो? एखादा हायजॅकर विमान कसं ताब्यात घेतो? तेथे ते शस्त्राचा धाक दाखवतात, येथे हॅकर सिस्टीममध्ये घुसून सर्व महत्वाचा डेटा फाइल्स एनक्रिप्ट करतात. एकदा एनक्रिप्शन झालं की विशिष्ट कोडशिवाय इतर कुणी ते वापरू शकत नाही. एनक्रिप्शन हा शब्द सध्या माहितीचा आहे. आपले मेसेजेस एन्ड टू एन्ड एनक्रिप्शन केलेले असा दावा केला जातो. मध्ये कुणीही ते वाचू शकत नाही. तसंच हॅकरनं रॅनसमवेअरने एनक्रिप्ट केलेला डेटा मूळ यूजर म्हणजे मालकच वापरू शकत नाही. त्यांची सिस्टमच तो हॅकर ओलीस ठेवतो. अखेर खंडणी दिली की मग डेटाची सुटका! तसे केले नाही. क्रिप्टोकरन्सी या आभासी चलनात खंडणी दिली नाही तर डेटा नष्ट करण्याची धमकी ही गुन्हेगारांनी ओलीस ठेवलेल्यांना ठार मारण्याची धमकी दिल्यासारखीच!!
सायबर वॉरचे कोण लक्ष्य?
हॅकर, रॅनसमवेअर हे सर्व कमी वाटावं असं असते ते सायबर वॉर!
कारण वैयक्तिक किंवा व्यावसायिक पातळीवर होणार्या अशा घटना सायबर विश्वाच्या अफाट पसार्यात काही केबीच्या म्हणाव्या लागतील! पण जेव्हा हेच हॅकर मोठे योद्धे बनून देशासाठी किंवा काही दहशतवादी संघटनांसाठी सक्रिय होतात तेव्हा मोठा धोका निर्माण होतो. त्यातूनच मग गरज भासते ती अत्याधिक सायबर सुरक्षेची.
महत्त्वाच्या वेबसाइट लक्ष्य
हॅकर सरकारी वेबसाइटना लक्ष्य करतात तसेच महत्वाच्या कंपन्यांच्या वेबसाइट किंवा त्यांचे सायबर जाळे हे आवडते असते.
अनेकदा देशाची मानहानी करण्यासाठी, सुरक्षेच्या संदर्भातील गोपनीय माहिती चोरण्यासाठी सरकारी यंत्रणेला लक्ष्य केले जाते. पण आता कॉर्पोरेट हॅकिंगही वाढले आहे. काही हॅकर औषध कंपन्यांचे फॉर्म्युले, इतर क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या हालचाली, रणनीती माहिती करून देण्याची कामे करतात. अर्थातच त्यासाठी गडगंज शुल्क घेतले जाते.
पण याच सर्वात धोकादाय्काक घातपात घडवणारे असतात ते सरकारी पाठिंब्याने काम करणार्या काही हॅकर टोळ्या.
पुलवामानंतर भारतीय सरकारी वेबसाइटला लक्ष्य करू पाहणारे पाकिस्तानी हॅकर, महाराष्ट्रात वीज घातपात घडवल्याचा संशय असलेले चिनी हॅकर हे सर्व त्या-त्या सरकारने पाळलेले सुपारीबाज हॅकरच असतात. त्यांना सरकारी संरक्षण असल्याने त्यांना अधिक प्रभावीरीत्या काही कारवाया करता येतात.
भविष्यात हे हॅकर आणखी जास्त घातकीपणे काही कारवाया अगदी थेट विध्वंसक सायबर वॉर छेडू शकतात असं अॅड. प्रशांत माळी यांच्यासारखे अनुभवी सायबर तज्ज्ञही सांगतात.
सावध, ऐका पुढल्या हाका
सायबर वॉर हे काही आता पुढचाही धोका नाही. धोका होऊ लागला आहे. व्यक्ती ते राष्ट्र. सर्वांसाठीच हा धोका त्या-त्या पातळीवर घातपाती ठरतो आहे. त्यामुळे खरंतर सर्वांनीच सावध झालं पाहिजे. देशाने तर जरा जास्तच. पुढे तर हा धोका अधिकच वाढच जाणार आहे. एडवर्ड स्नोडेन या एथिकल हॅकर योद्ध्याचं नाव मध्यंतरी खूप चर्चेत होते. त्यात त्यांनी अनेक देशातील सरकारांची गोपनीय माहिती उघड केली होती. त्याने केलेल्या दाव्यानुसार भारतीयांशी संबंधित किमान ६.३ अब्ज गोपनीय माहितीपर्यंत हॅकर पोहचू शकतात. ही माहिती सरकारी यंत्रणेकडील आहे. याचा अर्थ हॅकर सरकारी यंत्रणेच्या सायबर जाळ्यात घुसखोरी करणे अशक्य नाही. त्यामुळेच आता सावध होऊन पुढच्या हाका ऐकणे खूप गरजेचे आहे. आज काहीसा धोका जाणवत असेल.
भविष्यात जो घातपात होईल तो असा:
– हॅकर देशाची इंटरनेट व्यवस्थाच हॅक करून देशाच्या संपर्क यंत्रणेलाच पंगू बनवतील.
– अर्थकारण सध्या खूप महत्वाचं, त्यामुळे अर्थसंस्थांच्या सिस्टमनाच हानी पोहचवण्याचा घातपात वाढेल
– देशांना जोडणार्या डेटा केबलना धोका असतोच, तो वाढताच असणार
– हॅकर देशातील वीज यंत्रणा बिघडवतील, त्याचे परिणाम घातकी ठरतील.
– हॅकर मोठ्या धरणांच्या सिस्टीममध्ये घुसून वाट्टेल त्या वेळी वाट्टेल ते दरवाजे उघडून वाट्टेल तसा विध्वंस घडवू पाहतील.
– हॅकर हवाई नियंत्रण सिस्टममध्ये घुसून हायजॅकर्सपेक्षाही मोठा घातपात करू शकतील.
– रेल्वे, मेट्रो, महामार्ग या वाहतूक मार्गांनाही हॅकरकडून धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
– भविष्यातील ९-११ घातपातासाठी विमानात जाण्याची गरज नसेल तर कुठेतरी जगाच्या कोपर्यात बसून कपटी हॅकर ते घडवू शकतील. आणि त्यापेक्षाही मोठा घातपात.
– अणुऊर्जेच्या, अणुशस्त्रांच्या सिस्टममधील घुसखोरी अशक्य मानली जाते, पण हॅकरसाठी माणसांनी बनवलेले काहीही बिघडवणे अशक्य नसते, तीही माणसेच असतात. जरा जास्तच कुशाग्र बुद्धीची!
देश काय करतो आहे?
सायबर हल्ले, सायबर वॉर, सायबर घातपात यांचे धोके ओळखत सरकारी यंत्रणाही गेली काही वर्षे कार्यरत आहे. पण केवळ फायरवॉल, अँटी व्हायरस म्हणजे सुरक्षा या भ्रमातून बहुसंख्य सरकारी अधिकार्यांना बाहेर यावे लागेल. आपल्या सायबर तज्ज्ञांनी केलेले प्रयत्न चांगले आहेत. पण दिवसेंदिवस तंत्रज्ञान बदलते आणि हॅकरची शस्त्रेही. त्यामुळे सतत बदलतं अद्यावत तंत्रज्ञान आपल्याकडेही असलेच पाहिजे.
राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण
भारताने मनमोहन सिंह पंतप्रधान असताना २०१३मध्ये राष्ट्रीय सायबर सुरक्षा धोरण ठरवले आहे.
देशाच्या पायाभूत सुविधांना होऊ शकणारा धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षेसाठी रणनीती ठरवण्यावर विचार झाला होता.
पुढे त्यानुसार पावलं उचलली गेलीत. सध्या बरीच सुरक्षा केली गेली आहे. परंतु ती पुरेशी आहे, असे मानून चालणार नाही. आभासी वास्तवाच्या या युगात आता धोके मात्र वास्तविक आहेत. त्याचे घातपाती दुष्परिणाम तर जास्तच घातक. त्यामुळे आपल्याला सावध राहावंच लागेल. त्यासाठी राजकारण बाजूला ठेवत, राष्ट्राच्या सायबर सुरक्षेला कडेकोट करावे लागेल. फुलप्रूफ काही नसतंच, पण किमान कोणीही यावं आणि हॅक करून जावं एवढं तकलादू काही नसावं. त्यासाठीच गरज आहे, ती आपल्या जबाबदार पदांवर बसलेल्यांनी सायबर सुरक्षा सज्ज करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे…अर्थात त्यासाठी आपल्या मानसिकतेच्या सिस्टममधील आभासी वास्तवात रमण्याचे इनबिल्ट व्हायरस नष्ट कराले लागतील. तसं व्हावंच!
– तुळशीदास भोईटे
(लेखक www.muktpeeth.com या मुक्तमाध्यम उपक्रमाचे संपादक आणि सोशल मीडिया सल्लागार म्हणून कार्यरत.)